भाषांतर - ६

क्लेअरमाँट तस फार लांब नाही. जवळजवळच आहेत, सोफियाटाऊनमध्ये कोणालाही जमीन-जुमला घ्यायला परवानगी आहे, वेस्टर्न नेटिव टाऊनशिप येते जोहानसबर्ग म्युनिसिपालिटीच्या अखत्यारीत, आणि क्लेअरमाँट - ह्या गर्विष्ठ शहराचा उकिरडा. ह्या तिघांच्या पश्चिम हद्दीवर आहे न्यू लँन्ड्सचा युरोपिअन इलाका, आणि पूर्व हद्दीवर आहे वेस्टडीनचा युरोपिअन इलाका.
-    दुर्दैव आहे, सिमान्गु म्हणाला. मी खर तर विभाजनवादी नाही; पण इथे वाईट वाटत, की आपण वेगळे रहात नाही. शहरातल्या मध्यवर्ती भागातून ट्राम सुटतात; त्यातला एक भाग युरोपिअन लोकांसाठी, आणि एक आपल्यासाठी असतो. पण बऱ्याच वेळा हे तरुण गुंड आपल्या लोकांना ट्राम मधून बाहेर खेचतात. आपले गुंडही दंगे करायला तयारच असतात.
-    आणि पोलिस, ते चालू देतात हे सगळ?
-    नाही देत. पण ते काही प्रत्येक ट्रामवर नजर नाही ठेऊ शकत. आणि एकदा दंगल सुरु झाली, की कोण तपासत बसणार तिची सुरुवात कशी झाली, आणि कोण खर बोलताय. खरच, आपण वेगळे रहात असतो तर बर झाल असत. ती बघा, ती बिल्डींग दिसतेय?
-    हो, दिसते.
-    ती 'बांटू प्रेस' ची बिल्डींग - आपल वृत्तपत्र. अर्थात तिथे युरोपिअन आहेत. हे वृत्तपत्र मवाळ आहे, आणि जे बोलायला पाहिजे ते सगळ स्पष्ट बोलत नाही. तुमच्या बंधूंच्या - जॉनच्या - लेखी बांटू प्रेसची फार कदर नाही. ते आणि त्यांचे दोस्त त्याची बांटू रीप्रेस म्हणून टिंगल करतात.
ते क्लेअरमाँटपर्यंत चालत गेले. तिथला बकालपणा, अस्वच्छता, घरांची दाटीवाटी आणि रस्त्यामधली घाण बघून कुमालोंना शिसारी आली.
-    ती बाई बघितलीत?
-    हो.
-    ती इथल्या हातभट्टीवाल्या महाराणींपैकी एक. अस म्हणतात, की सबंध जोहानसबर्गमधल्या धनाढ्य काळ्या लोकांपैकी ती एक आहे.
-    आणि ही मुलं? शाळेत कशी नाहीत ही आत्ता?
-    काहींना पर्वा नाही म्हणून, काहींच्या आई-बापांना पर्वा नाही म्हणून. पण कित्येकजण इथे आहेत, कारण शाळांमध्ये जागा नाही.
ते लिली स्ट्रीट वरून चालत आले, आणि हियासिंथ स्ट्रीट वर वळले. इथल्या रस्त्यांची नावं मात्र फार सुंदर आहेत.
-    हे आलंच, बंधू. अकरा नंबरच घर. तुम्ही एकटेच जाणारात?
-    ते जास्त बर होईल.
-    तुमच झाल की सांगा. मी त्यापुढच्या, तेरा नंबरच्या घरात असेन. आपल्या चर्चमधली एक बाई तिथे रहाते. चांगले घरंदाज लोक आहेत ते, ती आणि तिचा नवरा. मुलांना नीट वाढवायचा ते ह्या इथे प्रयत्न करताहेत. पण कठीण आहे ते. त्यांची मोठी मुलगी, रस्त्यातल्या एका मवाल्याबरोबर पळून गेली, पिम्सव्हिलमध्ये रहाते आता. असो; तुमच काम झाल की त्या घराचा दरवाजा ठोठावा, मी असेन तिथे.
त्या घरातून हसण्याचे आवाज येताहेत. ज्या हास्याची भिती वाटावी अशा हसण्याचे. आता, मुळातच एखाद्याला भिती वाटतेय, का खरच ते खिदळण उथळ आणि भयावह आहे - सांगण कठीण. एका बाईचा आवाज, आणि मग पुरुषांचे आवाज. पण ते नेटानी दारावर टकटक करतात, आणि ती दार उघडते.
-    छकुली, मी आलोय.
तिच्या डोळ्यात निःसंशय भिती आहे. ती एक पाऊल मागे घेते, त्यांच्यापासून लांब जायला. मागे वळून, त्यांना ऐकू येणार नाही अशा आवाजात काहीतरी बोलते. खुर्च्या हलवल्याचे आणि आवरासावर केल्याचे आवाज. ती त्यांच्याकडे वळते.
