ठमीची गोष्ट

बरोबर तीस वर्षांनी पुन्हा कलकत्याला आलो होतो - आठ दिवसांच्या बिझनेस ट्रीपसाठी. आयुष्यात पहिल्यांदा आलो होतो तेव्हा वाटलंही नव्हतं ह्या शहरात कधी पाऊल पडेल. आठवडाभर राहिल्यावर वाटलं होतं पुन्हा कद्धी इथे पाऊल टाकणार नाही... आणि दोनच वर्षात परत आलो, पुढची दोन वर्ष राहिलो, प्रेमात पडलो - कलकत्त्याच्या, बंगाली भाषेच्या, संस्कृतीच्या... तेव्हा सोडतांना वाटलं होतं, आता मात्र शंभर टक्के खात्रीने परत काही येत नाही मी! म्हणतात ना, पुरुषस्य भाग्यं!

बिझनेस ट्रीप संपली कालच; पण ओल्ड टाइम सेक, वीकेंडचे दोन दिवस इथेच राहून सोमवारी पहाटे परत जाणार. आज सकाळपासून फोन करायचा सपाटा लावलाय. तिचं लग्नानंतरचं नांव बरोबर आहे का ह्याची सुद्धा खात्री नाही. तीस वर्षांपूर्वी एवढी जवळीक, की नांव घेऊन हाक मारायचीच वेळ येत नसे. आलीच तर तोंडाला येईल त्या नांवाने - रंभा, ठमी, साळकाई, देवीजी... - काहीही चालत असे. ओ द्यायला ती तत्परच होती, ह्या नावांमधलं ओ का ठो समजत नसलं तरीही. मग परकी झाली ती एवढी, की नांव सुद्धा लक्षात नाही आता. आणि एवढं आहे, तर मग भेटायची एवढी उत्सुकता तरी कशाला?

पण काहीतरी आहे खरं! काल त्याच जुन्या रस्त्यांवरून गेलो ना? मधल्या काळात गर्दी पंचवीस पटींनी वाढल्यासारखी जाणवत होती. संध्याकाळच्या गर्दीत गाड्या, भॉम्पभॉम्प वाजवत पुढे सरकायची घाई करणाऱ्या सायकल रिक्षा, माणसं, रडणारी मुलं, फेरीवाले, वैतागून हॉर्नवर पंजा दाबून बसलेले टॅक्सीवाले - गोंगाटाची परिसीमा होती. ठेच गर्दीने ओसंडून वाहणारे, खरं तर गलिच्छच म्हणावं असे रस्ते. बाजूला गाडीमध्ये सूझनचा (माझी बॉस; तिला कलकत्ता दाखवायला घेऊन गेलो होतो) अविरत जप चालला होता, 'ओ माय गुडनेस! हाऊ क्राऊडेड! कान्ट बिलीव्ह इट. हाऊ कॅन दे लिव्ह लाईक धिस?' पण त्यामध्ये सुद्धा तिच्या कॅमेऱ्याचा क्लिक्लीकाट काही थांबत नव्हता. ह्या रस्त्यांवर फोटो काढण्याएवढं खास काही आहे कॉलेजात असतांना जाणवलंच नव्हतं, नाही? आणि कॅमेरा कोणाकडे होता तेव्हा; आणि हवा होता कशाला? ठमीचा चेहरा आजही तस्साच डोक्यात आहे, त्यासाठी कागदी फोटोंची काय गरज! सुझनला माझी कॉलेजची बिल्डींग बाहेरून दाखवली. तिने अमेरिकन सराईतपणे झटदिशी चेहऱ्यावर आठवं आश्चर्य बघत असल्याचा कौतुकाचा भाव फासला. म्हणाली 'तुझे तेव्हाचे मित्र मैत्रिणी असतीलच ना इथे? मग, क्लास री-युनियन नाही का?' आणि एकदम लक्ख ट्यूब पेटावी तसं झालं - अरेच्या! फोन तरी करून बघता येईल. म्हणजे, मुळात डिरेक्टरी मधून शोधून काढायला हवे नंबर, त्यासाठी नावं आठवायला हवी. तेव्हा दोन-पाच मिनिटं विचार करून ठमीचं खरं नांव आठवलं - पहिल्या दिवशीच, तोंडाचा फुगा करत. 'आमार नाम शुचिश्मिता चोट्टोपाध्दाय' म्हणून ओळख करून दिलेली. कोण एवढं मोठं नांव घेत बसणार! म्हणून थोडी ओळख वाढल्यावर 'ठमी'! म्हटलं आमच्या मराठीतही असतात तुमच्याचसारखी डाकनामं... इतकी गोड हसली होती. आता पुढचा प्रश्न - लग्नानंतरचं नांव काय? सगळी ओळखीची गांगुली, चॅटर्जी, बॅनर्जी, सेन, ठाकूर.. आठवून बघितली - गुहा! हां, गुहा आडनांव होतं तिच्या नवऱ्याचं... म्हणजे आता तिचं पण, नाही का.

