अ डे इन पॅरीस



विमान धावायचं थांबल्याक्षणी, लगेचच पुढची कनेक्टिंग फ्लाईट असल्याचा, एकटा असल्याचा, हातात फक्त एक छोटीशी बॅग असल्याचा, मुंबईच्या लोकल ट्रेन्समधल्या उच्च प्रशिक्षणाचा - सगळे सगळे फायदे घेऊन मी घाईघाईने विमानाच्या तोंडाशी पोचलो... आणि अवाक झालो. हे विमान गेटला लागले नव्हते. ह्याला टारमॅकवर उतरण्याची शिडी होती. खाली उतरून टर्मिनलकडे नेणारी बस घ्यायची... म्हणजे आणखी दहा मिनिटे. इतर काही गावंढळ एअरपोर्ट्सवर हे पाहिलं होतं; पण पॅरिसला? CDG - चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावर?

माझ्या पुढच्या, मुंबईच्या फ्लाईटला आता जेमतेम पाऊण तास उरला होता; वेगळ्या टर्मिनलमध्ये, वेगळ्या गेटवरून!. दि गॉल एअरपोर्टवर माझी पहिलीच वेळ. त्यामुळे टर्मिनल्स किती लांब असतील, कसं जायचं, बस ट्रेन काही असेल का, भाषा... सगळेच प्रश्न. चूक माझी, म्हणजे माझ्या आधीच्या फ्लाईटला वादळवाऱ्यापायी झालेल्या उशिराची, होती. आता प्रत्येक मिनिट मोलाचं होतं. त्यात आणखी हे बसचं लफडं!

काही इलाज नव्हताच. जिना उतरून बससाठी थांबलो. ती आली दोन मिनिटात; पण पूर्ण भरेपर्यंत सुटणार नव्हती. म्हणजे आणखी पाच मिनिटं. अरायव्हल टर्मिनल फार लांब नव्हतं; पाच सात मिनिटात पोचलोही. खरी फ्रेंच मौज इथे सुरु झाली. आता बसमधून उतरून चालत आत जायचं. पण इथे प्रवेशद्वाराजवळ जाण्याऐवजी बस बिल्डिंगच्यामध्येच कुठेतरी थांबली. दारंही उघडेनात. माझा श्वास जास्तच जलदगतीने होऊ लागला. बाजूचे बरेचसे युरोपिअन प्रवाशी मात्र स्थितप्रज्ञपणे कसलीतरी वाट पहात होते. आणि थोड्याच वेळात, काही पूर्वसूचना न देता, बसची जमीन दुभंगून आम्हाला पोटात घेण्याऐवजी, आम्हाला पोटात घेऊन ती उलट हवेत ऊंचऊंच वर जाऊ लागली! माझा डोळ्यावर विश्वास बसेना. सुटणाऱ्या फ्लाईटचा विचार मागे पडून, आता मी हा चमत्कार उघड्या डोळ्यांनी पाहू लागलो. असला प्रकार मी पूर्वी कुठेच, कधीच पाहिला नव्हता. लक्षात आलं, की ही सबंध बस पहिल्या मजल्यावरच्या गेटच्या लेव्हलपर्यंत वर लागणार होती. सरळ विमान गेटला लावणं, किंवा बसमधून खाली उतरून चालत जाणं काय कोणीही करू शकेल; एवढा शीक फ्रेंच प्राणायाम इतर कुठे बघायला मिळणार! मला फक्त सरकणारे घड्याळाचे काटे सतावत होते.

