भाषांतर - ५

तुमच्या राहण्याची व्यवस्था केल्येय मी. मिसेस लिथबी म्हणून आपल्याच चर्चमध्ये एक वृद्धा आहेत, म्सुटू आहेत त्या, पण झुलू बऱ्यापैकी बोलतात. तुमच्यासारखा प्रिस्ट घरात ठेऊन घ्यायला अभिमानच वाटेल त्यांना. तसं स्वस्त आहे - आठवड्याला तीन शिलिंग, आणि इथे मिशनच्या लोकांबरोबर तुम्ही जेवण घेऊ शकाल. अरे, ही वाजलीच जेवणाची घंटी. तुम्हाला हात धुवायचे असतील ना?
हात धुवायला बेसीन अगदी आधुनिक, पांढरी स्वच्छ होती, गार आणि गरम पाणी, टॉवेल वापरलेले असले तरी एकदम पांढरे शुभ्र. संडास सुद्धा आधुनिक पद्धतीचाच होता. काम झाल, की एक छोटीशी कळ दाबायची - काहीतरी मोडल्यासारख एकदम भसाभसा पाणी वहायला लागायचं. ह्या असल्या गोष्टींची माहिती नसली, तर घाबरायलाच होईल एखाद्याला.
जेवणाच्या खोलीत टेबल मांडलेलच होत. इथे बरेच प्रिस्ट होते - काळे आणि गोरे दोन्ही. सगळ्यांनी आधी प्रार्थना केली, आणि मग जेवायला सुरुवात केली. एवढे सगळे काटे आणि चमचे बघून ते आधी गोंधळले; पण मग इतरांच अनुकरण करून हळूहळू खायला लागले.
त्यांच्या शेजारी बसलेल्या, इंग्लंडहून आलेल्या, लालबुंद गालांच्या तरुण प्रिस्टनी त्यांना विचारलं, कुठून आलाय तुम्ही. मग दुसरा एक काळा प्रिस्ट उद्गारला 'मी सुद्धा इकोपोचाच आहे; माझे आई-वडील तर अजून तिथेच असतात, लुफाफाच्या खोऱ्यामध्ये. कस काय आहे तिकडे आता?' मग त्यांनी त्या सगळ्यांना त्या दूर देशीच्या सुंदर डोंगर आणि दऱ्या-खोऱ्यांच्या प्रदेशाची सविस्तर हकीकत सांगितली. त्या प्रदेशाबद्दलच प्रेम त्यांच्या आवाजातून प्रगटत असाव, कारण ऐकताना सगळे स्तब्ध झाले होते. त्यांनी त्यांना त्या जमिनीच्या मरगळीबद्दल सांगितलं, सगळ गवत कस नाहीसं झालय ते सांगितलं, कोरड्याठाण नद्यांच्या पात्रांच आता कस खोल धारदार भेगांमध्ये रुपांतर झालंय, देश कसा फक्त म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाच, आया आणि लहान मुलांचाच राहिलाय, धान्य कस जेमतेम पुरुषभर उंचीलाच पोचत, जमात व्यवस्था मोडून पडल्येय, घरं मोडल्येत, माणूस मोडून पडलाय. सगळेजण लांब लांब जाताहेत, बरेचसे परत येत नाहीत, बरेचसे पत्र लिहित नाहीत. आणि हे सगळं नुसतं इंडॉटशनीतच नव्हे, तर लुफाफा, आणि इम्ह्लाविनी, आणि उम्कोमास आणि उम्झीम्कुलू सगळीकडेच असच चाललंयपण गर्ट्रूड आणि अब्सलम बद्दल मात्र काहीच नाही सांगितलं.
