एवढ्या सुंदर शेकडो एकर जमिनीच्या धनाढ्य मालकाच्या मनात येतं, इथे एक छान कॉटेज - एक रस्टिक घर - बांधता येईल. बकाल शहराच्या गर्दीपासून, धकाधकीच्या जीवघेण्या स्पर्धेच्या जगापासून, सगळ्या दूषित वातावरणापासून दूर, आठवड्यातले दोन दिवस शांत निवारा म्हणून इथे येऊन राहता येईल. ह्या वाहत्या पाण्याच्या मंजूळ आवाजात सगळी मरगळ झटकून टाकून पुन्हा ताजंतवानं होता येईल. तो एक जगावेगळा आर्किटेक्ट शोधून काढतो हे घर रचायला - त्याच्यासारखाच द्रष्टा आणि कवी मनाचा. दोघं मिळून त्यांचं स्वप्न खरं करतात. आज ऐंशी वर्षांनंतरही लोक घर बांधणीतला एक चमत्कार म्हणून मुद्दाम बघायला जातात, बघून त्या आर्किटेक्टच्या प्रतिभेने थक्क होतात आणि मालकाच्या एवढ्या धाडसी पाठिंब्याची दाद देतात, ते एडगर कॉफमनचं, फ्रॅंक लॉईड राईटनी बांधलेलं घर - 'फॉलिंग वॉटर'.
मानवी निर्मिती आणि नैसर्गिक चमत्कृती ह्यात द्वैत राहू नये, हे घर त्या निसर्गाचाच एक अविभाज्य भाग वाटावं ह्या मूळ कल्पनेमधून राईटनी ह्या घराची रचना केली आहे. टेकडीच्या उतरंडीच्या पायऱ्यांसारखीच ह्या घराच्या मजल्यांची रचना आहे. खोल्यांएवढ्याच मोठ्या प्रचंड, घरापासून बाहेर झेपावणाऱ्या बाल्कनी आहेत, सभोवारच्या सृष्टी सौन्दर्यात न्हाऊन जाण्यासाठी. शक्य त्या सर्व खोल्यांच्या बाह्य भिंती संपूर्ण काचेच्या आहेत - सूर्यप्रकाशाला घरात येऊन खेळण्याची आणि घरातल्या माणसांना त्या प्रकाशात झळाळून जाण्याची पूर्ण मुभा राहावी म्हणून. पहिल्या मजल्यावरच्या बैठकीची खोली नुसती टेकडीच्या मूळ खडकांवर विसावलीय एवढंच नव्हे, तिथल्या फायरप्लेसच्या भोवताली जमिनीतून वर आलेल्या त्या खडकांचंच लहानसं रिंगण आहे. त्या खोलीतून एक नजरेआडचा छोटा जिना जातो तो थेट त्या वाहत्या पाण्याकडे! त्या जिन्याकडे जाणारं दार नुसतं उघडलं की खोलीभर त्या वाहत्या पाण्याचा स्तब्ध गंभीर आवाज दरवळायला लागतो. सगळ्याच खोल्यांमधलं बहुतांश फर्निचर सुद्धा राईटनी स्वतःच बनवलेलं आहे - अतिशय नैसर्गिकरित्या त्या खोल्यांना चपखल साजेसं. पिकासो, दिएगो रिव्हेरा आणि फ्रिडा काहलो सारख्या नामवंत कलाकारांची पेंटिंग्स खोल्यांमध्ये सजावट म्हणून आहेत.
ह्या सगळ्याच्याही पलीकडे, राईटच्या असामान्य कल्पकतेची चुणूक जाणवते म्हणजे हे घर त्या धबधब्याकडे त्रयस्थासारखं, एखाद्या परक्या अबोल वस्तूकडे बघत बसावं असं समोर न बांधता, त्यांनी हे संपूर्ण घर अक्षरशः त्या धबधब्यामध्येच बांधलं आहे. घरामधून कुठूनही तो धबधबा 'दिसत' नाही - एका बाल्कनीमधून तो बाजूनी दिसतो तेवढाच. पण त्याचं अस्तित्व कायम जाणवत असतं. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनी, विशेषतः त्या काळात हे असं घर बांधणं नुसतं धाडसाचंच नव्हे, कदाचित क्रांतिकारी मूर्खपणाचं मानलं गेलं असेल. त्यांच्या - आणि आपल्या - सुदैवानी त्यांना कॉफमनसारखा धनाढ्य पाठिंबा मिळाला, आणि वास्तुशास्त्रातला एक उत्कृष्ट नमुना उभा राहिला. ह्याहीपेक्षा महत्वाची, ह्या घरात रहायला आल्यावर झालेली कॉफमनची प्रतिक्रिया होती - 'तुम्हाला कसं कळलं, माझ्या आयुष्याला, रहाणीला, आवडीनिवडींना कशा प्रकारचं घर अचूक मिळतंजुळतं होईल?' हे घर नुसती स्थापत्यामधली एक शोभिवंत वस्तू नव्हती, एका मनस्वी कलासक्त मनाच्या माणसाचं ते राहतं घर असणार होतं, ह्याचं भान राईटनी कधीच सोडलं नव्हतं.
आयन रँडच्या 'फाउंटनहेड' कादंबरीच्या नायकाचं पात्र फ्रॅंक लॉईड राईटवरून स्फूर्ती घेऊन रचलं आहे हे खूप पूर्वी ऐकलं होतं. तेव्हापासून त्यांची एक तरी कलाकृती बघायची इच्छा होती. हे घर बघितल्यावर ती कादंबरी वाचल्यासारखाच आनंद झाला...
ह्यापलीकडे कॊतुकाचे शब्दच नाहीत माझ्या शब्दकोशात!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...