गजेंद्र अहिरे हे नांव बहुतेक मराठी सिनेप्रेक्षकांना परिचित असेलच. सातत्याने सामाजिक जाणिवेचे, आणि आशयघन सिनेमा करणाऱ्या दिग्दर्शकांपैकी ते एक महत्वाचं नांव म्हणता येईल. सायलेन्स, अनुमती वगैरे त्यांचे गेल्या काही वर्षात गाजलेले सिनेमे; पोस्टकार्ड हा त्यामानाने जुना. मी तो गेल्या वर्षी प्रथम पाहिला होता. तेव्हा मला तो अतिशय आवडला होता. नुकताच तो येथील काही सिनेमाप्रेमी प्रेक्षकांबरोबर पुन्हा एकदा बघायची संधी लाभली. दुसऱ्यांदा पाहतांना तो आणखी जास्त आवडला.
‘पोस्टकार्ड’ ही म्हटलं तर एक प्रकारची फँटसी आहे; थोडीशी गूढ! तीन वरकरणी स्वतंत्र, पण एकमेकात गुंफलेल्या लहान कथांची ती एक मालिका आहे. (सिनेमातल्या) सत्य घटना, आणि रूपकांचा ठळक वापर असलेल्या काल्पनिक गोष्टी ह्यांचं एक फार सुंदर मिश्रण आहे ह्यात. त्या दृष्टीने ह्या सिनेमाचं वेगळेपण बाजारातल्या इतर सिनेमांमध्ये अतिशय उठून दिसणारं, डोळ्यात भरणारं!
एक थोडासा भावुक पोस्टमन आणि त्याची थोडी जास्त भावुक बायको, त्याच्याकडे वाटपासाठी आलेली पोस्टकार्ड्स वाचायला सुरुवात करतात. आणि लवकरच दोघंही ती पत्रं लिहिणाऱ्या पात्रांमध्ये, त्यांच्या भावविश्वामध्ये, त्यांच्या सुखदुःखांमध्ये गुंतत जातात! त्यांच्या अडचणींमध्ये मदत करू पाहतात, वेळप्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊनही. विशेषतः तो पोस्टमन अनुत्तरीत पत्रांवरून, अनुपस्थित पात्रासंबंधी कल्पना रचू लागतो, त्यांना प्रत्यक्ष नजरेसमोर आणू लागतो. त्यांच्या व्यथा समजून घेतो. त्यांचे प्रश्न सोडवायला पहातो; त्यात असफलही होतो. हा त्याचा भावनिक प्रवास पाहणं अतिशय हृदयस्पर्शी, आणि तरीही अतिशय रंजक आहे.
पोस्टमन त्या पत्रलेखकांच्या सुखदुःखांमध्ये फार गुंततो आहे, हे पहिल्या कथेत फार स्पष्टपणे मांडलं आहे. उरलेल्या दोन कथांमध्ये, त्याचं त्या पत्रलेखकांच्या आयुष्यात मिसळून जाणं हा एक कॉमन धागा तर आहेच, पण त्याचबरोबर पहिल्या कथेमधल्या लाकूडफोड्याने प्रेमाने, मन लावून बनवलेला एक मुखवटा हाही दुसरा कॉमन धागा आहे. हा मुखवटा तिन्ही कथांमध्ये प्रवास करतो, जणू त्या पोस्टमनला आपल्याबरोबर ओढून घेऊन येतो. पहिल्या कथेमधला, वखारीमध्ये उभं आयुष्य घालवलेला, ह्या वेठबिगारीमधून सुटकेची वाट बघत थकलेला म्हातारा खरा आहे. कधीच न संपणारं कर्ज चुकवण्यासाठी स्वतःच्या आयुष्यावरच घाव घालत असलेल्या ह्या म्हाताऱ्याने भेटायची आस असलेल्या नातवंडांसाठी खेळणं म्हणून म्हणा, किंवा स्वतःचा एकुलता एक विरंगुळा म्हणून म्हणा, हा मुखवटा कोरला आहे.