पण मौजेच्या फ्रेंच प्रयोगांचा दुसरा अंक आता कुठे सुरु होत होता! डायवरसाहेब नुकतेच लायसेण (किंवा कदाचित दुसरं काही पेय वगैरे) घेऊन कामावर रुजू झाले असावेत. त्यामुळे ती बस कधी गेटच्या सहा इंच डावीकडे तर कधी दोन फूट उजवीकडे अशी झुलत होती. ती अचूक लागेपर्यंत तिची दारं उघडून आमची सुटका होणार नव्हती. प्रत्येक वेळी, ती काही फूट खाली आणून, मागे नेऊन, पुन्हा प्रयत्न करायचा. हा प्रकार तीन वेळा झाल्यावर त्रस्त होऊन, माझ्या मुंबईच्या सुट्टीतल्या मोजक्या दिवसांपैकी एक कमी होतांना बघून कळवळून मी थोड्या मोठ्यानेच 'ह्यापेक्षा आम्हाला खाली उतरू द्या ना!' असं उद्गारलो. डायवरसायबांचे डोळे त्या गेटरुपी पक्षाच्या डोळ्यावर खिळलेले होते, त्यांनी मला पूर्ण इग्नोअर मारला. बसमधील इतर प्रवाशांची फ्रेंच अस्मिता दुखावली असावी. ‘पोरगं एवढा प्रयत्न करतंय’, त्याचं कौतुक करायचं सोडून ही नकारात्मक टीका करणाऱ्या मला त्यांनी तोंडातल्या तोंडात दूषणे दिली. सगळेजण अतिशय शांतपणे त्या डायवरच्या जिद्दीचं आणि चिकाटीचं कवतिक न्याहाळत, 'हम होंगे कामयाब' ची वाट बघत, हातावर हात देऊन उभे होते. मी मनातल्या मनात भारतीय देवांचा धावा सुरु केला. आणि विश्वास ठेवा अगर ठेऊ नका, केवळ माझ्या प्रार्थनांमुळे त्याच्या सहाव्या प्रयत्नात त्याला अखेर यश येऊन ती डुगडुगती नौका एकदाची भाऊच्या धक्क्याला लागली.

ढकलपट्टी करत मी त्या वेड्यांच्या भवसागरामधून सुटका करून घेतली आणि तीरासारखा पुढच्या फ्लाईटचं टर्मिनल शोधायला निघालो. फार दूर जावं लागलं नाही; कारण जवळच्याच एक इंडिकेटरवर, डिपार्चरच्या आधी पंधरा मिनिटं, त्या फ्लाईटची दारं बंद केल्याची शुभवार्ता झळकत होती.

पॅरीसपर्यंत आणणारी कॉन्टिनेन्टल, आणि पुढे नेणारी एअर फ्रान्स ह्या दोन वेगळ्या एअरलाईन्स असल्यामुळे थोडा वेळ त्यांच्याबरोबर ‘माझी जबाबदारी कोणाची’ हा पिंगपॉंग खेळलो. शेवटी काँटिनेंटलने दयाबुद्धी दाखवून एअर फ्रान्सच्या ह्याच फ्लाईटचं, पुढच्या दिवसाचं तिकीट मिळवून दिलं. एअरपोर्टवरच्याच एका हॉटेलमध्ये एक रात्र रहायची सोय केली आणि जेवणाची दोन कुपनं दिली. हॉटेलात नेणारी बस बाहेरच मिळेल असं सांगितलं. आतापर्यंत ह्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर भाषेचा प्रश्न आला नव्हता; कस्टमर सर्व्हिसचे सगळे लोक, ऍक्सेंटेड का होईना, इंग्रजीत बोलत होते.

विमानतळाबाहेर भाषावाद सुरु झाला. फ्रेंच भाषा ही मुळात अनुच्चरणीय म्हणून जगद्विख्यात; त्यात माझ्या म्हराटी जिभेची हाडं तिला जरा म्हणता जरा वळू देत नाहीत. दहा मिनिटं आणि दोन बशी (डायवर बस ह्या हॉटेलला जाईल का ह्या इंग्रजी प्रश्नाचे उत्तर देण्याएवढा खालच्या वर्गातला नसल्यामुळे) फुकट घालवल्यावर मी पुन्हा एअरपोर्टात गेलो आणि माहिती कक्षामधून बस नक्की कुठे मिळणार ह्याचा नकाशा काढून घेतला.