गुहा नांवानी भरलेली पाच सहा पानं बघूनच छाती दडपली. पण, नेटाने फोन फिरवायचा सपाटा लावला. प्रथमग्रासे मक्षिकापातः! म्हाताऱ्या बाईंनी उचलला. त्यांना फक्त बंगालीच येतं. मग काय, एवढ्या वर्षांपूर्वीचं, मोडकं तोडकं, गंज चढलेलं बंगाली घासून पुसून झाडलं त्यांच्या तोंडावर! दुसरी पंचाईत म्हणजे घरातल्या 'बौ' (सूनबाई)ची चौकशी धेडगुजरी बंगालीत करणारा हा कोण अ-बांगाली - हा संशय फोनच्या कर्ण्यामधून माझ्या कानात स्पष्ट ऐकू येत होता. हा अनुभव त्यांनतर अनेकदा आला. बारा-पंधरा वेळा अशा ठोकरा खाल्ल्यावर हा वेडगळ नाद सोडून द्यावा अशी सद्बुद्धी झाली होती, पण 'अजून एकदाच' च्या मोहाने विजय मिळवला... आणखी तीन-चार वेळा. आणि शेवटी एकदा 'हालो, आमी शुचिश्मिता' कानावर पडलं. तोच आवाज! थोडा थकलेला... 'ठमी?' काही सेकंद स्तब्ध शांतता. माझा विचार चालू, फारफार तर काय, प्रॅन्क कॉल म्हणून बाई धाडकन फोन ठेऊन देईल; व्हिडीओ फोन तर नाही ना हा, आणखी काय होणार! पण तब्बल वीसेक सेकंदांनी आवाज आला 'के? के बोलचे? की बोल्लेन आपनी? (कोण? कोण बोलतंय? काय म्हणालात?)' मी म्हटलं 'चीनते पारो ना (ओळखलं नाहीस)?' 'ना, बिश्शाश कोरते पारिनी (विश्वास नाही बसत).' - आता मात्र उत्तर तत्क्षणी आलं, तस्संच फटकन, तस्संच खट्याळ.

ते खरंय! कसा विश्वास ठेवणार? एकेकाळी पाठ फिरवून आयुष्यातून निघून गेलेलं, आपलं वाटलेलं, एकदाही मागे वळून न बघता निघून गेलेलं माणूस! एक पत्रही लिहावंसं वाटलं नाही कधी ह्याला, का एका पत्राचं उत्तर द्यावंसं नाही वाटलं. अस्तित्वात तरी आहे का नाही ह्याचीही शंका असतांना अचानक धूमकेतू सारखं उगवेल? कशाला परत दार ठोठावेल... फोनची घंटी वाजवेल?

का? ते त्यालाच माहिती नाही.

एकदा ओळख पटल्यावर तिच्या प्रश्नांचा महापूर पार अवाक करतोय. 'कुठे होतास एवढी वर्ष? कुठून बोलतो आहेस? मी ऐकलं परदेशी गेलास? मला साधं कळवता सुद्धा आलं नाही तुला? मी कोण अर्थात, काय गरज आहे ना मला सांगायची?' मधली तीस वर्षं एखाद पान उलटावं तेवढ्या सहजपणे मागे पडली. अश्शीच भांडायची - रुसायची - कद्धी सुद्धा बोलणार नाही म्हणायची - आणि नॉनस्टॉप बोलत सुटायची. त्या परिस्थितीतही, तिचं ते फाडफाड बंगाली अजून आपल्याला समजतंय ह्याचा आनंद झाला.

प्रॉब्लेम तेव्हापासून आतापर्यंत तोच - समजतं सगळं, पण बोलता येत नाही! उत्तर देण्याएवढं बंगाली तर तेव्हाही येत नव्हतं, आणि आता? मुळात कुठच्या का भाषेत, उत्तर असायला हवं ना!

