नाही, हा लेख स्टीव्ह मार्टिन आणि जॉन कॅण्डी ह्यांच्या सुप्रसिद्ध कॉमेडीबद्दल नाही. आत्ता ते शीर्षक आठवण्याचं कारण म्हणजे माझी प्रवासाची आवड. लहानपणापासून कधीही, कुठेही, कसंही प्रवासाला जायचं असल्यास मी उडी मारून अर्ध्या पायावर तयार असतो. प्रवास कुठल्या वाहनाने करतो आहोत हे तेवढं महत्वाचं नसतं; कारण प्रत्येक वाहनाची आपली मजा न्यारीच असते.
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात लहानाचा मोठा झाल्यामुळे, बाहेर कुठेतरी, थोड्या शांत ठिकाणी जाण्याचं फार मोठं आकर्षण असे. क्वचित कधी, नात्यातल्या लग्नामुंजीसाठी कऱ्हाड, कोल्हापूर, सातारा वगैरे 'दूरदूरच्या' प्रदेशांमध्ये जाण्याची वेळ येई. प्रवासाच्या थ्रिलची सुरुवात टांग्याने बोरीबंदर ('सीएसटी' च्या फार पूर्वीचा काळ हा!) स्टेशन गाठण्यापासून असे. भल्या पहाटेच्या शांत रस्त्यांवरून घुमत असलेला घोड्याच्या टापांचा तो तालबद्ध आवाज अजूनही माझ्या कानात आहे. सगळ्यात लहान असल्यामुळे टांगेवाल्याच्या शेजारी बसण्याचा मान माझा असे. त्या उच्चासनावरून राजाच्या रुबाबात, अजूनही झोपेतून उठावं का नाही ह्याचा निर्णय घेत असलेल्या दक्षिण मुंबईच्या आपल्या साम्राज्यावर प्रेमळ नजर टाकत सावकाश बोरीबंदरला पोचण्यात फार मजा असे.
एकदा स्टेशनला पोचल्यावर मात्र सावकाश शब्दाला अजिबात थारा नसे. बॅगा सांभाळत धावपळ करणे, हमाल शोधणे, फलाट शोधणे, गाडी वेळेवर आहे का नाही पहाणे, आपली नावे त्या कीडमिड्या, किरट्या अक्षरातील यादीमध्ये शोधणे, कायमस्वरूपी अदृश्य असणाऱ्या टीसीच्या शोधार्थ मोहिमा काढणे, कंपार्टमेंट आणि सीट नंबर शोधणे, विनाकारण सामान घेऊन पायपीट किंवा चढउतार करत असलेल्या इतर प्रवाशांचे धक्के खाणे आणि त्यांना देणे - एक ना दोन, हजार कामे असत. म्हणजे कामे बहुतेक मोठी माणसं करत; आम्ही मुलं फुकटचं टेन्शन घेत असू. पण हाही सगळा प्रवासाच्या गंमतीजंमतीचाच भाग असे. आणि एकदा सीट सापडली, विशेषतः जर ती खिडकीजवळची असेल, तर स्वर्गस्वर्ग तो हाच अशी भावना असे.
शाळा-कॉलेजच्या दिवसात ‘इंडियन रेल' चा उदंड प्रवास घडला. दिल्ली आणि कलकत्त्याला शिक्षण झाल्यामुळे दर सुटीमधली मुंबईची ये-जा करतांना; आणि नंतर नोकरीच्या निमित्ताने. पहिली दिल्ली-मुंबई ट्रिप दिवाळीच्या सुटीमध्ये मुंबईला घरी येतानाची होती. होल्डऑल, किंवा साधं ब्लॅंकेट वगैरे घेणे हे त्या वयाच्या सर्वज्ञ हीरोगिरीमध्ये अमान्य असल्यामुळे, 'सुटसुटीत' प्रवासाचं भूत डोक्यावर सवार असल्यामुळे, आणि उत्तरेकडील थंडीची काडीमात्र कल्पना नसल्यामुळे एका छोट्याशा बॅगेत अक्षरशः चार कपडे आणि जुजबी सामान घेऊन केला होता - खालच्या बर्थवरून. रात्रीच्या वेळी गाडी राजस्थान भागातून जात असतांना भणाणणारे थंडगार वारे रेल्वेच्या खिळखिळ्या खिडक्यांमधल्या फटींना जुमानत नव्हते. सबंध रात्र पोटाशी पाय घेऊन, दंतवाद्याच्या तालावर कुडकुडत बसून घालवली. सूर्य उगवण्याची एवढी प्रदीर्घ प्रतीक्षा पुन्हा कधी केली नसेल. वर, सकाळी चहा घेतांना समोरच्या यूपी कुटुंबातील शालीमध्ये लपेटून घेतलेल्या भाभीजींचा प्रश्न 'आपको ठंड नही लगती?' - नुसताच हसलो होतो. पण, नंतरच्या एकंदर