मला फिरायची खूप हौस असली तरी नवीन शहरं, विशेषतः अमेरिकेतली शहरं, बघण्यात फारसा रस नसतो. ह्या देशात नवीन असतांना, इथली बरीच ठळक शहरं आवर्जून थोडीफार तरी बघून घेतली; नंतर त्यात तोचतोचपणा वाटायला लागला होता. कसं कुणास ठाऊक, शिकागो मात्र बघायचं राहून गेलं होतं. त्यातून, न्यू यॉर्कसारख्या मोठ्ठ्या ('जगात भारी!') शहराच्या जवळपास राहिल्यावर आणि कामानिमित्त बरंचसं आयुष्य ह्या शहरातच घालवल्यावर ह्यापलीकडे आणखी काय बघायचं, अशी थोडी उर्मट (‘जाज्ज्वल्य अभिमानी’) धारणा झालेली होती. मुलगा गेलं दीडेक वर्ष शिकागोमध्ये रहातो आहे, आणि त्या शहराचं गुणगान करण्याची एकही संधी तो अजिबात दवडत नव्हता. त्याच्या आग्रहाला बळी पडून शेवटी शिकागोची एक धावती भेट नुकतीच घेतली. वेल, ते बालादपी सुभाषितं ग्राह्यम थोडं खरं असावं. एका लहानशा भेटीतल्या कित्येक आठवणी मनात बरोबर घेऊन परतलो; त्या बहुतेक तिथे परत ओढून घेऊन जातीलच.
सुरुवात खरी थोडी साशंकरित्याच झाली होती. शिकागोत वेगळं असं काय आणि किती बघायला असणार, ह्या भीतीने मी दोनतीन दिवस आधीच निघून आसपास फिरून चारपाच तासावरचं सेंट लुईस बघण्याचाही बेत केला होता. सेंट लुईसची जगप्रसिद्ध 'गेटवे आर्क' हे एक अमेरिकन आयकॉन; पण माझ्यासाठी त्याहीपेक्षा जास्त मोठं आकर्षण होतं, ते दुसऱ्या एका अमेरिकन आयकॉन - रूट 66 - वरून ड्राइव्हिंग करण्याचं! अमेरिकेतील इंटरस्टेट हायवे सिस्टीमच्या जाळ्याची जवळजवळ सुरुवातच शिकागोहून लॉस अँजेलिस ला जाणाऱ्या, जवळजवळ अडीच हजार मैलाच्या, ह्या रूट 66 ने झाली. हा रस्ता मधल्या मिझुरी, ओक्लाहोमा, टेक्सास, ऍरिझोना अशा बऱ्याच राज्यांमधून एकदाचा कॅलिफोर्निया पर्यंत जातो. ह्या रस्त्याचं प्रवासी अमेरिकनांच्या मनावर एक मोठं गारुड आहे. हॉलिवूडच्या अनेक सिनेमांमधून (डिस्ने-पिक्सार चा 'Cars') आणि साहित्यामधूनही (‘Grapes of wrath’) त्याला सलामी दिलेली आहे. ह्या रस्त्यावरची विक्षिप्त (क्वर्की) मानवनिर्मित दृश्य गेल्या शतकाच्या पूर्वार्धातील अमेरिकन ड्राईव्हिंग संस्कृतीची, एका सामाजिक इतिहासाची, एका बालिश, आशादायी आणि कॅन-डू संस्कृतीची प्रतिबिंबं दाखवतात. त्यामुळे ह्या ऐतिहासिक रस्त्याच्या सुरुवातीचं काही अंतर तरी प्रत्यक्ष ड्राईव्ह करायला मिळणार म्हणून मी लहान मुलासारखा अधीर होतो.
