जी ए कुलकर्णी हे माझे एक अतिशय आदरणीय लेखक! 'आवडते' म्हणायला धाडस लागेल, कारण त्यांच्या बऱ्याच लिखाणाबाबत, हे आपल्याला पूर्णपणे समजले आहे का, आणि जे समजले असे वाटते ते खरं कितपत बरोबर आहे अशा प्रकारचे अनेक अनुत्तरीत प्रश्न माझ्या मनात नेहमीच रेंगाळत असतात. जिगसॉ पझल मधल्या बऱ्याच तुकड्यांचा सुटासुटा अर्थ सापडलेला असतो, पण संपूर्ण एकत्रित आकृती मात्र हाती लागू नये तशातला प्रकार. भले थोरले बलाढ्य पाय, लांबलचक सोंड आणि मोठाले गुळगुळीत हस्तिदंत हाताच्या नजरेला चाचपून समजलेले असतात, आणि तरीही हे अजस्त्र जनावर नक्की कसं दिसतं हे अंधुक नजरेच्या अंतःचक्षूंना उमजत नसतं. आणि तरीही आदरणीय अशासाठी, की त्यांच्या मराठी भाषेवरील हुकमी प्रभुत्वाचा, कथावस्तू जिवंतपणे डोळ्यासमोर उभी करण्याचा, एखाद्या अप्रतिम पेंटिंगप्रमाणे कथेमधील रंग जिवंत आणि ताजेतवाने भरण्याचा आवाका आणि प्रत्यय केवळ थक्क करून टाकणारा वाटतो. जे हाती लागतं, त्यातून जे निसटलं ते प्रयत्नपूर्वक समजून घेण्याच्या योग्यतेचं आहे ह्याची चुटपुट असते. त्यांच्या कथा वाचतानाचा हा शिवाशिवीचा खेळ माझा अत्यंत आवडता.
'काजळमाया' ह्या संग्रहातील गूढकथा खास लाडक्या! त्यात सुद्धा, माझ्या आठवणीप्रमाणे ७०च्या सुमारास एका दिवाळी अंकामध्ये प्रथम वाचलेल्या, 'गुलाम' ह्या कथेने तर अगदी पछाडूनच टाकले आहे. नंतर अनेकदा वेळोवेळी मी ती पुन्हापुन्हा वाचली आहे, अजून वाचतो. दर वेळी एखाद्या नवीन अर्थाचा तंतू, आधी नजरेतून निसटलेला एखादा सूक्ष्म शब्दप्रयोग ह्यावेळी हातात गवसतो. आणि बाकी काही समजो वा ना समजो, प्रत्येक वेळी केवळ त्या परक्या, अनोख्या, गूढ वाळवंटातील अजब दुनियेचे शब्दचित्र जी एंनी काय सुंदर उमटवले आहे एवढ्यातही मी हरखून जाऊ शकतो. एखाद्या उत्कृष्ट चित्राकडे तासनतास पहात रहावे, आणि त्याचे वेगवेगळे पैलू नजरेत भरून घ्यावे तशी मी ही आणि इतर काही गोष्टी पुन्हापुन्हा वाचतो.
'सूर्यप्रकाश, आणि त्याचा सतत नि:शब्द स्फोट होत असल्याप्रमाणे वाटणारे वाळूचे अणूसारखे अनंत, तापलेले कण.' हे कथेचे पहिलेच वाक्य, आपल्याला त्याच प्रकाशाच्या वेगाने क्षणार्धात त्या वाळवंटात घेऊन जाते. ह्या वाळवंटामध्ये लांबच्या प्रवासासाठी निघालेल्या, त्यासाठी सोबत बाळगायला योग्य अशा गुलामाच्या शोधात असलेल्या मुशाफिराशी आपली ओळख होते.
हा मुशाफिर स्वतः अजब आहे, तो म्हणतो 'मला सतत आणखी थोडं पुढे जायची अनावर इच्छा होत असते; आणखी एक: मागे न घेता येण्यासारखे आणखी एक पाऊल पुढे टाक, असा माझ्या मनात सतत इशारा होत असतो'. हे सगळं आपल्यामधल्या जिप्सीला एक अनावर भुरळ घालतं. काही होवो, त्याच्यामागून ह्या स्वप्नवत एमान नदीच्या उगमाच्या शोधात लागेल ते अंतर, पडतील त्या हालअपेष्टा सोसून जायचंच, 'जे कोणी अद्याप पाहिलं नाही, ते मी पाहिलं एवढं तरी अभिमानाने म्हणता येईल' म्हणून - असं आपल्यालाही वाटतं! अर्थात, 'उगमाजवळच्या प्रदेशातील शहामृगाच्या अंड्यांएवढ्या मोठ्या हिऱ्यांचा' जबर मोह नसतोच असं नाही.
मुशाफिराच्या एवढ्या उदात्त निर्हेतुक भटकंतीबद्दल साशंक असलेला, आपल्या खिडकीमधून सदैव रस्त्याने चालत राहणाऱ्या कारवांकडे पहात आयुष्य घालवलेला, परके आभाळ कधीही न पाहिलेला एमरा त्याला हवा असलेला गुलाम पुरवतो; आणि अल एदिनच्या सिद्दीसाठी, स्वतःची खास भेट म्हणून एक हस्तिदंती कोरलेली पेटीही देतो.
'पावलांना जमीन चिकटू न देणारा' मुशाफिर, धूर्त साशंक एमरा आणि फक्त कोड्यातच बोलणारा 'अतिकुरूप खुजा कुबडा' ही जगावेगळी पात्रे जी. एंनी अतिशय सुंदर रंगवली आहेत. गुलामाबरोबरच्या मुशाफिराच्या अल एदिनपर्यंतच्या प्रवासाचे वर्णन वाचतांना त्यांच्या, डोळे दिपवून टाकणाऱ्या शब्दसंपत्तीचा हेवा वाटतो. वरवर एखादी लहान मुलांची फँटसी वाटावी अशी, अतिशय जिवंतपणे रंगवलेली ही दीर्घकथा, नियती ('अल मक्तूब, मक्तूब - जे लिहिले आहे ते लिहिले आहे'), न्याय आणि नीतीच्या कल्पना, त्या स्थलकालातीत असाव्या का सापेक्ष, जगण्याचा आणि त्यातल्या मायावी स्वप्नांचा अतूट मोह, जिंकण्या आणि हरण्याच्या क्षुद्र कल्पना अशा अनेक प्रगल्भ, सखोल आणि तात्विक विचारांचा मागोवा घेते.
जी एंच्या कथांसंबंधीच्या माझ्या अनुभवाला मुशाफिराचंच एक वाक्य लागू पडेल - 'तलवारीच्या धारदार पात्याच्या रेषेवर पाऊल टाकत तोल सांभाळत पलीकडे जाणं हाच एक त्यातला आनंद आहे... पातं कधी संपत नाही, पावलांचा प्रवास कधी पुरा होत नाही. अंत आहे तो माणसाला, ह्या वेड्या भटकंतीला नाही.'. त्यांच्या कथा पुन्हा पुन्हा वाचण्याच्या, समजून घेण्याच्या माझ्या वेड्या आनंदालाही असाच अंत नाही.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...