'नेहमीचं आहे हे हिचं. फालतू गोष्टींवरून कटकट करत बसायचं, आईचं डोकं खायचं आणि मग निघायला उशीर होतो. धावत धावत जाऊन कशीतरी बस गाठायची.' घरातून बाहेर पडतांनाच अमेयच्या डोक्यात विचार चालले होते. त्याची धाकटी बहीण मेघा आज काही नाही तर लंच बॉक्स कुठच्या रंगाचा न्यायचा ह्यावरून हट्ट करत बसली होती. 'जेमतेम शाळेत जायला लागली नाही तर एवढे नखरे तिचे, उद्या मोठी झाली की काय ताप देईल' - उगाच नाही आई-बाबा बारा वर्षाच्या अमेयला आजोबा म्हणत! असलेच काही तरी खुळ्यासारखे विचार करत तंद्री लागलेली असते त्याची. त्याच्या वर्गातली मुलं सुद्धा त्याची टिंगलच करत, शिक्षक खोचकपणे टोमणे मारत. आता सुद्धा तो वर्गात जाऊन बसला खरा, पण डोक्यात चक्रं चालूच. पहिलाच तास फिजिक्सचा - मास्तर काहीतरी रटाळ बडबडत असतात - गतिमान वस्तूबद्दल.
गती म्हणजे स्पीड, नाही? अमेय विचार करायला लागतो, एकातून दुसरा... खोल खोल जायला लागतो. गरगरा गोल फिरत असावं आणि थांबताच येऊ नये असा. मेघाच्या शाळेची बस कोपऱ्यावर थांबते, आपल्या घरातून तिथे पोचायला एक छोटा रस्ता, कॉलनीतलाच झाला तरी काय, क्रॉस करावा लागतो. मेघा धावत सुटलीय, रस्ता क्रॉस करतांना नीट बघत सुद्धा नाही - सगळं लक्ष त्या उभ्या असलेल्या बसवर, चुकली तर शाळा बुडणार, आई-बाबा रागावणार. बाजूच्या रस्त्यावरून तो नुकताच गाडी चालवायला शिकलेला मुलगा, बापानी एवढी छान नवी गाडी घेऊन दिल्येय. ती थेट इंडी ५०० मध्ये चालवायला निघाल्यासारखा सुसाट येतोय. त्याच तरी लक्ष आहे कुठे. ही कॉलनी आहे, लहान मुलं असतात - कशाचं काही नाही त्याला. तो आणि त्याचा तो भन्नाट रेडिओ! बस थांबल्येय. ड्राइव्हर मेघाला खूण करतोय 'चला लवकर' म्हणून. मेघा आणि बस, यांच्यामध्ये फक्त तो एक छोटा रस्ता - ती फुटपाथवरून उडी मारते, गाडी भलतीच वेगात येते आहे. अमेय डोळ्यापुढचं हे दृष्य बघत थिजून गेला आहे, त्याचा श्वास रोधलेला... नकळत त्याचे हात डोकं गच्च दाबून धरतात. त्याची किंकाळी त्या गाडीच्या ब्रेक्सचा आवाज खाऊन टाकतो.
' वा वा वा!, आमचे न्यूटन साहेब आज शरीराने तरी वर्गात आहेत! मनाने बहुतेक अजून सफरचंदाच्या बागेत असतील, डोक्यावरचं टेंगूळ चाचपत - ह्या: ह्या: ह्या:' त्याच्याजवळ येऊन बोलणाऱ्या मास्तरांचा चिरका उपरोधी स्वर सुद्धा अमेयला सुखावह वाटतो, भानावर आणणारा दिलासा देतो. आजूबाजूची मुलं फिदीफिदी हसत असली तरी त्याला त्याचं काही वाटत नाही, तोही अर्धवट आनंदानी हसतो. चला, हाही भासच होता तर! मेघा काय खरोखर त्या गाडीखाली येणारबिणार नव्हती हे महत्वाचं. उगाचच काहीतरी डोकं भरकटत बसतं आपलं.
