'नेमेची येतो मग पावसाळा' खूप लहानपणी शिकलो होतो. मुंबईमध्ये फक्त उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच ऋतू माहिती होते. बाकी वसंत, हेमंत वगैरे गल्लीतल्या मुलांची नावं असत. अशा नावांचे ऋतूही असतात असं ऐकलं होतं, पण प्रत्यक्ष पुरावा काहीच नव्हता. पावसाळा मात्र नेमेची जूनच्या मध्यापर्यंत येत असे, आणि आल्यासारखा चार महिने रहातही असे.
अमेरिकेत असा चार महिने राहणारा पावसाळा 'ऋतू' नाहीच! इथे बहुतेक महिन्यांमध्ये थोडाफार पाऊस, किंवा बर्फ. कधी थोडा, तर कधी फार. त्यातल्या त्यात 'नेमेची' पाऊस सप्टेंबरअखेरचा. नांदीच ती, येणाऱ्या हेमंत ऋतूची. हो, आणि ऋतूंबद्दलच्या त्या अफवा मात्र खऱ्या निघाल्या बरं का! म्हणजे, खरंच वसंत, ग्रीष्म, हेमंत आणि शिशिर असे चार वेगवेगळे ऋतू असतात. प्रत्येकाच्या हवेचा पोत वेगळा, सूर्याचा प्रकाश, आसमंतातले आवाज, परिसरात दरवळणारे वास सगळंच वेगळं!
अमेरिकेत असा चार महिने राहणारा पावसाळा 'ऋतू' नाहीच! इथे बहुतेक महिन्यांमध्ये थोडाफार पाऊस, किंवा बर्फ. कधी थोडा, तर कधी फार. त्यातल्या त्यात 'नेमेची' पाऊस सप्टेंबरअखेरचा. नांदीच ती, येणाऱ्या हेमंत ऋतूची. हो, आणि ऋतूंबद्दलच्या त्या अफवा मात्र खऱ्या निघाल्या बरं का! म्हणजे, खरंच वसंत, ग्रीष्म, हेमंत आणि शिशिर असे चार वेगवेगळे ऋतू असतात. प्रत्येकाच्या हवेचा पोत वेगळा, सूर्याचा प्रकाश, आसमंतातले आवाज, परिसरात दरवळणारे वास सगळंच वेगळं!
प्रत्येक ऋतूत, आपणही वेगळे असतो.
दिवस दृष्ट लागण्यासारखे मजेत जात असतात. संध्याकाळी - ज्याला एरवी रात्री म्हटलं असतं - आठ-नऊ वाजेपर्यंत उजेड असतो. दिवसा दार उघडल्याक्षणी लक्ख उन्ह डोळे दिपवून टाकत असतं. बाहेर पडल्याक्षणी डोळे मिचमिचे करावे लागतात आणि अंगावर एक उबदार पांघरूण पडतं; आणखी पाचदहा मिनिटात भट्टीतल्यासारखं गरम होऊ लागतं. आसमंत हेझी असतो; फार दूरवर नीट दिसत नाही. बार्बेक्यूच्या चुलींचा धुरकट वास दरवळत असतो. सगळीकडे मुलांच्या खेळण्याचे, खिदळण्याचे आणि किंचाळण्यांचे आनंदी आवाज भरलेले असतात. कधीतरी त्यांना, दारोदार फिरणाऱ्या आईस्क्रीमच्या ट्रकाच्या बालिश खेळकर संगीताची पार्श्वभूमी असते, तर कधी शेजाऱ्यांच्या पूल पार्टीमधल्या बूमबॉक्सवरून तरंगत येणाऱ्या कॅरिबिअन कॅलिप्सो सुरांची. क्वचित कोणाच्या लॉन मोअरचा आवाज, तर कधी एखाद्या फटफटीच्या अश्वशक्तीच्या आवाजी प्रदर्शनाचा! हे सगळे आवाज खास उन्हाळ्याचे. अनमोल. चुटपुटते तीनचार महिनेच कानावर पडणारे हे दुर्लभ आवाज उराशी घट्ट धरून ठेवायचे असतात. ह्या ऋतूचंच सूर्याशी, सुट्यांशी, आनंदाशी अतूट नातं आहे! सगळं विश्व सूर्यदेवांच्या दर्शनासाठी बाहेर पडलेलं असतं, घराच्या चार भिंतींचा कोंडवाडा सोडून!
मग अचानक, सप्टेंबरअखेर एखादा दिवस येतो, सुटी संपत आल्याची पहिली घंटा वाजवत. तसा पाऊस पडत असतो दोन तीन दिवस, अगदी विजांच्या कडकडाटांसह - पण ९०-९५ तापमानाच्या हाळीमध्ये तो सुखदच वाटलेला असतो. ह्यावेळी मात्र पाऊस थांबल्यानंतरही हवेतला गारवा जाणवत रहातो; एसी ची गरज वाटत नाही. बाहेर उन्हाच्या उबेची नुसती झालर लावलेला एक सुखद गारवा असतो. माहिती असतं की सूर्य जरा ढगाआड गेला, तर हा गारवा घेरून टाकणार आहे. एक लहानशी शिरशिरी जाते अंगातून. प्रत्यक्ष थंडीमुळे नव्हे, पण उन्हाळा संपत आला, मनाची सुटी संपत आली, सुखाचे दिवस संपत आले ह्या भावनेने. हेमंताची चाहूल लागलेली असते. संध्याकाळी सहा-सातलाच सूर्यास्त व्हायला लागतो, आणि आठ-नऊला गुडूप अंधार!
