(अर्थात 'मी करोनामध्ये किती बोअर झालो आहे ह्याचा पुरावा'):
कित्येक बंगाली संगीतकारांची, आपल्याच जुन्या चाली हिंदीमध्ये खपवून डबल पैसे मिळवायची क्लृप्ती आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहितीच आहे. हीच सवय तेथील लेखकांनीही आत्मसात केली होती ह्याचा नुकताच शोध लागला. पुराण्या बंगाली साहित्याचा, रद्दीभांडार ग्रंथालयात अभ्यास करतांना, सन १९१०च्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या तिमिरेश गुहठाकुरता ह्या बंगालमध्ये विश्वविख्यात असलेल्या लेखकाच्या कादंबरीची काही पाने हाती लागली. ह्याच कथेवर 'ओल्ड थिएटर्स' ने ('न्यू थिएटर्स' च्याही आधीची, मूकपटांची विख्यात सिनेमा कंपनी) त्या काळातल्या अनेक नामांकित मूकाभिनेत्यांना घेऊन सिनेमा तयार केला होता. मूकपट असल्यामुळे, त्याची फार वाच्यता झाली नाही.
मूळ कथेचं नांव होतं 'घुगनी' (म्हणजे मराठीमध्ये, 'छोले')! ही कहाणी आहे बंगालमधल्या बीरभूम नावाच्या लहानशा गावातली. जॉय आणि बीरू ह्या दोन मध्यमवर्गीय बुर्ज्वा बंधूंची! बंगालीमध्ये बंधू (उच्चारी, बोन्धु – भोंदूशी यमक जुळणारं) म्हणजे खरे तर मित्र; पण ओल्ड थिएटर्सचे फायनान्शिअर सजन लाल मल्होत्रा हे पंजाबी असल्याने त्यांनी ह्या दोघांना सिनेमामध्ये भाऊ करण्याचा हट्ट धरला. तर हे दोघे गावभर उंडारणारे, वयात आलेले टोणगे होते. दोघांची मने त्याकाळच्या गंगेच्या पाण्याप्रमाणे स्वच्छ आणि पवित्र असली, तरी बुद्धिमत्तेमध्ये मात्र त्यांचा कोणी हेवा केला नसता. जॉयला विचारल्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल, तर तो दिमाखात डोळे बारीक करून प्रश्नकर्त्याकडे बघत गवताची काडी चावे. बीरू तर बिचारा तेवढाही चुणचुणीत नव्हता. वेळ घालवण्याचे काही साधन नसल्यामुळे, दोघे लहानसहान चोऱ्यामाऱ्या आणि दादागिरी करत दिवसभर आपलं मन रमवत. त्यांचे मानलेले बाबा, शोंजीब कुमार ठाकूर, त्यांना वेळोवेळी त्या इंग्रजांच्या जमान्यातल्या पोलिसांच्या कचाट्यातून सोडवून आणत आणि एकंदरीत लाडाकोडाने पोसत. ठाकूरमोशाय हे गावातले सर्वात मोठे, अतिशय धनाढ्य जमीनदार होते. रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्या भल्यामोठ्या ठाकूरबाडीतले – वाड्यातले – नुसते दिवे बंद करण्यासाठी त्यांनी एक विधवा स्त्री कामाला ठेवली होती, ह्यावरूनच कल्पना करा किती श्रीमंत असतील ते! काळोखामध्ये परततांना ती धडपडू नये, म्हणून जॉय बाज्या वाजवून तिला मार्गदर्शन करे. ती शब्दवेधी स्त्री त्या सुरांपासून दूरदूर जात, अंधारात लुप्त होई. गावातल्या अडाणी शेतकऱ्यांकडे दातावर वाजवायला पैसा नसतांना (जॉयकडे एक खोटा पैसा होता, तेवढा सोडा), ठाकूरमोशायकडे मात्र भलीमोठ्ठी तिजोरी होती, ह्यावरून कल्पना करा किती श्रीमंत असतील ते! अर्थात शेतकरी अडाणी असले तरी, पैसा मिळालाच तर तो दातावर वाजवत बसण्याएवढे येडपट नव्हते. मुद्दा काय, की ठाकूरमोशाय धनाढ्य होते. त्यांच्या शब्दाला गावात मान होता. 'पूजो कॉखून रे? कॉखून आछे पूजो?' (दुर्गापूजा कधी, कधी आहे दुर्गापूजा?), असं कोणी विचारलं, तर उत्तर द्यायचा मान ठाकूरमोशायचाच होता. सजनलालजींनी देशव्यापी दृष्टिकोन ठेवून पुजोऐवजी सिनेमामध्ये होळीचा सण वापरला – पण भावना तीच!
