निवडणुकीचे महाभारत

तर बरे का मुलामुलींनो, अमेरिकेतील करोना व्हायरसची साथ आता संपलेली आहे. कारण बाळराजेंना रोज संध्याकाळी जमतील त्या पत्रकारांवर खेकसायचा, त्यांची अक्कल काढायचा आणि मुख्यतः स्वतःचे स्वप्नरंजन सगळ्यांसमोर आग्रहाने मांडायचा आता कंटाळा आला आहे. त्यातही, ते कोव्हिड-१९ विरुद्ध रामबाण उपाय म्हणून मलेरियाचे औषध घेत असल्यामुळे, त्यांना स्वतःला हा आजार होण्याची सुतराम शक्यता नाही (बंब सोमेश्वरी गेला असला, तरी रामेश्वरीच्या आगीवरही थोडेसे पाणी उडेलच अशी त्यांची श्रद्धा आहे). आता बाळराजेंना निवडणुकीचा खेळ खेळायची लहर आली आहे. तसे ते नेहमीच २०१६ ची निवडणूक मनामध्ये पुन्हापुन्हा खेळत असतात; पण आता २०२०ची निवडणूक जवळ आल्याची त्यांना जाणीव झाली आहे.
२०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक अगदी हॉलीवूडच्या '... पार्ट टू' किंवा '... रिटर्न्स' तंत्राप्रमाणे होणार. पूर्वीचाच हिरो; तीच संकटे - ह्यावेळी जास्त भयानक; व्हिलन नवीन, पण पूर्वीच्याच प्रकारचा, जास्त डरावना; टेक्निकल विझार्डरी (म्हणजे हॅकिंग, जाहिरातीतील बनावट क्लिप्स, खऱ्याखोट्याचे बेमालूम मिश्रण वगैरे ) पूर्वीपेक्षा कितीतरी पटींनी तोंडात जास्त आत, अगदी घशात, बोट घालायला लावणारे; पूर्वी करोड डॉलर्समध्ये झालेले पिच्चर ह्यावेळी दस करोड तरी खर्चून जाणार; ष्टोरी? - हुं:, तुमी पन राव लैच गावठान! पिच्चर येवढा झगमगता असला का ष्टोरीची कोनाला आठवन तरी होते होय? ज्यानला पार्ट वण आवडला, त्ये समदे पार्ट टू बघनार मंजी बघनारंच! तिकटासाठी रांगा लावनारंच!
अध्यक्ष महाशयांनी 'काळ्याला झोडपा' हा आपला अखिलसंकटविमोचन जप जपायला पुन्हा सुरुवात केली आहे. 'ओबामागेट' (वॉटरगेटनंतर ह्या देशात सामान्य लफडी होतंच नाहीत, थेट '...गेट'च उघडतात) असे एक सूतोवाच त्यांनी करून ठेवले आहे. 'म्हणजे काय?' ह्या चोंबड्या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी केवळ मुग्ध हास्य करून 'ते तुम्हाला माहितीच आहे' असे रहस्यपूर्ण उत्तर दिले. मर्जी झाल्यास कदाचित ते यथावकाश ह्या गेटच्या मागे स्वप्नातील एक महाल उभारतील; अन्यथा त्यांच्या चंचलबुद्धीला दुसरे काही जास्त चकचकीत खेळणे दिसल्यास 'कसले ओबामागेट?' असा प्रश्न स्वतःच विचारून त्या खेळण्यामागे धावतील. मधल्या काळात डेमोक्रॅटिक उमेदवार श्री. बायडन ह्यांच्या तोंडातील मिठाची गुळणी बाहेर येऊन ते तोंड मोकळे सुटण्याची काही लक्षणे दिसत नाहीत. कदाचित स्वतःच तोंडात अडकवलेले त्यांचे पायाचे अंगठे अजून बाहेर पडत नसतील.
