लहानपणी एक इंग्रजी बडबडगीत ऐकलं होतं. सोमवारी जन्मून रविवारी दफन झालेल्या कोणा सॉलोमन ग्रंडीची जन्मगाथा होती ती. बहुधा आठवड्याचे वार घोकून घेण्याचा मूळ उद्देश असावा, पण आमच्या मास्तरांनी त्यातून मानवी जीवनाची विफलता आणि अनिश्चितता आमच्या चिमुकल्या डोक्यात घुसवायचा प्रयत्न केला होता. बऱ्याच वर्षांनी, नायकच्या संदर्भात हे गाणं पुन्हा एकदा आठवलं, ह्यावेळी खरच मानवी जीवनाची अनिश्चितता जाणवल्यामुळे! ग्रंडी बेटा आठवड्याभरात लग्न सुद्धा करून मोकळा झाला होता, नायक तेवढा सुदैवी नव्हता.
हॉस्टेलमध्ये माझ्या बाजूच्या खोलीत रहात असे, एवढी ओळख पहिल्याच दिवशी झाली होती! माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा असावा, पीएचडी करत होता. लकबी हिंदी सिनेमातल्या राजकुमारसारख्या. तीच (कसली कोणास ठाऊक) मिजास! तीच रुबाबी! तसच 'तुम्हाला मर्त्य लोकांना काय कळणार माझ्या व्यथा' छाप हास्य! पण ह्याबरोबरच एक अतिशय निष्पाप, बालिश भाव, डोळ्यात अखंड एक अथांग कुतूहल सामावलेलं, व्यवस्थित दाढी करणं, केस कापणं वगैरे बुर्झ्वा कल्पनांचा विरोध चेहऱ्यावर कायम झळकत असलेला. ज्यांना बघितल्याक्षणी 'ह्याच्याशी आपलं पटण शक्यच नाही' अशी प्रत्येकाची खात्री होत असेल, अशा एकांड्या जमातीचा तो प्रमुख शिलेदार होता. कलंदर, विक्षिप्त पण अती-हुशार अशी बिरुदं मिरवणारी एक जमात प्रत्येक हॉस्टेलमध्ये असते, त्याचा उत्तम नमुना होता तो.
त्याच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा पहिलाच प्रसंग आला तो थोडा डरावनाच. नवीन असूनही, हॉस्टेलमधल्या जेष्ठ मंडळींशी भांडूनच मी हट्टानी म्युझिक रूमसाठी हिंदी सिनेसंगीताच्या रेकॉर्ड्स खरेदी केल्या होत्या. तोपर्यंत त्या खोलीच्या भिंतींनी शास्त्रीय संगीत सोडून काहीही ऐकलं नव्हतं. नवी कोरी रेकॉर्ड उघडून, माझं आवडतं रोशनचं 'आपने याद दिलाया' सुरु झालं, तोच रूमचा दरवाजा थडाडकन उघडल्याचा आवाज आला. मला तर वाटलं होतं, की तिथली शास्त्रीय संगीताची उच्च परंपरा विटाळली म्हणून काही स्थानिक संगीतमार्तंड मला शाप देऊन भस्म वगैरे करायला आले असावेत. पण बघतो तर, केस अस्ताव्यस्त पिंजारलेले आणि एकंदरीत झपाटलेल्या अवस्थेत माझा शेजारी आत येत होता. मी काही बोलायला जाणार, तेवढ्यात मला चूप राहण्याचा इशारा झाला. एका खुर्चीत मटकन बसून, पालथ्या मुठीवर हनुवटी टेकवून सबंध गाणं निस्तब्धपणे ऐकून झाल्यावर मला म्हणाला, रोशन कसा काय आला इथे? मी ही रोशन आवडणारा कोणीतरी भेटला, ह्या आनंदात त्याला माझ्या भांडणांची हकीकत सांगितली, घेतलेल्या इतर काही रेकॉर्ड्स दाखवल्या. हिंदी सिनेसंगीतात अगदी छत्तीस गुण जुळले, महत्वाचं म्हणजे तो माझ्याहीपेक्षा मोठा तलतवेडा निघाला. त्याचं नांव नायक आहे, कर्नाटकामधल्या उडुपी नांवाच्या गावामधून (आतापर्यंत ह्या नांवाची हॉटेलं फक्त माहिती होती) आलाय वगैरे गोष्टी कळल्या.
