नुकत्याच संपन्न झालेल्या बी एम एम २०२२ च्या अधिवेशनामध्ये नेहमीप्रमाणेच कार्यक्रमांची रेलचेल होती. नेहमीप्रमाणेच, एकाच वेळी अनेक चांगले, बघायची इच्छा असलेले कार्यक्रम असल्यामुळे 'देता किती घेशील दो कराने' अशी परिस्थिती होती. ह्यावेळी मी संगीताचे कार्यक्रम पाहिलेच; पण क्लॅश अटळ असल्यास मात्र, भर शक्यतो नाटके पाहण्याला दिला. तरीही दुर्दैवाने 'शाबरी' (मिशिगन), 'पश्चिम रंग, पूर्व रूप' (शिकागो) असे काही नाट्यप्रयोग फार इच्छा असूनही सोडून द्यावे लागले. मी पाहू शकलेली काही उल्लेखनीय नाटके:
न्यू जर्सीच्या थिऍट्रिक्स ग्रूपने सादर केलेला 'ओपनिंग सेरेमनी' रूढार्थाने मराठी नाटकापेक्षा ब्रॉडवे शो ला जास्त जवळ होता. एखाद्या संगीतिकेसारखा, साठ-सत्तर कलाकारांचा हा ऑडिओ व्हिज्युअल परफॉर्मन्स खूपच रंजक झाला. हे इंग्रजी शब्द मुद्दाम वापरण्याचं कारण म्हणजे, मागील भव्य पडद्यावरील स्लाईड्सच्या साहाय्याने केलेली प्रभावी वातावरणनिर्मिती, अतिशय कॅची चटपटीत समर्पक संगीत आणि संपूर्ण कार्यक्रमातील अप्रतिम कोरिओग्राफी (९/११ च्या प्रसंगाच्या वेळीचे वाद्यसंगीत आणि नृत्य दोन्ही रोमांचकारी!) ह्यांचा कार्यक्रमाच्या यशामध्ये असलेला लक्षवेधी वाटा! थिऍट्रिक्स ही न्यू जर्सीमधील संस्था, गेली कित्येक वर्षे नेहमीच्या मराठी नाटकांऐवजी काहीतरी नवीन, वेगळं आणि वेधक सादर करण्याचा स्तुत्य प्रयत्न करत आहे. ह्या अधिवेशनातील 'हे अस्तित्व' हा त्यांचा कार्यक्रम हा अमेरिकन मराठी समुदायाचा खास फ्यूजन आविष्कार होता. ह्या झगमगत्या सादरीकरणासाठी संपूर्ण थिऍट्रिक्स टीमचेच हार्दिक अभिनंदन!
एका न्यू जर्सीमध्येच अनेक प्रशंसनीय कलाकार कसे एकवटले आहेत, ह्याचा प्रत्यय म्हणजे ह्याच राज्यातील मीना नेरुरकर ह्यांनी सादर केलेले 'कॅम्प वळिवडे' हे आणखी एक लक्षणीय नाटक! दुसऱ्या महायुद्धादरम्यान, पोलंडमधील निर्वासितांसाठी कोल्हापूरजवळील वळिवडे येथे छावण्या उघडून पाच हजार पोलिश स्त्रिया आणि मुलांना सुरक्षित निवारा आणि अन्नपाणी दिले गेले होते ही महाराष्ट्रीयनांना फार अभिमानाची गोष्ट असायला हवी. मीनाच्या ह्या नाटकापर्यंत असंख्य मराठी लोकांना इतिहासाच्या ह्या पानाची कदाचित कल्पनाही नसेल! विषय तर आगळावेगळा होताच, पण त्याचे नाट्यरूपांतर, लिखाण, अभिनय आणि सादरीकरणही गुंतवून ठेवणारे होते. पुन्हा एकदा पडद्यावरील स्लाईड्सच्या सहाय्याने, जुजबी नेपथ्यावर हा प्रयोग देखणा झाला. मीनाचं खास कौतुक हे, की गेली कित्येक वर्षे ती स्वतः वेगळी, चाकोरीबाहेरची आणि तरीही अतिशय रंजक नाटके लिहून, दिग्दर्शन, अभिनय, कोरिओग्राफी अशा अनेक बाजू स्वतःच सांभाळून, रंगमंचावर आणते आहे.
