दोन विश्व असतात - एक बाहेरचं, केवढंतरी मोठं, वास्तव विश्व; आणि दुसरं मनामधलं, आपल्यापुरतंच मर्यादित भासणारं, पण तळ गाठता येऊ नये एवढं अथांग खोल, कल्पना विश्व! वास्तव विश्वात चार माणसांशी बोलता येतं (म्हणजे, भाषा समजली तर); हातांनी चाचपून, पायांनी ठेचकाळून, नजरेने पाहून प्रत्यक्ष अनुभूती घेता येते. कल्पना विश्वात मात्र आपले आपणच; वाचा, स्पर्श, दृष्टी... सगळी कामं एकटं मनच करत असतं. त्यामुळे केवढं स्वातंत्र्य असतं! 'ह्या ऐवजी असं घडलं असतं तर?', 'असं होऊ शकेल का?', 'का नाही?' असले प्रश्न, आणि त्यांच्या उत्तरांची असंख्य समांतर विश्वे असतात. तळ्यात मळ्यात खेळत असल्यासारखं मानवी मन कल्पनाविश्व आणि वास्तवविश्व ह्यांच्यात आलटून पालटून फिरत असतं. कित्येक मानवी भावना दोन्ही विश्वात असतात; उदा. भय आणि आनंद. मात्र, कल्पना विश्व वास्तवापेक्षा कितीतरी जास्त गंमतीचं असतं. आनंदाचंच बघा, ह्या वर्षी एवढा बोनस मिळेल, मग त्यातून हे करता येईल, इटलीला जाण्याचा कधीपासूनचा बेत पुरा करता येईल... ह्या सगळ्या बोनस मिळण्यापूर्वीच्या आनंदाच्या कल्पना असतात. तो प्रत्यक्ष हाती आल्यावर अपेक्षेप्रमाणे असला, तरी अमक्याला तर ह्याहीपेक्षा जास्त मिळाला, टॅक्स कापून हातात एवढेच आले, कसले ते व्हेनिसचे कालवे - एवढं अस्वच्छ पाणी, शी:! असल्या निराशाच वास्तवात जास्त पदरी पडतात.
भयाचंही तसंच आहे! खऱ्याखुऱ्या भयंकारी घटना - सुदैवाने - बहुतेकांच्या आयुष्यात क्वचितच घडतात. पण 'काय होऊ शकेल' ह्या कल्पनांनीच कित्येकदा छाती जास्त धडधडत असते. प्रत्येकाच्या मनातली भिती वेगळी; आणि तरीही काही ठराविक गोष्टींचं भय हे स्थलकालाच्या, स्त्री का पुरुष, पुरातन का आधुनिक ह्या सगळ्या सीमा ओलांडून सारख्याच प्रमाणात आढळतं - उदाहरणार्थ, काळोखाची भिती. आदिम काळापासून, काळोखामध्ये, अपरिचित वातावरणामध्ये, अनपेक्षितरित्या क्षणार्धात झेप घेणाऱ्या श्वापदांमध्ये, वेगळ्या दिसणाऱ्या रंगरूपामध्ये, भाषेमध्ये जीवाला धोकाच संभवत असे. तेव्हापासून, ह्या सर्व गोष्टींपासून सावध राहण्याची बीजे मानवी मनामध्ये खूप खोलवर रोवली गेली आणि रुजली. ह्यातही मानवी कल्पनाशक्तीचं सामर्थ्य प्रकर्षाने जाणवतं. जवळची, प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून अचानक कायमची निघून गेली ह्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी, मृत्यूनंतरच्या अस्तित्वाच्या, पुनर्जन्म, अतृप्त आत्मे, भुताटकी वगैरे कल्पनांचा उगम झालाही असेल. जगभरच्या सगळ्या संस्कृतींमध्ये, संपूर्ण इतिहासामध्ये, अशा समजुतींचा, दंतकथांचा प्रभाव दिसतो. मृत्यूनंतर प्रत्यक्ष काय होतं ह्याचा प्रथमपुरुषी अनुभव कोणीच येऊन सांगत नसल्यामुळे, मृत्यूनंतरच्या जगाशी वास्तव विश्वाचा काहीच संबंध नसतो. कल्पनाविश्वाला मात्र ह्या जगामध्ये रान मोकळं मिळालेलं असतं. मग त्यातून, किर्र घनदाट जंगलातल्या पायवाटेने चालताना होणाऱ्या प्रत्येक सळसळीचा आवाज, वाऱ्याने वाजवलेल्या शिट्या, चंद्राच्या अर्धवट प्रकाशात भेसूर हालचाली करणाऱ्या सावल्या, अचानक पायाखाली येणाऱ्या झाडाच्या काटक्या - ह्यापैकी काहीही जीवाचा थरकाप उडवू शकतं. वरती, आपण काय संकटांवर मात करून शेवटी रात्रीबेरात्री गावात पोचलो ह्या मर्दुमकीच्या कथा रचण्याचा मोह अनावर असल्यामुळे, असल्या कथित अनुभवांमधून नवीन भुतांचा जन्म होतो.