आम्ही अतिशय चांगले मित्र होतो, दिवसाचा बराच काळ एकत्र घालवत होतो; अखंड एकदुसऱ्याची टिंगलच करत होतो. ती हुशार होती, खट्याळ होती, एक अवखळ, इर्रिप्रेसिबल म्हणावं असा, स्पार्क होता, छान विनोदबुद्धी होती तिच्यात. सुंदर?... त्याचं उत्तर शेवटी बघणाऱ्याच्या डोळ्यात असतं, नाही का? ‘आकर्षक' वर तरी बहुतेकांचं एकमत झालं असतं. पण मलाच कुठच्याही कमिटमेन्टची फार भिती होती. माझा मी काही करू शकेन, कुठेही जाईन आणि कसाही राहीन; पण मला बरोबर इमोशनली सुद्धा अवलंबून असलेलं कोणी नको होतं. गाठ बांधून स्थिर राहण्यापेक्षा, मी गाठी सोडून निर्लेपपणे कुठेही जाऊ शकतो ह्या स्वातंत्र्याची ओढ जास्त असते त्या वयात, निदान मुलांच्यात तरी! कशाकडेही म्हणताक्षणी पाठ वळवून मी एकदाही मागे न बघता निघून जाऊ शकतो हा ताठा होता माझ्यात. हे सगळं, कुठच्याही भाषेत सांगणं कठीण होतं, तिला समजणं त्याहूनही कठीण - असं निदान मला वाटलं होतं. त्यामुळे, जेव्हा नोकरीच्या निमित्ताने आपोआपच फारकत झाली, तेव्हा 'हो, पत्रं लिहू' एवढ्या वायद्यावर वेगळं होता आलं - करार-मदार, वेड्या शपथा आणि आणाभाका नसण्याचा तो एक फायदा, की प्रत्यक्ष तोडायला असं काही नसतंच! तिने वर्षभरात पत्रांमधून, घरचे लोक लग्नाच्या मागे लागले आहेत असं कळवलं, तेव्हा मी उत्तरात नुसती तिला बघायला येणाऱ्या स्थळांची, बंगाली बाबूंची, बंगाली लग्नसोहळ्याची थट्टा केली. वधूला डोक्यावर उचलून आणण्याची त्यांची पद्धत असल्याने चार पैलवानांना आतापासूनच खुराक देऊन तालीम करून घे असा सल्ला दिला. माझ्या उत्तरात तिचं असं बघून, दाखवून लग्न होणं गृहीतच धरलेलं सूचित होतं, आमच्या दोघांच्या संबंधी काहीच सूचना नव्हती. ना तिने विचारलं, ना मी सांगितलं. ताठा तिच्यात काही कमी नव्हता. काहीही स्पष्ट बोलायच्या किंवा लिहायच्या ऐवजी, तिने फक्त उलटी माझी 'एकदा लग्न होऊन गेले सासरी, की मग बसशील तळमळत. कित्ती बोलावलंस तरी मी काही येणार नाही. बीएरपोड आमार श्श्यामि ऍका आमार शोबाई (लग्नानंतर नवरा हेच माझं सर्वस्व!)' अशी टिंगल केली होती. एवढ्यावर मी समजून घेऊन काही सरळ डोक्याने विचार करून उत्तर देईन अशी कल्पना असेल तिची.

म्हटलं ना, अचाटच होती तिची कल्पनाशक्ती!

'बरं मग! समजतंय तरी का मी काय बोलतेय, का विसरलास सगळं बंगाली एव्हांना? पारच अबोल झालास एकाएकी! उद्या संध्याकाळी आमच्याकडे ये जेवायला आणि गप्पा मारायला. नाही, फालतू कारणं नको आहेत मला. रात्री आमच्याच इथून जा एअरपोर्टला. मी आणि पूर्णेन्दू येतो पाच वाजता तुला न्यायला.' तीच पूर्वीची इमोशनल बळजबरी!