असेच आणखी एक वेगळे आणि सुंदर नाटक पहायला मिळाले, ते डॅलासच्या ग्रूपने सादर केलेले 'शेक्सपिअर्स एक्सपेरिमेंट'! 'दिवसरात्र टाईपरायटर बडवत राहिले, तर एखादे माकड सुद्धा हॅम्लेट लिहू शकेल' हा थोडा विक्षिप्त सिद्धांत सिद्ध करण्यासाठीचा हा प्रयोग. तो करणारा एक रुक्ष, मानवी समवेदनांचा, जाणिवांचा विसर पडलेला गणिताचा प्रोफेसर, भावनिकरीत्या त्याच्यापासून दुरावत चाललेली त्याची पत्नी, आणि प्रयोगामधील माकडांपैकी एक थोडे सजग, संवेदनाक्षम माकड - ह्यांची ही कहाणी. सर्वच 'माकडांचा' अभिनय तर सुंदर होताच. पण, मान मोडून अखंड टाईपरायटर बडवत बसलेल्या माकडाच्या तोंडी दिलेल्या, त्याच्या स्वतःच्या आयुष्यातील सल व्यक्त करणाऱ्या संवादांसाठी हॅम्लेटच्या ओळींचा अचूक वापर आणखी जास्त प्रभावी होता. लिहिती-बोलती भाषा वापरता आली नाही, तरी त्याहीपलीकडे जाऊन 'कम्युनिकेशन' कसं साधता येतं ह्यावरील खूप सुंदर भाष्य ह्यात पहायला मिळालं.
कार्यबाहुल्यामुळे (काय जाम भारी शब्द आहे ना!) एकांकिका स्पर्धेच्या तीन फायनॅलिस्टपैकी दोनच मला पाहता आल्या. त्यापैकी सिऍटल ची 'बदलतात गोष्टी' ही दोन प्रमुख स्त्री पात्रांच्या अभिनयासाठी आणि एकंदर मांडणीसाठी मला जास्त आवडली. 'समेवर टाळी' मधील तर्कबुद्धी विरुद्ध भावना (Head vs Heart) हा सनातन संघर्ष, दोन्ही समेवर येणे महत्वाचे हा विषय आणि सादरीकरणही मला तरी फार क्लिशे वाटले (अगदी 'मॅजिक कार्पेट' चा कल्पक प्रसंग धरूनही!).
उरली ती खास महाराष्ट्रातून आणलेली, व्यावसायिक कलाकारांची नाटके. ती पाहतांना प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट - नाटकासाठी कथानक ही गोष्ट कशी आणि किती दुय्यम होत जाते आहे. प्रशांत दामले, लीना भागवत आणि आनंद इंगळे हे सर्वच माझे अतिशय लाडके कलाकार, अगदी त्या क्रमाने! नुसत्या डोळ्यांच्या, भुवयांच्या हालचालीने, मिश्किल हास्याने, बोलक्या चेहऱ्यावरील हावभावांनी, उच्चाराच्या धाटणीने हमखास हशे मिळवणे हा दामले ह्यांचा हातखंडा; सहजपणे गाणारा सुरेल गळा हे सामर्थ्य वेगळेच! पण अलीकडचं 'साखर खाल्लेला माणूस' किंवा ह्या अधिवेशनातील 'सारखं काहीतरी होतंय' बघितल्यावर जाणवलं, हा अभिनेता आता कथानक वगैरे सामान्य गोष्टींच्या पलीकडे जाऊन पोचलेला आहे.
नाटकाचं कथानक, प्रसंग, संवाद वगैरे रचण्याच्या किचकट कामाऐवजी एक सर्वसाधारण ढोबळ कथाबीज दामलेंच्या हाती देऊन, 'करा बुवा ह्याचं काहीतरी' (त्यांच्याच पुढच्या नाटकाचं नांव वाटतं ना!) असा आदेश दिला जात असावा. अर्थातच त्यांचं कौतुक हे, की एवढ्या तुटपुंज्या सामग्रीवरही ते भक्तांना, आय मीन प्रेक्षकांना, दोन-अडीच तास हास्याच्या भुलभुलैयामध्ये रमवू शकतात. हां, काही प्रेक्षक चुळबुळतात, अस्वस्थ होतात, आता तरी काहीतरी घडेल अशी उत्सुकतेने वाट बघतात. आणि शेवटी विरल हास्याचे तरंगते बुडबुडेच फक्त हाती लागले, म्हणून चुटपुटतात.
