मनिला "प्रवास" वर्णन

(Originally written on Jan 29, 2015)

न्यूयाॅर्क ते मनिला डायरेक्ट फ्लाईट नसल्यामुळे नेहमी जपानमार्गे जाव लागत. आयत्यावेळी तिकीट घेतल्याने, नेहमीची सवयीची युनायटेड सोडून आॅल निपाॅन एअरलाईन घ्यावी लागली. ती एवढी "आॅल निपाॅन" निघेल याची कल्पना नव्हती. म्हणजे, औषघाला सुध्दा गोरी हवाईसुंदरी नाही (अस औषध लागाव असा काही आजार मला नाही, गैरसमज नसावा); किंबहुना, माझ्यासारखे काही थोडे सोडले, तर बाकी सबंध विमान खरोखरच "आॅल निपाॅन" होतं. ह्या फ्लाईट मध्ये, बोअर सिनेमांची नेहमीची यादी वाचल्यावर (उदा. Teenage mutant..; Expendables; रानी - एकदा बघितला, किती वेळा; धूम ३ - इच्छाच नाही बघायची, इ. इ.) काहीतरी वेगळ म्हणून डाॅक्युमेंटरी विभागात चक्कर टाकून बघू म्हटल. पहिलच नांव होतं - "Earth's wonders - Western India". कित्येकदा आपल्या ओळखीच्या गोष्टी सुध्दा दुसर्याच्या नजरेतून बघण्यात एक गंमत असते. पुन्हा एकदा "आॅल निपाॅन", डाॅक्युमेंटरी फक्त जपानी भाषेत! भाषांना सुध्दा गाण्यासारखे ठेके असतात, आणि ते फक्त ती न समजणार्यानाच जाणवतात. ह्या भाषेमधले ठेके एव्हाना परिचित होते, पण ही राजदरबारी जपानी ऐकतांना, 'रिव्होली' थिएटरमधले मद्राशी (हा शब्द मीही व्यापक अर्थाने वापरतो) सिनेमे बघितल्याचा पुन:प्रत्यय आला! विशेषत:, "छ त र प ती शि वा जी", किंवा "औ रं गा बा द" सारख्या कठीण शब्दांचा उच्चार ज्या कृत्रिम भारावल्या आणि नाटकी स्वरात होत होता, त्यावेळी हे साध्यर्म फारच जाणवलं. जपानी भाषेतून ओळखीच्या स्थळांच वर्णन ऐकताना, परिचित चेहरे बुलेट प्रूफ काचेआडून पहात असल्यासारख वाटत खर, पण परक्यांना आपल्या कुठच्या गोष्टीत रस वाटतो हे बघणही गमतीच असत. उदा. क्राॅफर्ड मार्केटमधले दाटीवाटीनी उभे असलेले गाळे हे माझ्या नजरेत प्रेक्षणीय स्थळ म्हणून कधीच ठसले नसते, पण ह्या डाॅक्युमेंटरी मध्ये कौतुकासकट होते. (पूर्वी एकदा अशीच मजा, एका अमेरिकन कलीगला, जुहू बीचवर Ferris wheel हातांनी फिरवणार्या माणसाचे फोटो काढतांना बघून वाटली होती).

जेवणामध्ये पुन्हा एकदा "आॅल निपाॅन" चा प्रत्यय! Appetizer च्याही आधी, Amuse म्हणून एक कोर्स (प्रथमच पाहिला) होता. त्यामध्ये, एक द्राक्षाच्या आकाराच्या मेलनच्या गोळ्याला लपेटलेला एक प्रोश्यूटो हॅमचा नाजूक तुकडा, एका मोनॅको क्रॅकरवर सांभाळलेला क्रॅब सॅलडचा डोलारा आणि दीड इंच व्यासाच्या चिनीमातीच्या बोलमध्ये फेटा चीज आणि व्हेज सॅलड - एवढ्या ऐवजापेक्षाही मोहक ते खायला दिलेला नाजूक काटा होता. मला वाटत, माझ्या लहानग्या भाचीच्या भातुकलीच्या खेळामध्ये मी यापेक्षा मोठे काटे-चमचे बघितले होते. जपानी मिनीएचरायझेशनची मजल इथपर्यंत पोचली असेल याची कल्पना नव्हती. संपूर्ण सजावट अत्यंत देखणी! एकंदरीत, ह्या कोर्सनी आपल नांव सार्थ केलं! फक्त, चव छान आहे हे समजेपर्यंत पदार्थ संपलेला होता. कॅलिफोर्निया शार्डने सुंदर होती, पण तिच्या सोबतीला पाठवलेल्या मिक्स्ड नट्समध्ये सरासर भेसळ होती, चक्क काजूच्या आकाराच्या चना जोर गरमच्या जपानी आवृत्त्या - छ्या:! स्मोक्ड साल्मनच Appetizer छान होतं. मेन कोर्समध्ये जो मुख्य पदार्थ होता, तो "Ribs in barbecue sauce" आहे असा ANA चा दावा होता; पण बार्बेक्यू साॅसला एक विशिष्ट धुरकट, आंबटगोड चव असावी लागते, ह्याची त्यांना कल्पना नसावी (हे आकाशातल्या बापा, त्यांना क्षमा कर). त्यामुळे तो नुसताच विचित्र तुरट लागत होता. सोबतचे बेदाण्याच्या आकाराचे पर्ल अनियन "how cute" कॅटेगरीमध्ये ठीक होते, मॅश्ड पोटॅटो मात्र छान पण थोडेसेच होते. नंतरच, "फार ईस्ट स्पेशल" रेड बीन आईस्क्रीम शिताफीने टाळून मी नेहमीच्या यशस्वी "चाॅकोलेट मूस" ला मत दिल, पस्तावायचा प्रश्नच नाही! शेवटी बेलीज ही भैरवीसारखी - सदा सुहागन!

हा "आॅल निपाॅन" प्रकार मात्र फक्त विमानापुरताच मर्यादित होता. टोकियो ते मनिला फ्लाईट सुध्दा त्यांचीच असली, तरी टोकियोला मला बॅगेचा ताबा घेउन, इमिग्रेशन, कस्टम वगैरे सगळे सोपस्कार परत करावे लागले, जे पूर्वी युनायटेड आणि डेल्टा सारख्या भिन्न कंपन्यानी सुध्दा करायला लावले नव्हते. फायदा फक्त एवढाच, की ह्यावेळी नुसतेच काचेमधून रस्ते बघण्याऐवजी, एयरपोर्टबाहेरच्याच का होइना पण टोकियोच्या रस्त्यावरून चालून घेतलं! तेवढाच जपानला पदस्पर्श...

पुढच्या फ्लाइटबद्दल काही लिहायचीही गरज नाही. विमानात शिरल्याक्षणापासून जो एक सर्वव्यापी कांजी अाणि आॅयस्टर साॅसचा दर्प पसरलेला असतो, त्याच आणि माझ अजून सख्य झालं नाहीय... त्यामुळे तो प्रवास नाक मुठीत धरुनच!

Comments