मैं, मेरी बाइसिकल और हमारी तनहाई



मैं, मेरी बाइसिकल और हमारी तनहाई... अक्सर ये बातें करते हैं|

आज सकाळी हवा एकदम 'खुशगवार' म्हणतात तशी होती. गेले दोन दिवस पाऊस पडून गेल्यावर आभाळातलं पाणी आत्तापुरतं तरी संपून गेलं होतं. आकाशाने पावडर ब्लू रंगाची शांत निळाई पांघरली होती. निरभ्र नाही, पण कालपरवाचे काळेमिचकूट ढग दोन दिवसाच्या पावसाने चांगले स्वच्छ धुवून निघाल्यासारखे पांढरे शुभ्र दिसत होते. सूर्य सुद्धा त्या पांढऱ्या झिरमिरीत पडद्यांच्या आडून चमकत असल्याने ना डोळे दिपवून टाकत होता, ना डोळे वटारून आग पाखडत होता. ७०-७५ अंश फॅरेनहाईट (२०-२५ सेंटीग्रेड) तपमानाचा ताप बराच सुसह्य होता.

ह्या हवेत माझ्या जुन्या बालमैत्रिणीने साद घातली नसती तरच नवल! दुचाकी सायकलची आणि माझी मैत्री खूप लहानपणापासूनची. त्यातून, आजच्यासारखी हवा तर 'देवाने सायकल चालवण्यासाठीच निर्माण केलेली' अशी माझी श्रद्धा आहे. त्यामुळे लगेच स्टॅन्डवरची सायकल काढून, हवा भरून (आता तिचं ही वय झालंय, दर सीझनमध्ये नव्याने हवा भरावी लागते. लहानसं पंक्चर असावं, पण ते शोधून रिपेअर करून मिळणं ह्या अतीप्रगत देशात कटकटीचं; वरती 'आता झाली पंचवीस-तीस वर्ष, घ्या ना नवीन' हा सल्ला ऐकावा लागेल. त्यापेक्षा एकदोनदा हवा भरली तर उन्हाळाभर छान चालते हे किती सुटसुटीत!), हेल्मेट घालून मी लगेच सज्ज झालो.

नुसती हवाच सुंदर होती नव्हे, तर दोन दिवस सचैल स्नान झाल्यावर सगळ्यांच्या लॉनवरचं गवतही तृप्त, शांत, हिरवंगार दिसत होतं. हा वसंतऋतूमधला गवताचा हिरवा रंगच अद्भुत! आमच्या शेजारच्या तीन चार डेव्हलपमेंट्समध्ये बहुतेक घरमालक आपलं लॉन आणि फुलझाडं शेजाऱ्यापेक्षा जास्त सुंदर दिसली पाहिजेत ह्यासाठी अहमहमिकेने झटत असतात, त्यामुळे अशा परिसरामधून सायकल चालवणं एक अतिशय सुखद अनुभव. सगळीकडे नुकत्याच कापलेल्या गवताचा, ओल्या मातीचा छान वास, पावसाला न जुमानता बेडरपणे तग धरून राहिलेल्या फुलांचा सुंदर फुलोरा, पार्श्वभूमीवर लॉनमोअरचे आवाज आणि त्यातही ऐकू येणारी पक्षांची किलबिल.

