मी रूढार्थाने आस्तिक नाही; पूजापाठ-कर्मकांडं वगैरेंवर तर माझा मुळीच विश्वास नाही! पण मी भाविक आहे. माझी श्रद्धास्थानं वेगळी असतील; पण ती ठाम आहेत. टिंगल कुठल्याही गोष्टीची होऊ शकते; पण म्हणून ती प्रत्येक बाबतीत केल्यानेच आपली मर्दुमकी सिद्ध होते असं मला वाटत नाही. म्हणूनच मला सश्रद्धांची टिंगल करणं पटत नाही. ह्या आंधळ्या कोशिंबिरीमध्ये, जो तो आपल्याला सुचेल तसा मार्ग चाचपडत असतो. जोपर्यंत दुसऱ्यांच्या मार्गात अडथळे रचत नाही तोपर्यंत त्याला मुर्खात काढण्यापेक्षा मला माझा मार्ग शोधणं जास्त महत्वाचं वाटतं. असो; घडाभर तेल संपलं, त्यामुळे आता नमन आवरतं घेऊन मूळ मुद्द्याला येतो.
५०-६०-७० च्या दशकांमधलं हिंदी सिनेसंगीत हा माझा मोठा वीक पॉईंट आहे. लता-आशा-रफी-किशोर हे तर देवाधिदेव आहेतच; पण त्या काळातले सगळेच (बहुतांश म्हणू!) गायक, संगीतकार, कवी ही फार आदराची, कौतुकाची आणि जिव्हाळ्याची स्थानं आहेत. ती गाणी अखंड मनात वाजतच असतात; कित्येकदा झोपेत एखादी चाल आठवते आणि शब्द आठवता आठवता पहाट कधी उजाडते समजतच नाही. अशीच अस्वस्थता एखाद्या गाण्यातल्या एखाद्या जागेवरून, दुसऱ्याच कुठल्यातरी गाण्याच्या होणाऱ्या आठवणींनी येते. कधी ओ पी नय्यरच्या गाण्यांमधले सारंगी आणि सतारीचे पीसेस दिवसदिवस डोक्यात घुमत राहतात.
हिंदी-मराठी संगीताच्या सुवर्णयुगातील खजिन्याचं हे प्रेम एवढं अमर्याद आहे, की मूळ गाण्यांची असंख्य पारायणं करूनही ही तहान भागत नाही. मी भारतीय टीव्ही वरचे सारेगमपा, इंडियन आयडॉल आणि तत्सम बरेच कार्यक्रमसुद्धा भक्तिभावाने बघतो; स्थानिक लहानमोठ्या कलाकारांच्या हिंदी सिनेसंगीताच्या कार्यक्रमांना आवर्जून जातो. सारेगम जेव्हा सुरु झाला आणि सोनू निगम तो होस्ट करत असे, तो ह्या टॅलेंट शोजचा सुवर्णकाळ होता! सोनू स्वतः उत्कृष्ट गायक तर आहेच, पण त्या काळी जसराज, झाकीर हुसेन, अनिल विश्वास, ओ पी नय्यर अशी मातब्बर मंडळी जज म्हणून येत. नंतरही काही काळ जजेस बरेच चांगले होते. गेली कित्येक वर्षे जजेसची वाचाळकी, स्पेशल गेस्ट्सचे थिल्लर थिऍट्रिक्स आणि निवेदकांचे अतिसामान्य विनोद आणि संपूर्ण अनावश्यक फिल्मीपणा ह्या सगळ्यांनी हैदोस घातला आहे! 'आम्ही तर हा थिल्लरपणा बघतच नाही; - हा कर्मठ सोवळेपणा मात्र मला पटत नाही. ह्या बिकट काट्याकुट्यातून वाट काढत, प्रसंगी गाणं सुरु होईपर्यंत चक्क टीव्ही म्यूट करून सुद्धा, मी धीराने हे शोज अजूनही बघतो. ह्याचं एकमेव कारण - माझ्या दृष्टीने अजरामर असलेली ही गाणी ऐकायला मिळावी म्हणून! कधीकधी, ह्यातले पोरसवदा गायक-गायिका खरंच गुणी असतात म्हणून! ह्याच कारणासाठी मी फेसबुकवरचे ला म्युझिका किंवा स्मृतिगंध सारखे ग्रूप्स, किंवा इतर अनेक गायक, फॉलो करतो.
