आय एस आय; दिल्ली

तब्बल पंचेचाळीस वर्षांनी दिल्ली पुन्हा बघणार होतो, म्हणून अधीर होतो. उत्सुकता होती, कुतूहल होतं. खूप बदलली आहे असं बऱ्याच वेळा ऐकलं होतं. एवढ्या वर्षात ते साहजिकच नाही का! पण त्या बदलातूनही ओळखीच्या काही खुणा शिल्लक आहेत का चाळून पहायचं होतं. अननुभवी विस्फारलेल्या नजरेने प्रथम पाहिलेल्या ह्या अनोळखी शहराच्या, पहिल्या भेटीतच प्रेमात पडलो होतो. अजूनही ते प्रेम पुन्हा जागवू शकेल असं काही आहे; का आता कितीतरी जास्त जग बघितल्यावर, बऱ्याच मोठ्या शहरांना सरावलेल्या नजरेला ते प्रेम केवळ 'त्या अपरिपक्व वयातला वेडपटपणा' वाटेल? प्रथमदर्शनी प्रेमावर द्वितीय दर्शन हा उतारा म्हणतात. त्या प्रेमाची झिंग ह्यावेळी उतरेल, का जास्तच दृढ होईल, माहिती नव्हतं. एवढ्या वर्षात, अनेकदा बेत आखूनही आयत्या वेळी ह्या ना त्या कारणाने ते जमलं नव्हतं; त्यामुळे उत्कंठा जास्तच वाढलेली. अखेर ह्यावेळी ती भेट घडली.

७६ साली मी दिल्ली सर्वप्रथम पाहिली; तिथे दोन वर्षे राहिलो. तोपर्यंत फक्त मुंबईच पाहिली होती; दिल्लीला जाण्यापूर्वीचे, कलकत्त्यात घालवलेले आठदहा दिवस सोडून. म्हणजे, भारतातील दोनच मोठी शहरं थोडीफार पाहिलेली होती. त्यांच्या तुलनेत, दिल्लीतले रस्ते, योजनाबद्ध आखणी, स्वच्छता आणि 'स्कायलाईन' फारच प्रभावी वाटली होती. म्हणजे, बोले तो राजधानीका शहर हो तो ऐसा! मी दक्षिण दिल्लीत, आयआयटी / हौज खासच्या पलीकडे, कदाचित दिल्लीच्या तेव्हाच्या हद्दीवरच रहात होतो. तेव्हा तो भाग अतिशय शांत, संथ, झोपाळू होता. अगदी विस्तीर्ण अशा अरोबिंदो मार्गावरही, एम्सच्या दक्षिणेला, रहदारी खूपच कमी असे. आमच्या शहीद जीतसिंग मार्गावर तर फक्त दोन-चार मोठ्या, म्हणजे चार-सहा मजली, इमारती होत्या. बाकी खेड्यातल्यासारखी, थोड्याशा मिग कालोनींची, आणि निम्नस्तरातील सरायची, एवढीच वस्ती! घराच्या चार भिंतींच्या कोषाबाहेर पडून प्रथमच एकट्याने घालवलेली ती दोन वर्ष. साहजिकच माझ्या आठवणींमध्ये दिल्लीचा, अल्मोस्ट मिथिकल, प्रभाव फार मोठा आहे. जीव जडला होता माझा दिल्लीवर, तिथल्या आठवणींवर.

मग, एवढ्या वर्षांनी पुन्हा ते शहर पाहतांना काय वाटलं?