हळूहळू ओळख वाढत गेली. दर रविवारी संध्याकाळी हॉस्टेलची मेस बंद असे - त्या निमित्तानी चार बरे घास पोटात पडण्याची ती सुवर्णसंधीच असे. तेव्हा जाणवलं की चवीनी खाणाऱ्या थोड्या मुलांपैकी नायक एक होता. कॉलेजच्या दिवसात पैसे नेहमीच तुटपुंजे असत; पण त्यातल्या त्यात, महिन्याभरातून एखाददा, आम्ही हौजखास पासून ते पार चांदनी चौक आणि लाल किल्ल्याजवळच्या अनेक गल्ल्या खाण्याच्या शोधात धुंडाळत असू - नायक त्यात सर्वात पुढे. त्याला माहितीही बरीच होती, आणि निवडही चांगली होती. दिल्ली मध्ये जगप्रसिद्ध मानला जाणारा 'काकी दा धाबा' असो, का पराठेवाली, छोलेवाली अशा गल्या असोत, का ग्रेटर कैलाश मधलं 'ल्हासा' तिबेटी रेस्टॉरन्ट असो, नायकमुळे हे सगळं मला परिचित झालं.
साहजिकच गप्पांच्या ओघात जास्त ओळख पटली. त्याच्या घरचे लोक खेडवळ होते; खाऊन-पिउन सुखी असले, तरी बरेचसे अशिक्षित. हा देशाच्या राजधानीमध्ये काहीतरी मोठं शिकायला गेला आहे ह्याचं त्यांना फार कौतुक होतं. पण लवकरच 'डॉक्टर' होणार, मग गावात दवाखाना का उघडणार नाही हे समजावून सांगणं म्हणे त्याने कंटाळून सोडून दिलं होतं. खेडेगावातून आलेली अनेक मुलं मी कॉलेजमध्ये किंवा हॉस्टेलवर बघितली होती. बऱ्याचदा त्यांच्या खांद्यावर एक अदृश्य कावड असते - एकतर कमीपणाची किंवा त्यातून आलेल्या दिखाऊ उर्मटपणाची; कधी घरच्या गडगंज संपत्तीचा माज असतो. पण इथे ह्यातलं काहीच नव्हतं; त्रयस्थपणे तो मला त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी समजून देत असे.
एवढ्या लहानशा खेड्यातून आलेल्या नायकची समज अतिशय प्रगल्भ होती. पुस्तकं खाणाऱ्या ब्रम्हराक्षसासारखी त्याची वाचनाची भूक आणि झेप होती. मला आठवतंय, त्याच काळात मी 'फाउन्टनहेड' पहिल्यांदा वाचलं; झपाटल्यासारखी ती सातेकशे पानाची कादंबरी मी शनिवार सकाळ ते रविवार पहाट ह्या दरम्यान वाचून पुरी केली होती. पुरी झाल्याक्षणी एखादा साक्षात्कार झाल्यासारखं मला ते सर्व ओसंडून वाहणारं कौतुक कोणातरी बरोबर शेअर करायचं होतं. काहीच नाही, तर मोकळ्या हवेत फिरून आखडलेले पाय सुटसुटीत करायचे होते. हॉस्टेल बाहेरची चहाची टपरी आता, पहाटे साडेतीनला, अपेक्षेप्रमाणे बंदच होती. परत येतांना बघतो तर बाजूच्या खोलीत दिवा चालू; म्हणून टकटक केलं. नायक जागाच होता. मी माझा सगळा कौतुकाचा, आदराचा, आश्चर्याचा भर त्याच्यावर ओतला. असं पुस्तक कसं शतकाशतकातून एखाददाच लिहिल जातं, ह्यावर एक प्रवचन ठोकलं. त्याला बोलायची संधी मिळाल्यावर त्याने सांगितलं हे पुस्तक त्याने काही वर्षापूर्वीच वाचलं होतं, एवढंच नव्हे, बरोबर दहा-बारा इतर पुस्तकांची नांवं सुचवली, तिच्यावर 'उतारा' म्हणून! आयन रॅन्डचे विचार, तिच्या लिखाणातली पात्रं, हे आदर्शवादी जग फक्त एका वयातच सहज शक्य वाटत का वगैरे प्रचंड वादही आम्ही घातला. सहा वाजून गेल्यावर मेस कधी उघडली हे कळलंच नाही. चहाच्या दोन-चार कपानंतर तर चर्चा आणखीच रंगत गेली.