शाळा सुटल्यावर घरी जातो, तर चार बायका जमवून त्याची आई मोठ्ठाले डोळे करून आणि हातवारे करून काहीतरी कहाण्या सांगत असते '... मी म्हणते, एवढ्या महागातल्या गाड्या द्याव्यात कशाला अशा तरुण पोरांना!'. त्याला बघितल्यावर एकदम थांबते, आणि विचारते 'काय रे? आज उशिरा गेलास वाटतं शाळेत?'. त्याला काहीच कळत नाही, गोंधळून तो म्हणतो 'नाही! उशिरा का, अगदी वेळेत गेलो.' आई म्हणते 'हुं:! मेघा म्हणाली ती बससाठी धावत असतांना तिनी तुला बघितलं... असं तिला वाटलं.' आणि परत त्या बायकांकडे वळून बोलायला लागते.
त्या दिवशी सकाळी, झाडावर आदळलेल्या गाडीच्या शेजारी, रुपेश प्रधान त्याच्या बाबांना आणि पोलिसाला पुन्हा पुन्हा एवढंच सांगत होता 'नाही हो, खरंच सांगतोय! मी अगदी व्यवस्थित चालवत होतो, स्पीड लिमिटमध्येच; पण त्या लहान मुलाची ती किंकाळी एवढ्या जोरात ऐकू आली ना, की मी पार दचकलो आणि कंट्रोलच गेला माझा गाडीवरचा... ब्रेक्स दाबले मी जोरात, पण कदाचित स्किड झाली असेल गाडी. नाही, मुलीचा नाही, आवाज नक्की मुलाचाच होता. हो माहित्येय, ती लहान मुलगी येत होती रस्त्यात, पण ती थांबली वेळेतच. कदाचित त्या स्कुलबसमधला एखादा पोरगा असेल!'.
* * * *
नेहमीप्रमाणे आपल्याच तंद्रीत चालत अमेय शाळेतून घरी येतो, तर दाराला कुलूप! त्याला एकदम आठवतं, सकाळी आई म्हणाली होती 'आज दुपारी मेघाची डान्स प्रॅक्टिस आहे. मला बहुतेक उशीर होईल घरी यायला. तोपर्यंत वरती लेले मावशींकडे बस.'. त्याला खरं तर हे असलं दुसऱ्याकडे बसून रहायला अजिबात आवडत नाही, शेजारी असले म्हणून काय झालं! कुक्कुलं बाळ का आहे तो आता? लेले मावशी तस्सच वागवतात त्याला अजून. नाईलाज म्हणून तो जिना धाडधाड चढून वरती जातो. मावशींनी बहुतेक त्याला रस्त्यातून येतांनाच बघितलं असणार, ब्लॉकचा दरवाजा सुद्धा उघडाच आहे. तो आत जातो, नेहमीच्या सवयीनी बॅकपॅक दाराशीच टाकतो. मावशीही घाईघाईनी नेहमीच्या कपात दूध आणून देतात - बारा वर्षाची मुलं काय दूध पितात का! कोण सांगणार ह्यांना. दुधाबरोबर नेहमीचा प्रश्न 'हं, आज काय शिकवलं शाळेत?'... उत्तरादाखल एक निरर्थक 'काय नाय' त्यांच्या तोंडावर टाकून, एकदाचं दूध पिऊन तो मुठीनंच तोंड पुसतो आणि धावत मावशींच्या बाल्कनीत जाऊन उभा रहातो. ह्यांच्या ब्लॉकला काय छान बाल्कनी आहे, सोसायटीत येणारा रस्ता पार दूरवर दिसतो. खाली खेळणारी मुलं, गाड्या, बसेस, फेरीवाले, दुकानं, गर्दी, गोंगाट ... सगळं बघत तो क्षणार्धात पार रमून जातो. मागे मावशी आपण एकट्याच बडबडतो आहोत हे लक्षात येऊन स्वैपाकघरात निघून जातात आणि स्वैपाकाला लागतात.
मेघाचा हात घट्ट पकडून आई बसमधून उतरतांना अमेयला दिसते. घरापासून शंभर पावलं नसेल तो बस स्टॉप. म्हणजे आता इथे थांबायची काही गरज नाही. मावशींना जातो म्हणून सांगायला अमेय किचनमध्ये जातो. मावशी त्याच्या दिशेला पाठ करून सिंकमध्ये भांडी विसळत असतात. बाजूला तो धुसफुसता प्रेशर कुकर चालू असतो. 'आई आलीच; मी घरी जातो' एवढं घाईघाईत तो ओरडून सांगतो आणि धाडधाड पायऱ्या उतरून आपल्या ब्लॉकच्या बाहेर येऊन थांबतो. आणखी दोन मिनिटात, मेघाला घेऊन आई येतेच. घरात गेल्यावर लगेच तिचा पहिला प्रश्न,
‘भूक लागली असेल ना? लाडू देऊ का?’
