नांवात काय आहे?

एक कोणीतरी थोर नाटककार म्हणे म्हणाला 'नावात काय आहे!'. थोरांशी माझं एवढं तंतोतंत एकमत क्वचितच! पण ईश्वरसाक्ष खरं सांगतो, अगदी लहानपणापासून हे माझं मत आहे. आता कायेय, एकतर त्याची नाटकं बऱ्यापैकी चालली, आणि दुसरं म्हणजे तो माझ्यापेक्षा चारेकशे वर्षांनी मोठा आहे - ह्या क्षुल्लक तकदीरच्या गोष्टींचा फायदा घेऊन तो हे वरील विधान बऱ्याचदा स्वतःच्या नांवावर खपवतो हे कानावर आलंय माझ्या. असो.

नांवाला एवढं गौण महत्व असल्याने, ओळख झाल्यावर पुढच्या दहा सेकंदात कोणाही व्यक्तीचे नांव विसरून जाण्याचं माझं कसब लोकविलक्षण आहे. मी माणूसघाणा नाही; पण फक्त नावांशीच माझं गेल्याजन्मीचं काहीतरी वैर आहे. मला त्या व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी, त्यांची सगळी माहिती वर्षानुवर्षं व्यवस्थित लक्षात असते. त्यामुळे मी पुढच्या भेटीत तासनतास त्यांच्याशी गप्पा मारू शकतो. फक्त नंतर 'कोणाशी बोलत बसला होतास एवढा वेळ?' हा अपरिहार्य प्रश्न साशंक नजरेने जेव्हा खाजगीत विचारला जातो, तेव्हा माझ्याकडे त्याचं उत्तर नसतं. 'तो हा ग, परवा (म्हणजे अठ्ठेचाळीस तासापूर्वी नव्हे, भूतकाळात कधीतरी) त्या ह्यांच्याकडे नव्हता का भेटला' - अशी उत्तरं हिचा (म्हणजे माझ्या बायकोचा. तिचं नांव ठेवलंय लिहून इथेच कुठेतरी!) मनस्ताप प्रचंड वाढवतात ह्याची क्लेशकारक जाणीव मला आहे. तिचंही काही चूक आहे असं नाही, बऱ्याचदा लोकांच्या नावांसंबंधी डम्ब शरेड खेळायला तिला वेळ नसतो.

कालपरवाचीच गोष्ट घ्या. ऑफिसला जातांना दररोज ट्रेनमध्ये भेटणारा तो हा कधी नव्हे तो ग्रॉसरी स्टोअरमध्ये भेटला. 'अरे, इकडे कुठे!' वगैरेने सुरुवात होऊन आमच्या गप्पा दहा मिनिटं छान चालल्या होत्या. तेवढ्यात ही शेजारी येऊन उभी राहिली. ह्या अनोळखी बाईची वाट अडवू नये म्हणून त्याने मला हाताला ओढून थोडे बाजूला केले. त्याबरोबर तीही पुन्हा माझ्या बाजूला उभी! ह्यावर त्याच्या (आणि तिच्याही) नजरेत मला स्पष्ट दिसत होते की आता मी ओळख करून देणे अपेक्षित आहे. तसे आम्ही काय दोन डाकू नोटेचे अर्धे तुकडे जुळवून माल एक्सचेंज करण्यासाठी वगैरे भेटत नव्हतो, त्यामुळे माझी हरकत नव्हती ओळख करून द्यायला. फक्त, मला काही केल्या त्याचं नांव आठवत नव्हतं. 'ही अतिशय लंगडी सबब आहे, आणि नांव माहिती नसलेल्या लोकांशी दहादहा मिनिटं गप्पा कशाला मारतोस?' हा गृहमंदीरातील आज सायंकाळच्या प्रवचनाचा विषय असणार ह्याची खात्री होती. शेवटी मी एक अत्यंत चतुर उपाय योजला 'अगं, हा बघ कोण भेटला... ओळखलंस का!'

आणिकसारखी एखादी सूज्ञ स्त्री असती, तर म्हणाली असती 'हो तर! नमस्कार, काय कसं काय! बऱ्याच दिवसांनी...' वगैरे. चांगला छान कात्रज नसता झाला त्याचा? ह्याला खोटं बोलणं म्हणत नाहीत; हे केवळ चांगले वैवाहिक एटीकेट्स आहेत - हे गेली कित्येक वर्षं मी तिला समजावून द्यायचा प्रयत्न करतो आहे!

पण नाही, श्रीमती सत्यवादी म्हणाल्या 'नाही. तू दे ना ओळख करून'.

अनाथांचा वाली परमेश्वर म्हणतात ना, मुळीच खोटं नाही ते! नेमक्या ह्याच क्षणी तो स्त्रीरूप धारण करून, दुरून माझ्या मित्राच्या रोखाने 'अमोल, ओह इथे आहेस होय तू! मी तिकडे... ' अशी वरच्या षड्जात सुरु केलेली आलापी पार खर्जात अर्धवटच सोडत ह्या स्थळी प्रकटला! मी ह्या अमोल हिंटबद्दल साष्टांग लोटांगण घालून माझी कृतज्ञता व्यक्त केली असती; कारण त्या एका शब्दावरून मला अमोलचं संपूर्ण नांव, गांव, तो नोकरी करतो त्या कंपनीचं नांव, त्याच्या बॉसबद्दलच्या तक्रारी सगळं सगळं झटकन आठवलं! पण परमेश्वर जरी असला, तरी त्याने ह्या प्रसंगी स्त्रीरूप धारण केले असल्याने, स्थळ-काळ-सोबत इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन मी माझ्या भावनांना आवरलं, आणि नुसता हात जोडूनच नमस्कार केला!

ओळखीची देवाण घेवाण झाली; 'अरे वा, एरवी ह्याच्या काही केल्या नावं लक्षात रहात नाहीत, आज नवलंच आहे!' अशा अनावश्यक गुपितांबरोबर. ह्यावर परमेश्वर खिदळत म्हणाला 'हॅहॅहॅ, शेक्सपिअर म्हणालाच आहे ना, नावात काय एवढं मोठं!'

आत्ता आठवलं. तो थोर नाटककार म्हटलं ना, त्याचं नांव शेक्सपिअर!

Comments