पण ते शिद्दतसे बघितलेल्या स्वप्नांना कायनात मदत करते वगैरे फक्त हिंदी सिनेमांमध्ये घडतं. प्रत्यक्षात जूनच्या शेवटच्या आठवड्यात, इथे अमेरिकेच्या दक्षिण भागातील उष्णतेची लाट, पूर्व किनाऱ्यावरील वादळे, शिकागो भागामध्ये कॅनेडिअन वणव्यांमुळे पसरलेला धूर आणि ह्या सगळ्याच्या वरताण युनायटेड एअरलाईन्सचा भोंगळपणा ह्या सगळ्या कायनातींनी एकत्र येऊन माझं रूट 66 ड्राईव्हिंग चं स्वप्न पार चकनाचूर केलं. त्या रस्त्यावर ड्राइव्ह करण्याऐवजी ते तीन दिवस आम्ही घर ते एअरपोर्ट आणि तेथील गेट्सचे खेटे घालण्यात आणि त्या कुंभमेळ्यामध्ये आमच्यापासून बिछडलेल्या आमच्या बॅगा नक्की कुठे असतील ही कोडी सोडवण्यामध्ये घालवले. शेवटी तीन दिवस उशिरा का होईना, एकदाचे शिकागोला पोचलो.
पोचलो त्या दिवशी बराच पाऊस होता. कदाचित त्यामुळे, शिकागो स्वच्छ धुतल्यासारखं, तजेलदार हिरवंगार दिसत होतं. इथे 'लीफी सबर्ब' म्हणतात तसाच आजूबाजूचा परिसर होता - फक्त आम्ही उपनगरात नसून खुद्द डाउनटाऊनमध्येच होतो. न्यू जर्सी राज्याला गार्डन स्टेट म्हणतात; पण शिकागो बघितल्यावर खरं गार्डन सिटी कसं असतं हे समजलं. एवढ्या मोठ्या आधुनिक शहरामध्ये एवढी लहानमोठी हिरवीगार आणि फुलांनी नटलेली पार्क्स असणं हे खरंच अप्रूप! अमेरिकेतल्या इतर मोठ्या शहरात मोकळी जागा दिसली की लोक कार पार्किंग नाहीतर राहण्यासाठी उंच इमारती बांधतात; त्याऐवजी शिकागोमध्ये दिसली मोकळी जागा की फुलव बागबगीचे अशी प्रथा असावी.
भौगोलिकदृष्ट्या नशीबवान आहे हे शहर! काय नाही ह्या शहरात? एक समुद्र तेवढा नाही; पण त्याची उणीव भासणार नाही असलं महाप्रचंड लेक मिशिगन आहे. त्या विस्तीर्ण जलाशयाशेजारी वसलेलं, आणि तरीही प्रसरण पावायला मुबलक जागा असलेलं हे शहर. त्यामुळे न्यू यॉर्क शहराची अरुंद बेटामधली गिचमीड दाटीवाटी इथे भासत नाही. शहरातले एवढे रुंद रस्ते आणि मोकळा परिसर नजरेत भरण्यासारखा - हे वैशिष्ट्य वॉशिंग्टन डी सी ची काही ठिकाणी आठवण करून देते - पण तिथला अंगावर येणारा भव्य अजस्त्रपणा वगळून! 'एल' (एलेव्हेटेड ट्रेन - शिकागोची मेट्रो सिस्टीम) मुळे शहर पादाक्रांत करणे सोपे होते; शिवाय न्यू यॉर्कच्या तुलनेत फारच स्वस्त (२४ तासाचा स्वैर फिरण्याचा पास फक्त पाच डॉलर्स!). लेक मिशिगनच्या काठाकाठाने जाणारे सुंदर रस्ते आणि प्रचंड पार्क्स तर आहेतच; पण शहरामधून वाहणाऱ्या शिकागो नदीच्या तीरांचाही उत्तम वापर करून घेतलेला आहे. सॅन अँटोनियो पासून धडे घेऊन (?) रचलेल्या रिव्हर वॉक ची - दोन्ही तीरांवर सुंदर दिवे लावून केलेली सजावट, रमतगमत चालण्यासाठी सुयोग्य रस्ते, मोठमोठी तारांकित हॉटेल्स, रेस्टोरंट्स, बार आणि नदीमधून जाणाऱ्या बोटींची सैर - असली फॅशन बऱ्याच शहरात दिसते; पण तिथेही शिकागोने आपलं वेगळेपण जपलं आहे. इथे हे सगळं आहेच, पण त्यांची स्थापत्यशास्त्राची सगळी समृद्धी - शिकागोची स्कायलाईन - ह्या काठांवर उभारली आहे.
