एखादा वास आपल्याला निमिषार्धात, एखाद्या जुन्या ओळखीच्या ठिकाणी घेऊन जातो; एखादी जुनी आठवण मनामध्ये जिवंत करतो. माझ्या बाबतीत हवा, उन्ह किंवा उजेडाचा पोतसुद्धा अशी जादू करू शकतात. न्यू जर्सीमध्येच एखाद्या जून महिन्यातलं लक्ख उन्ह बघून मी मनाने तत्क्षणी कॅलिफोर्नियात असतो. आज तसंच झालं; म्हणजे उलट! अतिशय ढगाळ, काळोखी आकाशामुळे; पाऊस पडत नसतांनाही ओल्या दमट असलेल्या हवेमुळे मुंबईची, पावसाळ्याच्या सुरुवातीची, आठवण आली. पावसाळा माझा सर्वात नावडता ऋतू! पावसाळ्यात शाळा सुरु होत, त्यामुळे लहानपणची शाळेची दहशत हे एक ह्या नावडीचे महत्वाचे कारण असू शकेल.
गिरगावातल्या त्या लहानशा शाळेमध्ये खेळायला पटांगण वगैरे चैनी नव्हत्या. सी-शेपवाल्या इमारतीच्या तीन बाजूंमधल्या छोट्याशा मोकळ्या जागेलाच पटांगण असं नांव होतं. पीटीच्या नांवाखाली घाटे मास्तर ह्याच प्रांगणात, आमच्यासारख्या गरीब कोकरांवर आपल्या जिभेची धार काढून घेत. 'हडे S ल हप' अशा आशयाचा काहीतरी उद्गार त्यांच्या तोंडून आला, की त्या चौकाभोवती रांगेत फिरणे ह्याला कवायत म्हणत. ह्या कवायतप्रसंगी, 'होकाइडो, होन्शू, क्युशू, शिकोकू' असं तालबद्ध (जपानचं) देशभक्तीपर गीत जोशात गाण्याचीही सक्ती होती. हा आचरटपणा - पीटीच्या नावाखाली - का करायचा हे विचारून, विनाकारण सर्वांदेखत मार खायची महत्वाकांक्षा नसल्यामुळे, आम्ही मुकाटपणे तो करत असू. कोकरांमध्ये मी त्यांचा जास्तच लाडका होतो. एकदा क्युशू ऐवजी मी केवळ अनवधानाने, शुशू म्हटल्याचं त्यांच्या तीक्ष्ण कानांनी अचूक टिपलं; आणि तात्काळ त्यांची ती समस्त गिरगाववासीयांचे कान बधिर करून सोडणारी कर्णभेदक शिट्टी फुंकून ते ओरडले, 'चष्मा! (आईवडिलांनी ठेवलेल्या माझ्या नांवापेक्षा मला ह्या नांवाने हाक मारणे त्यांना जास्त आवडे) काय म्हणालास!'. त्यानंतर, सगळ्या वर्गबंधू - आणि जास्त लज्जास्पद म्हणजे - भगिनींसमोर, माझा जाहीर 'सत्कार' झाला. हा काही फार मोठा दर्जेदार विनोद नव्हता, पण पीटीच्या तासाला इतपत करमणूकही दुरापास्त असल्यामुळे, सगळे बंधूभगिनी पोट धरधरून हसले. पाचवी-सहावीच्या इयत्तेत, शाळा सुरु होताहोता घडलेल्या ह्या घटनेचा माझ्या बालमनावर खोल परिणाम झाला असावा, ह्याची माझे सहृदय भावी चरित्रकार नोंद घेतीलच ही खात्री वाटते.
असो. पण पीटीच्या तासाच्या आठवणींवरून मोघेची आठवण आली; अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी आली होती हे विसरल्याला कित्येक वर्षे झाल्यानंतर. अचानक!
