लेखक आणि वाचक ह्यांच्यामधलं नातं मला नेहमीच फार अनोखं वाटतं आणि भुरळ पाडतं. लेखनाची प्रक्रिया अतिशय एकाकी असते. लेखक त्याच्या मनाप्रमाणे लिहीत जात असतो; हे लिखाण वाचून बघणारा, कदाचित त्याच्याशी समरस होणारा, कदाचित ते समजून घेणारा वाचक जगात असेल का ह्याची काही खात्री नसतांना देखील!
लेखक एका अनावर ऊर्मीने लिहीत जातो, मुख्यतः त्याची स्वतःची मानसिक गरज म्हणून, कदाचित त्याला स्वतःला वाचावंसं वाटतं, तसं लिखाण मिळवण्यासाठी.
दुसऱ्या टोकाला, वाचक केवळ पुस्तकातले छापील शब्द वाचत असतो. कित्येकदा, लिखाण त्याच्या समकालीन नसते, वातावरण त्याला परिचित नसते – आणि तरीही, वाचक शब्दांचे झिरझिरीत पडदे बाजूला करून, स्थलकालाची सामान्य बंधनं ओलांडून, त्यामागच्या लेखकाच्या विश्वामध्ये प्रवेश करू शकतो, ते वातावरण अनुभवू शकतो. क्वचित एखाद्या सुदैवी लेखक-वाचक मूकसंवादामध्ये, वाचक त्या पुस्तकाच्या जगातच नव्हे, तर लेखकाच्या अंतरंगामध्ये मिसळू शकतो, आपल्या स्वतःच्या मनातल्या विचारांचे तरंग त्या लिखाणामध्ये पाहू शकतो, मनातल्या मनात त्या लेखकाशी बोलू लागतो, प्रश्न विचारू लागतो, धडपडत, पुन्हापुन्हा वाचून उत्तरं शोधू लागतो.
महेश एलकुंचवारांचं 'मौनराग' वाचतांना हे सगळं फार प्रकर्षाने जाणवलं, कारण एक वाचक म्हणून मी स्वतः ते सगळं अनुभवलं. एलकुंचवार हे नांव माझ्या कॉलेजच्या दिवसात, नाटककार म्हणून – विशेषतः प्रायोगिक रंगमंचावर – गाजत होतं. सत्तरच्या दशकामधल्या त्यांच्या काही एकांकिका किंवा नाटकांची नावं कानावरून गेली असली तरी मौनराग हे मी वाचलेलं त्यांचं पहिलंच पुस्तक, तेही अगदी अलीकडे. 'ललित लेखन' ह्या ढोबळ नांवाखाली जाऊ शकेल असं हे पुस्तक. पुस्तकाचं शीर्षक इतकं बिनचूक आणि सुयोग्य, की एका शब्दात त्या पुस्तकाचं स्वरूप उलगडून दाखवणारं. म्हटलं तर ह्या लेखकाच्या आठवणी, नोस्टाल्जिआ, पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या अनेक गोष्टी-घटनांचं मानसिक पृथक्करण वगैरे वगैरे. पण, हा केवळ आंतरिक स्वसंवाद आपल्यासारख्या अनोळखी, त्रयस्थ वाचकाला खिळवून ठेवतो तो लेखकाच्या ते अनुभव शब्दांमधून एवढ्या प्रभावीपणे व्यक्त करण्याच्या अफाट सामर्थ्यामुळे, विचारांच्या प्रगल्भतेमुळे आणि चित्र, नाट्य, संगीत आणि तत्वज्ञान ह्यासारख्या अनेक विषयांमधील जाणकार रसिक टिप्पणीमुळे.
पुस्तकातील 'काळोखाची फुले' ह्या पहिल्याच लेखाची दोन-तीन पाने वाचल्यावरच मला जाणवलं होतं की हे पुस्तक खूप वेगळं आणि जबरदस्त आहे; आता ते पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवणं शक्य नाही. लेखाच्या सुरुवातीच्याच, 'द बर्डन' ह्या पेंटींगच्या अप्रतिम वर्णनाने भारून जाऊन मी मुद्दाम ते पेंटींग नेटवर शोधून पाहिले. चित्र सुंदर आहे, बखोटीला ओझे घेऊन निघालेल्या त्या स्त्रीच्या शारीरिक तपशीलांपेक्षा त्या ओझ्याचा भार, ते वाहून नेण्याचे क्लेश तिच्या चेहऱ्यावर, सभोवतालच्या निर्मनुष्य रखरखटामध्ये फार परिणामकारी दाखवले आहेत इतपत मलाही समजलं; पण एलकुंचवारांचं ह्या चित्रावरचं भाष्य हे 'ज्ञात्याचं पाहणं' म्हणजे काय, किंवा चित्र कसं पहावं ह्याचा जणू वस्तुपाठच! पुढचा सबंध लेख (खरं तर सात लेखांची मालिका) वाचतांना त्यांचे काळोखासंबंधीचे चिंतन – हा काळोख सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा, दुःखाचा, मृत्यूचा, आंधळेपणाचा, अविचाराचा – आणि ह्या चिंतनामध्ये गुंफलेल्या, असंबद्ध वाटू शकतील अशा, नार्सिससपासून ते वेश्याव्यसाय किंवा मनोरुग्ण ते 'रत्नदीपाच्या झुंबरासारखे चमकणारे' काजवे ह्या सर्व फुलांचे वेगवेगळे रंग पाहणं हा एक दिव्य अनुभव आहे.