'शिकागो रिव्हर आर्किटेक्चर टूर' हा गाईडेड टूर कशी असावी ह्याचा उत्कृष्ट नमुना निघाला. तीरावरच्या प्रत्येक इमारतींची खास वैशिष्ट्यं, इतिहास, आर्किटेक्चरच्या वेगवेगळ्या पीरिअड्स (निओ-गॉथिक, आर्ट-डेको, पोस्ट-मॉडर्न इ.) चा प्रभाव, बाजूने एल चे ट्रॅक्स जात असल्यामुळे किमान आकाराच्या उपलब्ध पायावर, शिकागो हे 'विंडी सिटी' म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे त्या झंझावाती वाऱ्याला तोंड देऊन शाबूत राहतील असे गगनचुंबी इमले रचण्यातील कौशल्य हे सगळंच त्या गाईडने खूप रंजक पद्धतीने समजावून दिलं. थोडा 'आता इथे काय गंमत केलीये... ' भाग होता खरा; तो सुसह्यच नव्हे तर स्वागतार्ह झाला तो इथल्या कित्येक इमारतींनी, त्यांच्या शेजाऱ्यांना, प्रस्थापित पूर्वसुरींना वाहिलेल्या ऑमेज (homage) च्या छान माहितीमुळे. कित्येकदा एखादी इमारत पाहताना आपल्याला तिची रचना थोडी विक्षिप्त वाटते, निव्वळ एक लक्ष वेधून घेण्याची क्लृप्ती वाटू शकते; पण त्यामागे काही सखोल विचार आणि साधार कारणही असू शकतं हे पहिल्यांदा समजलं. दीड तासाची ही टूर म्हणजे 'झटपट सुलभ आर्किटेक्चर' चा कोर्सच म्हणा ना! शेवटी जेव्हा ऐकलं, की हा गाईड हाडाचा आर्किटेक्ट नसून एक स्वेच्छानिवृत्त हाडाचा डॉक्टर (ऑर्थोपेडिक सर्जन) आहे आणि एक छंद म्हणून हे काम करतो, तेव्हा अमेरिकनांच्या खुळचट वेडांचं आणि छंदांचं मनस्वी कौतुक वाटलं.
एकंदर शिकागो स्कायलाईन प्रेक्षणीयच; पण खास उल्लेखनीय म्हणजे शिकागो ट्रिब्यून ह्या वृत्तपत्राची छत्तीस मजली उंच, मूळ बिल्डिंग! एकेकाळी 'जगातील सर्वात सुंदर ऑफिस बिल्डींग' अशी जाहिरात करणाऱ्या ह्या इमारतीच्या बाहेरील भिंतींमध्ये जगातील अनेक नामवंत बिल्डींग्सचे एकेक दगड बसवले आहेत - ह्या वृत्तपत्राचा आवाका आणि दरारा दाखवण्यासाठी. त्यात ताजमहाल, चीनची भिंत, सोळाव्या शतकातील इस्तंबूल मधील मशीद, जर्मनीमधील ब्रान्डेनबर्ग गेट अशा अनेक प्रसिद्ध इमारतींचे दगड आहेत.