-    थांब दादा, मी तयारी करतेय.
दोघ नुसते एकमेकाकडे बघत उभे राहतात. ते उत्सुक, ती घाबरलेली. ती वळून पुन्हा एकदा खोलीत नजर टाकते. एक दार बंद केल्याचा आवाज. मग ती म्हणते, दादा, ये ना आत.
आता कुठे ती त्यांचा हात हातात घेते. तिचा हात थंडगार, ओला आणि निष्प्राण.
दोघ बसतात, ती तिच्या खुर्चीत स्तब्ध.
-    मी आलोय, ते म्हणतात.
-    छान.
-    तू पत्रं नाही लिहिलीस.
-    नाही, नाही लिहिली.
-    नवरा कुठे आहे तुझा?
-    मला ते कधी भेटलेच नाहीत, दादा.
-    आणि तरीही तू आम्हाला कळवलं नाहीस.
-    खरच, खर आहे.
-    तुला कल्पना नव्हती, आम्हाला काळजी असेल?
-    पैसे नव्हते माझ्याकडे पत्र लिहायला.
-    स्टँम्पला लागणारे दोन पैसे सुद्धा नव्हते?
ती निरुत्तर, त्यांच्याकडे बघत नाही.
-    पण मी तर ऐकल तू श्रीमंत आहेस.
-    मी नाहीय श्रीमंत.
-    ऐकल, की तू तुरुंगात होतीस.
-    ते खर आहे.
-    दारू गाळण्यावरून?
आता एकदम ठिणगी पडल्यासाखी ती उसळते. आता ती गप्प नाही राहू शकत, काहीतरी करायलाच हव तिला. ती त्यांना सांगते, तिचा दोष नव्हता, दुसऱ्या एका बाईचा होता.
-    तू त्या बाई बरोबर रहात होतीस?
-    होय.
-    असल्या बाईकडे कशाला राहिलीस?
-    मला दुसरीकडे कुठे चारा नव्हता.
-    आणि तिला तिच्या धंद्यात तू मदत केलीस?
-    मला मुलासाठी पैसे तर हवे होते.
-    आहे कुठे तो मुलगा?
ती निर्विकारपणी इकडे तिकडे नजर टाकते. उठून आवारात जाते, आणि हाक मारते. पण त्या आवाजातला एकेकाळचा गोडवा जाऊन त्यात एक वेगळीच धार आली आहे. त्या घराबाहेरून ऐकलेल्या खिदळण्यातली धार. तिची नवीन रुपं सामोरी येताहेत.
-    मी पाठवलाय त्याला बोलवायला.
-    कुठे आहे तो?
-    येईल.
तिच्या डोळ्यात अस्वस्थता आहे. नुसती भिंतीवरून बोट फिरवत उभी आहे ती. त्यांचा संताप उसळत चाललाय.
-    आणि मी कुठे झोपणार? ते विचारतात.
आता तिच्या डोळ्यातल्या भितीबद्दल शंकाच नको. आता ती सगळ कबूल करेल, पण त्यांचा ताबा आता संतापानी घेतला आहे. ते तिच्या उत्तराची वाट बघत नाहीत.
-    लाज आणलीस तू आम्हाला. ते खालच्या आवाजात फिस्कारतात, जगाला जाहिरात नको म्हणून. हातभट्टीवाली, वेश्या! तुझ स्वतःच मुल, आणि तुला माहित नाही ते कुठे आहे? आणि तुझा भाऊ प्रिस्ट आहे! अशी कशी वागू शकतेस तू?
ती त्यांच्याकडे मूक नजरेनी बघते, कोन्डीतल्या जनावरासारखी. 
-    मी तुला परत घेऊन जायला आलोय.
ती जमिनीवर कोसळते, आणि हंबरडा फोडून रडू लागते. तिचा आक्रोश जास्त जास्तच तीव्र होतो, कसलीही भीड न बाळगता. बाहेर ऐकू जाईल, ते घाईघाईनी म्हणतात. ती हुंदके आवरून रडतच रहाते.
-    तुला परत यायची इच्छा आहे का?
ती मान हलवते. मला जोहानसबर्ग आवडत नाही. मला उबग आलाय इथे. माझ्या मुलालाही बर वाटत नाही इथे.
-    तुला खरच, मनापासून परत यायचंय? ती होकारार्थी मान डोलावते, हुंदके चालूच. मला जोहानसबर्ग मुळीच आवडत नाही, ती म्हणते. तिची नजर कष्टी आहे, आणि आशेनी त्याचं हृदय धडधडत. मी बदनाम स्त्री आहे, दादा. मी परत यायच्या परिस्थितीत नाहीय आता.
त्यांचे डोळे पाण्यानी भरून येतात. त्यांचा मूळ मृदू स्वभाव परतून येतो. ते तिला जमिनीवरून उठवून खुर्चीत बसवतात. मूकपणी तिच डोक थोपटतात. त्यांच हृदय करुणेनी भरून आलंय.