डोळ्यासमोर तरळू लागल्या, माझ्या आणि सायकलच्या मैत्रीच्या आठवणी! कधी आणि कशी चालवायला शिकलो आता सांगताही येणार नाही; जन्मतःच चालवता येत असावी असं वाटावं एवढ्या वर्षांपूर्वीची गोष्ट! घराजवळ सायकल भाड्याने देणारी दोन दुकानं होती. तासाला चार आणे च्या जवळपास रेट होता. त्यातही डिस्काऊंट म्हणून, एखादी जुनी अनफॅशनेबल, थोडी मोठाड सायकल तासाला वीस पैशाने मिळे! सुरुवातीला तर पुरेशी उंची नसल्यामुळे, सीटवर बसून चालवण्याऐवजी दोन दांड्यांच्या मधून पाय घालून पेडल मारूनही चालवली आहे. पण एकंदरीत गिरगावात, दाटीवाटीच्या रस्त्यांमधून, त्या वयात सायकल चालवण्याची फार सोय नव्हती. तिथे चालवली ती जास्त करून शिकण्यापुरतीच. पिंपरीला उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याकडे रहायला गेल्यावर मात्र माझ्या ह्या वेडाला खरी सुरुवात झाली. तिथे मी शब्दशः तासतास सायकल चालवत असे. गिरगावात जन्मून मोठ्या झालेल्या माझ्या नजरेला तेव्हाची पिंपरी फारच लहानशी वाटे. अगदी 'खेडेगाव, खेडेगाव म्हणतात ते हेच!', अशी ठाम खात्री होती. तिथे सायकलचं भाडं एकतर आणखी कमी होतं आणि महत्वाचं म्हणजे शेजारीपाजारी कोणी बरोबरीची मुलंही नव्हती. त्यामुळे दररोज दिवसाचे काही तास तरी एकट्याने सायकलवरून निरुद्देश भटकण्याची चैन उपभोगता येत असे. मुळात थोड्याशा अबोल व्यक्तीला, रमतगमत सायकल चालवतांना, इकडेतिकडे बघत स्वतःच्याच विचारात रमणं हा केवढातरी विरंगुळा असे. समोर येईल त्या रस्त्यावरून सायकल चालवतांना एक दिवस अटळपणे वाट चुकलोही होतो. त्या सिंधी मोहल्ल्यामध्ये हरवल्याच्या भितीपेक्षा आता पत्ता हिंदीत विचारावा लागणार ह्याची भिती जास्त वाटली होती हे आठवतंय.

आणखी काही वर्षांनी कॉलेजला गेल्यावर माझी स्वतःची सायकल घेतली, माहीमहून रुईया कॉलेजला जाण्यासाठी. आठवड्याचे पाच दिवस ते करतही असे; पण सायकलचा मुख्य वापर वीकेंडला एका मित्राबरोबर भटकण्यासाठी जास्त होत असे. आतापर्यंत सायकलवेडात एकटाच भटकत असलेल्या मला माझ्याहीपेक्षा एक येडपट मित्र भेटला होता. हा बहाद्दर वरळीपासून माहीमला माझ्याकडे येऊन नंतर आम्ही दोघे बॅण्डस्टॅन्ड, माउंट मेरी (त्या टेकडीवरून उतरतांना जबरदस्त वेगाने खाली येण्याचं थ्रिल अजून आठवतं), पाली हिल (काही लोक तिथे सिनेनट-नट्या दिसतील म्हणून जात, आम्ही तलत मेहमूदच्या दर्शनाचा योग कदाचित जुळून येईल ह्या एका खुळ्या आशेवर त्याच्या बंगल्याभोवती घुटमळत असू! दुर्दैवाने तो लाभ एकदाही नाही झाला), एअरपोर्ट (तेव्हा फक्त सांताक्रूझलाच होता), विलेपार्ले अशा अनेक ठिकाणी, एकूण वीसेक किलोमीटर, तासनतास पायपीट करत असू. गेल्या काही भेटींमध्ये मुंबईची रहदारी पाहिल्यावर 'ह्या रस्त्यांवरून आपण हेल्मेट न घालता सायकल चालवत असू' ह्या नुसत्या विचारानेच अंगावर काटा आला. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी मुंबईची रहदारी फार वेगळी असावी (किंवा तेव्हाची बेदरकार धाडसी वृत्ती आता हरवली असावी), एवढंच म्हणू शकतो.

पुढे दिल्लीला गेल्यावर, त्या नवीन, भल्या मोठ्या, अनोळखी शहरात सायकल चालवणं सुरुवातीला बंदच होतं. थोडा सराव झाल्यावर भय अथवा लज्जा दोन्ही न बाळगता हॉस्टेल मेसच्या कामगारांबरोबर, त्यातल्याच एखाद्याच्या मित्राची सायकल उसनी घेऊन काही रात्रीचे सिनेमे बघायला जात असे. त्यांच्या सायकली असल्याने, रस्ते त्यांना माहिती असल्याने, त्यांच्या आवडीचे सिनेमे बघायला लागत. अर्थात, कुठला सिनेमा ही गोष्ट दुय्यम; त्या निमित्ताने सायकल चालवायला मिळते हा आनंद फार मोठा असे. दिल्लीतले रस्तेही सुंदर, आणि त्याभागात, विशेषतः रात्रीच्या वेळी, शांतपणे सायकल चालवणे हे खरं सुख असे. अनोळखी भाग, अपरिचित रस्ते, रात्रीची वेळ वगैरे गोष्टींची भिती बाळगण्याएवढा मोठा नव्हतो झालो तेव्हा!

