ऍन अमेरिकन मॉंटाज

शुक्रवार, १६ नोव्हेंबर न्यूयॉर्क, न्यूयॉर्क:
मान खाली घालून टाईप करण्यात पार बुडालेल्या नॅन्सीला, तिच्या ऑफिसच्या दाराशी येऊन उभी राहिलेली तिची असिस्टंट दिसलीही नव्हती. तिसऱ्यांदा तिने आणखी जोरात दारावर टकटक केल्यावर कुठे नॅन्सीचं तिच्याकडे लक्ष गेलं. 'एक वाजायला आला आहे. मी बाहेर पडतेच आहे, तुझ्यासाठी काही घेऊन येऊ का?' नॅन्सीने अतिशय कृतज्ञतेने तिच्याकडे बघून म्हटले, 'आणशील प्लीज? नेहमीचंच, सूप आणि सॅलड? उद्यापासून माझी सुटी सुरु होते आहे. सकाळची फ्लाईट आहे त्यामुळे आज जाण्यापूर्वी हे सगळे रिपोर्ट्स पुरे करायलाच हवेत. बाराला कुठे सकाळच्या अपॉईंटमेंट्स संपल्या, अजून दोन आहेत दुपारी. एकीकडे त्याची कहाणी ऐकतच खावं लागणार बहुतेक आज मला!' असिस्टंट गोड हसून म्हणाली 'नो वरीज! मी येते अर्ध्या तासातच.'
तिला थँक्स म्हणायच्या आतच नॅन्सीचा फोन वाजला. 'हॅलो?', ओह, हा तो गेल्या आठवड्यातला पेशंट! 'नो, आय एम एक्सट्रीमली सॉरी; पण आज शक्यच नाही, पॅक्ड बिझी... नाही, मी उद्यापासून दहा दिवस व्हेकेशनवर आहे, बॅक इन डिसेंबर! .. नाही, नाही; तुम्ही डॉक्टर केलींची अपॉइंटमेंट घ्या, आज नाहीतर सोमवारची. मी सगळं पेपरवर्क त्यांना पाठवून देते,... थँक्यू सो मच फॉर द काईन्ड वर्ड्स. पण मला खात्री आहे की डॉक्टर केली सुद्धा तश्शीच मदत करतील तुम्हाला. फार अनुभवी आहेत ते. आणि मधल्या काळात त्या सांगितलेल्या गोळ्या घेत रहा नेमाने. ओके? बाय, अँड ऑल द बेस्ट. एव्हरीथिंग विल बी फाईन.'
अगदीच घायकुतीला आल्यासारखा वाटत होता आवाजावरून तरी. नंतर विसरायला नको म्हणून नॅन्सीने त्याच्या रिसेन्ट सेशन्सच्या नोट्स डॉक्टर केलींना इमेल करायला घेतल्या. त्यामधील तिचं स्वतःचंच निरीक्षण वाचून ती एक सेकंद थबकली... पण काही इलाज नाही, आज ह्याला बघणं शक्यच नाही, वेळच कुठे आहे तेवढा! नॅन्सीने झटकन इमेल सब्जेक्टमध्ये सुरुवातीला 'अर्जन्ट' घातलं आणि सेंड बटन दाबलं.
* * * *

शनिवार १७ नोव्हेंबर - बोलिंग ग्रीन, केंटकी:
'हेय जेसन! सारा बोलतेय. होप तुला माझा परवाचा मेसेज मिळाला असेल. थॅंक्सगिविंगला येण्याबद्दल काहीच नक्की कळवलं नाहीस? कदाचित आयत्यावेळी येऊन सरप्राईज देणार असशील. आणि दॅट्स ओके टू! शुअर लुकिंग फॉरवर्ड टू सी यू धिस इयर. गेल्या आठवड्यातल्या आपल्या बोलण्यावर विचार केलास का? चीअर अप, किडो! यायला जमणार नसलं तरी ठीक आहे, पण मला फोन कर. मला तुझ्याशी बोलायचंच आहे.'