थोडंसं चार पाच वर्षाच्या लहानग्या मुलीची प्रतिमा डोक्यात ठेऊन, कित्येक वर्षांनी तिच्यासाठी बाहुली विकत घेऊन भेटायला जाणाऱ्या काबुलीवाल्यासारखं वाटलं. जागोजागी, वेळोवेळी, 'किती मोठी झालीस गं बायो!' असं वाटलं. दिल्ली आता अचाट मोठी भासली; जास्त रुंद रस्त्यांच्या, उड्डाणपुलांच्या आणि सिग्नलविरहीत हायवेजच्या संदर्भात; आणखी दसपटींनी वाढलेल्या माणसांच्या आणि शंभर पटींनी वाढलेल्या वाहनांच्या गर्दीच्या संदर्भात; आकर्षक, झगमगीत आणि महागड्या दुकानांच्या संदर्भात; आणि घनदाट, प्रत्येक श्वासातून घशाला स्पर्श करणाऱ्या प्रदूषणाच्या संदर्भातही. जागोजागी दिसणारी, मुद्दाम लावलेली / निगा राखून वाढू दिलेली गर्द झाडी डोळे सुखावत होती; पण पानं हिरवीगार असण्याऐवजी धुळीने माखलेली आणि कोरडी रुक्ष दिसावी ह्याचा खेदही वाटत होता. माझ्या लाडक्या 'ल्युटेन्स डेल्ही' मध्ये फिरतांना पूर्वीही दूरच्या गडगंज श्रीमंत नातेवाइकांच्या घरी गेल्यासारखं वाटे; आता तर ठिकठिकाणी सशस्त्र पहारेकरी, चेकनाके आणि बॅरीकेड्स मध्ये बंद करून टाकलेल्या रस्त्यांमुळे ते नातंही संपल्यासारखं, निदान आणखीच दुरावलेलं भासू लागलं. एकेकाळी सफदरजंग रोड, रेसकोर्स रोड अशा हायफाय रस्त्यांवरून रात्री दीड-दोन वाजता, रस्त्यांवर काळं कुत्रंही नसतांना, कनॉट प्लेसपासून आयएसआय पर्यंतचं पंधराएक किलोमीटरचं अंतर आम्ही तीन मित्र चालत गेलो होतो हे आताच्या अतीसुरक्षादक्ष जमान्यात कल्पनेबाहेरचं वाटू लागलं. त्या काळी भिती आम्हालाही वाटली नव्हती, आणि सरकारलाही!

अर्थात, दिल्ली काही एकटीच बदलली नव्हती; मीही बदललो होतोच की. एकेकाळी पालिका बझारच्या अंडरग्राऊंड मार्केटमध्ये बटर (?) मध्ये नाहून निथळत असलेली चिकन बिर्याणी खाणे हे स्वर्गसुख वाटत असे. आता तिथे आत पाऊल टाकल्याक्षणापासून गर्दी, घाण आणि दुर्गंधीने केलेले आक्रमण असह्य होऊन कधी एकदा तिथून बाहेर पडतो असं झालं होतं; तिथे खाण्याचा प्रश्नच नव्हता. तशी, खाण्याची दुकानंही एखाददोनच उरलेली दिसली आतमध्ये. सगळं फक्त जास्त वाईटच झालंय असं काही नाही. कुतुब मिनार किंवा हुमायून कबर ह्या ठिकाणची स्वच्छता, जास्त चांगली निगा, जास्त झाडी आणि टापटीप हे सगळे ह्यावेळी सुखद आश्चर्याचे धक्के होते.

दिल्लीच्या प्रेक्षणीय स्थळांचं कौतुक होतंच; पण मन खरंखुरं अत्युत्सुक होतं, ते आय एस आय पुन्हा बघण्यासाठी!

अरोबिंदो मार्गावरून गाडीने एम्स पार केल्यापासून मी सरसावून बसलो होतो. शोधत होतो, रस्ते, भाग, दुकानं... काहीतरी आठवणी जागवणारं दिसतंय का. पण ग्रीन पार्क, हौज खास, आय आय टी... सगळंच फार बदललं होतं. आय आय टी कडे वरून जाणारा ओव्हरपास बघून चकित झालो होतो. शहीद जीत सिंग मार्ग ला गाडी लागल्यावर मी लहान मुलाच्या उत्कंठेने खिडकीतून बाहेर बघत होतो; ओळखीच्या खुणा शोधत होतो. त्या काळचा अतिशय धुळकट, जेमतेम एका लेनचा, हा रस्ता आता छान मोठा, डांबरी, दोन-दोन लेन्सचा झाला आहे. ज्या सुनसान रस्त्यावर फक्त आमची इन्स्टिट्यूट आणि इतर एखाद दोन मोठ्या बिल्डींग्स होत्या, त्यावर आता असंख्य नवीन इमारती, दुकानं, गाड्या सगळ्याची गर्दी होती. तेव्हा पार दुरूनही नजरेत भरणारी, शेजारीच असलेली, कुतुब हॉटेलची 'उंच' बिल्डिंग आता प्रत्यक्ष बाजूने जातांना सुद्धा डोळ्यांना जाणवलीच नाही. अचानक ड्रायव्हरच म्हणाला 'सर, ये तो नही वो जगह, जो आप ढूंढ रहे हो?'. त्याने पाटी वाचली होती. माझ्या आठवणींच्या जगामध्ये अशी पाटी, असं शानदार गेट आणि गार्डची चौकी अस्तित्वातच नव्हते. आठवणीतली एक छोटीशी मुलगी एवढा लफ्फेबाज शालू नेसून असा डोक्यावर पदर घेऊन आल्यावर मी ओळखणं कठीणच होतं. ड्रायव्हरला गाडी पार्क करायला सांगून मी घाईघाईने उतरलो.