‘नको, मावशींकडे कपभर दूध आत्ताच प्यायलं’.
'मग थँक्यू म्हटलंस का त्यांना?'
‘एवढ्या तेवढ्यावरून थँक्यू काय म्हणायचं सारखं’ - तो थोडा वरमलाय.
'खाली आलास त्यांना माहिती तरी आहे का?'
‘हो, जातो म्हटलं मी त्यांना’ – हे अगदीच मुळमुळीत, खालच्या आवाजात.
'थांब, मीच जाऊन बोलून येते त्यांच्याशी.' असं म्हणून आई मावशींकडे जाते.
थोड्याशा अपराधी भावनेनी, अमेयच्या डोळ्यांसमोर मावशींची पाठमोरी आकृती उभी रहाते. त्याला एकदम जाणवतं, मावशी उत्तरादाखल काहीच बोलल्या नव्हत्या. बहुतेक त्यांना ऐकू नसेल गेलं. एकीकडे तो नळ चालू आणि दुसरीकडे कुकर! त्यांचा कुकर मोडका असणार नक्कीच, आपल्या कुकरच्या कशा स्पष्ट शिट्या ऐकू येतात... मावशींचा कुकर अखंड धुमसत असल्यासारखा नुसता फुसफुसत असतो, त्याची पूर्ण शिट्टी कधी वाजतच नाही. त्यांना बरोबर माहिती आहे गॅस नेमका कधी बंद करायचा. पण त्या विसरल्या तर? आत्ता त्या भांडी घासताहेत, बरीच दिसत होती भांडी. त्यात झालं दुर्लक्ष, राहिला गॅस मोठा... कुकर काय नुसता शांतपणे फुसफुसत राहिलाय... आतमध्ये वाफ कोंडून राहिल्येय.. जास्त.. जास्तच.. जास्तच. तिला बाहेर पडायचंय, पण कुठेच वाट नाही. धुसफूस वाढत्येय… मावशी त्यांच्या भांडी घासण्यात सगळं विसरून गेल्या आहेत. त्या दिवशी मास्तर काय म्हणाले होते, कोंडलेल्या वाफेत फार प्रचंड ताकद असते. ती राक्षसी ताकद त्या मोडक्या कुकरच्या झाकणाला झुगारून देते... थडाडकन ते झाकण उडालं, बाजूच्याच सिंक मध्ये भांडी घासत असणाऱ्या मावशींच्या तोंडावर... होरपळून टाकणारी ती गरम वाफ... अमेय नकळत अंग चोरून घेतो, त्याचं तोंड आ वासतं, मोठ्यानी ओरडायला उघडावं तसं, घशातून आवाज मात्र बिलकुल येत नाही. बाजूला खेळत बसलेल्या मेघाचं मात्र त्याच्याकडे लक्ष जातं, त्याचा हरवलेला भयाकूल चेहरा तिला जाणवतो, आजकाल तिला सुद्धा सवय झाल्येय त्याच्या ह्या दिवास्वप्नांची. हातातली खेळणी सोडून खिदळत त्याच्या जवळ येऊन, आईची नक्कल करत ती म्हणते 'काय, कुठे तंद्री लागल्येय! अभ्यास झाला का?' तो तिला बाजूला ढकलतो, एरवी चिडला असता तिच्यावर, पण आता सुखावतो की डोळ्यासमोर दिसलं, त्यातलं काही खरं नव्हतं... आता तर आई वरती त्यांच्याशी बोलत असेल. कशाला असलं काही होणारे!...