-    परमेश्वर आपल्या सगळ्यांना क्षमा करतो. मी कोण तुला माफ न करणारा? चल, आपण प्रार्थना करू देवाची.
ते दोघ गुडघे टेकून खाली बसतात. ते प्रार्थना म्हणतात, हळू आवाजात; शेजाऱ्यांना नको ऐकायला जायला म्हणून. ती त्यांच्या आर्जवांना मध्ये मध्ये आमेन म्हणून पुष्टी देते. आणि त्यांची प्रार्थना संपल्यावर, ती स्वतः बांध फुटावा तशी आवेगानी प्रार्थना करते, स्वतःला डागण्या देते, ईश्वराची करुणा भाकते. मग शेवटी शांत होऊन ते दोघे हातात हात धरून बसतात.
-    आणि आता मला तुझी मदत हवी आहे.
-    काय झाल, दादा?
-    आमचा मुलगा, तुझी त्याच्याशी काही गाठ-भेट नाही?
-    मी ऐकलं होत त्याच्याबद्दल. इथे जोहानसबर्ग मध्ये कुठल्याश्या मोठ्या ठिकाणी काम करत होता. सोफियाटाऊन मध्ये राहायचा, कुठे ते नक्की मला माहिती नाही. पण मी सांगते कोणाला माहिती असेल. जॉनचा मुलगा आणि तुमचा मुलगा नेहमी बरोबर असत; त्याला माहिती असेल.
-    मी जाईन तिथे. आणि आता, मी लिथबी बाईंकडे तुझ्यासाठी एखादी खोली आहे का बघतो. तुझ बरच सामान आहे का?
-    खूप नाही. हे टेबल, त्या खुर्च्या, ती खाट; थोडी भांडी-कुंडी. एवढंच.
-    हे न्यायला मी कोणाची तरी व्यवस्था करतो. तुझी तयारी आहे ना?
-    दादा, हा बघ माझा मुलगा आला.
एका थोड्या मोठ्या मुलीच्या हाताला धरून, त्यांचा छोटासा भाचा खोलीत आला. मळक्या सदऱ्यामधल, नाकातून शेंबूड वाहणारं, तोंडात एक बोट घातलेलं ते एवढस मूल, मामाकडे आपले टप्पोरे डोळे बशीएवढे विस्फारून बघत रहात.
कुमालोंनी त्याला उचलून घेतलं, त्याच नाक स्वच्छ पुसलं; त्याचे पापे घेतले, त्याला कुरवाळल.
-    ह्या पोराच्या दृष्टीनी ते खूप बर होईल. चांगला मोकळ्या-खेळत्या हवेत राहील; चांगला शाळेत जाईल.
-    हो, त्याच्या दृष्टीनी ते बर होईल.
-    मी निघतो. बरीच कामं आहेत.
ते बाहेर रस्त्यावर आले. चौकस शेजारी त्यांच्याकडे अगदी उघडपणी टक लावून बघत होते – उम्फुन्डीस, आणि इथे? त्यांनी त्यांच्या मित्राला शोधल, आणि सगळी कहाणी ऐकवली. त्याला विचारलं, त्यांच्या बहिणीला, भाच्याला सामान घेऊन आणायला कुठे मदत मिळेल.
-    चला, निघू या आता आपण. तुमच काम झाल ऐकून बर वाटल.
-    मोठा बोजा उतरला माझ्या मनावरचा. देवा परमेश्वरा, आता दुसरही काम असच यशस्वी होऊ दे.
ते त्या दुपारीच तिला लॉरी घेऊन न्यायला आले. भोचक शेजाऱ्यांची गर्दी जमलीच होती. ते सगळे अगदी मोठ्यांनी खुल्लमखुल्ला ह्या सगळ्या भानगडीची चर्चा करत होते. काहींनी मान्यता व्यक्त केली, तर काहींच्या चेहऱ्यावर ते खास शहरी छद्मी हास्य होत. लॉरी भरून ते निघाले, तेव्हा कुमालोंनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

लिथबी बाईंनी माय-लेकांना त्यांची खोली दाखवली आणि जेवणाची व्यवस्था केली; कुमालो मिशन मध्ये गेले होते. त्या रात्री जेवणाच्या खोलीतच तिघांनी मिळून प्रार्थना केली. कुमालोंच्या आळवणीला त्या दोघींनी आमेन म्हणून पुष्टी दिली. कुमालो स्वतः गेल्या कित्येक वर्षात नव्हते एवढे खुश, लहान मुलासारखे आनंदात होते. जोहानसबर्ग मधला पहिलाच दिवस आणि जमातीची उभारणी पुन्हा सुरु झाली होती; घर आणि माणूस, दोघंही परत उभ राहू बघत होते. 

Comments