जी चाहूल नाकारायचा मन प्रयत्न करत असतं, तीच चाहूल झाडांनाही लागलेली असते. झाडं मात्र जेष्ठ, परिपक्व, शहाणी! ती सवयीने शांतपणे पानांचे रंग बदलायला लागतात. कालपर्यंत हिरवीगार होती, ती पानं बघताबघता पोपटी, पिवळी, नारिंगी, लालबुंद आणि तपकिरी व्हायला लागतात. कालपर्यंत झाडावर दिमाखाने मिरवत होती, आकाशाकडे झेपावत होती, ती पानं एकेक दोनदोन करत, संथ गिरक्या घेत जमिनीवर येतात. कालपर्यंत त्यांच्या पाठीमागे दडून राहिलेल्या भरगच्च फांद्या आता उघड्या पडत असतात. राठ, शुष्क आणि ओबडधोबड. चांगल्या नाही दिसत त्या त्यांच्या हिरव्या साजाशिवाय. आता पाऊस आणि वारा मिळून निर्दयपणे उरल्यासुरल्या पानांची झाडांवरून हकालपट्टी करत असतात. जमिनीवर तांबूस तपकिरी पानांचा खच पडलेला असतो. करडा, आणि कोरडा. 'फॉल' आलेला असतो. हवा अप्रतिम सुंदर स्फटिकासारखी पारदर्शी असते. बाष्प जवळजवळ शून्यवत असल्याने, नजर ठरेल तिथवर सगळा आसमंत दिसू शकतो. ह्या उन्हाला एक वेगळीच धार असते; स्वच्छ स्पष्ट दृश्यांची आणि पोकळ तप्त कडांची. म्हणजे कळत असतं, अंगाला जो स्पर्श होतो आहे तो तापलेला आहे, पण त्याच्या पलीकडे मात्र फक्त गारवाच आहे. सुंदर लखलखीत दिवस झपाट्याने लहान होत जातात. काळोख पटकन पडतो, दाट पसरतो आणि अंधाराच्या पेटीत सगळं सौन्दर्य बंद करून टाकतो! पाच वाजता ऑफिसातून बाहेर पडतांनाच गाडीचे दिवे लावावे लागतात; तेव्हा डोक्यात प्रकाश पडतो, आता यापुढे काही महिने थंडी, आणि बर्फ.
पण आता सणांची सुरुवात झालेली असते. बाहेरच्या काळोखी आणि थंडगार वातावरणाला आव्हान दिल्यासारखी, माणसं घरात उत्सव साजरे करतात. घराघरात बेकिंगचे गोडसर आणि उबदार वास पसरलेले असतात. थॅंक्सगिविंग सारखा खाण्याच्या, अन्नाच्या सन्मानार्थ सण साजरा होतो. जवळचे गोतावळे गोळा करून घरं भरून जातात. बाहेरच्या थंड मलूल वातावरणावर मात करून आतमध्ये हास्यविनोदाचे फवारे आणि गप्पांच्या मैफिली झडत असतात.
बाहेर थंडी दर दिवशी जास्तजास्त वाढतच असते; कोट आणि मोजे घालण्याशिवाय गत्यंतर नसतं. अशातच एक दिवस बाहेर काहीतरी पांढरं भुरभुरताना दिसतं. पहिलं बर्फ! गोठलेल्या पाण्याचे सूक्ष्म कण हवेबरोबर हेलकावे खात, वाऱ्याबरोबर डुलत, जमिनीवर पोचायची खास घाई नसल्यासारखे सावकाश पडत असतात. सात आठ महिन्यांनी भेटलं म्हणून आपणही कौतुकाने त्याच्याबरोबर खेळायला बाहेर जातो . थंडगार पांढऱ्या शुभ्र वाळूच्या भुसभुशीत स्पर्शासारखं भासतं ते बर्फ. जमिनीवर थर जमत जातात, आणि हांहां म्हणता चारसहा इंचांची पांढरी शुभ्र दुलई जमिनीला आच्छादून टाकते. वाढत्या थंडीमध्ये तिचा भुसभुशीतपणा जाऊन, तिला एक सुंदर गुळगुळीत तकाकी येते. देवाजीने करुणा केली, तर कधीकधी अशा वेळी नेमकी पौर्णिमा येते. आकाशही निरभ्र असतं. अशा रात्री, त्या शुभ्र तकतकीत बर्फावर विरघळणारा चंदेरी प्रकाश पहाणं हा आयुष्यातल्या अतिसुंदर अनुभवांपैकी एक. पूर्वजन्मीचं पुण्य असलं तर त्या निस्तब्ध वातावरणात कानांवर दुरून ख्रिसमस कॅरोलचे धीरगंभीर पण आनंदी विदेही सूर यावेत! हा अनुभव आपल्या उबदार घरात बसून घेणे ही 'आनंदाचे डोही आनंद तरंग' ह्याची प्रचिती असते.