कादंबरी लॉर्ड कर्झनपश्चात काळातली असल्यामुळे एव्हाना पूर्व आणि पश्चिम असे बंगालचे दोन तुकडे झाले होते. पूर्व बंगालमधून जे थोडेफार मुस्लिम भाई पळून पश्चिमेकडे आले, त्यापैकी एक इमाम चाचा होते. ते अंध असल्यामुळे दुर्दैवाने त्यांना त्यांच्या मग्रूर (हा 'मगृ' शब्दाचा अपभ्रंश असावा असेही काही जाणकारांचे मत आहे. 'र' हा बंगालीमध्ये षष्ठी प्रत्यय म्हणून जोडला जातो; जसे की ठाकुरांचे घर ह्याला ठाकुरेर बाडी म्हणतात) नातवाला घेऊन सगळीकडे फिरावे लागे. इमाम चाचांना कलकत्त्याच्या, त्याही काळच्या, गजबजाटाची फार सवय असल्यामुळे त्यांना दोन मिनिटे शांतता सहन होत नसे. लगेच ते चारचौघांना बखोट धरून ' एवढी शांतता का? कोर्टबिर्ट चालू आहे की काय?' असले प्रश्न विचारून जेरीस आणत. गावात बोशोंती नांवाची एक उपवर तरुणी होती. रूपाने चारचौघींपेक्षा बरी असली, तरी कुमारिकावस्थेतच अफाट आणि अखंड चालणाऱ्या तिच्या जिभेच्या पट्ट्यामुळे तिचे लग्न काहीकेल्या जमत नव्हते. तिच्या बडबडीला कंटाळून एका जत्रेमध्ये तिचे आईवडील गर्दीचे निमित्त करून हरवल्यामुळे, तिच्या पिशी (आत्या) ला स्वतःच्या उतारवयात तिची जबाबदारी घ्यावी लागत होती. पिशीमाच्या सुदैवाने त्यांना दोन्ही कानांनी मिळून अजिबात ऐकू येत नसे. बोशोंतीला घोड्यांचा फार शौक! दीर्घकाळ घोड्यांच्या सहवासात घालवल्यामुळे अश्वगंधा असे तिचे डाकनाम पडले होते. ह्या अभिजात रुचीमुळेच तिला जॉय आणि बीरू ओळख झाल्याक्षणापासून आवडू लागले. कुठल्याही उपवर ऐषारामी बंगाली तरुणाप्रमाणे बीरूला मात्र आवडत्या मुलीला सरळ प्रपोज करण्याऐवजी, चिक्कार दारू ढोसून गावातल्या उंचवट्यांवरून जीवन आणि मरण असल्या तत्वचिंतनपर विषयांवर भाषणे देऊन तिच्यावर इम्प्रेशन मारणे जास्त आवडत असे. (बीरुच्या ह्या स्वभावविशेषावरून स्फूर्ती घेऊन शरद चट्टोपाध्याय ह्या तरुणाने काही वर्षांनी एक कादंबरी लिहिली; ती तर बंगाली साहित्यात आणि भारतीय सिनेसृष्टीमध्ये अजरामर ठरली). तर, कुठल्याही बंगाली धाकट्या भावाप्रमाणे, आपल्याला सदैव चांगलंचुंगलं खायला घालून लाडाकोडाने गुदमरून टाकणारी, एक बौदी (वहिनी) असावी, एवढेच इटुकले स्वप्न जॉयच्या उरात होते. शेवटी जॉयनेच पुढाकार घेऊन, बीरूचा विवाह बोशोंतीशी करून देण्याचा बेत पिशीच्या गळी उतरवला.
अशा प्रकारे बीरभूममधील ग्रामवासी त्यांचे मध्यमवर्गीय आयुष्य समाधानात व्यतीत करत असतांना शेजारच्या ओसाड जमिनी आणि डोंगरकड्यांमध्ये विस्थापित केल्या गेलेल्या भूमिपुत्रांच्या मनामध्ये मात्र असंतोषाच्या ज्वाळा धगधगत होत्या. आर्थिकबरोबरच बौद्धिक प्रगतीही फार झाली नसल्यामुळे हे पुत्र गहू नुसते पाण्यात भिजवूनच खात. बीरभूमच्या लोकांना त्यांचे गहू मऊसूत दळून कसे मिळतात ह्या एका प्रश्नाने त्यांना अखंड ग्रासलेले असे. फार गरीब असल्यामुळे ह्या भूमिपुत्रांना नावे नसत, फक्त अरे शुंभा किंवा अरे काळ्या अशी हेटाळणीवाचक संबोधनेच असत. अशा भयानक गरिबीमध्ये प्रवेश करतो, तो नक्षल बाडी नामक एका परगावातून आलेला एक भयानक क्रांतिकारी नेता – गोबोर सेन! पहिल्यापासून, त्याची महत्वाकांक्षा क्रांती करून, बीरभूमच्या धनाढ्य ग्रामस्थांना लुटून, त्यांची दौलत आम जनतेमध्ये वाटून गरिबीची समता प्रस्थापित करणे ही असते. विशेषतः ठाकूरमोशायच्या जमीनदारीला त्याचा सक्त विरोध असतो. क्रांतीचा मार्ग बंदुकीच्या नळीतून जातो हे गोबोरचेच मूळ बंगाली सुभाषित; नंतर म्हणे त्याची चिनी आणि इंग्रजी भाषांतरेही