दक्षिणायन


पर्यटकांच्या चर्चांमध्ये सहसा 'A' लिस्टमध्ये नसलेल्या दक्षिण अमेरिकेबद्दल मला मात्र नेहमीच फार कुतूहल होतं. पॅटागोनिया, बुएनोस आयरेस, रिओ डी जेनेरो, कोपाकबाना अशी नावं कित्येक वर्षे कानावर पडत आलेली आणि अद्भुतरम्य वाटणारी. पण एरवी ह्या स्थळांबद्दल किंवा ह्या देशांबद्दल फारशी काही माहिती नव्हती. अमेरिकेत रहात असल्यापासून चीले आणि अर्जेन्टिना हे दोन प्रचंड लांबीचे, अँडीज पर्वतरांगेने विभागलेले, किनारपट्टीचे देश आहेत एवढं ठाऊक झालं होतं. ते दक्षिण गोलार्धात असल्यामुळे, सध्या नोव्हेंबर-डिसेंबर काळात तिथे वसंत ऋतू असल्याचा फायदा घेऊन नुकतीच एक पंधरा दिवसाची चीले - अर्जेन्टिना आणि ब्राझील ह्या तीन देशातील काही जास्त प्रसिद्ध स्थळांची टूर केली. त्या प्रवासातील, पाहिलेली आणि मनात राहिलेली, ही काही क्षणचित्रं!

टूरची सुरुवात आम्ही चीलेमधील सान्तियागो ह्या राजधानीच्या शहरापासून केली. आमच्याकडून तिथे पोचायला, विमानाने जेव्हा एकूण दहा तास लागले, तेव्हा कुठे ह्या भागातल्या प्रचंड अंतरांचा अंदाज आला - तुलनेने बघायचं तर, न्यू यॉर्क लंडन फ्लाईटला सुद्धा फक्त साताठ तासच लागतात! सान्तियागोला पोचल्यापासून, रिओ हून परत निघेपर्यंत जागोजागी कायम जाणवत राहिला तो ह्या देशांमधला कट्टर कॅथॉलिक ख्रिश्चन प्रभाव. ठिकठिकाणी दिसणारे चर्चचे लहानमोठे सुळके म्हणा, चीलेमधील सॅन क्रिस्टोबल टेकडीवरचा व्हर्जिन मेरीचा पुतळा म्हणा, मोठाली कॅथेड्रल्स म्हणा, का रिओ डी जेनेरो चा जगप्रसिद्ध 'ख्राईस्ट द रीडिमर' पुतळा म्हणा; ह्या धार्मिक प्रभावाची जाणीव कायमच असते. सुरुवातीला ती नजरेत भरते, आणि लवकरच आसमंताचा एक गृहीत भाग होऊन जाते. एक ब्राझील तेवढं सोडून, दक्षिण अमेरिकेत इतरत्र सगळीकडे स्पॅनिश वर्चस्व आहे; ब्राझीलमध्ये मात्र पोर्तुगीजांचं. नवीन प्रदेश शोधण्याच्या, वसाहतींचा विस्तार करण्याच्या मागोमाग धर्मप्रसाराचीही प्रेरणा ह्या दर्यावर्दी जमातीमध्ये होती. एक क्षण कल्पना करा, सुमारे आठशे वर्षांपूर्वी, गुगल मॅप्स आणि व्हाट्सऍप सोडाच, पण साधे कागदी नकाशे सुद्धा नव्हते; जेव्हा अथांग सागरामध्ये नौका घातल्यावर पुन्हा जमीन दिसेल का, कधी आणि कशी हे अज्ञात असे; जेव्हा एक ध्रुवतारा आणि इतर काही ओळखीची नक्षत्रे ह्यापलीकडे मार्गदर्शक साधने अस्तित्वातच नव्हती; आपल्याला नक्की कुठे जायचंय, तिथे काय प्रकारचे लोक, काय प्रकारच्या अडचणी आणि हालअपेष्टा सहन करायला लागतील, भाषेचं कसं जमणार, काहीही कल्पना नसण्याच्या काळात, केवळ स्वतःच्या मनगटावर भरवसा ठेऊन महिन्यामहिन्यांच्या सामुद्री सफरींवर जाणाऱ्या धाडसी लोकांचं मनापासून कौतुक वाटतं. कुसुमाग्रजांचं कोलंबसाचं गर्वगीत वारंवार मनात येत होतं - 'किनारा तुला पामराला' - हेच ह्या धाडसी संशोधकांचं ब्रीदवाक्य. मला कुठच्याच धर्माचं खास प्रेम नाही. पण अशा नव्याने सापडलेल्या प्रदेशातील अजाण बालकांना येशूचं तत्वज्ञान समजून देऊन त्यांचा उद्धार करायलाच हवा हा ध्यास, ही प्रेरणा, चांगलं राहतं घर (किंवा मठी!) सोडून अज्ञातात आणि धोक्यात पाऊल टाकणाऱ्या ख्रिश्चन धर्मोपदेशकांचे ठायी कशी निर्माण होत असेल ह्याचं कुतूहल मात्र नक्की वाटतं.


