मिश्रा

सत्यकथा. आँखों देखा हाल. प्रत्यक्ष घडलेला, प्रथमपुरुषी अनुभव. मुख्य पात्राचे नांवही बदलले नाहीय.

'लायन किंग' सिनेमामधील माझा एक फार आवडता प्रसंग: तो खुशालचंद रामभरोसे पुम्बा रात्री गवतावर लोळत आकाशाकडे पहात म्हणतो की हे तारे म्हणजे कोट्यावधी मैल दूर, अवकाशात जळत असलेले गॅसचे गोलक आहेत; आणि पुम्बाची कायम टिंगल करणारा, दीडशहाणा टिमोन त्याला मूर्खात काढतो. मीही, ह्यातल्या गर्भित विनोदावर, माझ्या लहान मुलांच्या बरोबरीने ख्याख्या करून, पोट धरधरून हसत असे.

आणि मग, न चुकता मी मिश्राच्या आठवणीने अचानक हसायचं थांबे.

१९८० मध्ये, कॉम्प्युटर्सच्या भारतातील अश्मयुगामध्ये, मी कॉम्प्युटर सायन्स ह्या विषयात मास्टर्स करत होतो. एके रात्री आम्ही चौघे वर्गमित्र आपल्या फायनल असाइन्मेंट्स उशिरापर्यंत पुऱ्या करत बसलो होतो. माझ्या नशिबी, भारतातील कुठलीही दोन शहरे जोडणारा रेल्वेचा सर्वात लहान मार्ग शोधण्यासाठी अल्गॉरिदम आणि त्याचा प्रोग्रॅम लिहिण्याची असाइनमेंट होती. त्या आदिम काळामध्ये फक्त 'ऑपरेटर्स' नांवाच्या गाभाऱ्यातील मोजक्या उच्चवर्णीय पुजाऱ्यांना कॉम्प्युटर नांवाच्या देवासंगे 'CRT' नामक टर्मिनल्सद्वारे संवाद साधण्याची मुभा होती. आमच्यासारख्या शिकाऊ अस्पृश्यांना फक्त काचेबाहेरून नुसत्या दर्शनाची सोय असे. आम्हाला प्रोग्रॅम्स कार्डांवर पंच करून, मेनफ्रेम कॉम्प्युटर्समध्ये 'कम्पाइल' करून घ्यावे लागत. कार्ड्स पंच करून घेणे (ह्यासाठी टायपिस्टसारखा स्टाफ असे!), कम्पाइल करून घेणे आणि त्याचा प्रिंटेड आऊटपुट मिळवणे, नंतर प्रोग्रॅम प्रत्यक्ष 'रन' करून त्याचा आऊटपुट मिळवणे ह्यातील प्रत्येक पायरीसाठी 'आप कतारमे हैं' अशा रांगा असत, आणि एकेक पायरी ओलांडायला सहा-आठ-बारा तास लागत. एवढं करून एखादी फडतूस चूक निघाल्यास संपूर्ण सायकल पुन्हा रिपीट करायची; त्यामुळे प्रोग्रॅममधल्या प्रत्येक चुकीचं जबरं मोल चुकवावं लागे. आजकाल हे मनस्ताप आणि ही दुःख कोणाला समजावून देणंसुद्धा अशक्य झालंय, हे सर्वात मोठं दुःख. असो!

मी मान मोडून माझं काम पुरं करायला झटत असतांना, मिश्रा पाय ताणून खिडकीच्या तावदानाकडे एकटक बघत बसला होता. हे त्याचं नेहमीचंच होतं. आम्हा वर्गमित्रांमध्ये तो वेगळाच होता. बिहारमधल्या कुठल्या लहानशा शहरातून आलेला; आईवडील, लहान भाऊ, स्वतःचा एक लहान मुलगा आणि बायको - एवढ्या सगळ्यांची जबाबदारी अंगावर असलेला; नोकरी करत असलेला; आम्हा सर्वांपेक्षा वयानी साताठ वर्ष तरी मोठा असलेला हा मनुष्य! त्याचं जग, आणि आम्हा विशीतल्या तरुणांचं जग एकत्र आलं केवळ त्याच्या कंपनीने त्याला ह्या कोर्ससाठी स्पॉन्सर केलं होतं म्हणून! त्याकाळी कॉम्प्युटर सायन्सचे डिग्री कोर्सेस, आय आय टी सोडून, फारच कमी होते.

