दोनच दिवसापूर्वी, संख्याशास्त्रज्ञ डॉक्टर सी आर राव ह्यांना २०२३ चा संख्याशास्त्रातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची बातमी वाचली; आणि अनेक आठवणी, अनेक भावना उचंबळून वर आल्या. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट च्या आठवणी, एका भारतीयाला गणितातील हा सर्वोच्च पुरस्कार मिळावा ह्याचं अपार कौतुक, वयाच्या एकशे दोनाव्या वर्षी तो पुरस्कार स्वीकारायला डॉक्टर राव तब्बेतीने ठणठणीत आहेत ह्याचा आनंद... आणि हो, रावांनी शिकवलेल्या वर्गात बसण्याचं भाग्य लाभल्याविषयीचा अभिमानही!
सी आर राव हे नांव मी प्रथम ऐकलं, ते बीएस्सीला स्टॅटिस्टिक्स शिकतांना. 'राव-क्रेमर इनिक्वालिटी' नांवाचा एक सिद्धांत आमच्या शिक्षणक्रमात होता. त्यापैकी राव हे भारतीय आहेत समजल्यावर अचंबा आणि कौतुक वाटलं होतं. आर्यभट्टानंतर गणित विषय उर्वरित जगाकडे आउटसोर्स करून, भारताने त्यातून हात झटकून, वानप्रस्थाश्रम स्वीकारला असा ग्रह व्हावा, अशीच परिस्थिती पाठ्यपुस्तकातून असे – बहुतांश सिद्धांत, बहुतांश प्रमेये परकीयांच्या नावांची! नंतर, आय एस आय मध्ये मास्टर्सच्या डिग्री कोर्स साठी अर्ज पाठवतांना डॉक्टर राव तिथे शिकवतात हे कानी आलं, आणि प्रवेश मिळवायची जिद्द आणखीच वाढली. आय एस आयचं पाणी वेगळंच आहे, ह्याची जाणीव लेखी प्रवेशपरीक्षेतच झाली होती. पेपर पुरा करण्यासाठी 'अमर्याद वेळ' (आपल्याला काहीच येत नाही ह्याची लाज वाटून किंवा कंटाळून तुम्हीच थोड्या वेळाने अर्धवट पेपर देऊन निघून जाल अशी अपेक्षा असावी!) हा चमत्कार प्रथमच पाहिला. पेपरातल्या प्रश्नांची गहराई पाहिल्यावर, अमर्याद वेळही अपुरा पडू शकेल हे लक्षात आलं. बहुधा दैवी चमत्कारांमुळे, मी लेखी परीक्षेत पास होऊन, कलकत्त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावणं आलं.
तो इंटरव्ह्यूही अजबच होता. कॉलेजच्या वर्गात एका टेबलाभोवती कोंडाळं करून बसलेले बारा-तेरा जण (ह्यातले कित्येक स्वतः विख्यात संख्याशास्त्रज्ञ होते, हे प्रत्यक्ष जॉईन झाल्यानंतर समजलं!), मला खडू हातात देऊन फळ्याजवळ उभा केलेला; आणि बंदुकीच्या फैरी झाडल्यासारखे एकामागून एक ते मला गणितातले प्रश्न फळ्यावर सोडवायला सांगत होते. अर्धा-पाऊण तास चाललेल्या ह्या छळणुकीच्या दरम्यान लक्षात आलं, की मी योग्य मार्गाला आहे ह्याची खात्री झाल्याक्षणी ते हा प्रश्न सोडून पुढचा विचारत; चुकीच्या दिशेने जात असेन तर हाताची घडी-तोंडावर बोट ठेवून मला स्वतःला ती चूक कधी समजते आहे, ही गंमत बघत बसून राहत. ह्या घामाघूम करणाऱ्या सत्वपरिक्षेअखेर जेव्हा त्यांनी विचारलं, दिल्ली कॅम्पस का निवडला, तेव्हा कलकत्ता बकाल आहे म्हणून, हे खरं उत्तर लपवून दुसरं, अल्मोस्ट तेवढंच खरं उत्तर दिलं की डॉक्टर राव दिल्लीत शिकवतात म्हणून! ते सगळे खदाखदा हसले... माझ्या उत्तरात त्या सगळ्यांचा थोडासा उपमर्द आहे हेही समजण्याएवढा पोच मला नव्हता.