मग ते सगळेच जण जमिनीच्या ओसाडीबद्दल बोलायला लागले, मोडून पडलेल्या जमात आणि कुटुंबव्यवस्थेबद्दल, मोडक्या घरांबद्दल बोलले. तरुण मुल-मुली कशी घरं सोडून निघून जातात, आपल्या रिती-भाती विसरतात, स्वैरपणी कसही निरुद्देश जगायला लागतातमग ते लहान मुलांमधल्या गुन्हेगारीबद्दल, आणि थोड्या मोठ्या आणि निगरगट्ट गुन्हेगारांबद्दल बोलले; गोरं जोहानसबर्ग कस काळ्या गुन्हेगारांच्या दहशतीत राहतंय. एकानी जाऊन 'जोहानसबर्ग मेल' नावाचं वर्तमानपत्र आणून त्यांना दाखवलं - मोठ्ठ्या काळ्या अक्षरात मथळा होता 'एकाकी घरामधील वृद्ध जोडप्यास मारहाण करून लुबाडले. चार काळ्यांना अटक. '.
-    हे जवळ जवळ रोज घडतं. आणि अस नाही की दहशत नुसती युरोपिअनांनाच आहे; आम्हालाही आहे, अगदी इथे सोफियाटाऊन मध्ये. आता परवाच ह्या पोरांच्या  टोळकयानी आपल्याच एका आफ्रिकन मुलीवर हल्ला केला, तिची पर्स आणि पैसे लुबाडले, पुढे बलात्कारही केला असता; पण तेवढ्यात घरांमधून लोक धावत आले.
-    इथे जोहानसबर्ग मध्ये तुम्हाला बरंच समजून घ्यायचं आहे अजून. तो लालबुंद गालांचा प्रिस्ट म्हणाला. उध्वस्त नुसता तुमचा गावाकडचा प्रदेशच नाहीय होत. आपण बोलू पुन्हा, मला खूप ऐकायचंय तुमच्या प्रदेशाबद्दल. पण आता मला निघायला हव.
मग ते सगळेजण उठले. सिमान्गु म्हणाले ते पाहुण्यांना त्यांच्या खोलीत घेऊन जातील. 'आम्हाला बरंच बोलायचं आहे.'
ते खोलीमध्ये गेले; सिमान्गुनी दार बंद करून ते बसल्यावर कुमालो म्हणाले, 'मी घाईघाई करत असेन, तर माफ करा; पण मला माझ्या बहिणीबद्दल फार काळजी आहे हो.' 'हो, मला समजतंय तुम्हाला बहिणीची काळजी असणार. आणि हे विचारतोय म्हणून मला बेपर्वा नका समजू, पण एक सांगा, त्या इथे मुळात आल्या कशासाठी.'
कुमालोंना प्रश्न खटकला, पण त्यांनी शांतपणी उत्तर दिल. ती तिच्या धन्याला शोधायला इथे आली. त्याला खाणींमध्ये काम मिळाल होत. पण त्या कामाची मुदत संपली तरी तो परतही येईना आणि पत्रही लिहीना. तो आहे का त्याच काही बर वाईट झाल, हेही तिला कळेना. म्हणून ती शेवटी त्यांच्या लहान मुलाला घेऊन इथे त्याचा तपास काढायला आली. यावर सिमान्गु काहीच बोलेनात, तेव्हा त्यांनी घाबरून विचारलं, फार वाईट अवस्था आहे का तिची? सिमान्गु गंभीरपणी म्हणाले, हो फार वाईट अवस्था आहे. पण नुसत्या शरीराच्या आजारांनी नव्हे, हा रोगच फार वाईट प्रकारचा आहे. मी तुम्हाला बोलावून घेण्याच एक कारण म्हणजे ती एकटी बाई आहे, आणि दुसर म्हणजे तिचा भाऊ एक प्रिस्ट आहे. तिला तिचा धनी भेटला की नाही माहित नाही मला, पण आता तिला धनी नाहीय. त्यांनी कुमालोंकडे एक दृष्टीक्षेप टाकला - खर तर, तिला आता अनेक धनी आहेत. कुमालो म्हणाले 'परमेश्वरा!' ती इथे क्लेअरमाँटमध्ये रहाते, जोहानसबर्ग मधल्या सर्वात वाईट भागांपैकी तो एक भाग आहे. एकदा का पोलिस येउन गेले, की तिथल्या रस्त्यांमधून दारू वहाताना दिसते. त्या सगळ्या भागात दारूशिवाय इतर कसला वास येतच नाही.      