अशा कहाण्या ऐकता-वाचतांना कितीही भिती वाटत असली, तरी त्या भितीची जात कच्च्या आंबटढसाण कैरीच्या, किंवा चिंचेच्या चवीची असते. दात कितीही आंबले तरी पुढचा चावा जसा घ्यावासाच वाटतो, तशी ही कहाणी पुढे बघावीशी वा ऐकावीशीच वाटते! हे मानवी स्वभावाचं एक गूढ आहे. भयकथा काय, हॉरर फिल्म्स काय, किंवा भयानक जीवघेणे रोलर कोस्टर आणि स्काय डायव्हिंग काय; सगळ्यामध्ये त्या भयाला स्पर्श करून आपण सुखरूप मागे आलो ह्याच्या अचिव्हमेन्टची सुखद विजयी जाणीव ही प्रेरणा असावी. हॉरर फिल्म बघतांना मगाशी उल्लेखलेला चिंचेचा आंबटपणा सर्वात जास्त एन्जॉय करता येतो तो आगामी भयाची, धक्क्याची मनामध्ये कल्पना करतांना. आता काय होणार, ह्याविषयीचे वाचक / प्रेक्षकांचे मनातले तर्ककुतर्क आणि अपेक्षा प्रत्यक्ष घटनेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त भयकारी असतात. कारण एकदा ती घटना घडली, की भितीची लाट फुटलेली असते. क्षणाक्षणाला वाढत, उंचउंच होत असलेल्या लाटेचा जोर आता विरलेला असतो. प्रत्येकाच्या पिंडातून, वैयक्तिक अनुभवातून, पार्श्वभूमीमधून उद्भवणारी भयस्थानं वेगवेगळीच असतात. सर्वाधिक प्रभावी भयपटांमध्ये, अक्राळविक्राळ मुद्रा, हाडांचे सापळे, रक्त, 'गोअरी' म्हणता येतील अशी दृश्ये फार क्वचित असतात. 'सायको', 'बर्ड्स', 'शायनिंग', 'ओमेन' हे माझ्या सर्वाधिक आवडत्या भयपटांमधील काही. भयपट दुसऱ्यांदा पाहतांना तेवढी गंमत येत नाही हा समज चुकीचा आहे; माझ्या मते, गंमतीची जात फक्त बदलते. सायको मधील अंधार-उजेडाच्या खेळाचा, सावल्यांचा, आवाजांचा वापर हिचकॉकने किती सुंदर केला आहे, असे वेगळे पैलू दिसू लागतात; पर्किन्सच्या अभिनयाचं सामर्थ्य आणखी जास्त जाणवू शकतं. हातचलाखीचे खेळ पुन्हापुन्हा बघतांना जसं जादूगाराने नेमकी कुठे नजरबंदी केली ह्याचा अंदाज येऊ शकतो, तसंच! चतुर दिग्दर्शक भिती निर्माण करायला सायको मधल्या पर्किन्सच्या अस्थिर वेडसर नजरेचा एखादा कटाक्ष, किंवा शायनिंग मधल्या निकोलसनच्या विचकट हास्यातला झपाटलेला भाव पुरेसा वापरून घेऊ शकतो. ओमेन मधील लहानसा डेमिअन तीनचाकी सायकल चालवत असल्याचे एरवी 'क्यूट' वाटणारे, किंवा बर्ड्स मधील शेकडो पक्षी शांतपणे समोरच्या झाडावर नुसते जमा होण्याचे एरवी अनुल्लेखनीय दृश्य, हीच प्रेक्षकाला कुठल्याही प्रत्यक्ष घटनेपेक्षा