निवडणूक संदर्भात येथे महाभारत पुन्हा खेळले जाते आहे. गलितगात्र बायडनला धीर देऊन, 'युक्तीच्या गोष्टी चार' सांगताहेत भगवान ओबामा. मात्र ह्या ठिकाणी कित्येकदा त्यांनाच रथ चालवता चालवता, धनुष्याला बाण लावून देऊन अर्जुनाचा हात धरून प्रत्यंचाही ओढावी लागणार असे दिसते. बायडन साहेब अजूनही ह्या तिसऱ्या प्रयत्नात पक्षाने आपल्याला खरेच धनुर्धारी मानले ह्या धक्क्यातून सावरत आहेत. सत्तावीस वर्षांपूर्वी त्यांनी एका बाईची छेड काढली ह्या आरोपाने (बाईला पण जुन्या हिंदी सिनेमातील कोर्ट सीनप्रमाणे, दीर्घकाळच्या स्मृतिभ्रंशानंतर एवढ्या वर्षांनी, अचानक बायडनचा लंपटपणा आणि तिला झालेला भयानक मानसिक त्रास अगदी योग्य मुहूर्तावर आठवला) ते एवढे हादरले आहेत, की तिकडे दु:शासन डॉन अनेक स्त्रियांच्या वस्त्रांना हात घालून, आणि त्यासंबंधी बढाया मारून, नसलेल्या मिशीला पीळ देतो आहे ह्याचे त्यांना विस्मरण झाले आहे. अर्थात, ह्या शक्तिपाताला डेमोक्रॅट्सचेच बोटचेपे अतिलाळघोटेपणाचे धोरण (स्त्रीपुरुष संबंधात बाईने आरोप केला असेल तर तीच नेहमी बरोबर!) कारणीभूत आहे. धर्मराज युधिष्ठिर, राजा हरिश्चंद्र किंवा न्यायमूर्ती रामशास्त्री ह्यासारख्या सोज्वळ भूमिकांसाठी सगळेच डेमोक्रॅट्स एवढ्या अहमहमिकेने प्रयत्न करत आहेत, की त्यापायी सैन्यामध्ये शिखंडींचीच भरती फार होते आहे. डेमोक्रॅट्स पांडवांनी अनेक मांडलिक राजे युद्धासाठी आणले खरे, पण त्यातल्या कित्येकांची तोंडे आपापल्या सवत्या सुभ्याच्या दिशेने आहेत. स्वतंत्र पक्षाचे बर्नीमहाराज ह्यांचे सैन्य लढाईत उतरेल, का शीक लीव घेऊन घरीच बसेल ही अजूनही टांगती तलवार आहे. उपाध्यक्ष बाईसाहेब काळ्या नसल्या, तर त्या एका कारणास्तव पक्षाच्या तोंडाला काळे फासण्याचे मनसुबे दक्षिणेतील काही सरदार रचत आहेत.
ह्याउलट विरुद्ध पक्षाकडे, उपाध्यक्षांसहीत हस्तिनापुरातील सर्व आमदार खासदार (रॉमनी सारखा एखादा गद्दार वगळता), महाराणी गांधारीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःच्या डोळ्यांना, आणि करोना प्रदूषणापूर्वीपासूनच तोंडालाही, पट्ट्या बांधून दोन्ही हातांनी स्वतःची आसने घट्ट पकडून बसले आहेत. संपूर्ण स्वतंत्र आणि स्वायत्त म्हणवल्या जाणाऱ्या सुप्रीम कोर्टाचे भीष्माचार्य, द्रोणाचार्य आदी ढुढ्ढाचार्य, आपली नेमणूक करणाऱ्या अध्यक्षाच्या प्रेमापोटी, गरज पडल्यास, त्यांचे पारडे जड करतील का हीही एक विचारणीय शंका आहे. महाराणी हिलरीदेवींनी ज्यांची एकेकाळी 'बाजारबुणगे' अशी संभावना केली होती, ते दु:शासनाचे ४० प्रतिशत सैन्य, आपली माफक बुद्धिमत्ता, परदेशी गेलेल्या नोकऱ्या परत येतील आणि हस्तिनापूरचे पुन्हा एकदा जगभर वर्चस्व प्रस्थापित होईल ह्या दिवास्वप्नापायी गहाण टाकून, युद्धासाठी सज्ज आहे. त्यांची दुःशासनचरणींची निष्ठा त्रिकालाबाधित अटळ आहे. ह्यामुळे दु:शासनी राज्य आणखी चार वर्षे चालू राहण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.
मधल्या काळात, सामान्य जनता मात्र नेहमीप्रमाणेच, करोनाची साथ संपते ना संपते तोच येणाऱ्या ह्या निवडणुकीच्या धर्मयुद्धाच्या कोलाहलामधून रोजीरोटी मिळवण्याचे मार्ग शोधत राहील.

Comments