अमेयची आई समोरचं दृश्य बघून जागच्या जागीच थरारली आहे! मावशींच्या ब्लॉकचा दरवाजा उघडाच आहे, दारापाशीच मावशी, दाराकडे पाठ करून भ्रमिष्टासारख्या किंचाळण्याच्या अविर्भावात, पण निःशब्द, गोठलेल्या! ती त्यांच्या नजरेचा मागोवा घेते. दारातून दोन पावलं आत येऊन ती बघते. किचनमध्ये ज्वालामुखीचा स्फोट व्हावा तसे जागोजागी उद्रेकाचे पुरावे. सिंकच्या आसपास काचेच्या भांड्यांचे, कप-बशांचे विखुरलेले तुकडे; गॅसच्या आसपास सगळीकडे उडालेली भाताची शितं आणि वरणाच्या डाळीचे ओघळ, एक खूप उबट वास! गॅस चालू आणि कुकरचं झाकण सिंकमध्ये! काय झालं तरी काय ह्या घरात! ती जपून चालत जाऊन प्रथम गॅस बंद करते, मावशींना हात धरून सोफ्यावर बसवते, त्यांना पाणी देते. हळूहळू त्यांना वाचा फुटते. त्यांच्या थोड्या असंबद्ध बोलण्यामधून तिला बोध होतो, भांडी घासत असतांना त्यांना अमेयची भयानक किंकाळी ऐकू आली, म्हणून त्या थर्र होऊन ह्याला काय झालं बघायला बाहेर आल्या, दिसत नाही कुठे, म्हणून दार उघडून हाक मारणार तेवढ्यात किचनमध्ये हा भयानक स्फोट!
- काय सांगता! कधी झालं हे?
- आत्ता, अगदी दोन मिनिटांपूर्वी हो, तुम्ही जिन्यात असाल...
- छे, अमेय कशाला ओरडतोय? आणि मी नाही ऐकलं ते! तो घरी बसलाय, तेच तर मी तुम्हाला सांगायला येत होते.
- नाही, पण काटा येतो हो अंगावर. मी तिथेच असते तर... देवा! ती उसळती वाफ, आणि केवढं तापलेलं जड झाकण ते.. कल्पनाच करवत नाही. कशात एवढी गुंगले कोणास ठाऊक.. तो कुकरखालचा गॅस बंद करायचं पार विसरूनच गेले.
- होतं हो असं कामात गुंतलं की. चला! बरं झालं, काही का होईना, पण तुम्ही नेमक्या त्या वेळी तिथून बाहेर आलात. मोठी आपत्ती टळली. बसा तुम्ही इथेच थोडा वेळ, मी आवरते किचनमधलं.
तिच्या डोक्यातून मात्र काही केल्या जात नाहीय; अमेय खाली घरात बसलाय, तर मावशींनी त्याचं ओरडणं कुठे ऐकलं... आणि आपल्याला कसं नाही ऐकू आलं!
* * * *
अमेयच्या वर्गात एक नवीन मुलगा आलाय - सचिन. चांगली गट्टी जमल्येय त्याच्याशी. परदेशात कुठेतरी होता म्हणे, नुकतीच त्याच्या बाबांची बदली झाली; आणि ह्या वर्षापासून अमेयच्या शाळेत येतोय. वर्गाबाहेर, आणि क्वचित वर्गात सुद्धा, अखंड गप्पा चालू असतात दोघांच्या. गप्पा म्हणजे, तशा एकतर्फीच - सचिन परदेशातल्या कायकाय गंमतीच्या गोष्टी सांगत असतो, आणि अमेय कान देऊन ऐकत असतो. ऐकतो, आणि विचार करतो. नेहमीसारखाच, खोल खोल. गोलगोल फिरत असावं आणि थांबताच येऊ नये असा.
आता परवाच सचिन सांगत होता, त्याच्या आधीच्या शाळेत एकदा काय धमाल झालेली... एक दिवस म्हणे कोणीतरी मुलगा शाळेत बंदूक घेऊन आला, खेळातली नव्हे - खरी! प्रत्यक्ष बंदूक! खोटं वाटतं ना, अशी कशी खरी बंदूक मिळेल शाळेतल्या मुलाला! पण तिकडे असतं म्हणे तसं. मग काय, कसं कुणास ठाऊक, पण टीचरला कळलं - काय विचारू नका! सगळ्या मुलांना एका हॉलमध्ये जमवलं, पोलीस आले, त्या पोराला पकडून घेऊन गेले, त्याला शाळेतून काढून टाकलं... काय नी काय!
अमेय डोळे विस्फारून, आ वासून ऐकतच रहातो. हा सचिन खरं सांगत असेल सगळं? शाळेतली मुलं कशी बंदूक मिळवतील, आणि वरती शाळेत घेऊन जातील! काहीतरीच! पण मोठी माणसं? त्यांच्याकडे असतील बुवा बंदुका. आई घरी नसतांना एकदा अमेयनी टीव्ही वर एक इंग्लिश सिनेमा बघितला होता. त्यात एक हॅट घातलेला माणूस काय फटाफट गोळ्या झाडत होता, अशी मुंग्यांसारखी माणसं मारत होता! तिथे सुद्धा मेघा रडायला लागली, तिला बंदुकीच्या आवाजाची भिती वाटली, म्हणून लगेच चॅनेल बदलायलाच लागलं. किती सांगितलं तिला, हे खोटं आहे ग बाई - नुसता ठो ठो आवाज, आणि ते काय खरं रक्त नसतं, केचप का कायतरी असतं - पण तिची समजूतच पटेना. शेवटी तिनी आईकडे चुगली केलीच, नसत्या कटकटी!
