गणेश चतुर्थी

लहानपणी, म्हणजे मी कदाचित सात-आठ वर्षाचा असतांना, आमच्या समोरच गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचं दुकान होतं. आॅगस्टपासूनच मूर्तींचे साचे बनवायला सुरूवात व्हायची. चाळीतल्या तळमजल्याच्या एका घराबाहेरच्या गॅलरीतच हा गृहोद्योग चालत असे. त्या कारागिरांनी मूर्तीची शाडू मळायला घेतलीकीच माझी पावलं तिथे रेंगाळायला लागायची. मग साच्यांमध्ये ती माती भरून ते घरात नेऊन ठेवले जायचे. एखाददोन दिवसांनी ते वाळून, पहिली बॅच बाहेर येईपर्यंत मला धीर नसे. (पहिली बॅच बाहेर आली, की रोज बाहेर गॅलरीत काहीतरी बघण्यासारखं असेच!)
एकदा का मूर्तीचा मूळ आराखडा उभा राहिला, की मग त्याची जडणघडण चालू व्हायची. सोंड बनवणं, साच्याचे सांधे घासून नीट गुळगुळीत करणं वगैरे. मला सगळयात जास्त रस असे, तो रंगकाम सुरू झालं की ते बघण्यात! गणपतीच्या अंगाचा तो तेजस्वी गोरापान रंग मिसळण्यापासून सुरुवात होत असे. त्या रंगाऱ्यांचं 'पॅलेट', छोट्या-मोठ्या वेगवेगळ्या आकारांचे ब्रश, एकात एक मिसळून नवीनच रंग निर्माण होण्याची जादू ... जबरदस्त गंमत असे हे सगळं बघत रहाण्यात. पाय दुखायला लागले, की शेवटी तिथून हलायला लागे. गणपती रंगवण्याच्या पण फेजेस असतात. प्रथम अंगाचा रंग, मग पितांबर, मग चेहरा - गंध, सोंडेवरच्या रेषा, दात, कान वगैरे - आणि शेवटी डोळे. पितांबर बहुतांश पिवळेंच असत - अर्थातच! - पण क्वचित काही मोरपिशी किंवा लाल किंवा गुलाबी सुद्धा असत. ह्यातले बरेचसे रंग इतरत्र बटबटीत वाटले असते, पण गणपतीचा पितांबर म्हणून ते सुंदरच दिसत. मग जानवं, हातावरच्या नाहीतर सोंडेवरच्या रेषा (नेहमी लाल चुटुक), मोदक अशा लहानसहान गोष्टी व्हायच्या. मोदक चांगला खरपूस तळलेला दिसेल असा सुंदर रंग द्यायचे ते लोकं.
त्यानंतर माझ्या दृष्टीनी ह्या रंगकामातला बेष्ट भाग सुरु होत असे - तो म्हणजे डोळे! ती अप्रतिम कारागिरी बघतांना खरोखर तिथून हलूच नाही असं वाटे. माझ्या डोळ्यादेखत मातीच्या गोळ्यातून साकार झालेल्या ह्या मूर्तीच्या देहात प्राण भरत असत ते डोळे. नंतर भटजी काय ते मंत्र म्हणून प्राणप्रतिष्ठा वगैरे करोत, पण माझ्या नजरेत डोळे रंगवून झाले की श्री गजानन महाराज तयार असायचे, घरी यायला! अर्थात, ते महाराज असल्यामुळे, त्यांना मुगुट आणि दाग-दागिने घालून नटवणं आलंच. मग तो सोनेरी वर्ख घातलेला रंग तयार करून त्यांच्या मुगुटाला लावायचा, बाजूबंद, गळ्यातले हार सगळं रंगवायचं... खरं तर घेणं नास्ती देणं नास्ती, पण मुगुटात इतर कुठच्याही खड्यांपेक्षा माणकं रंगवली की मला उगीचच जबरदस्त आनंद होत असे. सर्वात शेवटी, त्यांचं आसन, आणि मूषक महाशय रंगवले जायचे. ते तसं अगदीच सामान्य काम, दहा वेळा माझ्या तोंडावर येई, मला द्या ना तेवढं तरी करायला... पण उत्साही मुलांची कौतुकं (उर्फ 'नसते लाड') करण्याचा तो काळ नव्हता, त्यामुळे मी गप्पच बसत असे. न जाणो, रोज-रोज एक-दोन तास हे बघायला मिळतंय, तेही बंद व्हायचं, आणि वरती घरी समजलं की अभ्यास आणि खेळ (उर्फ 'व्यायाम') सोडून हे पोरगं रंगकाम बघत बसतं, तर उगीचच नसती पीडा!
त्याऐवजी, मी मनातल्या मनात खेळ रचत असे. कुठे जाणार असेल ही मूर्ती? त्या घरी आरास मन लावून, कौतुकाने करणारे लोक असतील, का वडिलोपार्जित कटकट गळ्यात पडली म्हणून निभावणारे लोक असतील. आरत्या अगदी ठेसात म्हणणारे, देवे-बिवे व्यवस्थित येत असलेले लोक असतील का? एवढे श्रम घेऊन घडवलेली मूर्ती दहा दिवस तरी ठेवतील, का दीड दिवसातच बाहेर काढतील? मूर्तीचं काय असेल ते असो, मला त्या न्यायला, हातात पाट घेऊन, टोपी-बिपी घालून, गंध लावून, झांजा वाजवणारी चार मुलं बरोबर घेऊन येणाऱ्या माणसांना बघण्याचंही कुतूहल असे. टॅक्सीमधून मूर्ती घेऊन जाण्याची पद्धत फार नंतर बघितली, आणि स्वतःची गाडी असणारे लोक त्या वस्तीत रहातच नसत.
गणेश चतुर्थी मनात राहिली आहे, ती अशी.

Comments