आठवणीतले रस्ते

माझ्या ऑफिस-कम-लायब्ररी मधल्या 'पसाऱ्याकडे' टाकले गेलेले जळजळीत दाहक कटाक्ष जेव्हा नजरेआड करणे अशक्य झाले, 'हे सगळं ठेवायला हवंच आहे का?' असे गोडीगुलाबीच्या सुरातले प्रश्न दुसऱ्या कानातून बाहेर काढणं अशक्य वाटू लागलं; तेव्हा मी मनावर घेतलं की आता ही खोली थोडी साफ करायला हवी. कालच कपाटातली चांगली दोन खणांची राहती जागा सोडून खोलीतल्या फूटपाथावर स्वतःच्या इमारती रचायला लागलेल्या पुस्तकांपासून सुरुवात केली. बेकायदेशीर झोपडपट्टी उठवणाऱ्या पोलिसांच्याच थाटात! म्हणजे उचलायला लागल्याक्षणीच ते पुस्तक गयावया करत मुळात जमिनीवर किंवा टेबलावर बाजूला का ठेवलं होतं ह्याची आठवण करून देई; मग पुन्हा कपाटाच्या कैदेत पाठवण्याआधी हवा तो भाग चाळून घेणं आलंच, वगैरे. थोडक्यात काय, ह्या प्रकारात वेळ गेला. शेवटचा भारा घाईघाईनी कपाटात ठेवताना तिथले आधीचे रहिवासी धडाधडा जमिनीवर आले. 'उद्या बघू' म्हणून मी झोपायला गेलो.

आज सकाळी त्या खोलीत जाऊन बघतो, तर खोलीमध्ये रस्त्यांचा हा गराडा! हे माझं रस्त्यांचं वेड फार जुनं आणि जोपासलेलं! अमेरिकेतली सर्वात पहिली गोष्ट मनात भरली, आणि जास्त जास्त भुरळ पाडत राहिली, ती इथले रस्ते. एवढ्या खंडप्राय अवाढव्य देशातले, दृष्ट लागण्यासारखे सुंदर जपलेले रस्ते! लोकं फुलांचे, लहान मुलांचे किंवा पाळीव प्राण्यांचे फोटो काढतात, जमवतात; तसे मी रस्त्यांचे फोटो काढतो, जमवतो. सुंदर फोटो बघण्यासाठी लोक मासिकं गोळा करतात, तसे मी गेल्या कित्येक वर्षात मिळून इथल्या बहुतेक राज्यांचे नकाशे गोळा केले आहेत. फार पूर्वीच, अमेरिकन ऑटोमोबाईल असोसिएशन (ट्रिपल ) ची मेम्बरशिप त्यांच्या सुंदर नकाशांसाठी घेतली होती. (बरं का चिमण्या पाखरांनो, एके काळी किनई GPS किंवा गूगल मॅप्स नसायचे, मॅपक्वेस्ट नव्हतं, वेज नव्हतं... खरंतर सेल फोन सुद्धा नव्हते ... नाही, नाही, खरं सांगतोय, बंडला नाही! जगायची माणसं तशा परिस्थितीत सुद्धा! जाऊ दे, ती भयकथा पुन्हा केव्हातरी हं; आज झोपेत दचकून उठायला नको तुम्हाला.)

तर, कागदी नकाशांमध्ये रस्ते शोधायचे. दहा-बारा घड्या घातलेले, भले मोठे मॅप्स. प्रवासाला जाण्यापूर्वी, रस्ता हिरव्या, पिवळ्या, लाल 'मार्कर' पेनांनी चितारलेला असे. त्यात पुन्हा, ट्रिपल एचे अनुभवी आणि माहितगार तज्ञ माझ्यासारख्या दिवाण्यांना, खास, जास्त सुंदर, पण थोडे आडमार्गाने जाणारे रस्ते दाखवायचे. अर्थात मी काही एकटाच असा दिवाणा नाही, असंख्य अमेरिकन लोकांना निसर्गरम्य रस्त्यांचं आणि त्यावरून ड्राइव्ह करण्याचं वेड आहे. रीडर्स डायजेस्ट काय, किंवा फोडोर आणि पर्यटन विषयाला वाहिलेली तत्सम इतर अनेक मासिकं काय, '100 Best Drives in U.S.' किंवा ‘100 Most Scenic Drives in U.S.’ च्या याद्या सारख्या छापत असतात.