केचपवरून एकदम आठवलं गेल्या वर्षी आई-बाबा त्याला वाढदिवसाला मॉलमधल्या मॅक्डोनाल्डमध्ये घेऊन गेले होते. अमेयला खूपच आवडलं होतं ते. काय मस्त फ्राईज होत्या - थोड्याशा केचपला लावून... एकदम टॉप! समीर म्हणतो त्यांच्याइथे पण मॉल्स असतात, आणखी मोठ्या असतात - ते आलंच म्हणा, परदेशातली प्रत्येक गोष्ट नेहमीच इथल्यापेक्षा मोठी आणि छान असते सचिनच्या गोष्टींमध्ये! तीन-तीन चार-चार मजली मॉल्स, सगळीकडे एस्केलेटर्स आणि लिफ्ट, केवढी मोठमोठाली दुकानं, छान कपडे घातलेले, हातात शॉपिंगच्या बॅगा घेऊन फिरणारे, आईस्क्रीम खात असलेले लोक, प्ले-ग्राउंड मध्ये खेळणारी मुलं ... अमेयला सगळं दिसायला लागतं डोळ्यासमोर... केवढे धप्प गोरे आहेत नाही हे लोक? काळे पण आहेत म्हणा, अगदी राक्षसांसारखे काळे... आपण कुठे बघितलेत असे लोक, आणि कधी?
अमेयचं लक्ष एकदम दुसऱ्या मजल्यावरच्या दुकानातून बाहेर येत असलेल्या एका माणसाकडे जातं. घाणेरडे जुनाट कपडे घातलेला, गबाळ्यासारखी दाढी वाढलेला तो माणूस जोरजोरात काहीतरी बडबडत येतो आहे. बाजूचे लोक घाईघाईने त्याच्यापासून दूर जात, त्याला वाट करून देताहेत; आई-बाबा आपापल्या मुलांचा हात गच्च धरून, त्यांना जवळ ओढताहेत. बापरे! त्या माणसानी बाहेर आल्यावर लगेच खिशातून बंदूक काढली आणि मूर्खासारखा त्या गर्दीत ठो-ठो गोळ्या झाडतो आहे - खऱ्या गोळ्या, काही लोक थाड्कन खाली पडताहेत, आरडाओरडा, लोक धावत दुकानांमध्ये शिरताहेत, मुलांना हाताच्या मिठीत लपवताहेत, पोटाशी धरून धावताहेत... नुसता गोंधळ. तो माणूस एस्केलेटरवरून खाली जायला निघाला आहे, त्याच्या पुढचे लोक धावत उड्या मारत तिथून बाहेर पडायला बघताहेत... पण काहींना गोळ्या लागतातच. शी:, हे रक्त काय केचपसारखं नाही दिसत ... आरडाओरडा, ढकलाढकली, गोंधळ. एक लहान मुलगा, चार-पाच वर्षाचा असेल, एस्केलेटरवरून धावतांना पाय अडकून गडगडत खाली पडला, रडतोय... अमेयला त्या माणसाचा चेहरा अगदी जवळून दिसतो आहे, त्याच्या डोळ्यातला खुनशीपणा, त्याची लहान मुलावर रोखलेली बंदूक! असह्य होऊन अमेय खूप जोरात ओरडतो, घामाघूम होऊन, तिथून पळायला लागतो...
सचिनच्या आवाजानी अमेय एकदम भानावर येतो. ' ए, कुठे निघालास धावत? तू कधी कधी खूप विअर्ड वागतोस हं' सचिन म्हणतोय. अमेयला एकाएकी थंडगार शांत वाटतं. विअर्ड म्हणजे काय माहिती नाही, बहुतेक ‘वेडपट’ असणार. हे बरंच बरं, इतर मुलं एकेक बोलतात त्यापेक्षा. आणि आत्ता जे डोळ्यासमोर बघितलं त्यापेक्षा तर कितीतरी पटींनी बरं - कोण कुठले लोक कोणास ठाऊक, पण अमेयच्या डोळ्यासमोरून त्या लहान मुलाचा भेदरलेला रडका चेहरा जात नाही. कसाबसा तो सचिनचं बोलणं ऐकत, त्याच्याबरोबर चालायला लागतो.