ही चिंतनात्मक आत्ममग्नता ह्या पुस्तकातील सर्वच लेखांमध्ये फार प्रकर्षाने जाणवते. अतिशय लहान, अजाण वयात, हक्काच्या वाटणाऱ्या आई वडिलांपासून दूर, 'देऊन टाकलेल्या' घरी राहणं आणि मोठं होणं, एकीकडे आयुष्यभर अतृप्त राहिलेली आई वडिलांच्या सहवासाची ओढ आणि दुसरीकडे चुटपुटत्या काही भेटींमध्ये अनुभवलेला अलिप्त त्रयस्थपणा ह्या सगळ्या गुंतवळ्याचं चित्रण, त्याचा अर्थ लावणं हे बऱ्याच लेखात वारंवार आलं आहे. 'गहकूटं विसंगितं' हा लेख तर संपूर्णपणे, लहानपणी दुरावलेल्या घराची मोठेपणी भेट घडल्यावर जुन्या आठवणींमध्ये रमलेला, बुडून गेलेला लेख आहे. ह्या लेखावर आधारित, सचिन खेडेकरांनी सादर केलेला नाट्याविष्कार नुकताच इथे पाहण्याची संधी लाभली होती. खेडेकरांचा अभिनय, आवाजाची फेक, लिखाणाची जाण (नॉट टू मेन्शन, पाठांतर!) हे सगळंच कौतुकास्पद! अत्यंत जुजबी, चार-पाच प्लॅटफॉर्म्सच्या लेव्हल्सच्या वापरामधून एक जुना वाडा, माडीसकट, नजरेसमोर उभा करणारे नेपथ्यही कल्पक. पण तरीही, हा प्रयोग पाहतांना पुन्हा पुन्हा वाटत होतं की हा लेख स्वतःच आपल्या मनाशी, रेंगाळत, थबकत, दोन पॅराग्राफ मागे जाऊन पुन्हा वाचण्यात, थेट लेखकाशी मूक संवाद साधण्यात जे सुख आहे, ते एका त्रयस्थाने - मग तो कितीही उत्कृष्ट अभिनेता असो - ही अशी लेखक-वाचकाची भेट घडवून देण्यात नाही.
हीच आत्ममग्नता 'जातस्य हि धृवो मृत्यू' ह्या लेखामधील आयुष्याचा बराच काळ डोक्यात सावट धरून राहिलेल्या स्वतःच्या मृत्यूच्या विचारांमध्ये आहे, 'मौनराग' मधल्या आपणा सर्वांनाच मिळणाऱ्या अनेक आनंदांविषयीच्या कृतज्ञतेमध्ये, आणि 'पुनर्गमनाय च' मधल्या दुरावलेल्या, परक्या झालेल्या, अबोल आईच्या आठवणींमध्ये आहे. एलकुंचवारांचं मोठेपण हे, की एवढ्या इंटेन्सली पर्सनल गोष्टींबद्दल लिहितानाही त्यांची त्यामागची तटस्थ तत्वचिंतकाची आणि रसिकाची बैठक अढळ राहते. त्यामुळे ह्या लिखाणाचा एक परका वाचकही समरस होऊन आस्वाद घेऊ शकतो, त्यात स्वतःच्या अनुभवांची प्रतिबिंबं बघू शकतो.
मौनरागामधला, एका फार मोठ्या, निपुण गायकाने आळवलेला हा बडा ख्याल! मला तरी ह्या सबंध पुस्तकावर एक काळोखी सावली जाणवली; आणि म्हणूनच कदाचित पुस्तक वाचतांना आणि संपल्यावरही मनात घोळत राहिल्या त्या दुसऱ्याच कोणाच्या ओळी -
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर

Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...