जास्त भेदरवू शकतात. एकदा कथालेखकाने किंवा दिग्दर्शकाने भितीची - मग ती भिती मानसिक विकारातून आलेली असो, वा अतार्किक अमानवी असो - मूळ कल्पना प्रेक्षकांच्या मनात रुजवली; की पुढचं बरंचसं काम प्रेक्षक स्वतःच करत असतात. दिग्दर्शक फक्त भयाण सेट्स, लोकेशन, लाइटिंग, पार्श्वसंगीत वगैरेचे खतपाणी घालून, त्या भयवृक्षाला फोफावायला मदत करतो एवढंच! म्हणून, सिक्सथ सेन्स मध्ये त्या लहान मुलाच्या डोळ्यातील कुतूहलपूर्ण पर्युत्सुक भाव, आपल्याला त्या भेसूर मुलीच्या रक्तबंबाळ दृष्यापेक्षा जास्त घाबरवतात. हे सामर्थ्य कल्पनेचं.
असे अतिमानवी, अमानवी, इंद्रियेतर अनुभव, त्यासंबंधीच्या गोष्टी, हा कल्पना विश्वातल्या भितीचा एक, थोडा रोमँटिक म्हणा, प्रकार झाला. एक प्रकारची करमणूक वा दुःस्वप्नरंजन म्हणा. ह्या भितीवर मात करणे, त्यामागील अतार्किक विचार झटकून टाकणे, सोपे असते. पण वास्तव विश्वामध्ये असलेली, प्रत्यक्ष हिंसाचाराची, शारीरिक इजेची, मरणाची, खरीखुरी भिती मात्र वेगळी! जी क्रिस्टलनाख्त च्या रात्री हजारो जर्मन ज्यू लोकांनी अनुभवली; गुलामगिरीच्या काळात दक्षिणेतील शेतांवर राबणाऱ्या अनेक कृष्णवर्णीय अमेरिकनांनी अनुभवली; ४७च्या फाळणीच्या काळात सरहद्दीजवळील असंख्य हिंदू-मुसलमानांनी अनुभवली.
आजही अमेरिकेमध्ये कित्येक कृष्णवर्णीय आईबाप आपल्या सतरा अठरा वर्षाच्या मुलांना एकट्याने ड्राईव्हिंग करू देताना, एकट्याने बाहेर पडू देताना, घाबरलेले असतात. ज्या पोलिसांकडून सुव्यवस्था आणि संरक्षणाची अपेक्षा ठेवायची, त्यांनाच प्रसंगी हातातल्या दंडुक्याच्या, टेझर गनच्या किंवा पिस्तुलाच्या जोरावर संशयितांच्या प्राणांशी बेदरकारपणे खेळतांना पाहून काळेच नव्हे, तर सगळेच सुजाण नागरिक घाबरतात. गौरवर्णीय प्रभुत्वावर श्रद्धा असलेल्या, अतिरेकी, धर्मांध ख्रिश्चन संघटनांना राजकीय पाठिंबा मिळण्याची केवळ काळ्या आणि ज्यू लोकांनाच नव्हे, तर इतरही सर्वाना भीती वाटते. लोकशाहीचे, मतदानाच्या स्वातंत्र्य आणि शुचितेचे पुळके असलेल्या सशस्त्र झुंडी जेव्हा लोकशाहीच्या सर्वात भव्य आणि जिवंत स्मारकावरच विध्वंसक हल्ला करतात; लोकनियुक्त प्रतिनिधींच्या जीवावर - ते कायदा तोडत *नाहीत* म्हणून - उलटतात, तेव्हा अमेरिकेतीलच नव्हे, संपूर्ण जगातील स्वातंत्र्यप्रेमी लोकांना भिती वाटते - वाटायला हवी!