हळूहळू बर्फाची नवलाई ओसरते, आता संपूर्ण आसमंत एकच एक पांढरा शुभ्र असतो. घरात लहान मुलंबाळं असली तर ती कोण कुठच्या दूरदेशीच्या प्रेमळ म्हातारबाबांनी, वर्षभराच्या चांगल्या वागणुकीसाठी दिलेल्या बक्षिसांची आतुरतेने वाट बघत असतात. त्यांच्या स्वप्नांमध्ये आणि आशांमध्ये सगळं घरच बाहेरच्या काळोखी थंडीला विसरून जातं. जुनं वर्ष संपतं, नवीन सुरु होतं. गेल्या वर्षी स्वतःशीच केलेले, अपुरे राहिलेले वायदे विसरून माणसं पुन्हा नवीन वर्षाचे नवे वाळूचे किल्ले उभारायला लागतात. आता बाहेर थंडीचा कडेलोट असतो, श्वास गोठून टाकणारी थंडी! दिवस काळोखी, ढगाळ आणि निरूत्साहीच असतात. क्वचित लक्ख उन्ह पडलं, तरी ते दूर गेलेल्या सूर्याने 'मी आहे बरं का! भेटू कधीतरी' असं नुसतंच फोटोशॉप केलेलं आश्वासन असतं. त्या उजेडाला उबेची अजिबात जोड नसते. हिवाळ्याला आवाज नसतो. आसमंतात आता पूर्ण शांतता असते, एखाद्या स्नो ब्लोअरचा अवेळी अघोरी आवाज सोडून! हे सरते तीन महिने सर्वात असह्य! हेही दिवस संपतील हा विश्वासच फक्त काय तो तारून नेतो.
अखेर एकदा चमत्कार होतो. जो दिवस कधी दिसेल का नाही अशी शंका यायला लागलेली असते, तोच दिवस उजाडतो. पहाटे कितीतरी महिन्यांनी एक अस्पष्ट मंजुळ आवाज ऐकू येतो. कसला बरं हा आवाज! ऐकलाय आपण पूर्वीही. नाही!! खरंच? ह्या दिवसातली नेहमीची मरगळ झटकून आपण ताडकन उठून बसतो. अरेच्या खरंच, पक्षी किलबिताहेत! जपून, सावधपणे, त्यांनाही खात्री नसल्यासारखे; पण किलबिल नक्कीच! ह्याचा अर्थ? वसंत येणार, नक्की येणार!
नुसत्या त्या विचाराने मन प्रफुल्लित होतं! अंधाऱ्या आणि थंडगार दिवसांचाही अंत आता दिसायला लागलेला असतो. एव्हाना घड्याळही पुढे गेलेलं असतं. त्यामुळे आधीच मोठा व्हायला लागलेला दिवस आणखीच मोठा भासायला लागतो. वसंत ऋतूचा आवाज म्हणजे पक्षांच्या किलबिलाटाचा आवाज. पहाटे पाच वाजल्यापासूनच त्यांना कोण घाई झालेली असते किडे शोधायला जायची. कलकलाट करून, 'त्या तिथे बघ, चार होते. गेले की काय सगळे? एवढं काही रडायला नकोय, नुसतं बघत बसून काही कोणी चोचीत आणून घालणार नाहीय. बघा बुवा, मी चाललो परत शोधायला... ' अखंड तोंडपाटीलकी चालू असते त्यांची; आणि सगळ्यांना एकदम एकाच वेळी काहीतरी महत्वाचं इतरांना सांगायचं असतं. आता मी कॉफी बाहेर डेकवर फेऱ्या मारत घेतो. बारीक बारीक फांद्या तजेलदार दिसत असतात. त्यांच्या टोकाला सूक्ष्म हिरवट ओलावा असतो. पान बाहेर पडावं का नाही ह्याचा निर्णय घेत असतं. काही बारक्या फांद्या टोकाला अगदी टपोरलेल्या असतात, त्यातून कळत नकळत एका कळीची चाहूल लागते. आणखी दोन दिवसात पानांच्या पदराआडून हळूच डोकावत ती कळी सूर्याच्या किरणांचा माग घेत असते. आता सगळ्या शुष्क वठलेल्या झाडाफांद्यांवर हिरवीगार पानं आणि रसरशीत फुलं फुललेली असतात. जमिनीवरचं करडं निर्जीव गवत पुन्हा एकदा जोमाने हिरवंगार होऊन वाऱ्याबरोबर डुलत असतं. निर्जीव हिवाळ्यावर मात करून चैतन्य पुन्हा एकदा उसळी मारून वर येत असतं, सूर्यदेव आता मुक्कामाला आलेले असतात, सृष्टीचा आनंदोत्सव सुरु झालेला असतो.
ऋतुचक्राचा फेरा अहर्निश चालू असतो.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...