असे प्रदीर्घ वाद त्या काळात बरेच चालत. आणीबाणी उठवण्याचा ऐतिहासिक निर्णय इंदिराजींनी त्याच काळात घेतला होता. राजकारणामध्ये तोपर्यंत फारसा रस नसलेल्या मला, त्या काळातल्या दिल्लीतल्या वातावरणानीच झपाटून टाकलं. दर रोज नवीन बातम्या असायच्या, जगजीवन रामनी राजीनामा दिल्याच्या बातमीनी जणू सबंध दिल्लीमध्ये वीज सळसळली होती. चव्हाणही आता राजीनामा देतील, अशा अफवा आणि अपेक्षा होत्या. जनता पक्ष नुक्ता अंड्यातून बाहेर येत होता. आम्ही 'ज्युनिअर' मुलं अती भारावून निवडणुका, जनता पक्ष आणि लवकरच येऊ घातलेलं रामराज्य वगैरे अटीतटीनी चर्चा करू लागलो, की नायक त्याच्या खास मद्रासी हिंदीत आमचे फुगे फोडायचा - "कूच नइ यार, सब लीडर लोग साले आईसेइ बेकार ऐ; कूच बी बदलनेवाला नई".
एवढ्या जवळची मैत्री असल्यामुळे मला त्याच्या 'पिण्या'बद्दल पूर्ण माहिती होती. हॉस्टेलच्या आयुष्यात तेही एक कौतुकच असतं; त्यामुळे त्याचा मी कधी फार विचार केला नाही. दिल्लीतलं माझं दोन वर्षाचं शैक्षणिक वास्तव्य संपायला येत असतांना मला पहिल्यांदा समजलं, तो त्याच्या समवयस्क मुलांमध्ये देवदास म्हणून प्रसिद्ध होता. मी उडालोच होतो, कारण त्याची पारो आमच्याच हॉस्टेलमध्ये राहणारी, कारवारी मुलगी वसुधा होती. मागे बघता मला जाणवलं, कुठच्याही घोळक्यात वसुधा असली, तर नायक तिथून चार हात लांबूनच जात असे - त्या घोळक्यात मी असलो, त्याला बोलावलं तरी येत नसे. त्याच्या विक्षिप्त स्वभावाशी हे मला सुसंगतच वाटे; पण आता त्यातल्या दुसऱ्या छटा दिसू लागल्या. त्यांचा प्रेमभंग नक्की कसा झाला मला कधी कळलंच नाही. त्याला विचारण्यात अर्थच नव्हता; 'चोडो यार' एवढं सविस्तर उत्तर मिळालं. पण जे कानावर आलं, त्याप्रमाणे वसुधा फारच जुन्या संस्कारांच्या, परंपरागत रिवाजांमध्ये वाढलेली मुलगी होती. नायकची कलंदर वृत्ती, विशेषतः दारू पिणं, तिला झेपलं नाही. नायकनी हा वार फार खोल झाकून ठेवला होता, त्याचा सर्वात जवळचा, किंबहुना एकुलता एक, मित्र मी असूनही माझ्यासमोर कधीच त्याने तिचा उल्लेखही केला नाही.