मोघे इयत्ता आठवीमध्ये माझ्या वर्गात होता. खरं म्हणजे, मोघेने घट्ट धरून ठेवलेल्या आठवीच्या इयत्तेमधून जाणाऱ्या अनेक प्रवाशांपैकी मी एक होतो. त्या काळच्या प्रथेप्रमाणे, आम्ही एकमेकाला आडनावानेच ओळखत असू. त्यामुळे, मोघेचं पहिलं नांव त्यावेळी माहिती असलंच तर आता लक्षात नाही. त्याचं दृश्य स्वरूप मात्र अजूनही जसंच्या तसं डोक्यात आहे. वर्गातील सगळ्या मुलांपेक्षा तो केवढातरी जास्त उंच आणि दणकट होता; गोरापान होता. आम्हा सगळ्या मध्यमवर्गीय बावळट मुलांमध्ये तो चक्क देखणा फिल्मी हिरो दिसत असे. चापून तेल लावून, गाल गच्च धरून पाडलेल्या आमच्या नीटस भांगांमध्ये, त्याच्या लांब केसांचा, डोळ्यावर बट येणारा कोंबडा आमच्या, आणि पुन्हा जास्त वाईट म्हणजे, वर्गभगिनींच्याही डोळ्यांत भरत असे. शाळेचा गणवेष सगळ्यांनाच सक्तीचा होता, पण तोच पांढरा (त्याच्या बाबतीत शुभ्र सुद्धा!) शर्ट आणि तीच खाकी पॅण्ट - दोन्ही कडक इस्त्री केलेले - त्याच्या अंगावर खुलून दिसत. आज एवढ्या वर्षांनी त्याचं रूप डोळ्यासमोर आल्यावर जाणवलं, आमच्या सगळ्यांच्यात औषधालाही नसलेला एक गुण त्याच्यात वारेमाप होता, तो म्हणजे कॉन्फिडन्स! तो कॉन्फिडन्स अनुभवाने आलेला होता. काय आहे, मोघेचं आठव्या इयत्तेमधलं हे तिसरं वर्ष होतं (त्याकाळी, सगळेच हुशार, सगळेच गोड असं म्हणत, सगळ्याच मुलांना वरच्या वर्गात रवाना करण्याएवढी ममता शिक्षकांचे ठायी नसे). कदाचित आधीच्या इयत्तांचाही त्याला दीर्घानुभव असेल. त्यामुळे, तो आम्हा मुलांकडे 'अजाण बालके' अशा वडीलधाऱ्या नजरेने बघे.
शाळेमध्ये वेगवेगळ्या इयत्तात अनेक मुले आली आणि गेली; सगळीच काही लक्षात नाहीत. मोघे लक्षात राहण्याचं खास कारण होतं. जगूनवाचून आठवीच्या वर्गापर्यंत पोचल्यावर पीटीच्या तासाच्या कवायती बंद होण्यापर्यंत प्रगती झाली होती. त्याऐवजी, एका मोठ्या खोलीमध्ये आम्हाला टेबलटेनिस खेळावे लागे. ह्या टेबलटेनिसचे नियम ऐकून चिनी आणि कोरियन खेळाडूंना झीट आली; आणि त्यांनी आंतरशालेय स्पर्धेत आमच्याबरोबर खेळायला नम्रपणे माघार घेतली असं ऐकलं होतं. दोन, फार तर चार, मुलांमध्ये खेळला जाणारा हा खेळ इथे वीसपंचवीस इच्छुक खेळाडू असल्यामुळे पाळीपाळीने खेळला जाई. म्हणजे, आपली पाळी आल्यावर एक पॉईंट खेळायला मिळे. तो पॉईंट आपण जिंकला काय किंवा हरला काय, नंतर पुढच्या दोन मुलांची पाळी. त्यामुळे, नेत्रदीपक शॉट मारून किंवा स्पिन करून प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करण्याऐवजी टुकूटुकू करत दोघांनाही जास्तीत जास्त वेळ पॉईंट चालू ठेवण्यामध्ये रस असे. अर्थातच, तिष्ठत राहिलेल्या इतर मुलांना हा प्रकार महाबोअर असे. नेमक्या ह्याच वेळी, मोघेचे अंगभूत कलागुण कामी आले.