सिमान्गु कुमालोंकडे झुकून म्हणाले, मी मद्य घेत असे; पण ते चांगल्या प्रकारचं होत. आपले वाड-वडील  करत, त्या प्रकारचं. आता, मी दारूला स्पर्शही करत नाही. ही इथली दारू फार वाईट असते. नशा वाढवण्यासाठी वाट्टेल त्या गोष्टी घालून केलेली; आपल्याकडे असलं कधीच केल नसत. आणि असली ही दारू गाळायचं काम ती करते - भट्टीवर गाळायची आणि विकायची. तुम्हाला सांगताना फार त्रास होतोय मला, पण मी तुमच्यापासून लपवूही इच्छित नाही. ह्या बायका काय, त्यांचा दाम वेचला की कोणाचीही शेज सजवायला तयार असतात. हिच्या घरात एका माणसाचा खून झालाय. दारू-जुगार-खून-मारामाऱ्यातुरुंगात जाऊन आल्येय ही - अनेकदा. सिमान्गु खुर्चीत मागे रेलले. टेबलावरच पुस्तक पुढे मागे ढकलत म्हणाले 'भयानक वाटत असेल ना ऐकताना तुम्हाला'. कुमालोंनी नुसती मूकपणी मान हलवली. सिमान्गुनी सिगारेट बाहेर काढली, 'ओढणार?'. कुमालोंनी नकारार्थी मान हलवली
-    मी खर तर सिगारेट ओढत नाही.
-    कधी कधी सिगारेट ओढल्यावर शांत वाटत. पण एक वेगळ्या प्रकारची शांती मनात असायला हवी माणसाच्या; मग गंमत म्हणून त्यांनी सिगारेट ओढली तर गोष्ट वेगळी. इथे जोहानसबर्गमध्ये त्या प्रकारची शांती मिळण अवघडच.
-    जोहानसबर्गमध्येच कशाला? सगळीकडे हेच आहे. ती दैवी शांती आपल्यापासून दूर दूर जाते आहे.
मग ते दोघ गप्प होते. जणू काही असा एक शब्द उच्चारला गेला होता, की आता पुढचा शब्द उच्चारण कठीण होत. शेवटी कुमालो म्हणाले, आणि तिचा मुलगा कुठे असतो
-    तिथेच असतो मुलगा पण. पण ती मुलांना वाढवायची जागा नव्हे. ते आणखी एक कारण आहे मी तुम्हाला बोलावून घेतलं. आईला आता वाचवण कदाचित नाही जमणार, पण निदान मुलाला तरी वाचवू शकाल.
-    आहे तरी कुठे हा भाग?
-    फार लांब नाही इथून. मी जाईन उद्या तुम्हाला घेऊन.
-    माझ आणखी एक मोठ दुख्ख आहे.
-    सांगा ना मला
-    तुम्हाला सांगून भार हलकाच होईल माझा.
पण नंतर ते गप्पच राहिले. बोलायला तोंड उघडल, आणि शब्दच फुटेनात. तेव्हा सिमान्गु म्हणाले, सावकाश; काही घाई नाही
-    सांगण कठीण आहे हो. आमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठ दुख्ख.
-    मुलगा... का मुलगी?
-    मुलगा.
-    सांगा ना.
-    अब्सलम त्याच नांव. तोही दूर गेला. माझ्या बहिणीला शोधायला. आणि परतलाच नाही. काही काळानंतर पत्रही थांबली. आमचीत्याच्या आईची आणि माझीपत्रं उलटटपाली परत आली. आता तुम्ही सांगितलेलं हे सगळ ऐकून माझी काळजी आणखीच वाढल्येय.