विचिटा ह्या एका अमेरिकन गावात स्थानिक टीव्हीवर रात्रीच्या बातम्या –
'… and now, a new and bizarre twist in the shooting rampage at the local mall earlier today: The accused mass murderer has confessed to being startled by a small boy running across the escalator bank. He described the boy as a dark haired, skinny, approximately 10-year old, ‘Asian-looking’ kid, screaming hysterically and crossing the escalators. No witnesses interviewed by the police recall seeing a boy of that description. However, this confession appears to corroborate the earlier police report that the accused had suddenly appeared distracted and confused for a few moments, allowing them to overpower him and take into the custody.’
* * * *
काय भयानक उन्हाळा आहे! सगळं वातावरण नुसतं कोरडं शुष्क, जरा ओलावा नाही कुठे! काहिली होतेय अंगाची, वारा आला तरी नुसत्या गरम गरम वाफा... बरं तर बरं, शाळेला सुट्टी आहे आत्ता. पण अमेय मात्र संध्याकाळच्या क्लासला जातो, पुढचं वर्ष दहावीचं आहे ना! सगळीकडे सारखा एकच घोष कानावर येतो 'हे वर्ष महत्वाचं', 'मार्क चांगले मिळायलाच हवेत'.
आज केमिस्ट्रीचा क्लास होता, अमेयनी पहिल्यांदाच लॅब बघितली ह्या क्लासमध्ये. शी, काय घाणेरडे वास होते एकेक. कसली कसली ऍसिड म्हणे. त्या काचेच्या भांड्यांमधून मोजूनमापून ओतायची, आणि गरम करायची. टिचरनी शंभर गोष्टी एकदमच डोक्यात कोंबल्या, अमेयच्या सगळंच काही लक्षात नाही राहिलं, काही तर मुळी समजलं सुद्धा नाही. काहीतरी केलं की म्हणे त्या ज्वाळांचा रंगही बदलतो. हा भाग अमेयला सॉलीड भारी वाटला. आज पहिल्यांदा जाणवलं, ज्वाळा काही नुसत्या लाल भडक नसतात तो चित्रकलेच्या वर्गात काढायचा तशा. कधी कधी त्या पिवळ्या, नारिंगी, निळ्या आणि चक्क हिरवट सुद्धा असतात. अमेयला चित्रं काढायची आणि त्याहीपेक्षा रंगवायची खूप आवड आहे. दाखवत नाही तो ही चित्र फारशी कोणाला, शंभर प्रश्नं विचारत बसतात लोक, म्हणून!
अमेयनी मुद्दामच क्लास घरापासून थोडा लांब निवडला आहे. तिथे बस जात नाही आणि रिक्षासाठी अंतर कमी आहे, म्हणजे आपोआपच वीसेक मिनिटं चालायला लागतं. ह्या क्लासमध्ये तो एकटाच जातो. तेच बरं; सारखं त्याला वेड्यात काढायला नको कोणी बाजूला. अमेयला खूप आवडतं, एकटं चालत जायला. रस्त्यात केवढं कायकाय बघण्यासारखं असतं, मनात आलं तर थांबून गंमत बघत जाता येतं. त्या गंमती बघतांना एकेक विचार येतात डोक्यात, कुठची कोण माणसं स्वप्नात बघावी तशी दिसतात. रस्ते आणि गावं सुद्धा अनोळखी असतात, पण आजूबाजूच्या गजबजलेल्या बकाल वस्तीपेक्षा खूपच इंटरेस्टिंग! बकाल म्हणजे काय, सगळ्या पडझड झालेल्या जुन्या बिल्डिंगी, एक जुनाट, वापरात नसलेली लाकडाची वखार आणि बाकी बहुतेक झोपडपट्टीच! वखारीच्या आवारामध्ये जुन्या, मोडक्या लाकडाच्या फळकुट्या, ढलपे, जुनी वर्तमानपत्रं, कापडाच्या चिंध्या अशा अनंत गोष्टी पडलेल्या दिसतात. कधीकधी त्या गोळा करून त्यांच्याचवर माणसं झोपलेली सुद्धा दिसतात. पण किती बकाल असला, तरी हा शॉर्टकट आहे ना, म्हणून कुठे रेंगाळण्यात वेळ गेला, तर अमेय ह्या रस्त्यानी झपाझप चालत जातो. कधीकधी क्लास संपून निघायला आजच्यासारखा उशीर होतो, काळोख झालेला असतो. अशा वेळी अमेयला वाटते थोडीशी भिती ह्या भागामधून जातांना. मोठी माणसं रस्त्यात भेलकांडत चालत असतात, आरडे-ओरडे, शिव्या... लहान मुलं आणि कधीकधी मोठ्या बायका सुद्धा रडत असतात, मग अमेयला अगदी एकटं वाटतं... मग तो मनातल्या मनात विचार करायला लागतो, खोल-खोल, गोलगोल फिरत असावं आणि थांबताच येऊ नये असं… त्याच्या डोळ्यापुढची दृश्यच बदलून जातात!