माझ्या कितीतरी आठवणी रस्त्यांच्या बरोबर जोडलेल्या आहेत. जशी आपल्या माणसांची आठवण येते, तशीच, तेवढ्याच तीव्रतेने एखाद्या रस्त्याची आठवण येते. त्यावेळचं आकाश, त्यावेळची हवा, गाडीत चालू असलेलं एखादं गाणं ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन येते. आता हेच बघा, गेली कित्येक वर्षं, कधीही 'जा रे बदरा बैरी जा' हे गाणं ऐकतांना मला न्यू हॅम्पशायर आठवल्याशिवाय रहात नाही. वीसेक वर्षांपूर्वी तिथे प्रवासात असतांना गाडीत ऐकलेलं हे सुंदर गाणं, त्या संपूर्ण निसर्गसुंदर अनुभवाचा एक सुश्राव्य भाग बनूनच राहिलं. हेमंत ऋतूमधल्या रंगांची उधळण बघण्यासाठी बाजूच्या व्हरमॉंटमध्ये आणि इथे बऱ्याच वेळा गेलो, पण मनात भरून राहिली आहे ती ९३ मधली ट्रिप. रंगांची इतकी सुंदर जमलेली मैफिल बघायचं भाग्य पूर्वी कधी लाभलं नव्हतं, आणि पुन्हा कधी वाटेत भेटलं नाही. इथल्या कॅन्कामागस हायवेबद्दल अशाच प्रवासी पुस्तकांमधून वाचलं होतं; पण प्रत्यक्षात दुतर्फा मेपलच्या घनदाट जंगलांनी सजलेल्या, लहानश्या खट्याळ हौशी मुलीसारख्या पावलापावलाला मुरडणाऱ्या रस्त्यावर हेमंताच्या ऐन बहरात - हो, हेमंताचाही बहर असतो, रंगांचा - गाडी चालवणं हा काय देवदुर्लभ आनंद आहे हे कळण्यासाठी तिथे जायलाच हवं. त्या दिवसात हवा जरा जास्तच स्वच्छ असते, आणि दिवसभर सूर्याच्या झळाळीमध्ये सगळी झाडं अंगावरचं लखलखीत सोनं मिरवत उभी असतात. त्यांचा हेवा वाटून की काय, त्यांच्या सावलीतले रस्त्यालगतचे झरे आणि तळी तीच झळाळी घेऊन चंदेरी चमचमत असतात. संध्याकाळ मात्र फारच लवकर होते आणि सगळे रंग अंधाराच्या पेटीत बंद करून टाकते, म्हणून हिरमुसायला होतं. तसं सगळंच न्यू हॅम्पशायर निसर्गसुंदर आणि डोंगराळ. पण त्यात पुन्हा व्हाईट माऊंटनचा भाग जास्तच सुंदर. डोंगराच्या एका कडेला दिसणारा, धुक्यातच लपून राहिलेला ‘Old man of the mountain’ चा चेहरा बघण्याचं भाग्यही बऱ्याचदा लाभलं होतं. २००३ मध्ये जेव्हा तो पडला, तेव्हा हळहळलेल्या अनेक लोकांमध्ये माझेही थोडे सुस्कारे होते.

