माझा 'मोठा' मित्र



वर्षानुवर्ष चष्मा वापरल्यानंतर माझी दृष्टी फार चांगली नाही याचा अंदाज आलाच होता. जवळून बघत असलेल्या माणसाच मोठेपण जाणवत नाही, हा बहुतेक त्या दृष्टीदोषाचाच परिणाम असावा. रत्नाकर मतकरींच्या बाबतीत तसच थोडस झालं. त्यांची माझी ओळख म्हटली तर खूप जुनी, (माझ्या) लहानपणापासूनची; पण त्यांच्या खऱ्या ओळखीचा, सहवासाचा योग आला तो बऱ्याच उशिरा. ते त्यांच्या पहिल्या अमेरिका भेटीमध्ये माझ्याकडे राहिले, त्यांच्या बरोबर चक्क 'ब्रॉडवे शो' (A Chorus Line) बघायची संधी मिळाली, पहिल्याच भेटीत तासन तास गप्पा मारत बसलेला हा मनुष्य प्रसिद्ध लेखक आहे, मोठा यशस्वी नाटककार, दिग्दर्शक आणि नट सुद्धा आहे, मान-सन्मान, अनुभव, ज्ञान, वय या सगळ्या मापानी खूपच मोठा आहे, हे विसरून, माझ्याच बरोबरीच्या मित्राशी माराव्यात तितक्या सहजपणे मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो, वाद घालत होतो. आणि त्यांनी याची कुठेही जाणीव करून दिली नव्हती! याच्या पूर्वीची, खूप आधीची ओळख म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा मित्र म्हणून ते आमच्या घरी येत असत. त्याही काळी ते 'बालनाट्य' तर्फे लहान मुलांसाठी अतिशय दर्जेदार आणि मनोरंजक नाटक लिहित आणि सादर करत होते, दिलीप प्रभावळकर आणि अजय वढावकर सारख्या नंतर खूप प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्यांना मी प्रथम पाहिलं ते बालनाट्यच्या नाटकांमधून! पण त्या काळात, वयातल्या फरकामुळे 'मोठी' माणस ही सगळी परग्रहावरच्या प्राण्यांच्या इतकीच दूरची वाटत, मी त्यांच्या वाऱ्यालाही उभा रहात नसे, गप्पा मारण तर दूरच!

पुढे शाळा-कॉलेज मध्ये असताना 'नवल' सारख्या मासिकांमधून प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या गूढ कथांनी मोहिनी घातली होती (ती अजूनही ओसरली नाही!). 'बोलावण', 'रंगांधळा', 'जेवणावळ', 'तुमची गोष्ट' अशा अनेक गोष्टी अजूनही डोक्यात बसलेल्या आहेत! आता त्या पुन्हा पुन्हा वाचताना, शेवटच्या वाक्यातला धक्का आता परिचित असल्याने, किंवा वाढलेल्या वयाने, त्या गोष्टींचे दुसरे पैलू दिसायला लागतात. त्यातल मानवी भीतीच मानसशास्त्र, गूढ गोष्टीच गूढ आकर्षण - हे सगळ जास्त जाणवायला लागत. तरीही, प्रत्यक्ष मतकरींच्या तोंडून 'बोलावण' ऐकताना पुन्हा पहिल्यासारखच थर्र व्हायला झाल होत. त्यांच्या 'लपा-छपी' आणि 'झोपाळा' नी असच भारून टाकलाय, की ते कोणी तरी एकपात्री कथाकथन करावच अशी फार इच्छा आहे.

गम्मत म्हणजे, मतकरींशी या सगळ्याबद्दल बोलताना, ते गप्पच राहतात, मी माझ्याच गोष्टींबद्दल त्यांना सांगत असल्यासारखे नुसते ऐकून घेतात. ते खरे बोलते होतात, ते नाटकांबद्दल, सिनेमांबद्दल, 'social issues' बद्दल, गाण्यांबद्दल, इतरांच्या कलाकृतींबद्दल. मग मात्र ते भरभरून, उत्कटपणे बोलतात. माझ्या सुदैवानी मला असे बरेच योग लाभले. हा लेखक खरा 'माणसांचा' चाहता आहे. माणसाच्या सगळ्या व्यवहारांमध्ये, सगळ्या पैलूंमध्ये त्यांना रस आहे. (न्यूयॉर्क मध्ये फिरताना सुद्धा, त्यांना प्रेक्षणीय स्थळांपेक्षा इथली माणस बघण्यातच जास्त रस होता. ट्रेन मधल्या, काळ्या कंडक्टरच दुर्बोध इंग्रजी ऐकताना, त्यांनी त्याला काय म्हणायचं असेल याच केलेलं काल्पनिक मराठी भाषांतर ऐकून माझी हसून हसून पुरेवाट झाली होती!)

