लेखन, नाटक आणि सिनेमा ही, काही वेळा ह्याच चढत्या क्रमाने जास्त जास्त समृद्ध अशी, अभिव्यक्तीची वेगवेगळी माध्यमे मानली जातात. ढोबळमानाने तिन्हींची मूळ प्रेरणा एक कथा सांगणे, वाचक/प्रेक्षकाच्या मनात एक अनुभव निर्माण करणे, हीच असते; पण तरीही तिघांची बलस्थाने आणि मर्यादा दोन्ही वेगवेगळ्या असतात. मला ह्या तिन्हीमधील नाटक हे सर्वात कठीण माध्यम वाटते. एकतर नाटक दर वेळी प्रेक्षकांसमोर नव्याने घडत असते; आणि त्याच्या प्रयोगात प्रत्येक वाक्याचा, हालचालीचा, मुद्राभिनयाचा परिणाम साधण्याची एकेकच संधी मिळते. तो क्षण गेल्यावर, ती संधी गेलेली असते. नाटकाचा ओघ पुढे चालत राहिल्यामुळे त्या क्षणावर रेंगाळता येत नाही; त्या अनुभवाचा इम्पॅक्ट विरत जातो. पुस्तकामधील एखादा कठीण भाग मागे जाऊन वाचणे किंवा सिनेमा थोडा रिवाईंड करून बघणे शक्य असते; ही संधी नाटकात नसते. मला नाटकाच्या दिग्दर्शकासाठी आणि कलाकारांसाठीच नव्हे, लेखकासाठी सुद्धा हे मोठं आव्हान वाटतं. जेव्हा नाटकाचा विषय एखाद्या प्रेमकहाणी, दैनंदिन समस्या किंवा डावपेच, रहस्य अशा सुफळ संपूर्ण 'कथां' पेक्षा जास्त क्लिष्ट असतो; जेव्हा त्यामध्ये 'अमुक घडलं' असं सांगण्याऐवजी लेखक एखादा तात्विक विचार मांडत असतो, तेव्हा हे आव्हान आणखीच मोठं! असं नाटक रंगमंचावर आणायला, सादर करायला धैर्य लागतं. कारण एकतर बहुतांश प्रेक्षकांना साधीसुधी, हसरी खेळती, मर्यादित वेळेत गोष्ट संपवून, 'सार' काढता येतील अशी नाटकं आवडतात. आणि दुसरं म्हणजे एखादा पठडीबाहेरचा कठीण विषय, त्यातील लेखकाचा आशय मोजक्या वेळात प्रेक्षकांपर्यंत पोचवणे ही फार मोठी जबाबदारी असते.
नुकतीच, न्यू जर्सीमधील नाट्यदर्पण ह्या वार्षिक एकांकिका महोत्सवात कॅलिफोर्नियाच्या 'अभिव्यक्ती' ह्या संस्थेने सादर केलेली महेश एलकुंचवारांची 'प्रतिबिंब' ही दीर्घांकिका पाहण्याची संधी मिळाली. एलकुंचवारांचं लिखाण मला अतिशय आवडतं. प्रतिबिंब समजायला सोपी नाही, पण विचार करायला लावणारी आहे. त्यामुळे, ही पोस्ट आहे ती "मला समजलेले ‘प्रतिबिंब'" ह्याबद्दल. माझा माझ्याशीच ह्या नाटकाचा पडताळा घेण्याचा एक प्रयत्न. हा अन्वयार्थ बरोबर असण्याचा माझा मुळीच दावा नाही. शेवटी, बऱ्याचदा कलाकृतींच्या आस्वादामध्ये चूक / बरोबर हा मुद्दा गैरलागू सुद्धा असू शकतो.
एलकुंचवारांच्या बऱ्याच साहित्याप्रमाणे 'प्रतिबिंब' सुद्धा फार चिंतनात्मक आहे. ह्या नाटकामध्ये प्रमुख पात्र ठोकळे ह्याचे प्रतिबिंब नाहीसे झाले आहे. आता प्रतिबिंब म्हणजे नक्की काय? प्रतिबिंब काही फक्त आरशातच दिसते असे नाही, ते व्यक्तीच्या मनातही असू शकते. आपल्यापैकी प्रत्येकजण दुसऱ्यांच्या मनात एक प्रतिबिंब उमटवत असतो – सहसा आपण त्याला प्रतिमा असा वेगळा शब्द वापरतो. आरशामधील प्रतिबिंब सर्वात जास्त प्रामाणिक, 'खरं' असं आपण मानतो; पण ते केवळ शरीराचं प्रतिबिंब असतं. 'प्रतिमा' निर्माण होण्यामध्ये दुसऱ्या माणसाचाही सहभाग असल्यामुळे ती १००% अचूक असेल ह्याची खात्री नसते. माणसाच्या बोलण्यामधून त्याचे विचार प्रगट होऊन एक प्रतिमा निर्माण करतात. तो आवाजही नाहीसा झाला तर? एखाद्याचं मनच रिकामं असेल, त्याला कशाचीच ओढ नसेल, सगळ्या सुंदर रंगीबेरंगी अनुभवांची फक्त 'मेलेली फुलपाखरं टोचून ठेवलेली' असतील त्याच्या मनात... तर काय अर्थ आहे त्या मनाला... त्या जगण्याला? अशी दोन मनं सुध्दा एकत्र येऊनही काय उपयोग?