रस्त्यांच्या आठवणी निघाल्या, की ग्रँड कॅनियनची आठवण अटळच! ग्रँड कॅनिअन च्या दक्षिण कडेला (साऊथ रिम) बहुसंख्य जनता जाते, कारण ते लास व्हेगासहून जवळ आहे आणि जायला सोयीस्कर आहे. पण त्याच कॅनिअनच्या उत्तर कडेला गेलं तर एकतर गर्दी कमी असते, आणि संपूर्ण अनाघ्रात निसर्ग बघायला मिळतो. जेमतेम अठरा मैल रुंद असलेल्या ह्या जमिनीतल्या खड्ड्याच्या दक्षिण कडे कडून उत्तर कडेला जायचं तर मात्र दीड-दोनशे मैलाचा फेरा आहे. 'पेन्टेड डेझर्ट' अशा अद्भुतरम्य नावाला सार्थ करणाऱ्या प्रदेशातून. मध्ये एकदा, डोंगरांमध्ये एवढी मोठी भेग चिरणारी ती बलाढ्य कोलोराडो नदी ओलांडावी लागते, पण त्या ठिकाणी ती नदी अगदीच भुईसपाट, विनम्र वाटते. तिच्या बाजूच्या डोंगरांचे पायथे मात्र एखाद्या राक्षसी डायनॅसोर काळातल्या महाप्रचंड हत्तींच्या पायांसारखे भेडसावत असतात. केवळ शतकानुशतकं चाललेल्या वाऱ्याच्या किमयेने मश्रूमसारखा आकार धारण केलेले वीस-पंचवीस फुटांचे धिप्पाड खडक विखुरलेले दिसतात. त्याच भागातल्या विस्तीर्ण पॉवेल लेक जवळ घालवलेली एक अप्रतिम शांत सुंदर संध्याकाळ आठवते. नंतर काळोखात केलेला - काळोख ह्या शब्दाचा खरा अर्थ माझ्यासारख्या शहरवासियांना समजावून देणारा, एकाकी रस्त्यावरचा प्रवास. अत्यंत नागमोडी, घाटातला रस्ता, संबंध रस्त्यावर फक्त आमची एकच गाडी, संबंध आसमंतात फक्त तिच्या दिव्यांचा पडणारा काय तो उजेड - अशा परिस्थितीत पस्तीस मैलानंतर एकदाचं ते नॉर्थ रिम लॉज दिसल्यावरचा अतीव आनंद, आणि त्या आनंदात दसपटींनी भर घालायला, जणू आमचीच वाट बघत पार्किंग लॉटमध्ये उभा राहिलेला तो बेडर काळवीट... सगळं कसं मनावर कोरून ठेवलेलं आहे.

तसाच एक दिव्य सुंदर रस्ता आहे, नॉर्थ रिमकडून युटामधल्या झायन पार्ककडे जाणारा. सुरुवातीचा ग्रँड कॅनियनचा डोंगर कपारींमधला अनंत वळणं घेणारा थरारक भाग सोडला, की हा रस्ता बऱ्यापैकी सरळ आहे. पण वाटेवरच्या कनाब गावाजवळ, तो चक्क आपण एखाद्या जॉन वेन किंवा क्लिंट ईस्टवूडच्या सिनेमाच्या  सेटवर चुकून आलो की काय अशी शंका निर्माण करतो! तस्सेच टाऊन स्क्वेअर्स आणि झुलती दारं असणारे बार्स! एक अदृश्य कोल्हेकुई कानांत गुंजायला लागते, आणि कुठल्याही क्षणी घोड्यांच्या टापा ऐकू येतील ह्याची खात्री होते. एक वेगळ्या प्रकारचं, ओसाड, ओकंबोकं सौन्दर्य! थोड्याच वेळात, अगदी अनपेक्षितरित्या झायनचं प्रवेशद्वार येतं ... आणि सर्वात सुंदर, (मला) अत्यंत अनपेक्षित 'सरप्राईज' म्हणजे, आणखी पाच मिनिटातच, आपण चक्क जगप्रसिद्ध 'चेकरबोर्ड मेसा' च्या बाजूनी गाडी चालवत असतो. ह्या प्रचंड, काटकोनात आखलेल्या उभ्या-आडव्या निसर्गनिर्मित रेषांच्या डोंगराचे फोटो खूप पूर्वीपासून बघितले होते, प्रत्यक्ष तो इतक्या अनपेक्षितरित्या (गूगल नसण्याचे तोटे... का फायदे!) समोर आल्यावर वाटलेलं आश्चर्य आणि आनंद अजून तसाच ताजा आहे.