नाटकाचं कथानक, प्रसंग, संवाद वगैरे रचण्याच्या किचकट कामाऐवजी एक सर्वसाधारण ढोबळ कथाबीज दामलेंच्या हाती देऊन, 'करा बुवा ह्याचं काहीतरी' (त्यांच्याच पुढच्या नाटकाचं नांव वाटतं ना!) असा आदेश दिला जात असावा. अर्थातच त्यांचं कौतुक हे, की एवढ्या तुटपुंज्या सामग्रीवरही ते भक्तांना, आय मीन प्रेक्षकांना, दोन-अडीच तास हास्याच्या भुलभुलैयामध्ये रमवू शकतात. हां, काही प्रेक्षक चुळबुळतात, अस्वस्थ होतात, आता तरी काहीतरी घडेल अशी उत्सुकतेने वाट बघतात. आणि शेवटी विरल हास्याचे तरंगते बुडबुडेच फक्त हाती लागले, म्हणून चुटपुटतात. दुसरं 'आमने सामने' हा असाच आणखी एक मुख्यतः एकखांबी तंबू! मी स्वतः लीना भागवतांचा जबरदस्त मोठा फॅन आहे. केवळ वाक्य उच्चारण्याच्या ढंगामधून त्या संपूर्ण प्रेक्षागाराला पोट धरधरून हसवू शकतात. आमने सामने नाटकाला थोडे तरी का होईना, नवरा बायको (भांडण) संबंधांचे थोडे घासून गुळगुळीत झालेले का होईना, कथानक होते. मंगेश कदम आणि इतर दोन कलाकार ह्यांनी काही मोजक्या प्रसंगात मजा आणली; पण संपूर्ण नाटकावर भलीमोठी सावली फक्त लीना भागवतांच्या खळाळून हसवणाऱ्या अभिनयाचीच होती.
शेवटच्या दिवशीचा 'आवाज मराठीचा' हा क्लोजिंग सेरेमनी पुष्कर श्रोत्री आणि आनंद इंगळे ह्यांनी सादर केला. त्यांच्या, विशेषतः इंगळेंच्या माझ्या मनातील लौकिकाला साजेसा तो नव्हता, एवढंच मी म्हणेन. I think they both could do better!
बी एम एम अधिवेशनांमधून मराठी साहित्य-संगीत-नाट्य-पाककला ह्या सर्वांगसुंदर संस्कृतीचा अनुभव घेण्याची इच्छा असते. अर्थातच कार्यक्रम ठरवतांना तीन-चार हजार उपस्थितांमधील विळ्याभोपळ्यांच्या पसंतीचा लसावि काढण्यामध्ये कार्यकारिणीची कसोटी लागत असणार निःसंशय! जुन्यापैकी जे सोने आहे ते तसंच झगागत राहणार आहे; पण महाराष्ट्रातील चांगल्या नवीन कलाकारांचा, नवीन प्रवाहांचाही थोडा समावेश झाला तर जास्त आवडेल. परदेशातील कलाकारांच्या, थोड्या दुरून, थोड्या तटस्थपणे दोन्ही संस्कृती पाहू शकणाऱ्या, दोन्हींचा युनिक समन्वय साधू पाहणाऱ्या कलाकृतींना प्रोत्साहन मिळाले तर ते जास्त आवडेल. ह्यापुढील बी एम एम च्या अधिवेशनांमध्येही असेच जास्तजास्त समृद्ध करणारे वैविध्यपूर्ण नाट्यानुभव पहायला मिळतील अशी अपेक्षा आहे.
आणि 'बृहन' महाराष्ट्र मंडळापेक्षा जास्त कोण ही अपेक्षा पुरी करू शकणार!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...