असंच... भरकटलेलं


माझं हे नेहमीचं आहे; इतरही बऱ्याच जणांना कदाचित असा अनुभव असेल. म्हणजे, शांत बसलेलं असतांना, किंवा काहींना अंथरुणावर आडवं झाल्यावर झोप लागेपर्यंत (मला डोळे मिटल्यावर ०.७३ सेकंदात झोप लागत असल्यामुळे माझं सोडा!) डोक्यात विचार येतात. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा... शांत तळ्याच्या पृष्ठभागावर, अतिशय हलक्या पडणाऱ्या पावसाच्या थेंबांनी लहानलहान इंटरसेक्टिंग वलयं निर्माण व्हावी तसे. पण विचार प्रकाशाच्या वेगाने येत असल्यामुळे, दोनच मिनिटात आपण अरेच्चा! हा आत्ताचा विचार एकदम कुठून आला ह्याचा मागोवा घेऊ लागतो. हां, ह्याच्यावरून ते आठवलं, आणि त्याच्यावरून ते हे... असे विचारांचे ब्रेडक्रम्ब्स चाचपडत आपण मागे जायचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचदा अर्ध्या रस्त्यावर पुन्हा हरवून जातो; तिसरंच काहीतरी आठवल्यामुळे.

तलतच्या 'तसवीर तेरी दिल मेरा...' ह्या गाण्यासंबंधी मी नुकतंच लिहिलं होतं. त्याच्याबाबतीत माझं तसं झालं. हे माझं फार आवडतं गाणं; पहिल्यांदा बहुतेक १९७० च्या सुमारास ऐकलेलं. तोपर्यंत तलतची 'जलते हैं जिसके लिये', 'जायें तो जायें कहाँ' सारखी लोकप्रिय फिल्मी गाणी थोडीफार ऐकली होती; पण तलत मेहमूद ह्या नावाचं गारुड अजून निर्माण झालं नव्हतं. उन्हाळ्याच्या सुटीत पुण्याला गेलो असतांना तलतच्या एका लाईव्ह मैफिलीला जाण्याचा योग आला; आणि त्यानंतर तलतच्या आवाजाचं आणि गाण्यांचं व्यसनच जडलं. त्या मैफिलीमध्ये तलतने त्याच्या शिरस्त्याप्रमाणे पस्तीसेक सर्वाधिक लोकप्रिय गाणी एकामागून एक, मूळ चालीत कणमात्रही बदल न करता अचूक गायली. हा शिरस्ता, ही गाणी लोकप्रिय आहेत, अचूक गातो आहे, वगैरे गोष्टी नंतर तलत जास्तजास्त ऐकू लागल्यावर, त्याच्या आणखी काही मैफिलींना गेल्यावर समजलं. ह्यातली बरीचशी गाणी प्रथमच ऐकत होतो. त्या काळी टेप रेकॉर्डर वगैरे फार कॉमन नसत; त्यामुळे आवडती गाणी ऐकायला मिळण्याचं भाग्य हे केवळ रेडिओच्या कृपेवर अवलंबून असे. पण गर्दीच्या ठिकाणी नवीनच ओळख झालेलं माणूस नंतर पुन्हापुन्हा दिसू लागावं, किंवा दिसल्यावर आता ओळखता येऊ लागावं, तसं रेडिओवर तलत मेहमूद हे नांव ऐकू आलं, की कान टवकारून पूर्ण गाणं ऐकलं जाई. 'तसवीर तेरी' हे गाणं सुद्धा सर्वप्रथम पुण्याच्या त्याच कार्यक्रमात ऐकलं होतं. खरं म्हणजे गैरफिल्मी गाणी हा प्रकार सुद्धा तेव्हा माहिती नव्हता; आणि तरीही ह्या गाण्याची जोरदार फर्माईश झालेली पाहून, त्या पहिल्या अनुभवातच शब्द, चाल आणि तलतचा आवाज सर्वच फार आवडल्यामुळे, त्याचे बरेचसे शब्द मनात राहिले. गैरफिल्मी असल्यामुळे ते रेडिओवर अतिशय क्वचितच लागे.