साराने कपाळाला आठ्या घालत फोन ठेवला. बोलायची इच्छा कितीही असली तरी हा भेटायला हवा ना फोनवर. आन्सरिंग मशीनवर मेसेजमध्ये आणखी किती स्पष्ट बोलणार? थँक्सगिविंगच्या आमंत्रणाच्या आठवणीचा त्याला एक टेक्स्ट मेसेजही पाठवून दिला.
कुठे गेलाय कोण जाणे; सगळं धड असू दे!
* * * *

सोमवार, १९ नोव्हेंबर – न्यूयॉर्क, न्यूयॉर्क:
सोमवारी आणि गुरुवारी न्यूयॉर्क शहरामध्ये रस्त्याच्या एका बाजूला वाहने पार्क करायला बंदी असते. ह्या सोमवारी बाहेर कडाक्याची थंडी, आणि थोडंसं बर्फही भुरभुरत होतं. जिमी आधीच वैतागलेला होता, नेमक्या असल्या दिवशी बेकायदेशीररित्या पार्क केलेल्या गाड्यांना तिकीट देण्याचं काम त्याच्यावर आलं ह्याबद्दल. न्यूयॉर्क पोलिसच्या कामातला हा सगळ्यात रटाळ भाग! आणि एवढं जणू पुरे नाही, म्हणून तनीषाला नेमकं आजच बरं नव्हतं; तिच्याही प्रिसिंक्टची जबाबदारी जिमीवर! नशीब गुरुवारी थॅंक्सगिविंगच्या सुटीमुळे आजचा एक दिवस निभावला, की ह्या आठवड्याची कटकट संपली. बऱ्याच रस्त्यांवरून नुसती बघत बघत चक्कर मारली तरी पुरेसं होतं. त्यातून दोन-चार नाठाळ गाड्या सापडल्या त्यांना तिकीट देऊन झालं होतं, म्हणजे आजचा कोटा पूर्ण झाला. हो, उगाच सार्जंटची किटकिट नको. दोन्ही प्रिसिंक्टस चकरा मारून पोलीस स्टेशनवर परतायच्या मार्गावर असतांना त्याला ती गाडी दिसली - ग्रे रंगाची टोयोटा, चुकीच्या बाजूला उभी असलेली. जिमीने पटकन लायसेन्स प्लेट्स कॉम्प्युटरवर तपासल्या; ही रेंटल कार होती. त्याच्या शेजारी गाडी थांबवून जिमीने पॅसेंजर साईडची काच खाली केली. टोयोटाच्या काळ्या काचेतून त्याला ड्रायव्हर सीटवरचा माणूस अस्पष्ट दिसत होता, बहुतेक फोनवर बोलत असावा असं त्याच्या हाताच्या पोझिशनवरून वाटलं. क्षणभर जिमीला वाटलं, खाली उतरून त्या ड्रायव्हरला समज द्यावी. पण त्याने विचार केला जाऊ दे, ड्रायव्हर आहे गाडीत, बाहेरगावचा असेल; फोन करण्यासाठी थांबवली असेल, झाला की जाईल निघून. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरच्या रहदारीत बर्फ तसंही कधी साठत नाही; त्यामुळे बर्फ साफ करणाऱ्या ट्रकला अडथळा व्हायचा प्रश्न नाही. जिमी नुसता उघड्या काचेकडे झुकून ओरडला 'हेय बडी, गेट मूव्हिंग. कान्ट पार्क ऑन धिस साईड टुडे!' - आणि पुढे निघून गेला.
टोयोटाच्या खिडकीची काचही खाली सरकली नव्हती.
* * * 

गुरुवार, २२ नोव्हेंबर - बोलिंग ग्रीन, केंटकी:
खुर्चीत बसल्याक्षणी साराला जाणवलं ती खरंच किती दमली होती. गेले तीन-चार तास सतत तिचं काम चालू होतं. पण समोर सुंदर सजवलेल्या जेवणाच्या टेबलाकडे बघून ती स्वतःवरच खुश झाली. घरभर नुसते स्वैपाकाचे आणि  बेकिंगचे गोडगोड वास पसरले होते. पाहुणे यायच्या आत सगळं नक्कीच तयार असणार. आता कुठे ती शांतपणे शॉवर घेऊन तयार होऊ शकेल.