ह्या सिनेमामधले लहानलहान सीन्स आणि संवाद अतिशय अर्थपूर्ण आहेत. ते जर चुकवले, तर पुढच्या दोन कथांचा अर्थ वेगळाच लागू शकतो - काही पात्रं रहस्यमय, गूढ – अगदी भुताटकी सुद्धा – वाटू शकतात. ह्या कथांमधली सगळीच पात्रं खरी आहेत, का भूत आहेत, का पोस्टमनच्या कल्पनाविश्वामधली आहेत; ह्या गोष्टींमधलं खरं काय, आणि काल्पनिक काय; पोस्टमनच्या त्या पात्रांमध्ये मिसळून जाण्याचा, त्यांच्या आयुष्यात दखल देण्याचा, काही कदाचित काल्पनिक पात्रांचा उरलेल्या खऱ्या पात्रांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो - हे सर्व प्रेक्षकांना खेळवणारे सुंदर प्रश्नच म्हणता येईल.
ही काही धक्कादायक रहस्यकथा नाही. पण ह्या रूपकसदृश कथेचा प्रत्येक प्रेक्षक आपल्या कल्पनेने वेगळा अर्थ लावू शकतो, म्हणून मला इथे माझा अन्वयार्थ सांगायचा नाही – हा सिनेमा स्वतः पाहणं आणि स्वतःशीच त्याचा अर्थ लावणं हे फार मनोरंजक आहे.
सिनेमाचं दृश्य स्वरूप – फोटोग्राफी, लोकेशन्स, रंगांचा वापर – उल्लेखनीय; अशा अनोख्या सिनेमाला अतिशय पूरक. तीच गोष्ट अभिनेत्या कलाकारांची. ह्या सिनेमाच्या मांडणीमध्ये फार मोजक्या पात्रांवर भर आहे; बऱ्याचशा प्रसंगांमध्ये एका वेळी दोन किंवा तीनच पात्रं पडद्यावर आहेत. त्यामुळे, कलाकारांकडून आशय पोचवण्याची मोठी गरज आणि मागणी होती. ती सर्वच महत्वाच्या कलाकारांनी उत्कृष्टरित्या पूर्ण केली आहे. त्यातही खास उल्लेखनीय म्हणजे (अनुक्रमे) गिरीश कुलकर्णी, सई ताम्हणकर, विभावरी देशपांडे, राधिका आपटे आणि किशोर कदम. गिरीश आणि सईंनी ते पोस्टमन जोडपं अविस्मरणीय रंगवलं आहे. विभावरीचा एका पाच-दहा मिनिटाच्या सीनमधला धक्का आणि शोक अतिशय सुंदर प्रकट झाला आहे; तर राधिकाच्या चेहऱ्यावरची अनंत काळची प्रतीक्षा आणि आर्तता अप्रतिम!
काही थोड्या उण्या बाजू जाणवल्या, त्या म्हणजे एक तर सिनेमाची गती. अर्थातच, अशा तरल भावनाप्रधान कथेमध्ये सनसनाटी, वेगवान घटनांची मुळीच अपेक्षा नाही. पण काही वेळा सिनेमा रेंगाळतो, पुनरावृत्ती करतो किंवा पुढे सरकत नाही असं वाटतं – हे कसं टाळता येईल? दुसरं म्हणजे, राधिका आपटे आणि सुबोध भावे ह्यांच्या प्रेमप्रकरणाची कहाणी; आणि एकंदरीत तिसरी संपूर्ण कथाच, थोडी जास्त सुस्पष्ट हवी होती असं वाटतं. उदा. गिरीश कुलकर्णी राधिकाच्या कोठ्यावर गिऱ्हाईक म्हणून अचानक का जातो ह्याबद्दल आपण प्रेक्षक फक्त तर्कच करू शकतो.
ह्यामधल्या जी एंच्या कथांच्या उल्लेखाप्रमाणेच हा सिनेमा स्वतःही थोडासा गूढ, रूपकात्मक आणि अर्थपूर्ण आहे. सिनेमाची कथा नेहमीच सरधोपट, साठा उत्तरी सुफळ संपन्न असायला पाहिजे ह्या विचाराला थोडा धक्का देणारा आहे. पण बघतांना आणि नंतरही विचार करायला लावणारा आणि तरीही मनोरंजक नक्कीच.
आणि म्हणून मनात राहणारा!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...