नव्याने भेटलेलं माणूसच नव्हे, त्याला ओळखणारी माणसंही जशी भेटायला लागतात (किंवा आता त्यांच्याकडे लक्ष जातं) तसे इतर तलत प्रेमी मित्र भेटू लागले, वाढू लागले. शिरीष कणेकरांचं लिखाण मी तेव्हा मासिकांमधून वगैरे थोडंफार वाचलं होतं (फिल्लमबाजी, कणेकरी सारखे कार्यक्रम, कॅसेट्स वगैरे अजून बाजारात आले नव्हते); त्यातच त्यांचा तलत वरचा एक लेख वाचला, आणि कणेकरांनी मला खिशात टाकलं! तलत आवडणारा, त्याची एवढी गाणी माहिती असलेला हा माणूस म्हणजे थोर वगैरेच ह्यात काही शंका नव्हती. माझ्या हिंदी गाण्यांच्या आवडीवर चांगले संस्कार घडवण्यात कणेकरांचे लेख आणि रेडिओ सिलोन ह्यांचा फार मोठा वाटा आहे! अशातच अचानक कुठेतरी तलत च्या गाण्यांवर आणखी एक लेख वाचला. कणेकर ही हिंदी गाण्यातली एकमेव ऑथॉरिटी असं मानणाऱ्या मी चमकून 'हा कोण संप्रती नवा पुरुषावतार' म्हणून आश्चर्याने लेखकाचं नांव पाहिलं - माधव मोहोळकर! कणेकरांपेक्षा पार वेगळ्या शैलीतला तो लेख एवढा सुंदर होता, की त्यानंतर त्या लेखकाचं नांव कधी विसरूच शकलो नाही. त्या लेखाच्या सुरुवातीलाच 'तसवीर तेरी' विषयी एक मोठा हृद्य किस्सा आहे. गाणी आवडतात म्हणून कौतुकाने बसवून 'अरे हे ऐकलंयस का? ऐकून तर बघ' असं म्हणत खजिना रिता करणारे दिलदार लोक मलाही भेटले आहेत; इराणी 'हॉटेलां' मधून पाच-दहा पैसे टाकून मीही ज्यूकबॉक्सवर गाणी ऐकली आहेत म्हणून असेल कदाचित, पण मला त्या लेखातल्या आठवणी फार जवळच्या वाटल्या; आणि हाही लेखक आवडीचा झाला.

मोहोळकरांवरून आठवलं; कित्येक वर्षांपूर्वी रत्नाकर मतकरींशी गप्पा मारतांना हिंदी गाण्यांचा विषय निघाला. त्यांना जुन्या हिंदी गाण्यांची एवढी आवड आहे मला माहिती नव्हतं. त्यावेळी मी मोहोळकरांच्या लेखाचा उल्लेख केला, आणि तो लेख असलेलं 'गीत यात्री' हे पुस्तक आता आऊट ऑफ प्रिंट असल्याविषयी हळहळलो. मतकरींकडे ते पुस्तक होतं; त्यांनी मला लगेच तो लेख दाखवला, आम्ही त्याबद्दल आणखी बोललो. दुसऱ्या दिवशी, त्यांनी त्यांच्या एका माणसाहस्ते त्या पुस्तकाची एक प्रत मला घरी पाठवून दिली होती! तलत बरोबरच, त्या पुस्तकात मजाज, साहिर, गीता दत्त, शैलेंद्र अशा माझ्या लाडक्या इतरही दिग्गजांवर तसेच सुंदर लेख आहेत. माझ्या लायब्ररीतील मतकरींच्या इतर पुस्तकांमध्येच मी ह्याला स्थान दिलं आहे, त्यांची आठवण म्हणून. माझा खजिना तो! पण त्याच्याहीपेक्षा जास्त मौल्यवान आहेत त्या मतकरींच्या निर्हेतूक प्रेमाच्या आणि आपुलकीच्या आठवणी! माया अँजेलु चं एक सुप्रसिद्ध विधान आहे - लोक तुम्ही काय बोललात, तुम्ही त्यांच्यासाठी काय केलंत ते विसरूनही जातील; पण तुम्ही त्यांना कसं वागवलं होतं हे ते कधीच विसरणार नाहीत! बऱ्याचदा हे विधान तुम्ही लोकांना कसं *वाईट* वागवलं होतं अशा नकारात्मक अर्थाने जास्त वापरलं जातं; पण स्वानुभवाने मी सांगू शकतो, तुम्ही लोकांना किती चांगलं वागवलं, हेही ते आयुष्यभर विसरू शकत नाहीत. निदान कृतज्ञतेला एक सर्वोच्च गुण मानणारी माझ्यासारखी लोक.

त्यावरून आठवलं, माणसांच्या वागण्याची, 'पाप-पुण्याची' माझी एक थिअरी आहे. असल्या ह्या थिअऱ्या प्रत्येकाच्या स्वतःच्या, आपापल्या अनुभवांवरून बनलेल्या, आणि वेगळ्या असतात. 'हाऊ टू' पुस्तकं लिहिणाऱ्यांची गोष्ट वेगळी; पण सहसा एकाच्या थिअऱ्या दुसऱ्याला उपयोगी पडतीलच असं नाही. आणि तसंही हे थोडं भरकटणंच आहे, त्यामुळे वोह किस्सा फिर कभी! इथे एवढंच म्हणतो, इतर लोक आपल्याशी चांगलं वागणं हे एक ऋण असतं, पण ते दरवेळी फेडून टाकून सेट्ल नाही करता येत. त्यासाठी मानलात, तर फक्त 'पे इट फॉरवर्ड', आपण त्यातून धडा घेऊन दुसऱ्याशी चांगलं वागणं, हा एकच उपाय असतो.

...बघितलंत, एका विचारातून कसे दुसरे आणि तिसरे विचार मनात येत जातात... भरकटलेले!

Comments