सिनेमाच्या आठवणीबद्दल बोलायचं तर यलोस्टोनकडून माउंट रशमोरला जातांना संबंध वायोमिंग राज्य आडवा जाणारा रस्ता आठवतो. ह्या ट्रीपची तयारी करतांना अचानक शोध लागला होता, की 'क्लोज एन्काऊंटर्स...' सिनेमाचं शूटिंग केलं होतं तो 'डेव्हिल्स टॉवर' ह्याच रस्त्यावर आहे. मग मुद्दाम वाट थोडी वाकडी करून त्याचंही दर्शन घेतलं होतं. शेकडो फूट उंच असणारा हा सरळसोट खडक हे एकच आकर्षण, पण ते बघायला जाऊन येऊन शंभरेक मैलाचा फेर फटका पडला... अर्थात, 'राह बनी खुद मंझिल' असा प्रकार असतो तेव्हा शंभर मैलाची ऐशीतैशी. रशमोरच्या पुतळ्यांच्या भारावून टाकणाऱ्या भव्य उदात्त सौन्दर्याबद्दल वेगळं लिहायची गरजच नाही... पण मनात राहिलं आहे, ते तिथून निघण्यापूर्वी एकदा 'शेवटचं' (तिसऱ्यांदा) दर्शन घ्यावं, म्हणून रात्री, पार्क बंद झाल्यावर त्या दिशेनी जाताना पाहिलेलं दृश्य! रात्रीच्या मिट्ट काळोखात, बाजूला कसलाही इतर उजेड नसतांना, एका वळणावर अनपेक्षितपणे आकाशात समोर आलेला, दिव्यांनी उजळून टाकलेला लिंकनचा महाप्रचंड चेहरा. केवळ अविस्मरणीय!

आठवायला लागलं, की बघितलेले अनेक सुंदर रस्ते एकमेकाला मागे ढकलून मनाच्या तळापासून वरती येऊ बघतात. कॅलिफोर्नियामधला एका बाजूला पॅसिफिक समुद्राच्या आणि दुसऱ्या बाजूला कडेकपारींच्या गळ्यात हात टाकून जाणारा, आयुष्य ओवाळून टाकावं असा सुंदर रस्ता; उत्तरेला दुतर्फा शेकडो फूट उंचीच्या देवदार वृक्षांच्या जंगलामधून बारीकशी वाट काढत जाणारा 'अवेन्यू ऑफ जायंट्स'; नापा आणि सोनोमाच्या 'वाईन कंट्री' मधले तसेच धुंद मदमस्त रस्ते! व्हर्जिनिया/कॅरोलायना मधला, बाजूच्या प्रचंड गर्द झाडीतून, निळ्या लाटांसारख्या दिसणाऱ्या डोंगरमाथ्यांमुळे 'ब्लू रिज पार्कवे' नाव पडलेला अप्रतिम नागमोडी रस्ता, कोलोराडोमधले दहा-बारा हजार फुटांच्या उंचीवरून जाणारे, 'अमेरिकन आल्प्स' मधले रस्ते; फ्लोरिडाच्या दक्षिण टोकाला असलेल्या लहानशा बेटांच्या रांगांमधून दोन्ही बाजूला अथांग समुद्र कापत जाणारा करंगळीएवढा बारीक रस्ता...


किती सौन्दर्य बघायला मिळालं, ह्या माझ्या रस्ते-मित्रांनी आठवणींचा खजिना कसा समृद्ध केला ह्या जाणिवेनं मन भरून येतं. नाही, हा 'पसारा' नाही. आल्बम आहेत माझ्या आनंदाच्या आठवणींचे, हे नकाशे म्हणजे. जपून नीट खणात ठेवायला हवेत एवढं खरं - अगदी मनात असले तरीहीगुगल मॅप्स आणि GPS ला आता त्यांची गरज नसली तरीही.

Comments