La Moneda - General Secretariat of the Government, Santiago, Chile

View from Gran Torre Costanera - tallest building in South America, Santiago, Chile

Virgin Mary on San Cristobal Hill, Chile

चीले आणि अर्जेंटिना दोन्ही देशात बरीच साम्ये आढळतात. भाषा, धर्म, खाणंपिणं, भौगोलिक रचना (पॅटागोनिया भाग दोन्ही देशात असल्यामुळे दर वेळी चीलेअन का अर्जेन्टिन पॅटागोनिया हे स्पष्ट करावं लागतं!), हवामान, सगळंसगळं खूप सारखं आहे. दोन्ही तर स्पॅनिश वसाहतीच होत्या. त्यामुळे मला साहजिकच कुतूहल होतं की ह्यांचे दोन (खरं तर बोलिव्हिया, उरुग्वे, पॅराग्वे सगळेच) वेगळे देश कसे काय झाले. गाईडकडे त्याचं फारसं समाधानकारक उत्तर नव्हतं; थोडक्यात म्हणे हे सगळे देश मूलनिवासी इंडियन जमातींनुसार निर्माण झाले. तसे चीलेअन आणि अर्जेन्टिन स्पॅनिश आपसात आणि मूळ स्पॅनिश भाषेपासून थोडेफार फटकून आहेत (मी गेले काही आठवडे डुओलिंगो ऍपवरून स्पॅनिश शिकायचा प्रयत्न करतो आहे, म्हणून एवढं तरी समजलं!). तिन्ही देशात एकंदरीत इंग्लिशला कोणीही विचारत नाही. मोठ्या शहरात सुद्धा आम जनतेशी संवाद फक्त खाणाखुणा आणि मूकाभिनयातूनच! इंग्लिश न येण्याची लाज वाटणारा भारत एकच देश असावा. अर्जेन्टिनामध्ये कालांतराने, दुसऱ्या महायुद्धानंतर, इटालियन आणि जर्मन स्थलांतरित जनताही बरीच येऊन राहिली; चीलेमध्ये मात्र बहुतांश जनता स्पॅनिश (आणि मिश्र) च .