दुसऱ्या दिवशी साडेचारच्या ठोक्याला हॉटेलच्या रिसेप्शनिस्टचा फोन, 'मिस्टार अँड मीसेश गूहो टू शी यू'. 'पाठव त्यांना वर', मोठं ऐटीत सांगितलं मी. बेल वाजल्यावर दार उघडलं. वयाच्या मानाने वजन भलतंच आटोक्यात, किंबहुना कमीच झालेलं असावं असं वाटलं; थकल्यासारखीही दिसत होती. पण चेहऱ्यावरचा मिश्किल भाव आणि चैतन्य मात्र तेच होतं. तेच खट्याळ डोळे, तशाच दोन्ही गालांवरच्या खळ्या! पूर्वीं केसांचं पोनीटेल असे, आता चांगला अस्सल बंगाली बौदी सारखा केसांचा चापूनचोपून घातलेला खोपा होता. अजूनही एवढे भरगच्च केस बघून माझा हात नकळत माझ्या डोक्याकडे जाणार होता - झाकून घ्यायला. 'ओरी बाब्बा! कॉतो मोटू होये गॅछो!' ने भानावर आणलं - एवढं डोळ्यात भरण्यासारखं वजन वाढलं असेल कधी जाणवलं नव्हतं. 'अँड यू लुक व्हेरी प्रेटी टू!' इतपतच टोमणा स्फुरला तीन सेकंदात. मग पूर्णेन्दूशी ओळख - कुठच्याही मध्यमवयीन बंगाली बाबूसारखाच दिसत होता तो. नांवाप्रमाणेच गोलमटोल. कुठल्यातरी सेंट्रल गव्हर्नमेन्टच्या मोठ्या ऑफिसात कोणीतरी मोठा होता, ते त्याच्या अतिरेकी पुस्तकी इंग्रजीमधूनच जाणवत होतं. मी अमेरिकेतून आलेला असल्यामुळे इंग्रजी सोडून कुठचीही भाषा माझ्या कानातून आत शिरत नसेल अशी त्याची कल्पना दिसली - ती मात्र बिनधास्त अखंड अस्खलित बंगालीत बोलत होती.

मग त्यांच्या गाडीतून त्यांच्या घरी. छोटासा टुमदार फ्लॅट - मन लावून सजवलेला दिसत होता. जेवायला आम्ही तिघंच असूनही बेत गावजेवणाचा होता. जेवतांना गप्पा बहुतेक आमच्या दोघांच्याच. माझ्या बायको-मुलांची चौकशी. कोण, किती, काय करतात... तिच्या प्रश्नांचा आणि त्यामागच्या कुतूहलाचा धबधबा अवाक करणारा होता. मी गमतीने म्हटलं 'एक बायको, एक मुलगा आणि एक मुलगी. झालं समाधान?' नाटकी चेहऱ्याने चुकचुकत म्हणाली 'एवढ्या वर्षात अमेरिकेत राहूनही एकच बायको? काय उपयोग तिथे राहून!' मग थोडी गंभीरपणे टीव्हीवर नजर खिळवून म्हणाली 'मला खात्री आहे, ती नक्की खूप सुंदर असणार. तोमार चॉईस जे!' मी नुसताच हसलो - 'ज्याई बॉलो (तू म्हणशील ते)'. 'बायकोचा सोड, पण मुलांचा सुद्धा एकही फोटो बरोबर ठेवावासा वाटत नाही तुला?' ह्यावरून एक लेक्चर! त्यांना दोघांना मूल-बाळ नव्हतं. मी संसाराच्या गोष्टी तिथेच थांबवल्या; मग बहुतांश आमच्याच जुन्या आठवणी. हा काय करतो, तो कुठे असतो. अमका प्रोफेसर आजकाल अमेरिकेत असतो, ते अमुक गेले माहितेय का वगैरे. गप्पांच्या बरोबरीने आग्रह करकरून खायला घालत होती मला.

जेवण उरकून वाळलेल्या हातांनी तसेच कितीतरी वेळ आम्ही टेबलावर गप्पा मारत बसलो होतो. पूर्णेन्दूमोशाय बहुतेक गप्पच होते - अगदीच विचित्र दिसू नये म्हणून मध्येमध्ये जुजबी भाग घेत होते आमच्या संभाषणात. शेवटी मीच हात धुवायला उठलो. मग मघई पानाचा आग्रह - पूर्णेन्दू तत्काळ उठला, मी घेऊन येतो सगळ्यांसाठी पान! मी म्हटलं, मीही येतो तुमच्याबरोबर - तेवढेच पाय मोकळे करता येतील. ती भांडी आवरायला लागली.