ट्रेनच्या प्रवासाच्या रात्रींच्या छान आठवणीच मनात राहिल्या आहेत. बहुतेक वेळा, मी रात्र जागूनच काढत असे. कुठलंही स्टेशन आलं की काही कारण नसताना प्लॅटफॉर्मवरून एक फेरफटका मारून यायचा. स्टेशन जेवढं लहान, तेवढं उतरणं जास्त आवश्यक! मध्य आणि उत्तर भारतातील ही लहानशी स्टेशनं खूप मजेदार असतात. तो सर्वव्यापी कोळशाच्या धुराचा वास; मिणमिणते दिवे; चहा आणि कॉफी ह्यांच्या मधल्या नो मॅन्स लॅन्ड वरचं, उकळून उकळून चव वगैरे मानवी अनुभूतींच्या पलीकडे जाऊन पोचलेलं, मातीच्या छोट्याशा भांड्यामधलं ते पेय; रात्रीच्या वेळी डबा शोधण्यासाठी लगबग करणारी ती कुटुंबं - खेकसणारे नवरे, काळोखातही डोक्यावरचा घुंघट सावरत लेकरांना खेचत निघालेल्या बायका, भेदरलेली, झोपाळलेली पण कुतूहलाने 'मोठ्या' शहरात जायला अधीर झालेली पोरं; रात्रीच्या त्या प्रहरीसुद्धा तळाशी उरलेले दोनचार 'नमकीन' कोणाच्या तरी गळ्यात मारायचा प्रयत्न करणारे फेरीवाले; केवळ स्वतःचं मन रमवण्यासाठी रेल्वेच्या चाकांवर ठाकठाक हातोड्या मारणारे कर्मचारी - ते सगळं अद्भुत विश्व अचूक कोरलेलं आहे माझ्या डोक्यात! पुन्हा एकदा इंडियन रेलने लांबचा प्रवास करायच्या माझ्या स्वप्नांमध्ये ते वारंवार खुणावतं मला.
माझ्या आयुष्यातल्या पहिल्या विमानप्रवासाचं थ्रिल अजूनही ताजं आहे. मुख्य कारण म्हणजे तो चकटफू होता; कलकत्त्याहून मुंबईला एअर इंडियाच्या जॉब इंटरव्ह्यूसाठी! त्याकाळी (किंवा त्या वयात) विमानप्रवासाचं ग्लॅमरही फार मोठं होतं. रात्रीबेरात्रीच्या त्या फ्लाईट्स, विमानतळावर दिसणारी ती 'फोरेनची' फाडफाड इंग्रजी बोलणारी लोकं, ड्यूटी फ्री दुकानांमध्ये चकाकत्या काचांच्या आड विकायला ठेवलेल्या त्या अद्भुत जिनसा, चकाचक दिमाखदार कपडे घातलेले पायलट आणि एअरहोस्टेसेस - ह्या प्रत्यक्षात सुंदर असल्या किंवा नसल्या तरी त्यांच्या मेकअप, फॅशन आणि लडिवाळ इंग्रजी उच्चारांमुळे ग्लॅमरस नक्कीच असत... एक ना दोन, विमानतळावरचं जगच पार वेगळं असे. अमेरिकेत आल्यावर विमानप्रवास वाढतच गेला; फिरण्याच्या हौसेमुळे, आणि नंतर नोकरीतल्या कामामुळे. पण माझं विमानतळांचं आकर्षण कमी नाही झालं. विमानाआतमधली वागणूकही त्या सगळ्या ग्लॅमरला साजेशी आदबशीर आणि लाडाकोडाची असे. मला अजूनही विमानातली खिडकीजवळची सीट मिळवायचं, आणि प्रवासभर बाहेर बघत बसायचं आकर्षण आहे; अगदी बाजूच्यांना उठवून जाण्यायेण्याचा त्रास असला तरीही. ११ सप्टेंबरनंतर मात्र विमानप्रवास आमूलाग्र बदलला. त्या हल्ल्यानंतर लगेचच डिसेम्बरमध्ये मी ऑफिसच्या कामानिमित्त सिंगापूरला गेलो होतो. त्यावेळी बिझिनेस क्लासमध्ये सुद्धा जेवणाबरोबर प्लॅस्टिकचे सुऱ्याकाटे दिलेले पाहून वाटलं होतं जगबुडी आता फार दूर नाही! त्या हल्ल्याने एअरलाइन्सचं कंबरडंच मोडलं; जे नंतर अजूनपर्यंत ठीकठाक झालं नाहीय. फ्लाईट्समध्ये घट, सेवेमध्ये काटछाट, कमीतकमी जागेत जास्तीत जास्त सीट्स कोंबायचा हव्यास, खाद्यपेयांची काटछाट, प्रत्येक खुट्ट कारणासाठी वेगळे पैसे लावण्याची चढाओढ - हे सगळं कुठे जाऊन थांबणार कळत नाही. नवल नाही, आजकाल बऱ्याच एअरपोर्ट्सना म्हाराष्ट्रातल्या यष्टी ष्ट्यांडाची कळा आलेली दिसते!