जमशेदपूरच्या आठवणी वेगळ्याच! होस्टेलच्या कंपाऊंडमध्ये, टेल्कोच्या शांत सुरक्षित छायेत राहून उबून गेलो होतो; पण बाहेरचं बिहारी विश्व दुसऱ्या टोकाचं गजबजलेलं आणि खतरनाक दिसत असल्यामुळे फिरायची सोय नव्हती. तशीही रविवारची एकच सुटी मिळत असे. नवीनच मिळालेल्या मित्रांपैकी एकाने टूम काढली 'इथून जवळच अमुकअमुक टेकडी आहे. येत्या रविवारी तिथे हायकिंगला जाऊ. टेकडी २०-२५ किलोमीटरवर आहे, त्यामुळे तिथे सायकलने जाऊ. दिवसभर हायकिंग करून संध्याकाळी परत!' ह्या सगळ्या वर्णनामधला सायकल एवढा शब्द फक्त माझ्या कानांनी टिपला. बाकी एका सुटीच्या दिवशी एवढ्या लांब जायचं काही अडलंय का, तिथे जाऊन काय करायचं, एवढं काय मोठं आहे त्या टेकडीमध्ये बघण्यासारखं वगैरे सूज्ञ प्रश्न डोक्यात आलेच नाहीत. ह्या उत्साही ग्रुपमधल्या काहींकडे स्वतःच्या सायकली होत्या; माझ्यासारख्या एकदोघांना मेस कामगारांच्या उसन्या मिळाल्या. पाचांपैकी एकाला तर सायकल चालवताही येत नाही हे आदल्या रात्री समजलं - मग होस्टेलच्या कंपाऊंडमध्ये त्याचे इमर्जन्सी नाईट क्लासेस घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी हा नवशिका आधी इतरांच्या मागे पडायला लागला आणि नंतर स्वतः सायकलवरून खाली पडायला लागला, तेव्हा अर्ध्या रस्त्यात उरलेल्यांनी आळीपाळीने त्याला डबलसीट घेऊन, आणि एका हाताने त्याची रिकामी सायकल धरून ते एकाएकी भयानक लांब भासणारं अंतर कसंबसं काटलं. डबलसीट घेणाऱ्या प्रत्येकाकडून त्याने रस्ताभर शिव्यांची लाखोली ऐकली. एवढं करून त्या टेकडीमध्ये अर्थातच काही खास बघण्यासारखं नव्हतं. पण त्या काळात थोडा मोकळा परिसर, काही झाडं, थोडी शांतता आणि रस्त्यांमध्ये फार गर्दी नसणे ह्यालाच 'निसर्गसौन्दर्य' असं नांव असे; तेवढं मात्र भरपूर होतं.

अमेरिकेत आल्यावर सुरुवातीची काही वर्षे सायकलच नव्हती. एवढ्या अवाढव्य देशात, अचाट अंतरे आणि ती कापणाऱ्या वाहनांचा भन्नाट वेग, ह्यामुळे रस्ते अतिशय सुंदर असूनही त्यावर सायकल चालवायचं धाडस केलं नव्हतं. भरीस भर म्हणून आमच्या भागातली चारपाच महिन्यांची थंडी! ह्यामुळे, फक्त उन्हाळ्यातच, फक्त जवळपासच्या रेसिडेन्शिअल भागामध्येच अशी बंधनं असली, तरी शेवटी सायकल घेतलीच. गावातल्या पार्क्स मध्ये बायसिकल ट्रॅक्स असतात, पण त्यासाठी सायकल गाडीत घालून किमान पाच-दहा मैल दूरवरच्या पार्कात ती घेऊन जाणे ही कटकट वाटते. पण तरीही, जवळच्या भागात, शाळेच्या विस्तीर्ण आवारात फिरण्यात तासभर तर सहज निघू शकतो. आजकाल बऱ्याच शहरांमध्ये बायसिकल ट्रॅक्स असतात; शिवाय भाड्याच्या सायकल्स सुद्धा मिळतात. पण मला शांत भागातच सायकल चालवण्यात खरी मजा येते.

माझ्या घराजवळच्या शांत हिरव्यागार परिसरातला हा स्वान्त सुखाय स्वसंवाद मला अतिशय आवडतो. सायकल कान देऊन ऐकत असतेच माझ्या गप्पा!

Comments