माझे तर त्यांनी खूपच लाड केले - आभार मानायचे तरी किती गोष्टींचे! माझ्या सारख्या अकला वंताला शांतपणे त्यांचा मुद्दा समजावून सांगण्यापासून, त्यांच्या नवीन नाटकाच पहिलं वाचन इथे आमच्या घरी करण्यापासून, माझ्या आग्रहासाठी त्यांच्या कथा वाचून दाखवण काय, किंवा प्रत्येक मुंबई भेटी मध्ये आपुलकीनी घरी बोलावून गप्पांसाठी वेळ काढण काय! नुकत्याच (या वर्षी) झालेल्या भेटीत, त्यांनी त्यांचं 'रस गंध' पुस्तक मला दिल. चित्रपट, नाटक, साहित्य याबद्दलची ही 'आस्वादक समीक्षा' मला अतिशय आवडली. एका जाणकार मित्राने, इतर मित्रांशी, त्याला आवडलेल्या कलाकृतींची वैशिष्ट्य आणि उणीवा याबद्दलच्या मनमोकळ्या, सहज आणि सुबोध अशा मारलेल्या ह्या गप्पाच आहेत. त्यांच्या गप्पांप्रमाणेच, ह्या लिखाणातून कलाकृतींमध्ये काय आणि कस बघाव याचा एक सुंदर दृष्टीकोन मिळतो.

वेगवेगळ्या कला क्षेत्रांमध्ये एवढी मोठी कामगिरी केलेल्या या कलाकाराला गेली काही वर्ष योग्य ती हक्काची मान्यता मिळत आहे (२०११ मध्ये ते BMM - Chicago ला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते, त्यानंतर त्यांना महाराष्ट्रात आणि भारतात अनेक पुरस्कार मिळाले) याचा खुप आनंद आहेच, त्याही पेक्षा जास्त कौतुक आहे की त्यांच्यातला प्रयोगशील कलावंत अजूनही तितकाच बहरतो आहे. सिनेमाक्षेत्रातल्या पहिल्याच पावलाला मिळवलेल (राष्ट्रपती पदकासकट) प्रचंड यश कौतुकास्पद होतच, आता नुकत्याच मिळालेल्या 'चतुरंग' पुरस्काराने तर मन भरून आल. आणि 'आपल्या' माणसाच कौतुक करावस वाटल, म्हणून हा प्रपंच!

Congratulations, and all the best for his new projects!



Comments

  1. निव्वळ आदरापोटीच नव्हे तर एखाद्या मित्राने आपल्या ज्येष्ठ मित्राच्या विविध रुपड्यातील सांस्कृतिक जीवनातेल पैलू तितक्याच क्षमतेने उलगडून दाखवावेत अशा सुंदर रितीचे हे लेखन वाचतना नजरेसमोर श्री.रत्नाकर मतकरी तर आलेच पण त्याचबरोबर त्यांच्यातील मोठेपणाची एक जाणीव जाणवली ती म्हणजे तुम्ही स्वत:च म्हटल्याप्रमाणे वयाने तुम्ही लहान आहात म्हणून तुमच्याशी केवळ टाईमपास म्हणून ते संवाद करत नाहीत तर एक बरोबरीचा रसिक या नात्यानेच तुमच्याशी त्यांचे नाते राहिले, जे खरोखरी हृदयस्पर्शी असेच आहे. यंदा त्यानी वयाची ८० वर्षे पूर्ण केली आणि मला खात्री आहे की आजही त्यांचे मन साहित्यक्षेत्रातच गुंतलेले असणार. धन्यवाद तुम्हाला या लेखाबद्दल.

    ReplyDelete

Post a Comment

I would love to hear from you. Please post your comments here...