(व्यक्ती आणि वल्ली मधल्या 'दोन वस्तादांची' क्षमा मागून)
डॉन्या वस्तादांची आणि आमची ओळख फार जुनी! ओळख बहुतांश वृत्तपत्रांच्या पानांमधूनच - पान क्रमांक सहा वर एके काळी त्यांचं अधिराज्य होतं – रोज निरनिराळ्या
सुंदर, कमनीय आणि मुख्यतः तरुण स्त्रियांबरोबर
नेहमी दिसणारा हा टक्सिडोधारी नटमोगरा कोण म्हणून त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं. नंतरच्या काळात ओळख वाढत गेली - ह्या बोटाची थुंकी त्या बोटावर कर, ह्याची टोपी त्याला घाल, इकडून उधार घेऊन तिकडचं कर्ज फेड, नाहीच जमलं तर बुडीत गेल्याचं सोंग करून गटांगळ्या खायचं नाटक कर अशा असंख्य अंगभूत कलागुणांमुळे तरुण वयातच त्यांनी 'कलाकार चीज' म्हणून नांव कमावलं होतं. त्याशिवाय एवढे गुण स्वार्थीपणे स्वतःसाठीच न वापरता केवळ जनतेला त्याचा लाभ व्हावा, म्हणून वस्तादांनी 'टोप्या घालण्याची कला' विषयावर पुस्तकं लिहिली. स्वतःच्या नावाचं विश्वविद्यालय सुद्धा उघडलं. केवळ पुस्तकी शिक्षणापेक्षा कार्यानुभवावर जास्त विश्वास ठेवणाऱ्या वस्तादांनी विद्यार्थ्यांना टोप्या घालूनच ह्या कलेचं सामर्थ्य जाणवून दिलं. स्वानुभवाएवढा महान गुरु दुसरा नाही, हे समजण्याची पात्रता नसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर नको ते आळ घेतले. इतक्या क्षुद्र गोष्टींनी डगमगून न जाता, वस्तादांनी कलासाधना चालूच ठेवली. टीव्ही वर 'अप्रेंटिस' नावाचा अप्रतिम शो त्यांनी कित्येक वर्ष यशस्वीरीत्या सादर केला - अप्रतिम आणि यशस्वी हे दोन्ही वस्तादांचेच शब्द आहेत.
आता दिवस वाईट आले आहेत. आज वस्तादांची परिस्थिती
हलाखीची आहे. ह्या जातीच्या कलाकाराला एका व्हाईट हाउसात घुसमटून ठेवलं गेलंय. ज्या
टीव्हीवर त्यांनी रेटिंग्सचे अतुलनीय पराक्रम केले, त्याच टीव्ही वर आज त्यांच्या प्रत्येक
विधानाची, भिंगाखाली ठेवून खऱ्याखोट्याची शहानिशा होते आहे. मनमोकळं बोलायची चोरी आहे,
आजचं विधान कालच्याशी मिळतंजुळतं असायला हवं असले पोरकट हट्ट धरून पत्रकार कुत्र्यासारखे
भुंकायला लागतात. एकेकाळी हजारो (वस्तादांच्या मते, लाखो) लोकांसमोर डागणारी ही मुलुख
मैदान तोफ आता ट्वीटरच्या १४० अक्षरांत दाबून बसवावी लागते. अशा विपन्नावस्थेत दिवस
कंठत असलेले वस्ताद बघून सुद्धा मन भरून येतं.
नुकतीच आम्ही त्यांची मुलाखत घ्यायला गेलो
होतो, त्या मुलाखतीचा वृत्तान्त येथे जगजाहीर करत आहोत. एवीतेवी आमचं विश्व फेसबुकपुरतं
मर्यादित असल्याने 'जगजाहीर' म्हणायला आम्हाला कसलीही लाज अथवा विधिनिषेध वाटत नाही.
तसेही, वस्ताद आणि लाज अथवा विधिनिषेध एवढे सगळे शब्द एका वाक्यात बसत नाहीत ह्याची आम्हास
जाणीव आहे.