-    आपण त्याला शोधायचा प्रयत्न करू. कदाचित तुमच्या बहिणीला काही माहिती असेल. तुम्ही दमलाय आता. मी तुमच्यासाठी राखून ठेवलेली खोली दाखवतो तुम्हाला.
-    हो, ते बर होईल.
ते उठले, आणि कुमालो म्हणाले, ‘झोपण्यापूर्वी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करायची माझी सवय आहे. मला दाखवाल का, चर्च कुठे आहे?’
-    हो, ते वाटेवरच आहे.
कुमालो दीनपणे म्हणाले, तुम्ही सुद्धा माझ्यासाठी प्रार्थना कराल का?
-    अवश्य, आनंदानी करेन. बंधू, मला अर्थातच माझी कामं आहेत; पण तुम्ही जोपर्यंत इथे आहात, मी सर्वतोपरी तुमची मदत करेन.
-    फार दयाळू आहात तुम्ही.
त्या दीन आवाजातली आर्तता सिमांगुंना स्पर्श करून गेली असावी, कारण ते म्हणाले, 'नाही, मी दयाळू नाही; खूप स्वार्थी आणि सामान्य आहे मी. पण देवानी माझे हात त्याच्या हातात घेतले आहेत - एवढंच.' त्यांनी कुमालोंची ब्याग उचलली; दाराशी पोचणार तेवढ्यातच कुमालोंनी त्यांना थांबवलं.
-    आणखी एक गोष्ट सांगायची आहे.
-    काय?
-    इथे जोहानसबर्ग मध्ये माझा एक भाऊ सुद्धा आहे. तोही लिहित नाही. जॉन कुमालो - सुतार काम करतो.
एक स्मित करून सिमांगु म्हणाले, ‘ओळखतो मी त्यांना. फार व्यस्त असतील ते पत्रं लिहायला. आपल्यातले मोठे राजकारणी आहेत ते.’
-    राजकारणी? माझा भाऊ?
-    होय, राजकारणात मोठ नांव आहे त्यांच.
सिमांगु थबकले. ‘तुम्हाला आणखी क्लेश द्यायची इच्छा नाही माझी. तुमच्या बंधूंना चर्चविषयी फार आस्था नाहीय. म्हणे जे देवानी दक्षिण आफ्रिकेसाठी आजवर केल नाहीय, ते आम्ही माणसं करून दाखवणार आहोत. अस म्हणण आहे त्यांच.’
-    मोठ्या कष्टाचा प्रवास ठरतोय हा.
-    समजतं मला.
-    कधी कधी वाटत, हे सगळ ऐकल्यावर बिशप काय म्हणतील! त्यांच्याच एक प्रिस्टबद्दल ...
-    काय म्हणणार बिशप? हे जे सगळं घडतंय ते कुठचा बिशप थांबवू शकणार नाहीय. कोणीच थांबवू शकणार नाहीय. हे असंच चालणार.
-    अस कस म्हणता? हे असंच चालणार कस म्हणू शकता तुम्ही?
-    हे असंच चालणार. सिमांगु गंभीरपणी म्हणाले. तुम्ही जगरहाटी थांबवू नाही शकत. हे बघा, मीही ख्रिश्चन आहे. गोऱ्या माणसाचा द्वेष माझ्या मनात बिलकुल नाही. गोऱ्या माणसानीच तर आपल्या वाड-वडिलांना अंधारातून बाहेर आणलं. स्पष्ट बोलतो, माफ करा. जग कोलमडून पडतंय याच दु:ख नाही; दु:ख ह्याच आहे की ते कोणी परत उभारू पहात नाही. गोऱ्यांनी आपली जमात व्यवस्था मोडीत काढली. पुन्हा सांगतो, माफ करा; पण ती आता परत दुरुस्त होणार नाहीय. पण हे जे घर उध्वस्त झालंय, आणि त्यामुळे माणूस कोलमडून पडलाय ह्या खेदाच्या गोष्टी आहेत. म्हणून ही लहान मुलं गुन्हेगारीकडे वळतात, म्हणून म्हातारे गोरे लुबाडले जातात आणि मारहाण सहन करतात.