दोन्ही एकेकाळचे समृद्ध देश! सुमारे शंभर वर्षांपूर्वी अर्जेंटिना जगात सातव्या क्रमांकाचा (कॅनडा आणि इटली सारख्या देशांच्याही पुढे!) श्रीमंत देश होता. तिथल्या चांदीच्या खाणी (अर्जेंटिना नांव तेथील चांदीच्या दंतकथांवरून पडलेलं आहे), आणि इतर गहू, मांस, फळे अशा शेतकीप्रधान निर्यातीच्या जोरावर! तांब्याच्या खाणी आणि भाजीपाला-फळफळावळ ह्यामुळे चीले सुद्धा बराच समृद्ध होता. आमची टूर मॅनेजर अर्जेन्टीन होती; तिच्या बोलण्यात, सभोवतालच्या जुन्या बिल्डिंग्स दाखवताना वारंवार 'एकेकाळी आम्ही श्रीमंत होतो तेव्हा... ' असे उल्लेख येत. दुर्दैवाने एकतर दोन्ही देश शेती आणि खनिज प्रधानच राहिले; आणि दुसरं म्हणजे भ्रष्टाचार, हुकूमशाह्या आणि लष्करी राजवटी - थोडक्यात राजकीय अस्थिरता - जी संपूर्ण दक्षिण अमेरिकेतच फार मोठ्या प्रमाणावर आढळते, त्यामुळे चीले आणि अर्जेंटिनाच्या प्रगतीलाही मोठे ग्रहण लागले. नजीकच्या इतिहासात, चीलेमध्ये पिनोशे ह्या दहशतवादी हुकूमशहाला अमेरिकेचा पाठिंबा होता. त्याच्या कारकिर्दीत हजारो तरुण 'गायब' होत असत; त्यांचा थांगपत्ता अजून लागलेला नाही. सरकारविरुद्ध चकार शब्द काढण्याची सोय नव्हती. त्याच सुमारास अर्जेन्टिनामध्ये पेरॉनची राजवट होती. पेरॉनने मजूर संघटन, स्त्रियांना मतदानाचा हक्क वगैरे काही समाजवादी सुधारणा केल्या असल्या तरी तीही एका वेगळ्या प्रकारची दडपशाहीच होती. दोघांपैकी चीले आता पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभे राहू पहात आहे. अर्जेंटिना मात्र गेली कित्येक दशके सरकारी उधळपट्टी, कायमची राजकीय अस्थिरता, कर्जबाजारी आणि दिवाळखोरीचे अर्थकारण ह्यामुळे अफाट चलनफुगवट्याच्या चक्रात सापडले आहे. सध्या तिथे १८५% इन्फ्लेशन चालू आहे; २०१९ च्या अखेरपर्यंत ६० पेसोज ना मिळणारा अमेरिकन डॉलर आता १,००० पेसोज पेक्षाही वर गेला आहे. ह्याचा परिपाक म्हणून सामान्य जनता त्रस्त होऊन जो जास्त गोडबोल्या राजकारणी भेटेल त्याच्या गळ्यात नेतृत्वाची माळ घालते आहे. ह्याच महिन्यात सत्तेवर आलेल्या मिले ह्या अर्जेन्टीन अध्यक्षांच्या टोकाच्या वक्तव्यांची तुलना फक्त ब्राझीलचे बोल्सनरो किंवा अमेरिकेचे ट्रम्प ह्यांच्याच बरोबर करता येईल.