आजच्या ह्या नवीन युगात मला गेटवरच्या सिक्युरिटी गार्डने अडवलं. कोणाला भेटायचंय विचारल्यावर मी गडबडलो. नाही... तसं कोणालाच नाही... कारण ओळखीचे कोणी, म्हणजे माणसं तरी, आता नसणारच इथे. मला भेटायचंय ते फक्त इथल्या क्लास रुम्सना, होस्टेलला, दोन वर्षातल्या माझ्या दोन जुन्या खोल्यांना, कँटीनला. पण त्यातलं कोणी तुम्हाला, फोनवर, माझी ओळख पटवून नाही देऊ शकणार. कसबसं त्याला समजावून सांगितलं, मी इथे कित्येक वर्षांपूर्वी शिकत होतो आणि नुसती एक चक्कर मारणार आहे. तिथे चालू असलेल्या, मोठमोठ्या गणितींच्या एका इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये कोणाला त्रास देणार नाही, का त्यांचे फोटो काढणार नाही. इथल्या कोणालाच माझ्यापासून काहीही धोका नाही वगैरे बऱ्याच वचनांनंतर त्याने माझा नावपत्ता लिहून घेऊन एकदाचं मला आत सोडलं.

आत पाऊल टाकल्यावर जणू जादूची कांडी फिरली, आणि एवढ्या वर्षांपूर्वीच्या, ह्या ठिकाणी प्रथमच पाऊल टाकत असल्याच्या आठवणींनी घेरून टाकलं. कौतुक आणि आदर तेव्हाही होता, आताही होता. तेव्हा त्यांच्या जोडीला एक मोठं दडपण होतं. मुंबईच्या लहानशा कॉलेजातून एवढ्या मोठ्या जगप्रसिद्ध संस्थेमध्ये प्रवेश तर मिळाला, पुढे काय होणार? मुंबईच्या बाहेर, घरापासून दूर जाणं एवढं महत्वाचं, शहाणपणाचं आहे का? एवढ्या भारदस्त संस्थेशी आपण आता जोडले जाणार आहोत, पास होऊन डिग्री मिळवून तरी बाहेर पडणं जमायला हवं! हे तेव्हाचं दडपण आता नव्हतं. आता जे काही व्हायचं ते झालेलं होतं; मिळालं ते आपलं, आणि निसटलं ते गेलं एवढी शांत स्थिर वृत्ती होती. त्या वेळी आत शिरणारा तो एक नवथर तरुण आयुष्याची दिशा शोधत चाचपडत होता; ह्यावेळी, पायाखालून बरीच वाट तुडवलेला एक प्रौढ माणूस कोणाच्या अप्रूव्हल किंवा ऍक्सेप्टन्स ची धडधडत्या अंतःकरणाने वाट बघत नव्हता. आता कौतुक आणि आदर ह्यांच्या जोडीला फक्त एक नॉस्टॅल्जीक प्रेम, आणि तिथल्या अनुभवांबद्दल कृतज्ञता होती. ह्या विचाराने थोडा शांत होऊन मग मी स्वतःशीच हसत, जुना आल्बम चाळावा, तसा त्या कॅम्पसमधली दृश्य बघत, वेळोवेळी आठवणी चाळवत, फिरू लागलो. ह्यावेळी सर्वप्रथम नजरेत भरली ती कॅम्पसवरची मोठाली झाडं, आणि सुरेख मेन्टेन केलेलं लॉन! जी लहानशी रोपं त्यावेळी सहज नजरेआड झाली असावी, त्यांचेच हे वृक्ष झाले असणार. पंचेचाळीस वर्षात आकारमान काय माझं एकट्याचंच वाढलं नव्हतं, ही झाडंही खूप गरगरीत मोठी झाली होती. प्रकर्षाने जाणवलं, ते माझ्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीबाहेरचं, आता एवढं मोठं झालेलं, समोरील कँटीनला झाकून टाकणारं, झाड. त्याचं रोपटं तिथे होतं हेही आठवत नव्हतं मला.