मग पुढचा प्रवास मात्र सुकर होता. हॉटेल दहा मिनीटावरच होतं. खोलीमध्ये एका माणसापुरता एक बेड, एक डेस्क आणि एक खुर्ची एकमेकांशी धक्काबुक्की करत रचलेले होते. चार-बाय-चारच्या बाथरूममध्ये वॉशबेसीन, टॉयलेट आणि शॉवर स्टॅन्ड सगळे कोंबण्यामध्ये विश्वकर्म्याचं कौशल्य पणाला लागलं असावं ह्यात शंका नव्हती. पण एकतर फुकटात आणखी काय मिळणार ह्या विचाराने आणि माझ्या अमेरिकन घड्याळात पहाटेचे अडीच वाजलेले असून गेले दोन तास तारवटलेल्या डोळ्यांनी एअरपोर्टवर घासाघीस केली असल्यामुळे, मी आणखी विचार न करता आडवा झालो.

दोन-तीन तासातच, आपल्याला पॅरीसमध्ये - दुसऱ्याच्या खर्चाने... फुकट - एक दिवस मिळतो आहे, आणि आपण तो झोपून फुकट घालवत आहोत असल्या भयानक स्वप्नांच्या टोचणीने जाग आली. आंघोळीच्या नांवाखाली शॉवरमध्ये कोपरं, ढोपरं आणि डोकं ठिकठिकाणी आपटून खरचटून घेतलं. स्थानिक घड्याळात दुपारचा एक वाजायला आला होता; हॉटेलचं रेस्टोरंट बंद व्हायच्या आत जेवून घ्यावं म्हणून घाईघाईने गेलो. ती भिती साधार होती. एकुलता एक वेटर 'कुठून एकेक कटकटी येतात! जर्रा शांत बसेन म्हटलं तर टेकायला म्हणून देणार नाहीत' ह्या अविर्भावात माझ्याकडे स्थिर नजरेने बघत उभा राहिला. मी 'लंच?' असं म्हणेपर्यंत त्याची समजूत बहुधा मी तिथल्या टेबलक्लॉथची पहाणी करायला आलो आहे अशी झाली असावी. लंच म्हटल्यावर त्याने एक लॅमिनेटेड मेनू आणून माझ्यापुढ्यात अक्षरशः आदळला. तो अर्थातच फ्रेंचमध्ये होता. मला निषिद्ध काही नसलं तरी आपण काय खाणार आहोत ह्याची किंचित उत्सुकता होती. पण माझ्या इंग्रजी प्रश्नांवर तो पुतळ्यासारखा निश्चल उभा राहिला. शेवटी त्या मेनूवरील फ्रेंच भाषिक फुलोऱ्याच्या लॅटीन मुळांशी थोडी झटापट करून मी दोन पदार्थ निवडले आणि एअरलाईनने दिलेलं कूपन त्याला दाखवलं. त्याकडे पाहताच त्याने शांतपणे नकारार्थी मान हलवली. मला कळेना, हे कूपन त्याला आवडलं नाही, का इथे चालणार नाही (ह्या हॉटेलात चालेल असं सांगितलं होतं), का आत्ता लंचसाठी चालणार नाही, का पदार्थ संपले, का काय? अर्थातच इंग्रजी प्रश्नांना फ्रेंचमध्येही उत्तर देण्याचे कष्ट तो घेत नव्हता. मी पुन्हा दोन पदार्थांवर बोटं ठेवली आणि कूपनकडे बोट दाखवलं. त्यावर त्याने त्वेषाने खिशातून पेन काढून त्या कूपनला भोकं पडतील एवढ्या जोरात त्यावर 'इथे इथे बस रे काऊ' केलं. त्याचा हा हिंस्त्रपणा बघून, मी सरळ बाहेर पडलो आणि रिसेप्शनिस्टकडे गेलो. सकाळी ती बऱ्या इंग्रजीत बोलली होती. तिने सांगितलं की हे कूपन अमुक रकमेचं आहे (जी त्या कुपनावर कुठेही लिहिलेली नव्हती, ज्यामुळे माझी समजूत 'काहीही मागवा' अशी झाली होती), आणि मी निवडलेले पदार्थ जास्त महाग होते. माझी पसंद जरा उंचीच असते, हे खरं! पुन्हा आत जाऊन वेटरला कूपन आणि क्रेडिट कार्ड दोन्ही दाखवली. आता तो किंचित संतुष्ट दिसल्यामुळे, त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटून त्याला तडा जाईल की काय अशी मला पाव सेकंद भिती वाटली. पण तेवढा भावनातिरेक व्हायच्या आतच तो अदृश्यही झाला. एवढ्या आतिथ्यानंतर जेवण मात्र छान होतं; कदाचित ते फ्रेंच असल्यामुळे 'छान' हे विशेषण माझ्या तोंडून आपोआप आलंही असेल.