आणखी दोन तासात लोक आलेच. लोक म्हणजे, तसे घरातलेच; मार्क, ज्युली आणि त्यांची तीन मुलं! मार्क तिचा भाऊ; इथे बोलिंग ग्रीनमध्येच राहतो. गेल्या कित्येक वर्षांची प्रथाच होती, थॅंक्सगिविंगला तिच्याकडे जमायची. पूर्वी तिचा सगळ्यात धाकटा भाऊ जेसनही येत असे. पण एकदा न्यू यॉर्कला स्थायिक झाल्यावर त्याचं बहीण-भावाकडे येणं कमीच होत गेलं.
थॅंक्सगिविंगला, आणि एरवी वर्षातून एखाददा फोनवर जेसनशी बोलणं होत असे तेवढंच! आजही जेवण उरकलं की 'जेसनला फोन' हा कार्यक्रम होईलच नेहमीप्रमाणे. तेच नेहमीचं संभाषण. मग पुरुष आणि मुलं पाय ताणून फुटबॉल बघायला मोकळे; आणि बायका भांडी आवरायला. हा थॅंक्सगिविंगचा संपूर्ण दिवस कसा एखाद्या नाटकासारखा साचेबद्ध आणि ठाशीव आखलेला; आणि म्हणून बोअरिंग! छे, उगीच काहीतरी – म्हणत साराने डोक्यातून ते विचार झटकून टाकले. तिला होतं कौतुक आणि उत्साह, थॅंक्सगिविंग मनापासून साजरा करायचा. आज नवल म्हणजे मार्कनेच आल्याआल्या जेसनचा विषय काढला.
सारा: कुठे आहे कोणास ठाऊक! आत्ताच्या आत्ता गेल्या आठवड्यात दोन-तीनदा फोन केला होता; पण भेटला नाही. व्हॉइसमेल ठेवला, टेक्स्ट पाठवले होते, कशाचंच उत्तर नाही. बघितले तरी की नाही कोणास ठाऊक!
मार्क: भटकत असेल कुठेतरी! ह्या न्यूयॉर्कवाल्या हायफाय लोकांचं सगळंच वेगळं. आपल्यासारख्या फॅमिली गेटटुगेदर मध्ये त्यांना काही रस नसतो. ती एमिली अजून आहे, का मोडलं ते लग्न?
सारा: अरे भाऊ आहे ना तो तुझा सुद्धा? कसं बोलतोस! त्यांच्या डिव्होर्सचं ते प्रकरण चालूच आहे. तीनचार महिन्यापूर्वी बोलले होते तेव्हा खूप डाऊन वाटत होता. नोकरीचं काही जमत नव्हतं, मुलाच्या कस्टडीबद्दलही काहीतरी भांडणं चाललेली होती.
मार्क: म्हणजे, नोकरीही गेली? आठवतंय, मोठं मिरवून दाखवत होता! कधी नव्हे ते स्वतःच्या घरी तिकडे लग्नाच्या ऍनिव्हर्सरीला बोलावलं होतं. त्याच्या ऑफिसातल्या त्या फ्याशनेबल लोकांसमोर केवढ्या बाता मारत होता, एक्झेक्युटिव्ह व्ही पी का काहीतरी होता, ना? कधी गेलो होतो ग आपण, बरीच वर्षं झाली आता. 
मार्क आणि जेसनच्यात लहानपणापासूनच फार प्रेम नव्हतं, हे लक्षात घेऊन साराने विषय बदलला. दोन आठवड्यापूर्वीच्या संभाषणात जेसन केवढा निराश वाटला, आयुष्याला कंटाळल्याविषयी, सगळं चुकतंच गेल्याबद्दल काय बोलत होता, ह्याचा तिने उल्लेखही केला नाही. एकतर ह्या थॅंक्सगिविंगच्या मूडचा विचका नको; आणि मार्क असल्या आत्महत्येच्या वगैरे 'बायकी' विचारांची टिंगलच करणार तिला माहिती होतं. 'ह्या न्यूयॉर्कच्या लक्षाधीशांना झालंय काय आत्महत्या करायला! फालतू खुळं नाहीतर!' ही त्याची प्रतिक्रिया ती ठामपणे सांगू शकली असती. तिने फक्त पटकन टेक्स्ट मेसेजेस तपासले - तिचा मेसेज जेसनने पाहिल्याचीही काही खूण नव्हती. आता फोन करण्यातही अर्थ नाही; तो घरी नसावा.