जुन्या सवयीने शेजारी नायकच्या दारावर टकटक केलं; नंतर मग दाराचं कुलूप डोळ्याला दिसलं, नायकही आत असणारच नव्हता! आता पूर्वीसारखं खोलीबाहेरच्या गॅलरीत उभं राहून, संध्याकाळी कँटीनबाहेरील चौथऱ्यावर कोणकोण चहा पीत फिरतंय, गप्पा मारायला कोण आहे, ते दिसणं त्या झाडामुळे शक्य नव्हतं. बहुतांश हॉस्टेल रिकामंच दिसलं; कसली सुटीबिटी असेल कदाचित. एका खोलीबाहेरील फळ्यावर अर्धवट सोडवलेली गणितं बघितली, आणि अजून तीच कोणीतरी कोडी घालण्याची परंपरा चालू आहे हे पाहून कुठेतरी बरं वाटलं. आतल्या आत, आपल्याला आता हे कोडं सोडवणं तर सोडाच, पण प्रश्न समजणंही आवाक्याबाहेर आहे हे मान्य करावं लागलं. पण मग, वाढलेल्या वयाचा फायदा म्हणून आपण ह्या स्पर्धेतून आता बाहेर आहोत ह्या विचाराने हायसं वाटलं.


कँटीनमध्ये चक्कर मारली; रिकामंच होतं. नवी आधुनिक धर्तीची टेबलं-खुर्च्या सोडल्या तर बदललं काहीच नव्हतं. सर्व्हिंग काउंटरवरून आत किचनमध्ये डोकावून बघितलं; कोणीच नव्हतं.


'बहादुर, चाय लाव!' हे तोंडातलं फर्मान ओठाच्या हद्दीवरच अडकलं. दलीप आणि बहादूर ह्या मेसच्या दोन नोकरांच्याबरोबर, त्यांच्याच एका मित्राची सायकल उधार घेऊन पार साऊथ एक्स, ग्रेटर कैलाश किंवा दुसऱ्या दिशेला वसंत विहार पर्यंत जाऊन रात्री नऊ ते बारा पाहिलेले सिनेमे आठवले. त्यांची सायकल, म्हणून सिनेमाची निवडही त्यांची; एरवी 'धर्मा' सारखा सिनेमा माझ्या कुठला नशिबात! तेव्हाचा पाच फुटाच्या आतला, गोरटेला, कायम हसतमुख, मिचमिच्या डोळ्यांचा नेपाळी बहादूर सुद्धा आता साठी ओलांडून गेला असेल ह्या विचाराने वाईट वाटलं. पहिल्या मजल्यावरच्या माझ्या खोलीला बाहेरून कुलूप होतं; पण त्याच्या मागच्या बाजूने थोडा चाललो; काचेच्या खिडकीतून आत डोकावून बघितलं - अंधारच होता. खोलीमागे पटांगण, आणि त्या काळी पटांगणापलीकडे संपूर्ण मोकळं माळरान होतं. माझ्या खोलीच्या खिडकीतून पलीकडे क्षितिजावर कुतुब मिनार दिसत असे. आता, मागे मोकळं आणि माळरान दोन्हीपैकी काहीच नव्हतं; सगळीकडे फक्त राहत्या बिल्डिंगींचे असंख्य मिनार दाटीवाटी करून उभे होते.'बहादुर, चाय लाव!' हे तोंडातलं फर्मान ओठाच्या हद्दीवरच अडकलं. दलीप आणि बहादूर ह्या मेसच्या दोन नोकरांच्याबरोबर, त्यांच्याच एका मित्राची सायकल उधार घेऊन पार साऊथ एक्स, ग्रेटर कैलाश किंवा दुसऱ्या दिशेला वसंत विहार पर्यंत जाऊन रात्री नऊ ते बारा पाहिलेले सिनेमे आठवले. त्यांची सायकल, म्हणून सिनेमाची निवडही त्यांची; एरवी 'धर्मा' सारखा सिनेमा माझ्या कुठला नशिबात! तेव्हाचा पाच फुटाच्या आतला, गोरटेला, कायम हसतमुख, मिचमिच्या डोळ्यांचा नेपाळी बहादूर सुद्धा आता साठी ओलांडून गेला असेल ह्या विचाराने वाईट वाटलं. पहिल्या मजल्यावरच्या माझ्या खोलीला बाहेरून कुलूप होतं; पण त्याच्या मागच्या बाजूने थोडा चाललो; काचेच्या खिडकीतून आत डोकावून बघितलं - अंधारच होता. खोलीमागे पटांगण, आणि त्या काळी पटांगणापलीकडे संपूर्ण मोकळं माळरान होतं. माझ्या खोलीच्या खिडकीतून पलीकडे क्षितिजावर कुतुब मिनार दिसत असे. आता, मागे मोकळं आणि माळरान दोन्हीपैकी काहीच नव्हतं; सगळीकडे फक्त राहत्या बिल्डिंगींचे असंख्य मिनार दाटीवाटी करून उभे होते.


