तब्बल अडीच वर्षे उलटून गेल्यावर आमच्या कंपनीला जाग आली, की आपल्या पेरोल वर हजारो मजूर आहेत असं म्हणतो आपण, पण त्यांचे चेहरेमोहरे आजकाल बघितलेले सुद्धा नाहीत. कुठे पळूनबिळून तर नसतील गेले? जुना आयातोल्ला जाऊन नुकताच नवीन आला आहे; त्याने लगेच फतवा काढला - करोना संपलेला आहे. कर्मचाऱ्यांनी आता ऑफिसात येणे जरुरीचे आहे. आमच्या सुदैवाने आम्ही आय टीच्या निबीड अरण्यामध्ये खोलवर, लोकांच्या नजरांपासून दूर, मशीनसारख्याच स्थितप्रज्ञ चेहऱ्याने कामे करत असल्यामुळे आम्हाला एवढी झळ लागली नाही. ह्या चिटरफटर जमातीला येऊ दे आठवड्यातून एखाद दिवस - कायद्यानुसार बोलायचं तर तिमाहीमध्ये दहा दिवस - एवढ्यावर आमची सुटका झाली.
गेल्या आठवड्यात अनेक महिन्यानंतर प्रथमच गेलो ऑफिसात. पूर्वीची ऑफिस बिल्डिंग फुंकून टाकल्यामुळे आता नवीन ऑफिस - न्यू यॉर्क शहरात एक, किंवा न्यू जर्सीतच दुसरं - कुठेही जाण्याची मुभा! दोन्ही सारखीच लांब आणि वेगळ्या परींनी सारख्याच जिकिरीच्या प्रवासाची. छापा-काटा करून प्रथम न्यू यॉर्कचं ऑफिस बघायचं ठरवलं.
प्रथम स्वतःच्या कारने १२ मैल 'जवळच्या' ट्रेन स्टेशनवर जायचं. तिथलं पार्किंग पहाटे सहाच्या आत भरून जातं, त्यामुळे घरातली किंवा बाहेरची उबर राईड असल्याशिवाय गत्यंतर नाही. मग दोन ट्रेना करून वर्ल्ड ट्रेंड सेंटरला. नवीन वर्ल्ड ट्रेड सेंटर फारच सुंदर बांधलेलं आहे, विशेषतः आतला कॉन्कोर्स आणि शॉपिंग (ऑफिसला जाण्याच्या / घरी परतण्याच्या घाईगर्दीत विंडो शॉपिंगला सुद्धा वेळ नसतो हे वेगळं)! बाहेर पडायचे शंभर मार्ग; पण नेमका अचूक जर निवडला, तर माझी ऑफिस बिल्डिंग जेमतेम चारपाच मिनिटं चालायच्या अंतरावर. डोअर टू डोअर वेळ - दीड पावणेदोन तास.
मजुरांना हापिसात परत आणण्यासाठी कंपनीने काही प्रलोभने योजली आहेत. फुकट स्टारबक्स ड्रिंक्स हे त्यातील एक! स्टारबक्सची साधी कॉफी मला आवडते, मला हवी तशी स्ट्रॉंग असते म्हणून. पण त्या दुकानांमध्ये एकतर भाषेचा प्रश्न येतो. डंकिन डोनट च्या ठेल्यासारखी साधी स्मॉल/मिडीयम/लार्ज अशी गल्लीतली भाषा चालत नाही. आता कॉफीच्या दुकानाकडून माझी साधीशी अपेक्षा असते, की त्यांनी चांगली कॉफी द्यावी; देशाचं नागरिकत्व मागत असल्यासारखे सतराशेसाठ प्रश्न विचारायची काय गरज आहे? शॉर्ट, टॉल, ग्रान्दे का व्हेंटी? डबल शॉट का सिंगल शॉट? लाते का कापुचिनो का माकियाटो? आल्मन्ड मिल्क, का सोया मिल्क असले प्रश्न विचारणाऱ्या ह्या शहरी बाबूंमध्ये माझा मलाच मी एकदमच गाय/भैंस/बकरी का दूध पिनेवाला गॅंवार वाटू लागतो. गरम की थंड ('तुझ्या बापाने प्यायला होता का थंड चहा?' हा फुलराणीतला प्रश्न इथे अप्रस्तुत; कारण इथे विशेषतः दक्षिणेत, आईस टी सुद्धा असतो!). मसणं का दगडं; एक ना दोन! एका स्टारबक्समध्ये तर नायट्रोजेन हवंय का विचारल्यावर मी स्वतः काही काळ गॅसवर होतो! 