आज इथे कसला तरी उत्सव दिसतो आहे! काही ना काही असतंच दर दोन दिवसाआड. पण आज फटाके लावण्याएवढं काहीतरी मोठं आहे वाटतं. लहानशी पोरं फुलबाज्या हातात धरून धावताहेत, भुईनळे आणि सुदर्शनचक्र आहेत. काय दिवाळी आहे की काय ह्या लोकांची - भर उन्हाळ्यात? कल्पनेनी सुद्धा अमेयला हसू येतं. मोठमोठे अनार लावले आहेत भर रस्त्यात. अमेयची पावलं एकदम थबकतात. काय मस्त रंग दिसताहेत त्या अनारच्या फुलांचे! सूंss स्स्स्स करून एक बाण आकाशात उंच उडतो, त्याच्या मागोमाग दुसरा... तिसरा मात्र दहा-बारा फुटांवरच तिरपागडा जायला लागतो, त्या वखारीच्या कुंपणावरून पलीकडे जातो आणि जमिनीवर कोसळतो.... जुन्या पेपरांच्या ढिगाऱ्यावर! ते तत्क्षणी पेट घेतात, मोठमोठ्या ज्वाळा वरती झेपावायला लागतात. बाजूच्या काही कोरड्याठाण लाकडाच्या तुकड्यांना गिळंकृत करत.
अमेय त्या ज्वाळांचे बदलते रंग मंत्रमुग्ध होऊन बघतो आहे. पिवळ्या, नारिंगी, केशरी, गुलाबी, लाल मध्येच एखादी दिसता दिसता अदृष्य होणारी निळी किंवा अगदी हिरवट छटा! समोर दिसेल त्या वस्तूला लपेटून, गिळून, भस्मसात करून पुढे झेपावणाऱ्या त्या ज्वाळा. चांगलीच झळ जाणवते आहे. धूर कोंदतो आहे. अमेयला कळत नाही, हे खरं आहे का हा भास आहे? तो आजूबाजूला बघतो, हे घर तर नाही, शाळाही नाही... एव्हाना कोणीतरी त्याला हसतं, काही तरी टोमणे मारतं, टिंगल करतं... तसं का नाही होत अजून? म्हणजे हे खरं असणार, नाही? मग बाजूची फटाके लावणारी मुलं कुठे गेली? रस्त्यात स्वैपाक करणाऱ्या बायका, जथ्यांनी उभं राहून विडी फुंकत असणारी माणसं... सगळे गेले कुठे? आहे कुठे तो? सगळीकडे नुसता काळा-करडा धूर, आणि मोठमोठ्या ज्वाळा! त्याला चांगलीच धग जाणवते आहे. सगळीकडे नुसता रंगांचा कल्लोळ, त्याच्या अंगावर चाल करून येतो आहे, आणि तो एकटा! आता मात्र अनावर होऊन तो जोरात ओरडायला तोंड उघडतो, पण आतून आवाज बाहेर येण्याऐवजी बाहेरचा धूर घशात जातो आणि जोरजोरात खोकत तो खाली पडतो.
हे काय... आगीच्या बंबाच्या सायरनचा आवाज? का नुसताच भास? खरंच येत असेल बंब? वेळेत पोचेल? त्यांना दिसेन मी? माझा आवाज जाईल ऐकू त्यांना?
कोणीतरी वेड्यात तरी का काढत नाही अजून?
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...