ह्या दीर्घ प्रतीक्षेमध्ये मोघे आम्हाला हिंदी सिनेमातल्या नकला करून दाखवे. सुरुवात हिंदी सिनेमांच्या गाण्यांपासून झाली. त्याचा आवाज आमच्या शालेय पातळीवर रफी, किशोर आणि मुकेश ह्या सगळ्यांना एकाच वेळी खाऊन टाकणारा असला; तरी नुसतं छान गाणं म्हणणं हे मोघेचं कौशल्य नव्हतं. तो 'संपूर्ण कलाकार' होता. त्यामुळे तो ते गाणं आमच्या डोळ्यासमोर उभं करे. त्याने सादर केलेली 'जानेवालों जरा होशियार' किंवा 'लाल छडी मैदान खडी' मला अजून आठवतात, कमरेतल्या लचकांसह आणि भसकन चेहरा जवळ आणण्यासह. साधारणतः 'भक्त प्रल्हाद', फारतर अगदी कहर म्हणजे 'थांब लक्ष्मी कुंकू लावते' टाईप बघण्यापर्यंत मजल असलेल्या आम्हा मुलांना शम्मी कपूर हे काय जानवर आहे ह्याची कल्पना नव्हती! दोन गाण्यांच्या मध्ये, तो विविध भारतीचे विशिष्ट 'टिडींग!' असे म्युझिक स्वतःच म्हणून जाहिरातीच्या जिंगल्सही म्हणत असे - संपूर्ण रिऍलिस्टिक अनुभव! आपल्याच गाण्यांच्या मध्ये सॅरीडॉनच्या डोकेदुखीच्या गोळ्यांची त्या काळची प्रसिद्ध जाहिरात म्हणण्यामधली आयरनी समजण्याएवढी विनोदबुद्धी त्यालाही नव्हती आणि आम्हालाही! पण त्या जाहिरातीसुद्धा तो पूर्णपणे तद्रूप होऊन म्हणे. 'सूट अगर सिलवाना चाहो, ग्वालियर सूटिंग्स से ले लो' ह्या जाहिरातीत, त्याच्या पांढरा शर्ट, खाकी हापपॅन्ट ऐवजी त्याने घातलेला शानदार सूट आमच्या विस्फारलेल्या डोळ्यांना दिसत असे. आमची हिंदी सिनेमांची आकलन पातळी त्याच्या नजरेत थोडी वर आल्यानंतर, त्याने सिनेमामधले डायलॉग्स पेश करायला सुरुवात केली. 'जीने की राह', 'काजल', 'हमराज' असे काही सिनेमा त्याच्या नजरेतून पाहिलेले मला आठवताहेत. पुन्हा, हे सिनेमाचं परीक्षण नसे; सादरीकरण असे. एक प्रकारचा एकपात्री लाईव्ह ट्रेलर म्हणाना! राजकुमार त्याचा फार आवडता नट असल्यामुळे 'जानी', 'जिनके घर शीशेके होते हैं...' वगैरेची तर पारायणे होत. जितेंद्रचा 'फर्ज' हा हिंदीतला पहिला बॉण्डपट आहे, हे ज्ञान मोघेकडूनच प्राप्त झालं होतं. काही अगदीच लाज आणणाऱ्या पोरांनी बॉण्ड म्हणजे काय असं प्रत्यक्ष विचारायचं धाडस करून, मोघेचा 'गाढवासमोर वाचली गीता' हा आयसी थंडगार लूक मिळवला होता. अशा वेळी, आम्ही अजितच्या राबर्ट किंवा पीटरसारखे त्या मुलांना बाजूला घेऊन मागास शिक्षणसंस्था चालवत असू. हसीना, मोहतरमा, जानेतमन्ना अशी यवन शब्दसंपत्ती मोघेमुळेच हासील झाली होती; फक्त ती उधळण्यासाठी लायक व्यक्ती मात्र त्या आसमंतात कुठेच नव्हत्या (मोघेने बबिता आणि आशा पारेखच्या कातिल