दिल्लीमध्ये आल्यावर रोजच डॉक्टर रावांचं दर्शन होत असे. त्याही काळी आजोबा वाटावेत असा अतिशय प्रेमळ, अखंड स्मितहास्य करणारा चेहरा, मध्यम उंची, पांढरे होत असलेले कुरळे केस, अतिशय मृदू खालच्या पट्टीतील संभाषण हे सगळं दर्शनच आपण एका बुद्धिमान माणसाशी बोलतो आहोत ह्याची जाणीव करून देणारं होतं. फक्त, पाठ्यपुस्तकांमधून ज्यांचा उल्लेख वाचला होता ती हीच व्यक्ती ह्यावर विश्वास बसायला थोडा वेळ लागला. शिक्षण, पी एचडी, आंतरराष्ट्रीय ख्याती, वयाचा, अनुभवाचा मान ह्या सगळ्याविषयी मनःपूर्वक आदर बाळगण्याचा तो काळ, आणि माझं वय होतं. मुंबईच्या छोट्याशा घरकुलाबाहेरचं विश्व प्रथमच बघत होतो. सामान्य लोकांचे क्षुद्र मानापमान कसे सतरा वेळा पायात घोटाळतात, आणि राग कसे नकट्या नाकांच्या पायथ्याशी नासिकारोहण करायला तयारच असतात, हे चोहीकडे पहात होतो. आणि इथे हा प्रेमळ चेहऱ्याचा, एवढा मोठा विद्वान मनुष्य, एवढा साधासुधा, सहज अप्रोचेबल आहे; जोक मारत प्रश्नांची उत्तरं देतो आहे हे पाहून मलाच चोरट्यासारखं व्हायचं सुरुवातीला; पण हळूहळू सवय झाली. आय एस आय मधील एकूण संस्कृतीच मुळी शांतिनिकेतनवरून स्फूर्ती घेतल्यासारखी, थोडी गुरुकुल पद्धतीची, प्रोफेसर आणि विद्यार्थी ह्यातला दुरावा, उच्च-नीच भेदभाव नष्ट करून टाकणारी आहे. तेथील खडतर प्रवेशपद्धतीच्या गाळण्यामुळे, त्या काळी तरी प्रत्यक्ष प्रवेश मिळवून आत आलेली मुलं थोडीच असत. माझ्या मास्टर्सच्या वर्गात मोजून तीन मुलं होती. मुंबईमधल्या बीएस्सीच्या वर्गात - अगदी गणिताच्या वर्गात सुद्धा - किमान पन्नास साठ मुलं असण्याच्या अनुभवानंतर इथे इन-मीन-तीन मुलं हा धक्का होता. त्यामुळे, क्लास बंक करणे, वर्गात झोपा काढणे - कागदी बाण वगैरे तर कल्पनेपलीकडच्या गोष्टी - ह्या आनंदांपासून वंचित रहावे लागे. बहुतांश शिक्षक श्यामच्या आईपेक्षा प्रेमळ असल्याने, एखादा मुलगा खरंच आजारी म्हणून अनुपस्थित असेल, तर ते लेक्चर, लेक्चरच काय, वेळप्रसंगी परीक्षा देखील, 'रीस्केड्युल' होई!
डॉक्टर राव आम्हाला बायो स्टॅटिस्टिक्स शिकवत. तो त्यांचा हातखंडा विषय होता. त्यांचं स्वतःचं बरंच कर्तृत्व त्याच विषयाशी संबंधित आहे. त्यामुळे, तो विषय त्यांच्याकडून शिकायला मिळणं हे केवढं भाग्य! हे लक्षात येण्याची आमची पूर्ण कुवत नव्हती. त्यांची शिकवण्याची गंमत म्हणजे, ते बहुतेक वेळा पुस्तक उघडून काही शिकवण्याऐवजी आळीपाळीने तिघांपैकी एकाला धरून फळ्याजवळ उभा करत, आणि गणिते, प्रमेयं वगैरे सिद्ध करायला लावत. वर्गातल्या इतर दोघांनी मदत करणे मान्य, नव्हे अपेक्षितच, असे. अगदीच अडल्यास ते एखादी हिंट देत. अशा रितीने एकमेका सहाय्य करून एकदाचा सुपंथ गाठल्यानंतर मग ते सांगत 'आत्ता हे जे काही तुम्ही सिद्ध केलं ना, त्याला अमक्यातमक्याचा सिद्धांत म्हणतात'. ऐकून आमच्या वीतभर छात्या आश्चर्याने आणि अभिमानाने फुलून येत! बायो स्टॅटिस्टिक्स अर्ध्या सेमेस्टरचाच विषय होता. पण मास्टर्स संपवून दिल्ली कॅम्पस सोडतांना मुद्दाम त्यांची भेट घ्यायला गेलो होतो. पुढच्या मार्गासाठी ज्यांचा आशीर्वाद घ्यावा असं मनापासून वाटलं, त्या फार थोड्यांपैकी ते होते. दुर्दैवाने मॅथ-स्टॅट्स मध्ये पीएचडी करावी ह्या माझ्या आणि मला ते जमेल, मी ते करावं असे मानणाऱ्या काही शिक्षकांच्या तत्कालीन स्वप्नांमध्ये लवकरच कॉम्प्युटर्स, नोकरी, पैसे ह्या मायावती मोहिनीने तपोभंग केला, आणि स्टॅटिस्टिक्सकडे मी विश्वामित्रासारखी पाठ फिरवली, ती आजतागायत! आजही कधी एकांताच्या (म्हणजे मी एकटा असतांना) क्षणी 'काय होऊ शकलं असतं' असले खोडकर विचार डोकी वर काढतात. आणि मग प्रॉजेक्ट डेडलाईन्सच्या आठवणींनी, आणि हे बटन ग्रे व्हावं का, का होत नाही, असल्या गहन प्रश्नांवरील सहा ईमेल्स बघून घाबरून डोकी परत वाळूत खुपसतात.
पण, आय एस आय मध्ये जडलेलं गणित, संख्याशास्त्र विषयांवरचं प्रेम, त्या विषयांचं 'पावित्र्य' (प्युरिटी ला मराठीत खरंच दुसरा शब्द नसेल?!?), ती स्वच्छ सरळ स्पष्ट विचारवृत्ती, त्यात संशोधन करणारे लोक - ह्या सगळ्याविषयीचं कौतुक मात्र कधीच मावळलं नाही. अजूनही कुठे गणितातल्या बातम्या वाचल्या की जुन्या प्रेमाला उजाळा देत, मी हातातलं काम सोडून, त्या वाचून काढतो. अशा एखाद्या बातमीमध्ये एखादं ओळखीचं, आदरणीय नांव असेल, तर दुप्पट खात्रीने!
पद्मविभूषण डॉक्टर राव, ह्या 'गणितातील नोबेल' प्राईझ साठी अतिशय नम्र आणि मनःपूर्वक अभिनंदन!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...