आरण्यका, का बघतो मी हे सगळं?

तर, एक आटपाट नगर असतं बरं का! नांव कायतरी घरोंदाबिरोंदा असतंय; ते येवडं महत्वाचं नाही. पण गांव हिमाचल प्रदेशात असतं. म्हणजे ते तुमचं निसर्गसौन्दर्यबिंदर्य एकदम लयलूट, काय! हिरवेगार डोंगर, वळणदार रस्ते, धुकंबिकं एकदम ढिंचॅक; बघितल्याक्षणी हाईसहुईस झालंच पायजेल. ष्टोरी आहे तशी २१व्या शतकातली, म्हंजे सेल फोन, इंटरनेट, अश्लील व्हिडीओ अपलोड वैगरे भानगडी आहेत; पण कायदा आन सुवेवस्था एकदम १८व्या शतकातलं. म्हंजे बरं का, एक पोलिस इनिस्पेक्टरीण असते, कायतरी कानफटी का काय नांव असतं तिचं, कारण ती समोर येणाऱ्या बहुतेकांच्या कानफटीत मारत्येय कायमची. आज गब्बर असता तर ठाकूरऐवजी हिचेच हात मागितले असते त्याने; येवड्या जोरात नुसत्या कानफटीत मारून ती भल्याभल्याना लायनीवर आणते. कानफटी सुटीवर जाणार म्हणून बदली कामगार म्हणून आणलेल्या इनिस्पेक्टरची आणखीच एक तऱ्हा! लय शिरेस टाईपचा मर्द; पण त्याला पण बीते हुए लम्होंके साये सतावतायत वैगरे, काय! गांवात एकंदरीतच पोलिसांला सॉल्लिड पावर, बरं का! मनात येईल त्याच्या घरात घुसून काय पण करायचं. एकीकडे पोलिसांचं राज्य, तर दुसरीकडे एका मदनपुरी टाईप व्हिलनचं! एकदम लाला कम शेटजी कम गावचा राजा वैगरे टैप व्हिलन. सारा गाँव उसकी मुठ्ठीमे, आन तरी सालं येक टूरिष्ट प्राजेक्ट मिळवण्यासाठी रडतंय! झालंच तर एक होम मिन्स्टर लेडी बाई असतेय. त्याशिवाय एक कॅफे चालवणारा, कम फ्रेंडशिप बँड, चरस, ड्रग्स वैगरे किराणामाल विकणारा दुकानदार असतो. ह्या सगळ्यांना पोरं पण असतात - एकजात सगळी दिवटी!
 
गाव तसं दिसायला एकदम जन्नतका नजारा वैगरे, काय! पण एखाद्या आतून किडलेल्या सफरचंदासारखं. प्रत्येकाच्या घरात मायला कायतरी लफडं हायेच! कानफटीला स्वैपाक करता येत नाही. तो शिकण्यासाठी ती वर्षभर सुटी घेते; पण साधा भाजीच्या भांड्याखालचा ग्यास ऑन करायला हवा एवढ्या बेसिकपासून लोचा असतांना अभ्यास सोडून ती गावातल्या एका फ्रेंच पोरीच्या खुनामागे धावत सुटतेय - सुटीवर असतांना. तिची स्वताची वयात येणारी पोरगी अभ्यास सोडून सेक्सी व्हिडीओ करण्यात गुंतलेली. नवरा, ... ह्ये बेणं एक प्रॉब्लेमच हाय. तो नांवाला इंटरनेट कॅफे चालवतो; पण कुठल्यातरी बायमाणसाशी चॅट करण्यात आक्खा वेळ घालवतो. कॅफे चालवत असला तरी इंटरनेटवरचं बाईमाणूस पुरुषीबाप्या पण असू शकतोय येवडं शिंपल गोष्ट पण म्हायती नाय त्येला. कानफटीने ह्याच्याशी लग्न का केलं, काय म्हाईत! म्हणे सासरा आवडला. आवडला म्हंजे, एकदम प्यूऽर रिस्पेक्ट वैगरे लव्ह हां - इकडे तरी काही भांजड नाहीय. पण म्हणून त्याच्या मुलाशी लग्न करायचं? कायकाय कारणं असतात, ते येका ब्रह्मदेवालाच म्हायती. सासरा एकदम दिलीप कुमार कम परेश रावळ टाईप - म्हंजे न समजणारे डवायलाक मारताना सोतावरच येवडा खूष, वर परेश रावळसारखा ज्याडा ढापण्या चष्मा लावून! ही मॅडकॅप फ्यामिली पुरे नाही म्हणून एक फ्रेंच आई आणि दोन मुलींची फ्यामिली हाये. आई फ्रेंच असल्यामुळे इंग्रजी बोबडं बोलते, वेळप्रसंगी हिंदी पण तितपतच बरं बोलू शकते, काय? मोठ्या पोरीचा खून झालाय (कॉरोनर येवडा हुश्शार, की बॉडीकडे बघूनच रेप पण झाला होता हे वळकतो!). मातोश्रींची स्वताची ड्रग्स आणि इतर लफडी काय कमी नाहीत. होममिनष्टर बाईचा पोरगा वाईट मार्गाला लागलेला, दुसऱ्याच एका रेपच्या आरोपाखाली आलरेडी जेलमध्ये असतांना आई पॅरोल मिळवून पण देते आणि फ्रेंच पोरीचा खून झाल्यानंतर 'ह्ये पोरगं लय डेंजर' म्हणून काय संबंध नसताना पुन्यांदा जेलमधी पण फेकते - बोललो ना, त्या गांवात कोणपण कायपण मनमानी करू शकतंय.