लवकरच मी पुढच्या शिक्षणासाठी कलकत्त्याच्या कँम्पसवर रहायला गेलो. नायकशी संबंध तुटला. पत्राद्वारे संपर्क वगैरे ठेवण्याच्या बुर्झ्वा कल्पनेनी सुद्धा आमच्या दोघांच्या अंगावर शहारा आला असता. अशा परिस्थितीत वर्षभरानी मला खरच पत्र आलं, नायककडून! त्याचं पीएचडी पुरं झालं होतं, आणि पदवीदान समारंभासाठी तो कलकत्त्याला येणार होता. त्याच्या नेहमीच्या थाटात त्यानी ‘त्याची रहायची व्यवस्था माझ्याच दोन मजली हॉस्टेलमध्येच आहे’ ह्याच्याच खालच्या वाक्यात 'तुला जमणार असलं तर आपण भेटू शकू' असं लिहिलं होतं! मला मास्टर्स आणि त्याला डॉक्टरेट पदवी एकाच वेळी मिळाली. जुन्या दिवसांची आठवण म्हणून कलकत्त्यातल्या त्या वेळी पॉश समजल्या जाणाऱ्या पार्क स्ट्रीट वर जेवायला गेलो. मी सांगत असलेली पंजाबी आणि चिनी रेस्टॉरन्ट्स टाळून त्याने तिथे स्वतःच एक इटालिअन रेस्टॉरन्ट शोधून काढलं आणि 'मेरी ट्रीट' म्हणून घेऊन गेला. प्रचंड पीत होता हे मला सुद्धा जाणवलं; पण अतिशय खुशीत होता. घरच्यांच्या कहाण्या सांगत होता, व्हायव्हा मध्ये त्या अमक्यातमक्या स्टुपिड (त्याची आवडती शिवी) ला कसं निरुत्तर केलं ह्याच्या कहाण्या सांगत होता, प्लानिंग कमिशन मध्ये मोठ्या हुद्द्यावर नोकरी मिळत असल्याचं बोलला, त्या मारुतीच्या शेपटासारख्या अनादी अनंत स्पॅघेटीबरोबर चाललेली माझी झटापट बघून खदखदुन हसत होता. प्रचंड गप्पा झाल्या, बऱ्याच जुन्या आठवणी निघाल्या - एक वसुधाचा विषय सोडून. दुसऱ्या दिवशीच तो दिल्लीला परत गेला.
दिल्ली-कलकत्त्यामध्ये बरीच ये-जा असे. दोन तीन महिन्यानंतर मला बातमी मिळाली - तुझा तो नायक, गेला माहित्ये ना? त्या वयात अशा बातम्या इतक्याच निर्लेपपणे प्रसारित होतात. मी म्हटलं, नाही, कुठे गेला? मग समजलं, त्याला कावीळ झाली होती. काविळीसाठी जे पथ्य करायला हवं, ते तर सोडाच; पण इथे वेळच्या वेळी खाणं सुद्धा घडत नव्हतं. त्याला मी सोडून 'मित्र' कोणी नव्हतेच; सहसा तो कोणाशी बोलतही नसे. मी ऐकलं, की ह्या काविळीच्या दिवसात वसुधाने त्याची थोडी काळजी घ्यायचा प्रयत्न केला, पण त्याने तिला अजिबात दाद दिली नसेल ह्याचीही मला पूर्ण कल्पना होती. दुर्दैव असं, की दोन दिवसांनंतर तो खोलीतच गेला असल्याचं लोकांना समजलं.
मी ऐकून सुन्न होतो. ऐन विशीत असं कोणी जात नाही, 'जाणारे' लोक वयस्कर आणि म्हातारे असतात… निदान असे भक्कम विश्वास असतात त्या दिवसात. बरोबरीचं कोणी जाणं हे कल्पनेच्या पार बाहेर असतं. नायकच्या पुढे बरंच आयुष्य पडलं होतं. तो हुशार होता, त्याच्या विषयात तज्ञ होता, त्याला हवी ती मानमान्यता आता मिळणार होती, आणि ह्या सगळ्यापेक्षाही, तो माझा मित्र होता; कितीतरी तास मी त्याच्याबरोबर घालवले होते, त्याच्याकडून बरंच शिकलो होतो. खूप जुन्या आठवणी गोळा झाल्या.
आणि एकदम ती निर्णायक अखेरची ओळ आठवली ‘and that was the end of Soloman Grundy’!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...