सर्वात भेदरवणारी भिती, जेव्हा माणसे त्यांच्या मनातील भ्रमिष्ट, निराधार कल्पनाविश्वालाच वास्तव मानू लागतात, तेव्हा वाटते. 'तुमच्या आर्थिक दुःस्थितीचं मूळ कारण अमुक देशाच्या, अमुक वर्णाच्या, तमुक धर्माच्या लोकांमध्ये आहे' असली अतार्किक भिती रूजवण्यासाठी सिनेदिग्दर्शक व्हावं लागत नाही; राजकीय नेता असलेलंही चालतं आणि पुढचं काम अनुयायांवर सोपवून देता येतं. वास्तव आणि कल्पना ह्यातील सीमारेषा जेव्हा पुसट आणि अदृश्य होऊ लागतात; चक्षुर्वै सत्य आणि सांगोपांगी असत्य ह्यातील फरक समजून घेणे जेव्हा अनावश्यक वाटू लागते; चिरंतन, तार्किक आणि कालातीत मूल्यं जेव्हा आज आणि उद्याच्या सत्तेच्या आमिषापुढे बळी दिली जातात, तो काळ सर्वात भयावह असतो - पुढे काय होऊ शकेल ह्या कल्पनेमुळे.
सर्वात भेदरवणारी भिती, जेव्हा माणसे त्यांच्या मनातील भ्रमिष्ट, निराधार कल्पनाविश्वालाच वास्तव मानू लागतात, तेव्हा वाटते. 'तुमच्या आर्थिक दुःस्थितीचं मूळ कारण अमुक देशाच्या, अमुक वर्णाच्या, तमुक धर्माच्या लोकांमध्ये आहे' असली अतार्किक भिती रूजवण्यासाठी सिनेदिग्दर्शक व्हावं लागत नाही; राजकीय नेता असलेलंही चालतं आणि पुढचं काम अनुयायांवर सोपवून देता येतं. वास्तव आणि कल्पना ह्यातील सीमारेषा जेव्हा पुसट आणि अदृश्य होऊ लागतात; चक्षुर्वै सत्य आणि सांगोपांगी असत्य ह्यातील फरक समजून घेणे जेव्हा अनावश्यक वाटू लागते; चिरंतन, तार्किक आणि कालातीत मूल्यं जेव्हा आज आणि उद्याच्या सत्तेच्या आमिषापुढे बळी दिली जातात, तो काळ सर्वात भयावह असतो - पुढे काय होऊ शकेल ह्या कल्पनेमुळे.
ह्या भितीवर मात करण्याचा एकच उपाय - ह्या घडीला हातात असलेल्या स्वातंत्र्याचा, ते निसटून जाण्यापूर्वी वापर करणे. दहशतवादी झुंडींना स्वतःला जर कसली भिती वाटत असेल तर ती दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याची - आचार, उच्चार आणि सर्वात जास्त, विचार स्वातंत्र्याची. म्हणून ह्या झुंडी स्वातंत्र्यावर पहिला घाला घालतात. जोपर्यंत हे स्वातंत्र्य आहे, तोपर्यंत ते वापरणं, टिकवणं, जास्त सबळ करणं हा एकच प्रभावी आणि गुणकारी उपाय आहे संभाव्य भिती टाळण्यासाठी!
एखादा सायको सिनेमा पडद्यावर पाहणं सोपं असतं. 'मदर' अजून इथेच आहे ह्या भ्रमातल्या भयावह माणसाला रिमोटचे एक बटन दाबून गप्प आणि अदृश्य करून टाकता येतं. समाजामध्ये, राजकारणामध्ये, सत्तेमध्ये मात्र काल्पनिक आणि वास्तविक विश्वांची गल्लत करणाऱ्यांना दूर ढकलण्यासाठी फार मोठे परिश्रम घ्यावे लागतात!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...