खाद्यभ्रमंती हे कुठल्याही नवीन ठिकाणी माझे मोठे आकर्षण! अमेरिकेत पिझ्झाची दोनच आद्य आणि प्रमुख घराणी - एक न्यू यॉर्क स्टाईल (हा पातळ, कमी मैदावाला, उभा फोल्ड करून, हातात धरून प्लेटमध्ये तेल ओघळू देत खाण्याचा फार चविष्ट जिन्नस) आणि दुसरी शिकागो स्टाईल (हा पिझ्झा 'पाय' ह्या संज्ञेला जागणारा, डीप डिश कॅसरोल च्या जास्त जवळ जाणारा, पिठाळ मैद्याचा, वाकवता न येणारा, सुऱ्याकाट्याने खाण्याचा ऐवज). इतरत्र सगळीकडे ह्या दोन घराण्यांच्याच भेसळयुक्त धेडगुजऱ्या नकला मिळतात. दोन्ही घराण्यांचे गंडाबंद शागीर्द अटीतटीने आपापल्या चीजांचं जास्त गुणगान करतात. मी अर्थातच न्यू यॉर्क घराण्याचा चाहता! शिकागो स्टाईल पूर्वी खाल्ली असली, तरी आता प्रत्यक्ष त्या घराण्याच्या उगमस्थानी, पिक्वॉड ह्या तिथल्या एका प्रसिद्ध ठिकाणी, तासभर रांगेत उभं राहून, खाऊन मी माझा निःपक्षपातीपणा सिद्ध केला; आणि त्या पिठूळ जाड भटुऱ्यामध्ये (तरी बरं ज्यादा टोमॅटो सॉस आणि ज्यादा चीज घेतलं होतं!) एवढ्या कष्टांचं चीज झालं नाही ह्याच निर्णयाप्रत परतलो. शिकागोमधील लिट्ल इंडिया अशी फार स्तुती ऐकलेल्या डेव्हॉन अव्हेन्यू नेही निराशाच केली; पंचवीसेक पाकिस्तानी रेस्टोरंन्टसच्या मध्ये पाच-सात भारतीय रेस्टोरंटस, आणि एखाददोन साड्या-दागिन्यांची दुकानं - ह्याला लिट्ल इंडिया म्हणायचं? मग आमच्या न्यू जर्सीला तर आसेतुहिमाचल अखंड भारतवर्षच म्हणायला हवं! मी परखलेली चिकन बिर्याणी सुद्धा 'ठीक आहे' इतपतच होती. पण शिकागोचा बाकी अमेरिकन 'फूड सीन' मात्र कुठल्याही मोठ्या शहराच्या तोंडात मारू शकेल एवढा छान वाटला. रँडॉल्फ स्ट्रीट वरील झगमगीत खाऊ गल्ली काय, किंवा डाउनटाऊन मधील सिंडीज रूफटॉप, नेव्ही पिअर वरची रेस्टोरंटस काय; ह्या सगळ्यामध्ये प्रचंड व्हरायटी आहे. पण ह्या सगळ्यामध्ये बेव्हेट हे फ्रेंच स्टेक हाऊस मात्र तिथल्या चवीची दीर्घकाळ आठवण ठेवणारं निघालं - आतापर्यंत मी फक्त अमेरिकन, ब्राझिलियन, अर्जेंटाइन अशा स्टेक हाऊस मध्ये गेलो होतो. फिले मिनिऑन हा मुळात स्टेकचा बादशाह; तो इथे एवढा सुंदर होता, की खातांना आपल्याला एकच तोंड आणि एकच पोट असल्याची हळहळ वाटावी! टिपीकल स्टेक हाऊसमधील नेहमीच्याच साईड डिशेस, पण फ्रेंच मेकअपमुळे केवळ अप्रतिम बनवलेल्या होत्या! बिल बघितल्यानंतर मात्र एकच तोंड असल्याचा अपार संतोष जाहला.
चार दिवस झपाट्याने उडून गेले. एका नवीन, छान शहराची ओळख झाली ह्याचा खूप आनंद झाला. ही योजनाबद्ध ओळख मुलाने घडवली, त्यालाही सौन्दर्यदृष्टी आणि अभिरुची आहे ह्याचा आनंद आणखीच जास्त!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...