मुलाखतीला आरंभ म्हणून
आम्ही एक साधा सरपटी चेंडू टाकला - 'एका यशस्वी उद्योगपतीला, संपूर्ण स्वतंत्र जगाचा
एकमेव नेता म्हणून काम करतांना काय फरक जाणवतो?' आमच्या मते हा अगदीच मैदानाबाहेर चौकार
मारायच्या लायकीचा प्रश्न होता; पण झालं भलतंच. वस्ताद धो धो कोसळत तुटून पडले, 'काय
डोक्याला फासायचंय ते स्वतंत्र जग!' त्यांची अभिव्यक्ती थोडी वेगळी होती, पण एकंदरीत
आपले नारिंगी रंगाचे केस हा त्यांच्या फार जिव्हाळ्याचा विषय जाणवला. 'साला, त्या अंगेला
मर्कलला 'ज्याडी' म्हणायचं स्वातंत्र्य नाही, तेरेसा मे ला 'तरुणपणी बरी दिसत असशील'
म्हणायची सोय नाही, सद्गुणांचा पुतळा पुतिनचं (काय बॉडी आहे राव ह्या वयात!) उघडपणे
कौतुक करायची चोरी. खुट्ट झालं की तुमचे खोटारडे पेपर आणि टीव्ही 'हे का केलं आणि ते
का केलं नाही' कारणं विचारायला टपलेले! तरी बरं, मेलानिया तिकडे न्यूयॉर्कमध्ये राहते, नाहीतर
ते आणखी एक नॅगिंग!'
आम्ही त्यांची खिन्न विमनस्क
मनःस्थिती समजू शकतो. तेच मध्यंतरी म्हणाले त्याप्रमाणे, इथे कोणा लेकाला कल्पना होती
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणं एवढं कठीण आणि कटकटीचं काम असेल! तो काळू पैलवान अशा कसरती करे, की सगळा कसा डाव्या हातचा खेळ वाटायचा. आता पहिल्या महिन्याभरात वस्तादांनी एवढे फतवे काढले,
टीव्ही वर दाखवले, त्याला रेटिंग्स सुद्धा छान मिळाली - पण ते नाही पुरेसे म्हणे, काँग्रेसनी
आणि कोर्टानी मान्यता दिली पाहिजे - निव्वळ आचरटपणा! काय गरज आहे काँग्रेसची - वस्तादांना
एवढं प्रचंड बहुमत मिळालं, साधा हुकूम काढायचा अधिकार नाही त्यांना?
बहुमताचा
विषय निघाल्यावर मात्र वस्तादांची कळी खुलली. एकदम रंगात आले. चक्क सोफ्यावर मांडी ठोकून बसले, आणि
कहाणी सांगायला लागले. 'बरं का, १६ मधल्या बनवाबनवी महोत्सवाची गोष्ट आहे! आमच्या पार्टीनी
हे असे उतरवले होते सोळा पठ्ठे मैदानात. सगळे तालेवार, कोणी मोठ्या नामवंत घराण्यातले, कोणी
सिनेटर, तर कोणी गव्हर्नर - सगळेच्या सगळे वर्षानुवर्षं लोकांना चुना लावून स्वतः पांढरे
शुभ्र! होता एक काळ्या सुद्धा, स्कॉलर म्हणवायचा स्वतःला - पण डोक्यानी थोडा ढील होता.
मी गुगलीच मुळी असे टाकले ना – एकेक करून सगळे प्यांटीला पाय लावून पळत सुटले. मी बिंदास
काय मनात येईल ते बोलायचा – कालच्या बोलण्यावर विचार करताहेत तोवर आज आणखी मोठा गुगली.
