Happy Birthday, Gulzar!

साहीर आणि गुलझार हे दोघे माझ्यासारख्या हिंदी काव्याच्या शब्दलोभी दिवाण्यांचे सर्वोच्च 'हिरो'! मुद्दाम मी हिंदी ‘सिनेसंगीताच्या’ असा उल्लेख टाळला आहे, गरजूंनी नोंद घ्यावी. सिनेसंगीताला काव्याच्या वेशीबाहेर, वाळीत टाकण्याएवढा कर्मठपणा माझ्यात नाही.
साहीरची शब्दकळा दिमाखदार, नजाकतदार, रुबाबदार; मैफिली - मुशाय-यामध्ये बेफाम वाहवा मिळवणारी. तर गुलझारची - लोभस, खोडकर, खट्याळ मुलासारखी! मोठ्यांच्या मैफिलीत सुध्दा आपण गंमत करतोय ह्याची जाणीव ठेऊन पटकन जीभ वेडावून दाखवणारी. सहजपणे घेतलेल्या शब्दांच्या कोलांट्या उड्या बघून लोक तोंडात बोट घालत असतांनाच ‘हूं:, हे तं काय, अगदी सोप्पय!’ असं म्हणत हात सोडून पुढे धावत सुटणारी.
गुलझारच्या कवितांमध्ये हळुवार आर्त प्रणय नसतो असं मुळीच नव्हे. तिथेही एखादी प्रेयसी 'इन रेशमी राहोंमें, एक राह तो वो होगी, तुमतक जो पहुंचती है' अशी आशा लावून बसलेली असते, 'फिरसे आईयो, बदरा बिदेसी' आळवत. अवेळी ढगांमधून डोकावणाऱ्या चंद्राला 'तोहे राहू लागे बैरी' असा शाप देणारी प्रेयसी. एका अर्ध्यामुर्ध्या छत्रीमध्ये अर्धवट भिजून आल्यावर, बिस्तर के पास बहुतेक अजून पडून असलेल्या गिल्या मनाची आठवण ठेवणारी प्रेयसी. 
पण तरीही, एक अनिवार निरागस मूल गुलझारच्या काव्यप्रतिभेमध्ये वारंवार दिसतं. त्याच्या अमाप शब्दभांडारातल्या खेळण्यांशी खेळण्यात पार बुडून गेलेलं मूल! म्हणूनच त्यांच्या कवितांमध्ये चुलबुला पानी आखलेल्या मार्गानी धावण्याऐवजी, ‘लेटे लेटे’ फुलांवर आरसे चमकावतांना आढळतं. प्रियकर प्रेयसीसाठी चाँद 'चुराके’ घेऊन आलेला असतो. ह्या मुलाला मोठ्यांचे खऱ्याखोट्याचे रुक्ष नियम मान्य नसतात, म्हणून त्याच्या नजरेला आँखोंकी महकती खुशबू दिसू शकते, चाँदका 'कटोरा' घेऊन अकेली आलेली भिखाऱन रात दिसत असते, आणि कधीकधी हीच रात 'चाँदकी बिंदीवाली' झाली तरी त्याला आश्चर्य वाटत नाही; लागोपाठच्या दोन अनुस्वारीत शब्दांचा नादच बहुतेक त्याला मोहवत असतो. 'ही बघ मला काय गंमत सापडली!' अशा निर्व्याजपणे हे मूल फक्त त्याचं कल्पनाविश्व आपल्यापुढे उलगडतं. ह्या अवखळ मुलाची अनेक मूड्समधली अनेक रुपं आपण बघितली आहेत, कधीतरी एखादी चुपसी लगी मनाला लावून घेऊन गप्प गप्प बसून रहाणारं, जवळ घ्यायला गेलं तर नुसतंच 'नहीं, उदास नहीं' म्हणत राहणारं. कधी ही परछाईयोंकी दुनिया भरगर्दीत सुद्धा नुसतं तनहा होऊन बघत बसणारं, तर कधी एखाद्या जन्मजात बंजा-यासारखं, नमकीन रात आणि मीठे सांझ-सवेरे दोन्हीही सारख्याच आनंदाने चाखू शकणारं! काही म्हणा, याच्या उपमा-उत्प्रेक्षा-प्रतिमा-विशेषणं नेहमीच, डोळ्यापुढच्या दृश्याचा सर्वांगाने आस्वाद घेत, सैरावैरा झेपावत असतात.
गुलझारच्या अनेक उत्कृष्ट कलाकृतींमध्ये, 'लेकीन' सिनेमामधली गाणी हा एक मोठा मानदंड मानता येईल. 'कुछ चाँदके रथ तो गुजरे थे, पर चाँदसे कोई उतरा नही' म्हणून हताश झालेली काय किंवा 'पिछली गली में जाने क्या छोड आयी मैं' शोधणारी, सिली लकडीसारखी विरहाग्नीमध्ये धुमसणारी नायिका त्यांच्या शब्दांमधून बिती हुई गलियोंसे फिरसे गुजरण्याचं दुःख अप्रतिमरित्या व्यक्त करते. पण ह्या सगळ्यामध्ये मला त्यांचं 'सुरमई शाम' सगळ्यात जास्त आवडतं.

सुरमई शाम इस तरह आयें, सांस लेते हैं जिस तरह सायें
कोई आहट नही बदनकी कहीं, फिरभी लगता है तू यहीं है कहीं
वक्त जाता सुनाई देता है, तेरा साया दिखाई देता है 

हे सगळं एका अतिशय स्तब्ध सुंदर हलकेच मावळणाऱ्या सोनसळी संध्याकाळीचं खास गुलझारी शैलीतलं (सांस लेते हैं... ) वर्णन वाटतं... आणि मग एकदम पुढे येतं ते…

जैसे खुशबू नज़रसे छू जायें

खरं तर एव्हांना ह्या मुलाच्या शब्दाच्या खेळण्यांची उलथापालथ करण्याची, प्रतिमांचा लपंडाव खेळण्याची सवय झाली आहे - असं वाटत असतं - पण हे त्याहीपेक्षा भारी आहे हे जाणवून आपण थबकतो. खुशबू... नजरसे... आणि छू जायें... अरे काय चाललंय काय म्हणून आपण संवेदना आणि अनुभूतींचा हा गुंता सोडवायला जातो आणि ह्या खट्याळ पोराच्या कल्पनाशक्तीनी थक्क होतो. लक्षात घ्या, 'लेकीन' ही एक इंद्रियेतर अनुभवाची कहाणी आहे. इथे मुद्दामच त्यानं पंचेंद्रियांच्या अनुभूतींचा काला करून एक नवीन परिमाण - सिक्सथ सेन्स - शोधलं नसेल कशावरून? नायकाभोवती घोटाळणाऱ्या गूढ अनाकलनीय घटनांच्या सावल्याच ह्या गाण्यात प्रतीत झालेलया जाणवतात.
मला तरी गुलझारची, त्यांच्या स्वतःच्या मोजपट्टीने सुद्धा, ही एक श्रेष्ठ काव्यरचना वाटते.
शब्दांशी एवढ्या सहजपणे, नाजूकपणे आणि खट्याळपणे खेळत राहणारं हे मूल आज आणखी एका वर्षानी मोठं होतंय. त्याचं चिरतरुण काव्य असंच बहरत राहू दे! 

आजच्या दिवशी देवाजवळ एक मोठी स्वार्थी मागणी!

https://www.youtube.com/watch?v=ADHapMuxZik

Comments