असो. सान्तियागो, आणि विशेषतः बुएनोस आयरेस मध्ये फिरताना जागोजागी ह्या जुन्या समृद्धीच्या, फ्रेंच आणि स्पॅनिश भव्य आणि कलाकुसरीच्या (ऑर्नेट) आर्किटेक्चरच्या खुणा नजरेस पडत होत्या. दोन्ही शहरांना अभिमान वाटावा असे प्रशस्त, रुंद बुलेव्हार्डस आणि विस्तीर्ण चौक आहेत. ठिकठिकाणी सुंदर पुतळे आणि स्मारके उभारलेली आहेत. सुदैवाने अजूनपर्यंत ह्या जुन्या वास्तुसमृद्धीची पडझड झाली नाहीय; पण त्यांची एकंदर आबाळ आणि मध्येमध्ये उभ्या केलेल्या सामान्य किंवा अती मॉडर्न बिल्डिंगी - पुलंच्या भाषेत, नऊवारीतल्या आजीबाईने सिगारेटच्या पाकिटातल्या चांदीचे डूल कानात घातल्यासारख्या - डोळ्याला खटकतात! डोळ्यात भरणारी एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे दोन्ही (आणि रिओ सुद्धा!) शहरांमध्ये सर्वत्र दिसणारी, हेतुपरस्सर लावलेली असंख्य झाडं! शहरांमध्ये एवढे मोठाले हिरवेगार ठिपके बघायला फार बरं वाटतं. बुएनोस आयरेस आणि रिओ दोन्ही शहरातील प्रमुख कॅथेड्रल्स मला खूप लक्षवेधक वाटली - मुख्य कारण म्हणजे ती दोन्ही पारंपरिक कॅथेड्रलच्या रचनेपेक्षा पारच वेगळी आहेत. रिओ चं कॅथेड्रल बाहेरून तरी धक्कादायकरीत्या मॉडर्न दिसतं, तर बुएनोस आयरेसचं जास्त ग्रीक पार्थेनॉन सारखं स्तंभांवर आधारित; दोन्हींमध्ये पारंपरिक घुमट आणि शिखरावरचा क्रूस दिसत नाही. आतमधून मात्र दोन्ही नेहमीप्रमाणे क्रॉस च्या धर्तीवर उभारलेली, स्टेन्ड ग्लासच्या खिडक्यांची / स्कायलाईट्सची असल्याचं जाणवतं. वीस-पंचवीस हजार उपस्थितांची क्षमता असूनही, दोन्हींचं अकुस्टीक्स अप्रतिम सुंदर; पाद्रीबाबांचं प्रवचन आणि ऑर्गन अगदी सुस्पष्ट शेवटच्या रांगेपर्यंत ऐकू येत होता.


Buenos Aires, old architecture


Old architecture and the Obelisk, Buenos Aires, Argentina


Metropolitan Cathedral, Buenos Aires


Inside the Metro Cathedral, Buenos Aires


Jacaranda trees in bloom in the city, Buenos Aires


Casa Rosada, Government Palace, Buenos Aires


Obelisk in Plaza de la República, Buenos Aires, Argentina

सान्तियागो आणि बुएनोस आयरेस, दोन्ही शहरात थोडे 'फंकी', 'बोहेमिअन' वगैरे म्हणता येतील असे, थोडे न्यू यॉर्क शहराच्या सोहो भागासारखे, पण जास्त भडक ग्राफिटी (भित्तिचित्रं) रंगवलेले, मॉडर्न आर्टिस्ट्सचे भागही पहायला मिळाले. ह्या भागात, माझ्या पूर्वीच्या 'सडकछाप कलाकार' पोस्टमध्ये भर घालायला आणखी एक कलाविष्कार सापडला - टूरीस्टबरोबर सुप्रसिद्ध अर्जेंटीनीयन 'टँगो' नृत्याच्या पोजेस देणारे स्त्री-पुरुष कलाकार! तिन्ही शहरांमध्ये स्लम्सही बऱ्यापैकी आढळल्या; पण बाहेरून दिसायला तरी मुंबईच्या झोपडपट्टीपेक्षा बऱ्याच बऱ्या दिसत होत्या. तिथे फोटो काढायला बंदी आहे.


La Boca neighborhood, Buenos Aires


Posing for Tango, La Boca


La Boca neighborhood

पॅटागोनिया हा भाग साधारणपणे, चीले आणि अर्जेंटिनाच्या मध्यावर सुरु होऊन खाली दक्षिणेला पार अंटार्क्टिका पर्यंत जातो. अँडीज पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला हा भाग दळणवळणाच्या दृष्टीने थोडा दुष्कर आहे. कित्येक भागात तर विमानाने, किंवा बोटी, कॅटामरॅन अशा वाहनानीच प्रवास करावा लागतो. दोन्ही देशांची बहुसंख्य लोकवस्ती सान्तियागो आणि बुएनोस आयरेस सारख्या मोजक्याच मोठ्या शहरात राहते; त्यामुळे उर्वरित खेडवळ भागात प्रवासाच्या सोयी कमी असाव्यात. बर्फाच्छादित ज्वालामुखी डोंगर, अँडीज पर्वतरांग आणि स्फटिकासारखे नितळ निळेशार नैसर्गिक तलाव हे पॅटागोनियाचं वैशिष्ट्य! उगाच नाही त्याला 'चीलेचं (किंवा अर्जेन्टिनाचं) स्वित्झर्लंड' म्हणत. आम्हाला ह्या प्रदेशातून चीलेमधून अर्जेन्टिनामध्ये पोचायला एक सबंध दिवस तीनचार वेळा बोटी आणि बसेस बदलून प्रवासात घालवावा लागला (किंवा घालवायला मिळाला!).