धापा टाकत होते माझ्या मागे धावतधावता. पण पब्लिक सॉलिड खुश होती आपल्यावर! मी काय
करायचा, लोकांला जे काय पायजेल हाय ते कबुल करून टाकायचा – कोळशाच्या खाणीतच काम करायचंय,
जरूर करा (आपल्या बाचं काय जातंय हो म्हंतो मी), पब्लिकला काय पायजेल, युद्ध नको पण
हे मुसंडे पण नको - मी बोलायचा, ठीक आहे, बॉम्ब टाकू आपण नुसते वरूनच. बाकीचे पैलवान
चर्चा करत रहायचे 'मुसंडे' म्हणणं बरोबर आहे का, तोपर्यंत मी भिंत बांधायचं काम काढे!
घामाघूम व्हायचे सगळे गब्रू! पब्लिक नुसती गारगार माना हलवत टाळ्या पिटतेय - येऊन-जाऊन पब्लिकला काय हो, मनोरंजन हवं. लय मागणी नसत्ये त्यांची - तेवढं पुरवणं एक कलाकार म्हणून मी आपलं कर्तव्यच समजतो. आमच्या सोळा लोकांला तर पार झोपवलंच मी, मग
शेवटच्या बारीत मुकाबला होता त्या दुसऱ्या पार्टीच्या हिलरीण बाईशी.
इथे नुसत्या आठवणींनी वस्तादांचे
डोळे चमकायला लागतात, ते सरसावून बसतात. आतापर्यंत शंभरेक वेळा तरी आम्ही डॉन्या वस्तादांनी हिलरीणीला अंतिम फेरीत कसं चीतपट केलं हा किस्सा ऐकला आहे, पण वस्तादांचा जोश आणि उत्साह तिळमात्र कमी
होत नाही हा कथाभाग आला की.
बाय
पण लय तय्यार होती ना, अर्कान्सा घराण्याची मशहूर सम्राज्ञी ती. तो तुमचा कोण चाणक्य आणि
माकियाव्हेली सगळे तिच्या आणि तिच्या नवऱ्यापुढे दुधखुळे बच्चे - अशी ख्याती होती तिची.
मोठमोठाले वस्ताद तिच्यासमोर नांगी टाकून, हात जोडून, शरण आले आहेत. सगळे पेपरवाले तिच्या आगेमागे, आम्हाला कोण विचारतो हो. सगळ्यांची खात्री होती बाय बाजी मारणार. पण तिनी आल्याआल्या
लावला वरच्या पट्टीतला सूर, मी जो घुसलो थेट खालच्या पट्टीत. सप्तपाताळातून खर्जाचे सूर
काढले तिला समजेच ना हे काय चाललंय. शेवटच्या क्षणी तर इलिनॉय, ओहायो, मिशिगन आणि पेनसिल्व्हेनिया
ह्या आडा-चौतालात असा खाल्लाय तिला, आ वासून, कान पकडून बघतच राहिली. नंतर म्हणे रानावनात
जाऊन ग्लास सिलिंग बद्दल कायतरी भाषणं देत बसली होती एकटीच.
वस्तादांचा
चेहरा आकंठ तृप्ततेनी मोहरलेला असतो. अर्धोन्मिलीत डोळ्यांमधून आनंद आणि अभिमान ओसंडून वहात असतो. ओठांवरती अत्यंत स्वप्रसन्न हास्य तरळत असतं. वस्ताद खऱ्या अर्थाने जगले, ते
केवळ २०१५-१६ मधले ते सोळा महिने! आता केवळ अंगावर घेतलंय म्हणून पुढची चार वर्ष निभावायची
एवढंच. नसू देत आता दिवस चांगले! तिकडे तो येडचाप किम-जॉन्ग-उन वाकुल्या दाखवतोय, पुतीनच्या पाठीमागे दडून आसाद
वार करतोय, मर्केल बाई येऊन लेक्चरं देऊन जातात, मूठभर डेमोक्रॅट्स रशियाच्या हस्तक्षेपाबद्दल डोकं भंडावतायत - पण वस्तादांना खरं तर ह्या सगळ्यात
काही राम नाहीय आता.
ते सोळा महिने - आणि हिलरिणीला
हरवणं - ह्यापलीकडे त्यांच्या जगात कशालाच काही अर्थ नाहीय.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...