माणसाचे अस्तित्व, मन, एलियनेशन अशा बऱ्याच विषयांवर ह्या नाटकामध्ये भाष्य आहे. एक परीने ठोकळे ह्या माणसाची स्वतःचा शोध घेण्याची ही धडपड म्हणता येईल. ह्या धडपडीत तो प्रेक्षकांनाही ओढून घेऊन जातो. ह्या प्रकारचा आशय नाटकाच्या फॉरमॅटमध्ये बसवणे हे एक एलकुंचवारच करू जाणोत. कदाचित त्या विषयाचा 'हेवीनेस' जाणवून, त्यांनी ह्यातील घरमालकिणीचे पात्र हलक्याफुलक्या विनोदी ढंगात चितारले असावे. एका परीने ती अस्तित्व, त्याचा अर्थ वगैरे गंभीर विषयांकडे 'भंकस! काय फालतुगिरी?' म्हणून बघणाऱ्या सर्वसामान्य माणसाचे प्रतिनिधीत्वही करत असेल. ती ठोकळेची टिंगल करत नाहीय; ती फक्त सामान्य माणसाप्रमाणे हे सखोल विचारांचे खड्डे टाळून, त्यावरून टपाटप उड्या मारत, जमिनीला वरवर स्पर्श करत पुढे निघून जाते आहे. मला वाचक किंवा प्रेक्षक म्हणून, अशा पात्राची नाटकाच्या वजनाचा तोल राखण्यासाठीची आवश्यकता आणि उपयुक्तता समजू शकते, आणि तरी कधीकधी ते फोकस घालवेल का, बरेच प्रेक्षक ह्या सगळ्याकडेच कॉमेडी म्हणून बघून आशय सोडून देतील का अशी भीती वाटते. तेव्हा, नाटक म्हणून 'प्रतिबिंब' मला तरी सर्वार्थाने एक धाडसी प्रयोग वाटला!
अभिव्यक्तीने ही दीर्घांकिका फार प्रामाणिकपणे आणि समर्थपणे सादर केली. 'एकांकिका' महोत्सवाच्या कालमर्यादेमध्ये बसवण्यासाठी दिग्दर्शक अनु महाबळ ह्यांना मूळ संहिता बरीच संक्षिप्त करावी लागली. त्यांच्या एडिटींग ला सलाम! कुठेही जखमा दिसणार नाहीत अशा सफाईने शस्त्रक्रिया करून त्यांनी आशयाला धक्का लागू न देता अनावश्यक तो भाग काढून टाकला. तीनही (दिप्ती गोखले-मेंगडे ह्यांनी साकारलेली, ठोकळेच्या ऑफिसातील 'केरसुणी' ही त्याला भेटायला आलेली तिसरी लहानशी, पण महत्वाची व्यक्तिरेखा!) कलाकारांच्या अतिशय सुजाण अभिनयाने हा क्लिष्ट आशय प्रेक्षकांपर्यंत पोचवायला मदत झाली. घरमालकिणीच्या भूमिकेमध्ये सुप्रिया जोशींच्या अभिनयाची छाप नक्कीच दीर्घकाळ मनात राहील. विनोदी पात्रे प्रेक्षकांना नेहमीच जास्त जवळची वाटतात; आणि इथे जोशींनी थोड्याशा एक्झॅजरेटेड फार्सिकल ढंगाने, त्यांच्या प्रत्येक वाक्यातून अपेक्षित तो हशा मिळवलाच, आणि योग्य परिणामही साधला. अजय दांडेकरांनी ठोकळे च्या मध्यवर्ती भूमिकेतील गोंधळलेला आत्ममग्न माणूस अचूक रंगवला. मिनिमल नेपथ्य आणि दार–खिडक्यांचा वापरही आशयाला पूरक!
एक वेगळा नाट्यानुभव सादर केल्याबद्दल 'अभिव्यक्ती' चे मनःपूर्वक अभिनंदन; आणि ह्या प्रकारच्या, वेगळ्या, आशयघन कलाकृती पाहण्याची संधी दिल्याबद्दल नाट्यदर्पणचे आभार!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...