कोणाच्या शुकशुकाटाने मागे वळून पाहिलं. एक बाई आणि बुवा मला हटकत होते. पुन्हा एकदा, माझ्या ह्या भेटीचा सद्हेतू स्पष्ट केला. बाईंनी स्वतःची ओळख करून दिली. त्या स्वतः तेहतीस वर्षांपूर्वी इथूनच ग्रॅज्यूएट होऊन आता व्यवस्थापन विभागात नोकरी करत होत्या. मोहेंजो दारो मधील पुरातन अवशेषाकडे बघावं त्या अविश्वासाच्या नजरेने माझ्याकडे पहात त्या म्हणाल्या 'ह्याच वर्षी आम्ही संस्थेचा सुवर्णमहोत्सव साजरा करतो आहोत; शहात्तरची म्हणजे तुमची पहिलीच बॅच असेल नाही का?'. मी नुसतंच म्हटलं; नाही माझी दुसरी बॅच, कारण दिल्लीमध्ये मास्टर्स कोर्स एकच वर्षात सुरु केला होता. मग त्यांच्या संमतीने मेन बिल्डिंगमधून, क्लासरूम्स मधून चक्कर मारली. आता बरीच मुलं असावीत एकेका वर्गात; कारण खुर्च्या दाटीवाटीने मांडलेल्या दिसल्या. प्रोफेसर्सच्या केबीन्समधून फिरतांना, कोर्स पुरा केल्यावर नोकरीसाठीची शिफारसपत्रं गोळा करत फिरल्याची आठवण झाली. प्रेमाने, मनापासून शुभेच्छा देणाऱ्या प्रोफेसर्सची, 'लिहून कळव, कुठे नोकरी घेतलीस, कसं चाललंय' अशा त्यांच्या सूचनांची, नोकरी मिळाल्यावर, नोकऱ्या बदलतांना, स्थलांतर करतांना कळवायचं राहूनच गेलं ह्याची टचकन टोचून गेलेली अशा बऱ्याच कडू गोड आठवणी झाल्या. माझ्या प्रोफेसर्सची नावं बाईंना फक्त ऐकूनच माहिती होती. साहजिक आहे; त्यातले कित्येक जण आता आय एस आय नव्हे, ह्या जगातही नव्हते.

शेवटी संपूर्ण कॅम्पसला एक प्रदक्षिणा घालून बाहेर पडलो. फोटो काढले. हो, ते केवळ दगडमातीच्या निश्चल इमारतीचेच आहेत खरे. पण पुन्हापुन्हा बघून त्यांचे रंग ताजे करायला, ते जिवंत करायला, ते दिवस पुन्हा एकदा जगायला चिक्कार आठवणी आहेत की माझ्याकडे.

Comments