त्यांनी कपाळावरून हात फिरवला.
-    आपली जमात व्यवस्था मोडून टाकण गोऱ्यांना सोयीस्कर होत. गंभीरपणी ते पुन्हा बोलू लागले. पण त्या मोडकळीच्या जागी दुसरी घडी उभी करणं त्यांना सोयीच वाटल नाही. तासनतास मी ह्याच्यावर विचार केलाय आणि आता मला बोललच पाहिजे, कारण माझ्या दृष्टीनी हे सत्य आहे. ते सगळेच तसे नाहीत. असेही काही गोरे आहेत, जे नवीन घडी उभी करायला त्यांच आयुष्य सुद्धा खर्च करतील. पण ते पुरेसे नाहीत. ते घाबरलेले असतात. हे सत्य आहे. ह्या सबंध देशावर राज्य आहे ते भितीच.
ते थोडे वरमून हसले. आत्ता बोलायचं म्हटलं तर वेळ पुरणार नाही एवढ्या अनेक गोष्टी आहेत ह्या अशा. यावर सावकाशिनी बसून शांतपणी बोलायला हव. तुम्ही फादर व्हिन्सेंटना ह्या सगळ्याबद्दल बोलताना ऐकायलाच हवं. ते गोरे आहेत, आणि जे बोलायला हव ते बोलू शकतात. लहान मुलासारखे गोबरे गालवाले होते ना, तुमच्या प्रदेशाबद्दल अजून बरंच ऐकायचय म्हणाले, ते.
-    हो आल लक्षात माझ्या.
-    आपल्या फार थोडंच हाती लागत. सिमांगु खिन्नपणी म्हणाले, जवळ जवळ काहीच मिळत नाही. चला, जाऊ या चर्चमध्ये.
* * *
-    लिथबी बाई, हे माझे मित्र रेव्हरंड स्टीफन कुमालो.
-    या, या उम्फुन्डीस*. खोली तशी लहान आहे, पण स्वछ आहे हं एकदम. (*'उम्फुन्डीस' हा झुलू शब्द पाद्रीबाबा अश्या अर्थानी आदरयुक्त संबोधन म्हणून वापरला जातो.)
-    असणारच, मला खात्री आहे.
-    गुड नाईट. मग उद्या सकाळी सात वाजता भेटू आपण चर्च मध्ये.
-    अर्थात.
-    मग तिथून पुढे मी तुमच्या नाश्त्याची व्यवस्था करेन.
-    जपून रहा, दोस्त, जपून रहा, मदर.
-    जपून जा, दोस्त.
-    जपून जा, उम्फुन्डीस.
तिनी त्यांना एका छोट्या, पण स्वछ खोलीत नेलं; आणि उजेडासाठी म्हणून मेणबत्ती लावून दिली.
-    कसलीही गरज लागली तर सांगायचं बर का, उम्फुन्डीस.
-    थँक्यू.
-    शांत झोपा, उम्फुन्डीस.
-    शांत झोपा, मदर.
ते क्षणभर त्या खोलीत स्तब्ध उभे राहिले. अट्ठेचाळीस तासापूर्वी, दूर इंडॉटशनीमध्ये, ते आणि त्यांची पत्नी त्यांची ब्याग भरत होते. चोवीस तासांपूर्वी ती आगगाडी, डोक्यावरची यंत्रणा सांभाळून, एका अपरिचित प्रदेशामधून रोरावत धावत होती. आणि आता बाहेर, लोकांच्या वर्दळीच्या आणि गजबजाटाच्यामध्ये आणि पलीकडे ह्या अजस्त्र शहराचे हुंकार ऐकायला येत होते - जोहानसबर्ग. जोहानसबर्ग.

कसा विश्वास बसेल कोणाचा ह्यावर!

Comments