Llamas in Chilean Patagonia


Osorno and Calbuco Volcanos, Patagonia


Lake district, Patagonia


Osorno Volcano, Patagonia


Downtown Bariloche, Patagonia, Argentina

पॅटागोनियाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या वायनरीज. अर्जेंटिनाची मालबेक द्राक्षं वाईन रसिकांमध्ये प्रसिद्ध आहेतच. वीसेक वर्षांपूर्वी ह्या द्राक्षांनी मर्लो आणि कॅबर्ने ह्या दोन लोकप्रिय रक्तवारूणींच्या मध्ये घुसून आपली हक्काची ओळख प्रस्थापित केली. आम्ही चीलेअन पॅटागोनिया मध्ये उन्दूरागा वाईनरीला भेट दिली. तिथे कॅबर्ने च्या जोडीने, कार्मेनेअर ही द्राक्षांची म्हटलं तर नवीनच जात जास्त प्रसिद्ध आहे. मर्लो एवढी फ्रुटी नाही आणि कॅबर्नेएवढी ड्राय (आंबट/तुरट) नाही, अशा वेगळ्याच जातीची ही जांभळी द्राक्षं एकेकाळी फ्रान्समधल्या बोर्डो भागात वाढत असत; पण आता ही फक्त चीलेमध्येच मिळतात. साहजिकच एक बाटली खरेदी आलीच! दोन्ही देशात, प्रत्येक जेवणात वाईन गृहीतच धरलेली असे; आणि यजमानांचा अपमान करायचा नाही म्हणून मी तिचा आदराने स्वीकार करत गेलो. चीलेचं राष्ट्रीय पेय 'पिस्को सावर' मात्र मला खास नाही आवडलं. द्राक्षांच्या ब्रॅन्डीपासून बनवलेलं हे पेय व्हिस्की सावर आणि मेक्सिकन मार्गारिटा ह्यांच्या मधलं धेडगुजरी पेय वाटलं. यजमानांच्या आग्रहाला बळी पडून तिथे दोन-चार वेळा प्यायलं; पण घरी आणण्याच्या योग्यतेचं नाही वाटलं. अशीच आणखी एक भ्रष्ट नक्कल वाटली ती ब्राझीलचं 'कायपिरीन्या' हे त्यांच्या 'कश्शासा' ह्या रम सारख्या (उसाच्या) दारूपासून बनवलेलं कॉकटेल. पण तिथे मात्र माझ्या मते त्या बारटेंडरला कायपीरिन्या करायला जमली नव्हती; म्हणून मी कश्शासाची एक बाटली घेऊन आलो आहे. मला करायला जमली, की त्या बारटेंडरला चार डोस (उपदेशाचे) पाजायचा बेत आहे.