झाली. तो नेहमी युद्धाच्याच गणवेशात राहून एक पिस्तूल बरोबर बाळगे. काटकसरीवर श्रद्धा असल्यामुळे, तो समोर जेवढी माणसे असतील तेवढ्याच गोळ्या त्या पिस्तुलात भरे. सुदैवाने त्याच्या समोर फार माणसे टिकतच नसत. बंगालमधील गावोगावच्या ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या घरी लहान मुलांना घाबरवण्याची नोकरी काही काळ केल्यामुळे, मार्क्स हे नांव त्याच्या कानावरून गेलेले होते. प्रत्येक गोष्टीत शंभर प्रश्न विचारून (जसे की 'गावात किती लोक होते?', 'तुम्ही किती जण होतात?') वाद घालण्याच्या त्याच्या हौसेमुळे त्याने स्वतःला मार्क्सवादी असे नांव घेतले होते. एके दिवशी, सॉरी रात्री, किटसनच्या कंदिलाच्या उजेडात तो 'प्रियोतोमा, ओगो प्रियोतोमा' ह्या प्रणयगीतावर चाललेले कामगारनृत्य पहात खाटल्यावर बसलेला असतो. गरिबांच्या ह्या साध्याशा आनंदात सारखा व्यत्यय आणणाऱ्या एका माशीला हाकलण्यासाठी तो जो फटका मारतो, तो नेमका तापलेल्या कंदिलाच्या लोखंडी फ्रेमला लागून 'लोखंड तापलेले असताना त्यावर घाव घालायचा, तर हाताऐवजी हातोडीने घालावा' हे उपरतीचे वाक्य त्याच्या तोंडून बाहेर पडते.
ह्या वाक्यापैकी 'घाव घालायचा' एवढा अर्धवट भाग ऐकून त्याचे अर्धवट क्रांतिकारी सहकारी बीरभूमवर मोर्चा नेतात. 'चोलबे ना, चोलबे ना' ने घसा सुकल्यानंतर आयत्या वेळी काय मागण्या आहेत हे नक्की ठरलेले नसल्यामुळे त्यातले अर्धे अर्धवट जॉय आणि बीरुला ताब्यात घेण्याची मागणी करतात. 'आयती पिडा टळली' ह्या आनंदात गावकरी तयार होतात. पण घासाघीस करण्याची बुर्ज्वा सवयच जडली असल्यामुळे, ठाकूरमोशाय 'तुमचं राहिलं, माझं राहिलं; अर्ध्यावर तोडा. एकट्या जॉयलाच घेऊन जा, आणि फुटा आता!' असं म्हणून जॉयची बोळवण करतात.
गोबोरला ह्याची खोबोर लागताच तो आधी सहकाऱ्यांवर, नंतर जॉयवर आणि शेवटी गावकऱ्यांवर भडकतो. त्यातच त्याच्या सहकाऱ्यांनी चाकूने 'गोबोर ऍक्टा छागोल', 'गोबोर = दुर्वास', 'गोबोर भडकू आहे' असे शिलालेख डोंगरकपारींवर कोरलेले त्याच्या दृष्टीस पडतात. त्या रागाच्या भरात, गोबोर आपल्या सहकाऱ्यांसमवेत बीरभूमकडे कूच करतो. ठाकूरमोशायना तो ऐकवतो, 'मला तुमची धनदौलत संपत्ती काही नको! मला फक्त तुमचे हात द्या ठाकूर! क्रांतीचा हा रथ पुढे ढकलायला तुमचे सहकार्य द्या. ह्या मातीची सेवा करायला, मला फक्त तुमचे हात द्या!'. त्याच्या ह्या हृदयद्रावक आर्त कळवळ्याने ठाकूरमोशायही विरघळतात. ते म्हणतात, 'हात्तेच्या! अरे, हात तर मी तुला गेल्याच वेळी दिले होते. ह्यावेळी हे पाय घे!'. असं म्हणून, त्याने डोकं ठेवावं म्हणून ते आपले पाय पुढे करतात. त्यांच्या रत्नजडित चढावांवर स्फुंदून स्फुंदून पुन्हापुन्हा डोकं टेकतांना गोबोरच्या कपाळातून रक्त वाहू लागते. पण तरीही तो अत्यानंदाने, 'क्रांती चिरायू होवो!' अशा घोषणा देत सहकाऱ्यांसह गावभर मिरवणूक काढतो. आयती मिरवणूक निघालीच आहे हे पाहून बीरू आणि बोशोंती त्यातच लग्नसमारंभही उरकून घेतात.
ठाकूरमोशाय सर्व गावकऱ्यांना घुगनीचे जेवण घालतात. अशा रितीने बीरभूममध्ये क्रांतीचा विजय होतो आणि स्वर्ग धरणीवर उतरतो.
अशी होती मूळ ‘घुगनी’ची कथा!
आधी म्हटल्याप्रमाणे ह्या कथेचा किंवा त्यावरील मूकपटाचा फार बोलबाला झाला नाही तरी, नंतर साठेक वर्षांनी ह्याच कथानकात थोडे फेरफार करून ह्यावर एक हिंदी सिनेमा काढला गेला. तो मात्र बऱ्यापैकी चालला असं म्हणतात.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...