खुबसूरतीची अशी काही तारीफ केलेली होती, की आसपासच्या वासंती आणि जयश्री त्याच्या पंचक्रोशीतही फिरकू शकल्या नसत्या)! ह्यातली सर्वात मोठी गम्मत ही, की ही सर्व सृष्टी मोघेने आमच्या नजरेसमोर उभी केलेली होती. ह्यातला एकही सिनेमा आम्ही कोणीच पाहिलेला नव्हता. आणि तरीही, प्राण एक नंबरचा खतरनाक इसम आहे, आणि ओमप्रकाश गरीब पण सज्जन (ही अनावश्यक द्विरुक्ती होती, गरीब म्हणजेच सज्जन हे एव्हाना मनावर पूर्णपणे बिंबलेले होते) ह्याची पूर्ण कल्पना मला पहिला हिंदी सिनेमा बघण्यापूर्वीच होती. तांबे, रेगे, कामत वगैरे शेजारी संप्रदायात असल्या विचित्र नावांचे लोक असतात ही सुद्धा खरं तर अविश्वसनीय बाब होती, पण मोघे आमचा हिरो होता. तो खोटं सांगणार नाही ह्यावर विश्वास होता.
पीटीचा तास संपला, की इतर वर्गामध्ये मोघे वर्गात मागे बसून तरी असे, किंवा अदृश्य असे. 'कुठे असतोस' विचारण्याएवढी ह्या मोठ्या हस्तीशी आमची जवळीक नव्हती. परीक्षांच्या दोनचार दिवस आधी तो डिफिकल्टया घेऊन येत असे. त्यावेळी, त्याने पुरवलेल्या मनमुराद मनोरंजनाची थोडीतरी परतफेड करता आली ह्याचं मलाच अप्रूप वाटत असे. हांहां म्हणता वर्ष संपून गेलं; आणि आम्ही बहुतेक जण नववीमध्ये गेलो. ह्या वर्गात मोघे नव्हता. तो आठवीच्याच पुढच्या बॅचला हिंदी सिनेमांची ओळख करून देण्यासाठी थांबला होता. आमचे पीटीचे तास मात्र फार बोअर होत. पुढच्या वर्षभरात त्याला शाळेने काढून टाकल्याचं, किंवा त्याने शाळेला लाथ मारल्याचं - डिपेंडींग ऑन बातमी कुठे ऐकली - समजलं. मोघेशी संबंध पारच तुटला. त्या वयात, एखाद्याचं नसणंही सहज ऍक्सेप्ट करता येतं.
कित्येक वर्षांनी एका गेटटुगेदर मध्ये मोघेची आठवण निघाली होती. कोणीतरी म्हणालं, शाळा सोडल्यावर कुठल्यातरी ऑर्केस्ट्रात तो मिमीक्री करत असे. पण फार काळ टिकू नाही शकला तिथे. बरोबरच आहे म्हणा; पैसे देऊन तिकीट काढून ऑर्केस्ट्रा बघायला येणारे लोक, आणि तेराचौदा वर्षाची अनभिज्ञ मुलं ह्यांच्या जाणकारीमध्ये फरक असणारच ना! कदाचित तो नसेलही फार चांगला ऍक्टर किंवा मिमिक; पण आमचे कित्येक तास त्याने भरपूर मनोरंजन केलं होतं. त्या लहान वयात एक दमडी खर्च न करता, हिंदी सिनेमांच्या अद्भुत जगाशी ओळख करून दिली होती हे खरं. नंतर मुरडलेल्या नाकांच्या आधी एकदा आमचे डोळे विस्फारलेले होते हेही खरंच!
शाळेच्या जगाशी फारसं सख्य नसलेला मोघे, माझ्या शाळेच्या आठवणींचा मात्र अविभाज्य हिस्सा आहे.

Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...