Undurraga Winery, Chile

खाण्याबद्दल बोलायचं तर, तिन्ही देश प्रचंड बहुसंख्येने मांस - उतरत्या क्रमाने बीफ, मासे, पोर्क आणि मग थोडंफार लॅम्ब, चिकन वगैरे - खाणारे. शुद्ध शाकाहारी लोकांना इथे फिरणं थोडं अवघड जाऊ शकेल. काही ठिकाणी सॅलड, विशेषतः फळं, भरपूर मिळाली; पण एकंदरीत पिझ्झा एके पिझ्झा खाऊन रहायची तयारी ठेवणं बरं, विशेषतः अंतर्भागात! चीलेअन बास मासा अतिशय प्रसिद्ध आहे. तो, आणि साल्मन हे दोन्ही मासे मी मनसोक्त खाल्ले. व्हाईट साल्मन ही नवीनच व्हरायटी पाहिली! आणि अर्जेन्टिन बीफ जगप्रसिद्ध असल्यामुळे, तिथला स्टेक खाऊन पाहणं अर्थातच मस्ट! तो त्यांच्या बीफच्या स्तुतीला पूर्णपणे पात्र ठरला. ब्राझीलमधील शेवटच्या दिवशीचं फेअरवेल डिनर त्यांच्या खास 'चुरास्कारी' पद्धतीचं होतं. ह्यामध्ये बऱ्यापैकी मोठा, अनेक भाज्या, सुशी, कोल्ड कट्स वगैरे असलेला, ओपन सॅलड बार असतो. आणि नंतर वेगवेगळ्या प्रकारचं रोस्टेड, ग्रिल्ड, किंवा बार्बेक्यू मांस घेऊन वेटर्स टेबलटेबलावरून फिरत असतात (थोडासा चिनी डिमसम सारखा प्रकार!). आपल्याला हवं तर, आणि हवं तेवढं, ते कापून देतात. सोबतीला वारुणी नाहीतर कायपिरीन्या असतातच! डेझर्ट्समध्ये अर्जेन्टिन चॉकोलेट्सची खूप स्तुती ऐकली होती; मला, चॉकोलेटवेडा असूनही, ती काही खास वाटली नाहीत. त्यापेक्षा त्यांचं फ्लान, आणि लेचे (कंडेन्स्ड दुधापासून बनवलेलं) क्रीम वापरून केलेले पदार्थ मला जास्त आवडले.


Argentinian Steak - Buenos Aires


White Salmon - Rio de Janeiro

ब्राझील, अर्जेंटिना आणि पॅराग्वे ह्यांच्या हद्दीवर असलेल्या इग्वाझू नदीवरचे इग्वाझू धबधबे जगप्रसिद्ध आहेत. सुमारे २७५ लहानमोठे धबधबे २-२.५ किमी अंतरामध्ये कोसळत असतात. दाट झाडीमुळे सगळे एकत्र कधीच दिसत नाहीत. अर्जेंटिनाच्या बाजूने त्यातले ८०% जवळून फिरत बघता येतात; पण त्यांचा एकत्रित थक्क करणारा आविष्कार ब्राझीलच्या बाजूने बघता येतो. ब्राझीलच्या बाजूने त्यातील सर्वात मोठा धबधबा सर्वात जवळूनही बघता येतो. इग्वाझू पाहणं हा अनुभव प्रत्यक्षच घ्यायला हवा; कुठल्याच फोटो किंवा फिल्ममध्ये तो परिणाम साधणं अशक्य! कोणाला इंटरेस्ट असल्यास, द मिशन ह्या तीसपस्तीस वर्षांपूर्वीच्या सिनेमात तो बराच सुंदररित्या दाखवला आहे.


Iguazu Falls - AR side


Iguassu Falls - BR side


Iguassu Falls - BR side

रिओ मध्ये कोपाकबाना बीच आणि ख्राईस्ट द रीडीमर ही दोन मोठी आकर्षणं! आमचं हॉटेल बीचवरच होतं, त्यामुळे तिथे बरंच फिरून घेतलं. हा बीच एकेकाळच्या, मी फक्त जुन्या फोटोमध्येच पाहिलेल्या, मुंबईच्या क्वीन्स नेकलेसची आठवण करून देतो; फक्त इथे प्रत्यक्ष वाळू खूपच विस्तीर्ण पसरलेली होती. ख्राईस्टचा पुतळा एका २३०० फूट उंच टेकडीवर आहे, बऱ्याचदा ही टेकडी आणि पुतळा दोन्ही धुक्यात गुरफटलेले असतात. आमच्या सुदैवाने धुकं सारखं येत जात होतं, त्यामुळे बऱ्यापैकी दर्शन घडलं. ३० मीटर उंच, आणि ३० मीटर पसरलेल्या हातांचा आवाका असलेला हा भव्य काँक्रीटचा पुतळा भारदस्त खराच! मला फक्त पुलंच्या 'धर्मोपदेशक फुटपट्टीने जग जिंकतात' अशा अर्थाच्या वाक्याची आठवण झाली.