पुढचे तीनचार तास खाण्यापिण्या-खिदळण्याच्या मागे सारा मनामध्ये बेचैनच होती.
* * * *

गुरुवार, २२ नोव्हेंबर – न्यूयॉर्क, न्यूयॉर्क:
अप्पर ईस्ट साईडवरच्या त्या फूड किचनमधून अँडी बाहेर पडला; गरम कॉफी आणि ब्रेकफास्ट पोटात गेल्यावर त्याला थोडं ताजतवानं वाटत होतं. आत्ता त्याला मनस्वी गरज होती ती एक झुरका मारायची - त्याने दोघातिघांकडे 'देता का एखादा क्वार्टर?' म्हणून विचारायचा प्रयत्न केला. पण तिथून चालणारे लोकं ज्या झपाट्याने नाकावर हात धरून दूर निघून जात होते, ते पाहिल्यावर त्याला संशय आला की रेस्ट रूममधल्या साबणाने त्याने तोंड किती खसाखसा धुतलं असलं, तरीही त्याच्या जुन्यापुराण्या कपड्यांचा कुबट वास हटत नव्हता बहुतेक. हुं:, गेले खड्ड्यात! अँडीने त्या छानछान कपडे घालून फिरणाऱ्या लोकांना चार शेलक्या शिव्या हासडल्या, बोटभर वाढलेली दाढी खाजवली आणि स्वतःशीच हातवारे करत तो चालू लागला.
अँडी बेघर होता. इथेच दोन गल्ल्या टाकून पलीकडे असलेल्या फ्लायओव्हरखाली राहायचा. हा न्यूयॉर्कमधील अत्यंत महागडा रेसिडेन्शिअल भाग आहे ह्याच्याशी त्याला काही देणं घेणं नव्हतं, त्याला फक्त ह्या भागात दोन-तीन चर्चची फूड किचन्स जवळपास आहेत आणि पोलीस कमी त्रास देतात एवढी सोयच दिसत होती. दिवसा शुद्धीवर असतांना तो चालत पार थिएटर डिस्ट्रिक्ट, टाइम्स स्क्वेअर वगैरेपर्यंत जायचा. बरोबरच्या गोधडीवर बसून भीक मागायचा. 'व्हिएटनाम व्हेटला मदत करा' अशा अर्थाचा एक बोर्ड त्याने करून घेतला होता. तो एका काठीवर लटकवून बसून रहायचा. मध्येच मूड लागल्यास बरोबरच्या पोतडीतून एका बाजा काढून त्यावर कसले तरी करुण सूर वाजवायचा. येणारे जाणारे क्वचित एखादा डॉलर त्याच्या दिशेने फेकायचे.
फूड किचनमध्ये सिगारेट, दारू किंवा ड्रग्स ह्या महत्वाच्या गोष्टी मिळत नसल्यामुळे अँडीला पैशाची थोडी गरज भासत असे. भिकेच्या अपुऱ्या कमाईला जोडधंदा म्हणून तो कचऱ्याच्या पेटीत टाकलेले ऍल्युमिनम कॅन गोळा करत असे. प्रत्येक कॅनमागे पाच पैसे मिळायचे - दिवस बरा निघाला तर पाचेक डॉलर्स सुद्धा जमा व्हायचे. आत्ताही तो शेजारच्याच अपार्टमेंट बिल्डिंगसमोरच्या गार्बेज बिनमध्ये डोकावून रिकामे कॅन्स धुंडाळू लागला. अचानक मागून आलेल्या 'डाय, यू क्रीप! आम गॉन्ना किल यू डेड धिस टाइम!' ह्या गर्जनेने थरारून तो जागच्या जागी गोठला. दोन सेकंदाच्या शांततेनंतर त्याने मागे वळून पाहिले.
