असं म्हणतात, की दोन व्यक्ती एकमेकांच्या सहवासात फार काळ राहिल्यानंतर त्या एकमेकांची अर्धवट उच्चारलेली वाक्य पुरी करू शकतात; न बोललेले भाव समजून घेऊ शकतात वगैरे. व्यक्तींच्या बद्दल माहिती नाही, पण हिंदी सिनेसंगीताबद्दल माझं तसं व्हायला लागलंय खरं! कित्येक ओळखीच्या गाण्यांबद्दल, मला ते बोल, त्यामागचे भाव एवढ्या खोलवर समजतात की गाण्याच्या आधीचा किंवा नंतरचा सीनही अगदी डोळ्यासमोर उभा रहातो. आता हेच गाणं बघा (म्हणजे, खरोखर पडद्यावर बघा असं म्हणण्याएवढा दुष्ट नाही मी! राजिंदरकुमारचा बॉयकट, तो हंगेरियन मुलींसारखा कॉस्च्यूम, ते चांदीच्या हातकड्यांसारखे कानातले टॉप्स आणि वैजयंतीमालाच्या दुप्पट मेकअप हे सगळं थोड्या कमजोर मनांना झेपायला तसं कठीण आहे, दीर्घका़ळ ते स्कार्स राहू शकतात, हे खरं!)
मग कुठे एकदाची ती शंभर व्हायोलिनं वाजायला लागतात!
बहारों फूल बरसाओ:
एका जातिवंत आय टी मॅनेजरने टीमला हुकूम सोडत हे गाणं म्हटलेलं आहे - बाब्या, तू हे कर. बने, ते केलंस का? पिंट्या, त्या ह्याच्याकडे बघ जरा... एवढं कोणालाही समजतं. माझी खासियत ही, की मला ह्या गाण्यापूर्वी अर्धा तास तो हायपर झालेल्या इव्हेंट प्लॅनरसारखा थैमान कसा घालत होता हेही दिसायला लागतं.
- ओ बहारो, फुलांची वृष्टी करण्याची सोय झाल्ये का नाही अजून? एवढं कानीकपाळी ओरडूनही केशरी गुलाब नाहीच का मिळाले? म्हणून शेवंती आणि झेंडू? अरे सौदिंडिअन रोमॅन्स वाटला काय रे चोरांनो तुम्हाला? जा आधी थोडी लाल-गुलाबी फुलं आणा शोधून कुठून तरी! हो, बोगनवेल, गुलबक्षी, डेलिया, सदाफुली जे काय मिळेल ते बघा. आता आयत्यावेळी गुलाबांसाठी मंडईपर्यंत जायला दोन तास नाहीत आपल्याकडे…
- अग ए लाल्ये, ते मेंदी लावायचं काम तुला दिलंवतं ना? झाली का मेंदी वाटून? स्वत: नुसतं लाललाल होऊन काय तुला बसवायचंय का हिरायणीच्या हातांवर?…
- आणि ते काळे ढग बोलावले होते तिच्या डोळ्यात काजळ घालायला, ते कधी उगवणारेत? वेधशाळेवर कामं सोपवावीत, आणि माणसानं काशीयात्रा करून यावं!…
- तो उस्मानचाचाचा नूर येणार म्हणाला होता त्यांच्या त्या खास सोलापूरच्या चादरी घेऊन, तो काय चालत निघालाय की काय? आमची हिराइन एकदम टाप क्लास काम आहे, समजलं ना? आयत्या वेळी चादर नाही म्हणून आम्हाला शरमिंदा करून निघून जायची!…
- अरे, जरा कोणी त्या दिल नावाच्या कार्ट्याला बहलावेल का रे थोडा वेळ? केवढा वेळ रडतंय ते! अहो तात्या, बहलावेल म्हणजे नुसती समजूत काढायची हो, बहकावेल वेगळं असतं; घाटी नुसते एकेक!…
- शेवटी प्रत्येक गोष्टीत ना, प्लॅनरलाच मेल्याशिवाय काही स्वर्ग दिसणार नाही! वर आयत्या वेळी सगळं नीटनेटकं नसलं, की प्लॅनरच्या नावानी बोंबा मारायला आहेतच सगळे तयार!…
- चला उठा, कामाला लागा; ती आत्ता इथे येऊन ठेपेल.
मग कुठे एकदाची ती शंभर व्हायोलिनं वाजायला लागतात!
बहुतेकांना फक्त पुढचं गाणंच ऐकू येतं, ही आधीची धुमश्चक्री दिसतच नाही!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...