Copacabana Beach from our room


Rio de Janeiro Cathedral - Outside


Rio de Janeiro Cathedral - Inside


Rio de Janeiro - View from Sugarloaf mountain


Christ the Redeemer - Rio de Janeiro


Copacabana Beach at night

बऱ्याच खिश्चन देशांमध्ये ईस्टरच्या चाळीस दिवस आधी मार्डी ग्रा (शब्दश: फॅट ट्यूसडे!) साजरा करण्याची पद्धत आहे. रिओ मधील मार्डी ग्रा (कार्निव्हाल) परेड जगप्रसिद्ध आहे. टीव्हीवरील बातम्यांमध्ये ही परेड नेहमीच फार उथळ, भडक आणि अनाचाराचे प्रदर्शन करणारी भासते. आमच्या भेटीमध्ये ह्या परेडमध्ये भाग घेणाऱ्या एका पथकाची बॅकस्टेज तयारी पहायला मिळाली, आणि ह्या परेडचा एक वेगळाच पैलू समोर आला. कार्निव्हालच्या दुसऱ्याच दिवशी पुढील वर्षाच्या परेडची तयारी सुरु होते. असंख्य शाळा त्यात भाग घेण्यासाठी झटत असतात, त्या परेडमध्ये सामील होता येणे हा मोठा बहुमान असतो. भाग घेणारे प्रत्येक पथक मूलतः एक हालते संगीत-नृत्य-नाट्य प्रेक्षकांसमोर सादर करत असते. त्या कथेची संकल्पना, गाण्यांचे बोल, संगीत (बहुतेक वेळा सांबा पद्धतीनेच), कॉस्च्युम्स, कोरिओग्राफी हे सगळं त्या त्या पथकाने ठरवायचं असतं. निवड करण्यासाठी एक परीक्षक समिती असते, आणि ती जास्तीत जास्त कल्पक सादरीकरणाला प्रोत्साहन देते. शेवटी सर्वोत्कृष्ट सादरीकरणाला बक्षिसेही मिळतात. आम्हाला गंमत म्हणून त्यातले काही कॉस्च्युम्स घालून पाहायची संधी मिळाली. ते प्रचंड कलाकुसरीचे, दागिन्यांनी मढवलेले कॉस्च्युम्स, आणि डोक्यावर अवजड मुकुट किंवा हेडगिअर घालून दहा मिनिटं काढणं आम्हाला कठीण झालं होतं. रिओच्या मार्चमधील ४०-४५ सेंटीग्रेड तापमानामध्ये ते लोक असले कॉस्च्युम्स घालून तासंतास नाचत कसे असतील हे आमच्या कल्पनेच्याही बाहेर होतं. तेव्हा, बघ्यांच्या गर्दीमध्ये वेडेविद्रे चाळे करणारे, पिऊन लास झालेले अनेक आचरट असतीलही; पण त्यांच्याविषयीच्या तिरस्काराबरोबर फ्लोट्स वर नाचत असलेल्या लोकांविषयी पुढच्या वेळची परेड बघताना नक्कीच सहानुभूती आणि वेगळा दृष्टिकोन असेल!


In the Carnival costumes

दोन आठवड्याच्या टूर नंतर, दक्षिण अमेरिकेबद्दलही मला असंच म्हणावंसं वाटतं - अजून तिथे बरंच काही बघायचं, समजून घ्यायचं राहून गेलंय; पण पुढच्या वेळी परत तिथे जाईन तेव्हा, आतापर्यंतच्या ज्ञानावरून एक सहृदय, आणखी जास्त मोकळा दृष्टिकोन ठेवून जाईन. चीले, अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या बातम्या वाचता-ऐकतांना जास्त रस घेऊन बघेन; कारण आता माझ्या मनात मी ते देश थोडेथोडे बरोबर घेऊन आलेलो आहे.

Comments