बिल्डींगमधून बाहेर पडत असलेला चार-पाच वर्षाचा एक मुलगा हातातल्या स्मार्टफोनच्या 'नाईट ऑफ झॉम्बीज' गेममधल्या कोणा पात्रावर मोठमोठ्याने ओरडत होता. फोनवर नजर खिळलेला तो मुलगा फुटपाथ पार करून सरळ रस्त्यावरच्या वाहत्या रहदारीमध्ये चालत गेलाही असता, नशिबाने त्याआधीच फुटपाथला लागून उभ्या असलेल्या टोयोटाला अडखळून तो पडला. आता कुठे त्याच्या मागून दहा वेळा केसांमधून हात फिरवत चालत असलेली ती बाई लांबूनच ओरडली 'हे जस्टीन, वॉच व्हेअर यू गोईन!'.
रस्त्यात आडव्या झालेल्या जस्टीनला हात द्यायला अँडी त्याच्या जवळ गेला, पण तो पोरगा स्वतःच धडपडत उभा राहिला आणि घाबरून आईकडे पळत गेला. डोळे बारीक करून, चेहरा वेडावाकडा करून परत परत तिला मोठमोठ्याने सांगू लागला किती घाणेरडा वास येत होता. आईने स्वतःच्या तोंडावर हात धरत त्याला दबलेल्या आवाजात काहीतरी सांगितले.
ह्या टोयोटामध्ये चोरण्यासारखं काही असेल का, चोरायला जमेल का ह्याचा विचार करत असलेल्या अँडीला काचेतून, हातात फोन धरून बसलेला ड्रायव्हर दिसला. जस्टीनच्या आईचे जेमतेम वर उचललेले बोट त्याच्या दिशेने होते हेही त्याने पाहिले.
खांदे उडवून तो दुसऱ्या गार्बेज बिन्स धुंडाळायच्या कामाला लागला.
* * *

सोमवार, २६ नोव्हेंबर, न्यूयॉर्क, न्यूयॉर्क
तनिषाने फोन जवळजवळ आदळला आणि हवेत हात उडवून हताशपणे ओरडली 'जीझ! काय पीडा आहे ही बया. सोडायलाच तयार नाही!' जिमीने घड्याळाकडे पाहिलं; पाच वाजत आले होते. तनिषा गेला अर्धा-पाऊण तास फोनवर बोलत होती. बोलत असतांना तिने कितीही प्रोफेशनल कर्टसीचा भाव आणला, तरी ऐकत असतांना फोन म्यूट करून तिचे जे चेहरे, आविर्भाव आणि हातवारे चालले होते, त्यावरून ती किती वैतागली होती त्याला समजलं होतं. तिला सहानुभूती दाखवायला तो म्हणाला 'लेट मी गेस! मिस सारा, फ्रॉम केंटकी?'. तनिषाने उत्तरादाखल नुसतेच डोळे फिरवले.
'थॅंक्सगिविंगच्या संध्याकाळपासून ही बया मला सोडत नाहीय. कोण तिचा भाऊ जेसन ह्या भागात रहातो, तो म्हणे गेला आठवडाभर हिच्या फोन कॉल्सना आणि टेक्स्ट मेसेजेसना उत्तर देत नाहीय. मी म्हटलं तिला; ‘पोलीस काय करणार, त्याला त्याची बहीण नसेल आवडत तर’! म्हणे, नाही एव्हांना तो फोन केल्याशिवाय राहिला नसता. हिला वाटतंय तो मिसिंग आहे – हरवला आहे, किंवा त्याचं काही बरंवाईट झालं असावं. शुक्रवारी मी त्याच्या बिल्डिंगमध्ये जाऊनही आले. पंधरा मिनिटं बेल वाजवत होते, कोणी दार उघडायला तयार नाही. पुन्हा ह्या हायफाय लोकांचे शेजारीही तसलेच! एकतर कोणी घरात नसतात; आणि असले तरी त्यांना जेसन ब्रिग्स म्हणून आपला कोणी शेजारी आहे हेही माहिती नसतं. त्याला शेवटी कधी बघितलं होतं काय विचारणार कपाळ! मेलबॉक्समध्ये ह्याच्या पत्रांचा बराच ढिगारा दिसत होता. बिल्डिंगच्या सेक्युरिटी गार्डला विचारलं, तो म्हणतो गेल्या आठवड्यात कधीतरी शेवटचं पाहिलं होतं. बिल्डिंगच्या पार्किंग लॉटमध्ये ह्याची गाडीही नाही कुठे. गेटकीपर म्हणाला, जेसन गेल्या शनिवारीच गाडी घेऊन बाहेर गेला होता, तो परत आलेला नाही. कुठे गेला आहे कोणालाच माहिती नाही; ह्या शहरात तरी आहे का नाही काय माहिती! मग काय, मी फॉर्मल मिसिंग पर्सन रिपोर्ट भरला, आणि ई-मेल केला तिला. म्हटलं सही स्कॅन करून पाठव. आणखी आत्ता काय करणार ना?'
