भारतभेटीच्या गोष्टी

'हा आमचा xxx, अमेरिकेत असतो; कालच आलाय एका धावत्या भेटीसाठी' अशी माझी ओळख करून दिली जाते आणि माझा मनोमन थरकाप उडतो. सीतामाईप्रमाणे मलाही धरणी दुभंग होऊन पोटात घेईल तर बरे अशी तीव्र इच्छा माझे ठायी उत्पन्न होते. पूर्वानुभवावरून, ज्या पाहुण्यांशी ओळख करून दिली गेली, ते आता मला खालील मल्टीपल चॉईस संकटात टाकणार ह्या भितीने नकळत माझी गात्रे कंप पावतात.

१. अमेरिकेच्या 'बावळट आणि निर्बुद्ध' परराष्ट्रधोरणाबद्दल माझी खरडपट्टी काढणे.
२. 'पैसा असेल तिकडे तुमच्याकडे, पण डोक्याची मात्र वानवाच हो एकंदरीत!' ह्या अर्थाचे घालूनपाडून बोलणे.
३. पुढच्या पाच वर्षात भारत महासत्ता बनून मूर्ख अमेरिकनांची कशी छुट्टी करणार आहे ह्यावरून तीरंदाजी करणे - हा बाण दोन्ही दिशांनी जाऊ शकतो; म्हणजे आम्ही लाडीगोडी लावायला म्हणून मुंबईतील नवीन उड्डाणपुलाचे नाहीतर भारतीय उपग्रहाचे कौतुक करायला जावे, तर सी आय ए आणि अमेरिका कशी भारताच्या प्रगतीमध्ये टांग अडवून बसली आहे, ह्यावरून शरसंधान सुरु होते. एकंदरीत ऑप्शन ३ अ आणि ब दोन्हीमध्ये घायाळ होणेच नशिबी असते.
४. 'तिथे तुमच्याकडे काय मर्सिडीज आणि बी एम डब्ल्यूचा ताफाच असेल' ह्या खडा टाकण्याच्या विधानावर आम्ही सलज्ज मुद्रेने खालमानेने 'छे छे, काहीतरीच काय' वगैरे पुटपुटल्यावर 'म्हटलंच होतं मी ह्यांना, पैशाची सोंगं आणावी तर अमेरिकनांनी!' हा विषारी बाण कानाला चाटून जातो. एकदा कधी तरी ह्या प्रश्नाला 'हो, यंदा त्यात आणखी चार नव्या आवडयांची (हो, ह्या नावाचा अमेरिकन उच्चार आवडी आहे!) भर पडलीय.' असं उत्तर देऊन बघायचंय. ह्या उत्तरावर ऑप्शन २ चं संकट कोसळेल ह्याची खात्री आहे.
५. वरील सर्व प्रश्न आणि उपप्रश्न 'तुम्हाला आता मराठीची सवय नसणारच' ह्या एकतर्फी निर्णयानुसार इंग्रजीशी जवळीक दाखवणाऱ्या, पण आडवेळी मायबोलीची वाघनखे उगारून त्याच इंग्रजीच्या चिंध्या करणाऱ्या एका क्रूर भाषेत विचारले जातात.

ह्या अग्नीपरीक्षेतल्या चटक्यांचा बऱ्याच वेळा अनुभव घेतला असल्याने आता मेल्या कोंबड्याच्या निधड्या छातीने त्याला सामोरे जाऊ शकतो. पण गेल्या भेटीत आणखीच एक नवा अनुभव पदरी पडला. मेव्हण्याने त्याची गाडी आणि सोबत त्याचा पंचवीसेक वर्षाचा कुडाळ / गुहागर / सावंतवाडी परिसरातून नुकताच मुंबैत आलेला ड्रायव्हर दिमतीला दिला होता. ह्या पाहुण्याकडून तरी थोडी सन्माननीय वागणूक मिळेल ह्या माझ्या भाबड्या आशेला आमच्या दादर ते फोर्ट ह्या पहिल्याच प्रवासात सुरुंग लागला.

'कुटूनशीक आले तुमी? आ s मेरिकेतू s न?
'हो'
'कुटं असता तिकडं? हालिवूड तर नाय ना?' - ह्या प्रश्नावर एक छद्मी हास्य. मला परीक्षेची पहिली घंटा वाजलेली स्पष्ट ऐकू आली.
'नाही, न्यू यॉर्कमध्ये'
'मोठंय ना त्ये पन?'
'हो, बरंच मोठं आहे.'
'मुम्बैपेक्षा पन?'
'हो मला वाटतं' - मी बाजूचा म.टा. उघडला; संभाषणाला कात्री लावायचा प्रयत्न.
'मंग हापिसला गाडीनं जाता? तिकडं काय सगल्यांकडे गाड्या, नाsय?' आमची कात्रीच मेली बोथट!
'हो'
'डायवर आपला हाय का तिकडचाच?' - मला हा आपपरभाव समजायला थोडा वेळ लागला.
'नाही, ड्रायव्हर नाही. मीच चालवतो गाडी.' – उत्तर दिल्याक्षणी हा फाऊल होता ह्याची मला जाणीव झाली. मी जिन्यावरून धाडकन वीसेक पायऱ्या खाली गडगडलो.
'कसलं काम करता तिकडं?' - व्यवसायबंधूच तर नाही ना ह्याची चाचपणी.
'मी कॉम्प्युटरच्या क्षेत्रात आहे.'
'हां इकडं पन, जो उठतो तो म्हंतो मी काम्प्युटरचं काम करतो.'
'तिकडं रस्ते मंजी एकदम टीपटाप असतात नाय? हितल्यासारके वशाड ना s य. शंबरच्या स्पीडनं सगले गाड्या चालवतात. हाय ना?'
'इथल्यापेक्षा बरे असतात रस्ते, सगळेच काही चांगले नसतात. आणि सकाळी ऑफिसच्या वेळेला ट्रॅफिक जॅम असतात, शंभरच्या स्पीडने कुठे चालवणार गाडी!'
'ट्रॉपिक ज्यामचा मला सांगताव? सायबांना सकाली हापिसात सोडतो ना, तेवा बगायला या टिलक ब्रीज्यच्या भायेरच काय ज्याम असतो. मुंबैसारका ट्रॉपिक ज्याम कुट्टे पन नाय भेटनार तुमाला, काय?'