कल्याणजींसमोर लहानशा श्रेया घोषाल ला 'सुनियो जी' लाईव्ह म्हणतांना ऐकणे हा माझ्या लेखी एक चमत्कार होता. तिने प्रत्यक्ष अनिल विश्वास समोर 'तुम्हारे बुलानेको' गायल्याची माझी आठवण खरी आहे, का केवळ माझा कल्पनाविलास आहे ह्याची मलाच खात्री नाही! यु ट्यूबवर आता ती क्लिप शोधूनही मिळाली नाही. फास्ट फॉरवर्ड काही वर्षे - आणि नऊ-दहा वर्षाच्या अन्वेषाला श्रेयासमोर, श्रेयाचंच 'आमी जे तोमार' अचूक सुंदर गातांना ऐकून, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ह्या हिंदी सिनेसंगीताच्या वारशाचे हस्तांतर होतांना बघून माझा आवंढा घशात अडकला होता. निहिरा जोशीला आशा भोसलेंच्या 'साथी रे भूल ना जाना मेरा प्यार' च्या अवघड जागा घेताना ऐकून अंगावर आलेला काटा अजून स्मरणात आहे. संगीता नेरुरकरने म्हटलेलं 'सरणार कधी रण' असंच अविस्मरणीय! कोणीतरी लहानगा केरळी सौरव किशन, त्याच्या जन्माच्या कित्येक वर्षे आधी हे जग सोडून गेलेल्या रफीचं स्वर्गीय 'खोया खोया चांद', कणमात्र सदोष उच्चारात, पण एरवी अगदी रफीच्याच आवाजात, मूळ गाण्याबरहुकूम गातो, तेव्हा काहीही घेणं नास्ती देणं नास्ती असलेल्या मला बसल्या जागी आनंदाचं भरतं येतं. कोणीतरी जेमतेम मिसरूड फुटलेला साग्निक सेन हेमंतकुमारच्या लकबी सहीसही उचलून 'ना ये चांद होगा' म्हणतो, आणि माझं हृदय उचंबळून येतं. कित्येकदा एवढीही लोकप्रियता, किंवा कौशल्य न लाभलेली लहान मुलंमुली असतात; कदाचित आईबाबांच्या, शेजाऱ्यांच्या, मोठ्या माणसांच्या शाबासकीसाठी, मोठ्या माणसांची आवडती जुनी गाणी गाण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात. ते पाहून मला भरून येतं. कारण, ह्या गायकांना, संगीतकारांना मनःपूर्वक वाहिलेली एवढी मोठी आदरांजली, दिलेली दाद दुसरी होऊच शकणार नाही! ही गाणी आज पन्नास-साठ आणि सत्तर वर्षांनंतरही असंख्य लोक विसरू शकत नाहीत; आणि आजच्या गायकांची वयं बघता कदाचित आणखी कित्येक वर्ष ही गाणी विस्मरणात जाणार नाहीत हा फार मोठा दिलासा असतो माझ्यासाठी.
त्याचबरोबर, आजच्या, अगदी टॅलेंटेड सुद्धा, कलाकारांकडून ही गाणी ऐकतांना मला क्षणोक्षणी मूळ गायकांची महती आणखी जास्त जाणवत राहते. लता-आशाच्या गाण्यातील एखादी अवघड जागा घेऊन झाली की त्या मुलीचं मनातलं 'हुश्श्य!' माझ्या कानांना दिसत असतं. ती जागा जरी जमली असली तरी शब्दाची फेक, उच्चार, त्यातला भाव, आवाजातला अभिनय हे राहून गेलं किंवा कमी पडलं हे जाणवतं. मी ड्राइव्हिंग शिकत असतांना, 'ह्याला काय अर्थय! मी गाडीचा स्पीड पण बघायचा, गिअर पण बदलायचा, रस्त्यावर लक्ष ठेवायचं आणि एक्झिटच्या पाट्या पण बघायच्या! सगळं एकदम कसं जमणार?' हा प्रश्न ऐकून बेशुद्ध पडायला आलेल्या इन्स्ट्रक्टरचा चेहरा आठवतो. मग साहजिकच, लता आणि रफी आणि इतरांकडून ही गाणी घडवून घेणारे थोर संगीतकार होते - 'म्हणून त्या सगळ्यांचीच आठवण ठेवायची!' ह्याची मनात दहा लक्षव्यांदा उगाळणी होते.
म्हणूनच एखाद्या स्निती मिश्रा कडून 'जाईन विचारीत रानफुला' किंवा एखाद्या विभावरी आपटेचं 'लग जा गले' ऐकून खूप छान वाटत असलं, तरी ताबडतोब मी मूळ गाणी ऐकतो! अचूकतेचा, परिपूर्णतेचा साक्षात्कार घेण्यासाठी!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...