बाहेर पडल्यावर पूर्णेन्दू म्हणाला, 'युआर भिजीट इज हायली ओब्लायजिंग हां. माने, शुचिश्मिता इज शो, की बॉलो, एकशायटेड'. मी म्हटलं, 'आपण बंगालीत बोलूया का? मला ऐकायला खूप आवडतं आणि मोडकंतोडकं बोलता सुद्धा येतं.' मग तो बोलायला लागला, 'काल तुझा फोन आल्यापासून तिच्यात नवीनच चैतन्य उभारलंय. गेल्या कित्येक दिवसात तिने खाण्या पिण्यात, स्वैपाकात अजिबात रस घेतला नव्हता. अर्थात स्वैपाकाची बाई आहे; तिच्या ह्या परिस्थितीत स्वैपाक करणं सोडाच, तिला धड खाणं सुद्धा जात नाही.' चर्र्कन मला एकदम जाणवलं, आम्हाला आग्रह करण्याच्या आणि मला शेकडो प्रश्न विचारण्याच्या भरात तिने जेमतेम दोन घास भात वाढून घेतला असेल स्वतःसाठी. हसण्या खिदळण्यामध्ये 'अशी फिगर मेंटेन करतेस होय!' असं तरी विचारता आलं असतं! 'तिच्या ह्या परिस्थितीत म्हणजे?'. पूर्णेन्दू खरंच अवाक झाला - 'तिचा विग तुझ्या लक्षात आला होता ना? पोलाईटपणे तू त्याबद्दल काहीच बोलला नाहीस, जाणवलं मला. (अरे वेड्या, अडाण्यांना पोलाइट नाही रे म्हणत इंग्रजीत!, जाऊ दे.) तिला हसत ठेवलंस हे कितीतरी महत्वाचं होतं माझ्या दृष्टीने - आज किती महिन्यांनी एवढी छान गेली आमची संध्याकाळ. तिला अजूनही किमो चालू आहे. काही दिवस चांगले असतात, पण कालपासून तिच्यात जो उत्साह दिसतोय तो अलौकिक! सगळे मनाचे खेळ, मनाची साथ असली की ती निभावून नेते. पण बऱ्याच वेळा मात्र ती फार थकलेली असते. खरंतर दोघेही हताश आहोत, कारण डॉक्टरांनी डेडलाईन दिलेलीच आहे. चार, फार फार तर सहा महिने.'

डेड लाईन! का हा माणूस नको तिथे इंग्रजी पाजळतो? खूप खोल जबरदस्त ओरखडा उठवून गेला तो शब्द.

घरी परतल्यावर तिच्या नजरेला नजर देणं मला शक्यच नव्हतं. तिला समजलं - तीही जुनीच सवय! हसली, म्हणाली मघाशी आलं होतं माझ्या लक्षात तुला माझ्या काळ्याभोर दाट केसांचा हेवा वाटतोय, तुझे पिकले ना सगळे! आणि तरीही बुद्दू तो बुद्दूच! मग बोलत होती बराच वेळ, स्वीकारानंतर येणाऱ्या शांतपणे. ती एकेकाळी रवींद्र संगीत शिकत असे. मी आठवण करून दिली, 'म्हण ना एक तरी'. बरेच आढेवेढे घेऊन, 'तुला तेव्हा फार आवडत असे' असं म्हणून तिने गुणगुणायला सुरुवात केली 'गोधुली गगने मेघे, ढेकेछिलो तारा; आमार ज्या कोथा छिलो, होये गॅलो शारा' (संध्याकाळच्या धूसर नभात, ढगांच्या आड लपले होते तारे; जे सांगायचे मनात होते, संपूनच गेले ते सारे ) अजूनही माझं अतिशय आवडतं गाणं... पण आता त्या ओळी, तिच्याकडून, पूर्ण ऐकवणारंच नव्हत्या. तिला थांबवून मी मधलीच ओळ म्हटली 'आर की कोखून कोबे, एमून शोंध्दा हॉबे?' (आता पुन्हा अशी संध्याकाळ कधी आणि कुठे येणार?) गप्पच झालो मग दोघेजण.

दारातून निघतांना तिने पटकन एका पिशवीमधून एका महागड्या दिसणाऱ्या साडीची घडी काढून माझ्या हातात ठेवली - 'बॅगेत वरती राहील नक्कीच! तुझ्या बायकोसाठी. ही नेसून तिचा फोटो काढून पाठव मला; बघू दे माझ्या कल्पनेतल्यासारखीच सुंदर दिसते की नाही.' मी थक्क! हे मला पारच अनपेक्षित होतं. कसनुशा चेहऱ्याने तिला शेवटी खरं ते सांगितलं. 'अगं, कल्पनेतल्या माणसांची वर्णनं करणं, त्यांची चित्रं रेखाटणं सोपं असतं. ही प्रत्यक्षातली साडी कशी नेसवणार ना त्या कल्पनेला?'

विस्फारल्या डोळ्यांनी ती जेमतेम मला ऐकू जाईल असं म्हणाली 'पुढच्या वेळी, पुढच्या जन्मात, पत्रांची उत्तरं द्यायला, नाहीतर फोन करायला एवढा उशीर नको करू.'

विमान उडतांना मी मनाला पुन्हा पुन्हा बजावलं - पुन्हा ह्या शहरात पाऊल सुद्धा टाकणार नाही कधी.

ह्या जन्मी तरी.


Comments