पुन्हा एकदा, हॉटेलच्या रिसेप्शनिस्टच्या मदतीने पॅरिसच्या 'मेट्रो' नामक सबवेचं जाळं थोडं समजून घेतलं; जवळच्या प्रेक्षणीय स्थळांपैकी कुठची सहज अर्ध्या दिवसात बघता येतील ते ठरवलं आणि बाहेर पडलो. मेट्रो मात्र अतिशय इम्प्रेसिव्ह! एकदाही तोंड उघडायला न लागता (माझ्या इंग्रजी शब्दसंपत्तीला इथे कवडीचं मोल नाही हे लक्षात आलंच होतं) मी ट्रेन्स बदलत, बऱ्याच इच्छित स्थळी आपलाआपण पोचू शकलो. स्टेशनांची आणि रस्त्यांची नावं मनातल्या मनातच वाचत असल्यामुळे, फ्रेंच भाषेचे शेकडो खून शिताफीने पचवले. मेट्रोने आणि पायी, बराच भटकलो. सगळ्यात वाईट वाटलं ते, लूव्र म्युझिअमला मेट्रो जाते, आणि ते एअरपोर्टपासून आयफेलला जायच्या रस्त्यावरच होतं हे उशिरा समजल्यावर. तिथे फक्त बाहेर पडून म्युझियमबाहेरील पिरॅमिडचा फोटो काढू शकलो. ज्या शहरांमध्ये पायी फिरून बरंच बघता येतं ती शहरं मला फार आवडतात; अमेरिकेत हा योग कमीच! ह्या बाबतीत लंडनपेक्षाही पॅरिस मला जास्त आवडलं असतं, जर लोक इंग्लिश बोलत असते तर (मला फ्रेंच भाषा समजणं आणि त्यापलीकडे जाऊन बोलता येणं मी पुढच्या जन्मावर टाकलंय)! जेमतेम पाच-सात तास मी पायी भटकलो; पण जे पाहिलं त्याच्या पार प्रेमात पडलो. साईडवॉक कॅफे काय, स्ट्रॉंग स्मोकी चवीची कॉफी काय, महानाजूक पेस्ट्रीज काय, चीज आणि बटरनी (ज्या दोन्ही गोष्टी मला सहसा अजिबात आवडत नाहीत) संपृक्त असलेले तलम स्पर्शाचे आणि नाजूक चवीचे पदार्थ काय... आणि ती कलिजा खलास करणारी पण उर्मट्ट त्रैलोक्यसुंदरीसारखी भाषा काय (फ्रेंचांच्या तोंडून इंग्रजी ऐकायला मिळण्यासाठी सात जन्मांची पुण्याई लागते; पण जर, आणि जेव्हा कधी, ते कानावर पडतं तेव्हा इंग्रजीचा तो फ्रेंच अवतार सुद्धा फार लोभस असतो) - सगळंच अतिशय मोहक!

कालच्या विचित्र जागरणाने आणि जेट लॅगने आता झोप यायला लागली होती; उद्या पहाटेची फ्लाईट चुकून चालणार नाही, आणि त्या वेटरचा ओरडा खायला नको, म्हणून घाईघाईने वेळेत हॉटेलात परतलो. पुढच्या वेळी बराच मोकळा वेळ ठेऊन, आयुष्यात एकदा तरी सवडीने ह्या शहराचा आस्वाद घ्यायचा हा निश्चय करूनच!

Comments