एवढीशी मोहरी

परवाच्या फ्लाईटमधल्या एका चिकनच्या डिशबरोबरच्या 'sautéed kale and mustard' नी मझा आणला. त्या 'Dijon' प्रकारच्या चवीनी, मोहरी या पदार्थाची बघितलेली अनेक रुप, आणि मानवजातीवर त्यांचे अनंत उपकार याची जाणीव नव्याने करुन दिली. 

वरकरणी दिसायला एवढेसे मोहरीचे दाणे, पण कडक तापलेल्या तेलात तडतडले, की खमंग फोडणी म्हणून काय बहार करतात! खमण ढोकळा, किंवा सुरळीच्या वड्याच घ्या ना - कितीही सुंदर, हलक्या, आंबट-गोड सगळ्या असल्या तरीही, त्या फोडणीनंतरच पूर्ण स्वरुपाला पोचतात. सांबार, रसम्, उपमा एवढच काय पण ह्या मद्राशी पदार्थांची जन्म जन्मांतरीची सहचरी चटणी - ह्या सगळ्यांची कल्पना तरी शक्य आहे का, त्यांच्यावरच्या फर्मास फोडणीशिवाय? मराठी कांदेपोह्यांचा संबंध मुलगी बघायला जाण ह्याहीपेक्षा खरा म्हणजे जास्त निकट, त्यांच्यावरच्या फोडणीशी आहे - इतका, की काही लोक त्यांना चक्क फोडणीचे पोहे म्हणतात. बघायला गेलेल्या मुलीऐवजी, 'तिने केलेल्या' (त्या घरातल्या कुठल्याही गोष्टीच कौतुक करण धोक्याच असत... 'तिने' ती गोष्ट कशी स्वतः केली आहे - लहानपणापासूनच आवड - वगैरे पुराण ऐकायची इच्छा नसल्यास) कांदेपोह्यांवरच्या कच्च्या राहिलेल्या फोडणीवरच जास्त मतप्रदर्शन करत बसून, चांगल स्थळ हातचं घालवून बसलेल्या काही जिव्हाबहाद्दरांच्या कथा अगदी तोंडावर आहेत माझ्या! पण ह्या झाल्या मध्यप्रदेशाच्या दक्षिणेकडच्या भारतातल्या गोष्टी - जिथे मोहरीचा तडतडाट जास्त ऐकायला मिळतो. तेच जर उत्तरेकडे गेलो, तर हीच मोहरी दळून, गाळून तेल झालेली दिसते. उत्तरवासीयांना, मोहरीचं ते एवढसं बी बघितल्याबरोबर रगडावसं का वाटत कोणास ठाऊक!

माझी अशा मोहरी स्वरुपाची पहिली आठवण बऱ्यापैकी कडू आहे. लहानपणी, एका दिल्लीहून परतलेल्या शेजारणीने कौतुकाने दिलेलं 'पचरंगा अचार'! तद्दन मराठी आहारसंहितेत वाढलेल्या मला, मोहरीच्या (सरसोंच्या) तेलामधल ते लोणच अजिबात आवडल नव्हत. काही वर्षांनंतर, दिल्लीत रहात असतांना, ह्या चवीची नुसतीच सवय झाली नव्हे, ती अतिशय आवडायला लागली. हाॅस्टेलच्या मेसमधली कित्येक बेचव जेवणं घशाखाली उतरली ती केवळ पचरंगा अचारच्या साथीमुळे! ये दोस्ती हम आजतलक नहीं भूलें. दिल्लीमधल्या काही रस्त्त्याकडेच्या ढाब्यांमध्ये अनुभवलेल्या गरमागरम मक्कईकी रोटी आणि मख्खन आणि मोहरीची पानं समान प्रमाणात घालून केलेल्या सरसोंका साग ह्या दुक्कलीच्या नुसत्या आठवणींनी वय तीसेक वर्षांनी कमी झाल्यासारखं वाटत.

मात्र पुन्हा एकदा ह्या मोहरीच्या वासानी दगा दिला बंगालमध्ये. "हांशेर डीम" (बदकाच अंड) पासून, मोहरीच्या तेलात केलेलं आम्लेट हा घ्राणेंद्रियांवर काय अत्याचार आहे, हे जिसपर गुजरी है, वही जाने! एस्प्लनेडसारख्या सार्वजनिक परिसरांत, कित्येक संध्याकाळी हा परिमळ दरवळताना अनुभवला आहे... नकोच त्या आठवणी! त्याशिवाय, ते तेल अंगाला माखून हिवाळ्यातल्या सकाळी उघड्या अंगानी उन्हं खात बसण्याचा बंगाल्यांचा (पुरुषांचा) छंदसुध्दा जवळपास वावरणाऱ्यांचे प्राण कंठाशी आणतो. पण... हीच मोहरी जेव्हा त्यांच्या हिल्सा माश्याबरोबर, फेटलेल्या रुपात प्रगटते - तेव्हा फक्त तिचं दिव्यत्व जिभेला (आणि नाकाला) जाणवत. 

बाकी मोहरीचं सर्वोत्कृष्ट रुप ती फेटल्यावरच! मग ते बेडेकरांच्या मिरचीच्या लोणच्यामध्ये भेटो, का गुजराथ्यांच्या छुंदा लोणच्यामध्ये. चांगल्या चिनी जेवणामधल्या 'हाट मस्टल्ड' नांवानी सामोरं येवो, का 'डिजाॅन मस्टर्ड' च्या नांवाखाली डेली सॅंडविचमध्ये लपून येवो - डोक्यात जाण हा त्याचा सद्गुण ते सोडत नाही. तशीच महती वसाबी ह्या मोहरीच्या दूरच्या चुलत भावाची... पण तो किस्सा परत कधीतरी. दुसऱ्या टोकाला, मोहरीचं सगळयात दयनीय स्वरुप म्हणजे, अमेरिकन हाॅट डाॅगवर मिळणारं 'यलो मस्टर्ड'. त्याच्या चमत्कारिक चवीमुळे मला खात्री आहे, की पिवळ्या धम्मक रंगाच्या ह्या पदार्थाचा मोहरीशी काहीही संबंध नसून तो केवळ एक आंबट आणि खारट चवीचा मानवनिर्मित रासायनिक चमत्कार आहे. ह्यापुढचं गुपित म्हणजे, ह्याच पदार्थाची चव उतरली की तो प्लास्टिक पुड्यांमध्ये ओतून, फास्ट फूड चिनी रेस्टाॅरन्ट्समध्ये 'मस्टर्ड साॅस' नांवानी अवतरतो. हे जिन्नस मोहरीचं नांव बदनाम करतात.

असो. शेवटी फोडणीत तडतडून काय, किंवा वाडग्यात रगडून काय; ह्या राईचा पर्वत करणार तरी किती! 

Comments