मला मनोमन मी केवळ सर्वोत्कृष्ट ट्रॅफिक जॅम बघण्यासाठी फुकटचं देशांतर केलं नाही ह्याचा आनंद झाला. ह्या आनंदात मी बसल्या जागी उडी मारली की काय असा प्रथम भास झाला. मग लक्षात आलं की रस्त्यातल्या विवरामधून आमची संपूर्ण गाडीच फुटबॉलसारखी टणकन उडाली होती. माझ्या ड्रायव्हरने रस्त्यातील खड्ड्याच्या निषेधार्थ प्रथम तीन-चार वेळा कर्कश्य हॉर्न वाजवला… आणि नंतर तोंड!

'आयचा घो या मुन्शिपाटलीच्या! कवा सुदारनार नाय ह्ये. तुमच्या तिकडं रस्ते मंजे एकदम गुळगुळीत, काचेवर चालवल्यासारकं वाटनार. मुंबैपासून रत्नांग्रीपरेंत गेलेत ना, तरी समजनार पन नाय. शंबर काय, दीडशेच्या पन स्पीडनी चालवतात गाड्या तिकडं.' वेगात आणखी थोडी भर घालून मला पुन्हा एकदा डिवचत तो म्हणाला. पण ह्यात कुठेही प्रश्न नसल्याने मी गप्प राहिलो.

'आनी त्ये ज्यामचा बोललो ना, त्येचा येवडा टेन्शन नाय घ्यायचा. ही अशी फस्सकन मदून काडायची गाडी.' ह्या बोली वाक्यावर प्रात्यक्षिक म्हणून त्याने खरंच भसकन स्पीड वाढवून, पुढच्या दोन गाड्यांच्या मधल्या जागेतून आमची गाडी पुढे हाणली. मी जागच्या जागी खांदे आत घेऊन, अंग चोरून डोळे गपकन मिटले होते. दोन मिनिटाने उघडले तेव्हा जाणवलं की मुंबईतले रस्ते खूपच लवचिक असल्यामुळे दोनच लेन्स असल्या तरी कधी कधी विस्तारून त्या तीन गाड्यांनाही सामावू शकतात. बाजूच्या दोन्ही गाड्यांनी आणखी डावी उजवीकडे जाऊन आम्हाला वाट दिली होती, त्यामुळे कुठच्याच गाडीला खरचटलं नव्हतं.

आता आमची गाडी लेन मार्किंग बरोब्बर चासीच्या मध्याला ठेऊन, दोन लेन्सच्या मधून दिमाखात चालली होती. मी अस्वस्थ होऊन काही वेळाने त्याला सांगितलं
'अरे, नीट लेनमध्ये घे ना गाडी. अशी मधूनच नको चालवू.'

एक जळजळीत कटाक्ष मागे माझ्या दिशेने टाकून त्याने पुन्हा एकदा भसकन बाजूच्याला ओव्हरटेक करून गाडी उजव्या लेनमध्ये आणली. नजरेला आवाज असता तर 'भित्री भागुबाई!' मला नक्की ऐकू आलं असतं.

'तिकडं अमेरिकेत लेनमदून चालवतात काय गाडी? हिकडं अशी चालवली नाय तर तुमी कवा पोचनारच नाय फोर्टमदी.'
'आणि सिग्नल नाही का द्यायचा त्या लेनमध्ये जाण्यापूर्वी? त्या मागच्या ड्रायव्हरला कळणार कसं तू पुढे येणारेस?'

इथपासून माझी घसरगुंडी सुरु झाली आणि पुढच्या प्रश्नोत्तरात माझे सगळे खुळचटपणे त्याने वेशीवर टांगले – उदा. मी गाडीचा हॉर्न क्वचित, प्रत्यक्ष ऍक्सिडेंट टाळण्यासाठीच फक्त वाजवतो, पोलीस नसला तरी लाल सिग्नलला गाडी थांबवतो – हो, रात्री सुद्धा, दोन लेन्सच्या मधून गाडी चालवत नाही, लेन बदलतांना सिग्नल देतो, गाडी आणि विमान ह्यातल्या सीमारेषांचा मान राखून १०० मैलापेक्षा (१६० किमी पेक्षा) जास्त वेगाने मी आयुष्यात कधीच गाडी चालवली नाहीये. (जर्मनीत एकदाच ऑटोबानवर स्पीड लिमीट नाही म्हणून १०० मैलाच्या स्पीडने गाडी चालवली होती; तेवढं तरी इथे कामी आलं.)

या सर्वावर खेदाने मान हलवत तो म्हणाला 'मंग बराबराय तिकडं पन ट्रॉपिक ज्याम असनार!' 

पुढचं 'सरकारने एवढे सुंदर रस्ते बांधून देऊन सुद्धा लोकांना ते वापरायचं डोकं नसल्यावर असंच व्हायचं' हे केवळ मी सायबांचो जातवालो असल्याने त्याने मनातच ठेवलं.

Comments