त्यावरून आठवलं, प्रवासाची कितीही दुर्दम्य आवड असली, तरी दोन वाहनं मी फारशी मिस करत नाही - ती म्हणजे एसटी आणि बैलगाडी! दोन्ही अनुभव तसे फारच कमी; फक्त लहानपणीच घेतलेले. एस टी च्या प्रवासातील रणरणतं उन्ह, खुळखुळे झालेली हाडं, पेट्रोलच्या धुराचा तो असह्य दर्प आणि 'कधी पोचणार' ही अपार ओढ एवढी दहशतच मनात राहिली आहे. बैलगाडीचा प्रवास अत्यंत रटाळ; कदाचित कुठेही पोचायची काडीमात्र घाई नसेल तर गंमतीचा वाटतही असेल म्हणा!
देवादिकांची जशी प्रत्येकाची खास वाहनं असतात, तसं माझं वाहन आहे कार! एवढं सोयीस्कर, स्वतःच्या ताब्यातलं, भरवशाचं आणि संपूर्ण आनंददायी वाहन दुसरं नसेल. बस, ट्रेन, विमान ह्या सगळ्याच पब्लीक ट्रान्सपोर्टमध्ये आपण दुसऱ्यावर, त्यांच्या वेळापत्रकावर आणि त्यांच्या आखीव मार्गावर अवलंबून असतो. मध्ये एखाद्या ठिकाणी जास्त वेळ काढावासा वाटला, वाकडी वाट काढावीशी वाटली, तरी थांबू शकत नाही. सामानाचा बोजा होऊ शकतो. ह्या सगळ्या वेळी, 'आत्ता गाडी असती तर!' असं माझं अनेक वेळा झालेलं आहे. मला ड्राइव्हिंगची तर हौसच आहे; विशेषतः लांबच्या रोड ट्रीप्समध्ये ड्राइव्ह करतांना मी जेवढा शांत आणि संतुष्ट असतो, तेवढा एरवी क्वचितच, असं 'जाणकारांचं' म्हणणं आहे. अमेरिकेतले रस्ते हा माझ्या खास आवडीचा विषय आहे. त्यातही, युटा, मॉंटाना किंवा वायोमिंग सारखी प्रचंड, निर्जन आणि निसर्गसुंदर राज्यं असावी, पुढ्यात मैलोनमैल वहात असणारा रस्ता, डोक्यावर स्वच्छ निरभ्र निळंशार आकाश आणि आपण ड्राईव्हिंग करत असावं! कुठे ते जाऊन पोचण्यापेक्षा असं जातच रहावं असं वाटावं, एवढं सुंदर. नॅशनल पार्क्सच्या आवडीमुळे बऱ्याच राज्यांमध्ये ड्राइव्हिंग करण्याचा योग आला. फावल्या वेळातला माझा आवडता विरंगुळा म्हणजे पाहिलेल्या वेगवेगळ्या रस्त्यांच्या आठवणींचे व्हिडीओ मनाच्या पडद्यावर पाहणं, अपरिचित राज्यांचे नकाशे काढून, त्यातल्या रस्त्यांवरून ड्राइव्ह करायची दिवास्वप्नं पहाणं; किंवा नॅशनल जिऑग्राफिकचे प्रवासाचे व्हिडिओ पाहून तिथे कधी जायचं ह्याचे बेत आखणं!
सुरुवातीला उल्लेखलेल्या सिनेमामध्ये स्टीव्ह मार्टीन वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास करून एकदाचा घरी पोचायला अधीर असतो. मी मात्र ह्या सगळ्या वाहनांच्या, प्रवासाच्या आणि रस्त्यांच्याच एवढा प्रेमात असतो; की घरबसलेपणातून एकदाचा बाहेर पडायला अधीर असतो.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...