'हे! ही रेल्वेची टाईमटेबलं जर कॉम्प्युटर्सवर असली तर केवढी मोठी सोय होईल, नाही!' बहुतेक खिडकीच्या तावदानाला उद्देशून, त्यावरची नजर जराही न हलवत, आजूबाजूच्या शांततेचा, आणि माझ्या डोक्यातल्या कोलाहलाचा भंग करत तो अचानक उद्गारला.

खोलीतले उरलेले आम्ही तिघंजणं सोडावॉटरच्या बाटलीचं झाकण खटकन उघडावं तसं जोरात फसफसून हसलो. सहसा त्याच्या वयाचा, आणि अतिशय दिलदार स्वभावाचा मान राखून आम्ही त्याच्या ह्या असल्या आचरट कल्पनांना फक्त त्याच्या पाठीमागे हसत असू. 'आणि काय दिवे लागतील त्याने? लक्षात घे, आपण कॉम्प्युटर सायन्स शिकतो आहोत; आणि आपल्याला स्वतःचे प्रिंट आऊटपुट मिळवायला एक-दोन दिवस लागतात! उरलेल्या जनतेला कॉम्प्युटर असतो का आणि कसा, दिसतो कसा, ह्यातल्या कशाचीच कल्पनाही नाहीय. त्यांना प्रिंटआऊट वरून ट्रेन किती वाजता आहे हे समजण्याच्या एखाद दिवस आधी ती सुटलेलीही असेल!' एका शहाण्याने टोमणा मारला. दुसऱ्या दोघांनी ख्याख्या हसून त्याला दुजोरा दिला.

आता मिश्राच्या नजरेने आम्हीही खोलीत असल्याची दखल घेतली; आणि तो एकदम बुजला. आमच्या सहवासात तो बऱ्याचदा बुजलेलाच असे. मवाळपणे तो म्हणाला, 'तसं नाही; म्हणजे कल्पना कर. ह्या ऑपरेटर्सकडे असतात ना तशी टर्मिनल्स प्रत्येक लायब्ररीत असली, आणि ती सरकारच्या किंवा इंडियन रेलच्या मुख्य कॉम्प्युटरला जोडली, तर केवढा फायदा होईल! आपल्याला बरीच माहिती, सरकारी अधिकृत आकडेवारी (आम्ही आय एस आय मध्ये शिकत होतो) सगळं पटकन बघता येईल!'

हा हास्यास्पद पोरकटपणा आता खरोखरच हाताबाहेर चालला होता! प्रत्येक लायब्ररीत टर्मिनल्स म्हणे, आणि मोठ्या मेनफ्रेमला जोडायची; एवढ्या लांब वायरी कुठून आणणार आणि शहराशहरातून जोडणार कशा! खुळचटपणा नाहीतर काय! आणि शिवाय, गरज काय आहे ना. लायब्रऱ्यांमध्ये संदर्भग्रंथ असतातच की. माझे दोन मित्र शब्दशः अवाक झाले. मी त्यातल्यात्यात मुत्सद्दीपणा दाखवून थोडं थट्टेने म्हटलं 'मिश्रा, तुझ्या तोंडात साखर पडो, आणि आपल्या हयातीत काही लायब्रऱ्या तरी कॉम्प्युटर्सशी जोडल्या जावोत.'

मला तेव्हा कल्पना नव्हती माझी हयात एवढी प्रदीर्घ असेल. किंवा काळ एवढ्या झपाट्याने पुढे झेपावेल.

किंवा कदाचित मिश्रा चुकीच्या काळात, चुकीच्या देशात रहात असेल!

Comments