'काहीतरी मोठाले जडजंबाळ शब्द वापरून पैसे लुटायचे धंदे' हे माझं स्वच्छ मत आहे त्यांच्याबद्दल. त्यामुळे इथे ही सगळी नाटकं फुकट आहेत ऐकल्यावर मी सूड काढायचं ठरवलं आणि त्यांच्या लिष्टीतल्या एक ते शंभर कॉफया (एकदम नव्हे, एकेक करून!) मागवायचा बेत आहे. सध्या क्रमांक चारपर्यंत पोचलो आहे; तेवढ्यात सुद्धा मेले कॉफीच्या (व्हाईट चॉकोलेट मोका) नांवाखाली शुद्ध हॉट चॉकोलेट विकतात हे लक्षात आलंय. गरम का थंड, ह्या प्रश्नानंतर 'व्हिप्ड क्रीम हवं का' ह्या प्रश्नाने जाग यायला हवी होती. नशिबाने चॉकोलेट म्हणजे तर जनम जनम का प्यार असल्यामुळे तसं काहीच बिनसलं नाही.
बाकी ऑफिसात हॉटेलिंग असल्यामुळे स्वतःचा असा डेस्क नाही. डेस्क राखून ठेवण्यासाठी सुद्धा खरं तर सॉफ्टवेअर असतं; पण आमची कंपनी अजून तेवढी उत्क्रांत झाली नाहीय. त्यामुळे जिथे कुठे रिकामा डेस्क असेल तोच आजच्या दिवसापुरता आपला म्हणायचा! साहेबांपासून चपराशापर्यंत कोणालाच केबिन न देण्याचा साम्यवाद आता अंमलात आलेला आहे. झारच्या राजवाड्यांचे जसे क्रांतीनंतर वस्तुसंग्रहालयामध्ये वगैरे रूपांतर करण्यात आले, तशी भूतपूर्व केबिन्सची आता टीम रूम किंवा कॉन्फरन्स रूम मध्ये रुपांतरे करण्यात आली आहेत. करोना काळामध्ये बहुतांश वेळ खुर्चीत, नाहीतर सोफ्यावर बसून जात असल्यामुळे उभ्याने काम करायच्या डेस्कचं प्रस्थ वाढलं आहे. त्यानुसार ऑफिसातली डेस्क्स कळ दाबून हवी तशी उंचसखल करता येतात. माझी टीम विविध ठिकाणी विखुरलेली असल्यामुळे, गेल्या आठवड्यात ऑफिसात आमच्यापैकी मी एकटाच असून, सर्व मिटींग्स फोन / टीम्स / वेबेक्स वरच होत्या. इतपत 'कोलॅबोरेशन' मी गेली अडीच वर्षे घरून करतच होतो की; तेवढ्यासाठी तंगडतोड करत ऑफिसात जायची काय गरज?
परतीच्या वाटेवर निव्वळ दोन मिनिटांनी कनेक्टिंग ट्रेन चुकून, पुढच्या ट्रेनसाठी स्टेशनवर अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली. अमेरिकन पब्लिक ट्रान्सपोर्टला लाखोली वाहून झाली. त्यात प्लॅटफॉर्मवर इतस्ततः फिरणाऱ्या दोन-तीन भिकाऱ्यांनी पुन्हापुन्हा पैसे मागून उच्छाद आणला. त्यामुळे पुढच्या आठवड्यात न्यू जर्सीचं ऑफिस ट्राय करून बघणार आहे. ट्रॅफिक जॅम, उशीर वगैरे संकटं आली तरी आपण आपल्या गाडीत असतो ह्या सुखाचं मोल सुद्धा समजू लागतं असल्या अनुभवानंतर!

Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...