तर, अशी ही ष्टोरी फुडं रेटतेय. येका फ्रेंच पोरीच्या मर्डरच्या निमित्ताने कानफटी आणि मि. गंभीर एकेककरून गावातल्या सsगळ्यांची (सोताची सुद्दा!) सगळी जुनीपुराणी लफडी बाहेर काढतात (मग, ऍगाथा ख्रिस्तीबाईंच्या ग्रंथांमध्ये खुनांचा फॉर्म्युला नाही का दिलेला - प्रत्येक पात्र खुनी असल्याची शंका प्रेक्षकाच्या मनी निर्माण झालीच पाहिजे). आणि डझनभर इंग्रजी सिनेमांमध्ये नाही का पाहिलंय, दोन इनिस्पेक्टर, स्वभावाने एकमेकांच्या विरुद्ध, नाईलाजाने एकत्र येऊन दुष्ट माणसांचा तलास घेतात आणि दरम्यान एकदुसऱ्याकडून काही शिकतात. तो मसाला पण घाला ह्यात, होऊदेत रस्सा चांगला चमचमीत! शेवटी खरा खुनी हा प्रेक्षकांच्या बापजन्मात त्यांना कधी शंका येणार नाही असा भन्नाट असला पाहिजे - त्या लॉजिकबीजीकच्या भानगडी मला सांगू नका. हे ऍगाथा ख्रिस्ती, नायतर हालिवूडच्या शिणमांचे मसाले घाला हवे तेवढे, पण आपली अस्सल देशी 'सब गुनाहोंकी जड - एक मदनपुरी (नायतर अजित, नायतर प्रेम चोप्रा वैगरे)!’ ही मूंग दालच खरी हे ध्येनात ठेवा.

त्या फ्रेंच पोरीचा, आणि भूतकाळात इतर अनेक ह्याचप्रकारचे खून करणारा आहे म्हणे 'नरतेंदुवा'! हिमाचल प्रदेशात कैच्या कैच नावं बाबा - फुलगेंदवा ऐकलं होतं. तर नरतेंदुवा म्हणजे अर्धा माणूस अर्धा चित्ता का कायतरी! हिमाचल प्रदेशात कैच्या कैच प्राणिसृष्टी बाबा! हे कशावरून, तर बळींच्या मानेवर नखांचे ओरखडे दिसतात त्यावरून. तुम्हाला सांगतो, शिवाजीमहाराज - अफझलखान भेटीचा इतिहास भारतभर कंपलसरी रीडिंग म्हणून लावला ना, की असल्या आचरट कल्पना सुचणार नाहीत लोकांना. दोन एपिसोड्स बघितल्यावर मला ष्टोरी रायटर अर्धा माणूस अर्धा चिंपांझी वाटायला लागला होता. पण मी स्वतः पूर्ण नेटफ्लिक्स ऍडिक्ट असल्यामुळे सिरीज मात्र पूर्ण पाहिली. आणि ही बला तुमच्यावर येऊ नये, म्हणून ही गाथा लिहिली. तिचे मनोभावे वाचन करून हे अरिष्ट टाळावे. जमल्यास, मला दुवा दिल्यास, सत्पात्री ब्राह्मणाला दान दिल्याचे पुण्यही पदरी पडेल.

Comments