जांभई आवरत जिमी म्हणाला 'खरंय! तुला जमलं तेवढं तू केलंस.' ह्यातला बराचसा भाग त्याने तनिषाकडून गेल्या दोनचार दिवसात वेळोवेळी ऐकला होता. ही कोण सारा पुन्हापुन्हा फोन करत होती हे त्याने ऐकलं होतं. पण एकतर तो तनिषाशी सहमत होता, की ह्या केंटकीमधल्या गावठाण लोकांना नसतात उद्योग, त्यांना कल्पना तरी आहे का न्यूयॉर्कसारख्या शहरात पोलिसांच्या मागे किती कामं आणि कटकटी असतात. भाऊ फोन करत नाही म्हणून त्याच्यामागे शोधत फिरायला वेळ नसतो त्यांच्याकडे. दुसरं म्हणजे त्याला आता रेंजर्सच्या आईस हॉकी गेमला जायला उशीर होत होता. तनिषाच्या खांद्यावर दोन्ही हात फिरवत, थोडा मसाज करून, तिला थोडं शांत करून तो बाहेर पडला.
* * *

बुधवार, २८ नोव्हेंबर - न्यूयॉर्क, न्यूयॉर्क
न्यूयॉर्क शहराच्या सॅनिटेशन डिपार्टमेंटमध्ये, रस्त्यात मरून पडलेली जनावरे, किंवा तत्सम घाण साफ करणारे एक स्पेशल युनिट आहे. एवढ्या असंख्य द्विपाद जनावरांच्या दाटीवाटीच्या ह्या शहरामध्ये चतुष्पाद जनावरे क्वचितच रस्त्यावर दिसतात. ह्या युनिटचे मुख्य काम न्यूयॉर्क सबवेच्या ट्रॅक्सवर राज्य करणाऱ्या मोठाल्या उंदीर आणि घुशींचा नायनाट करणे हेच असते. फारच क्वचित एखादा अडाणी, न्यूयॉर्क शहर बघायला आलेला बावळट स्कंक भरधाव वेगाने चाललेल्या टॅक्सीच्या मार्गात आडवा येण्याची जुर्रत करतो आणि ह्या घोर पातकाचं देहान्त प्रायश्चित्त तात्काळ भोगतो. त्याच्या महाभयानक दुर्गंधीमुळे ताबडतोब ह्या स्पेशल सॅनिटेशन युनिटला एकाएकी शेकडो फोन येतात.
सकाळी सकाळी तनिषाच्या डेस्कवरचा फोन वाजल्याबरोबर जिमीनेच हसतहसत तिला डोळ्याने खूण केली - 'माहित्येय कोणाचा फोन असणार' अशा अर्थाने. तनिषाने कपाळाला आठ्या घालून कॉलर आय डी पाहिला. ती जिमीला म्हणाली 'नो, आपल्या मैत्रिणीचा नाही. सॅनिटेशन डिपार्टमेंट मधल्या कोणाचातरी आहे.'; आणि फोनवर बोलू लागली '... अप्पर ईस्ट साईड? हो, आमचाच प्रिसिंक्ट आहे तो. ... हो, माहिती आहे ती बिल्डिंग. ओह, स्ट्रीटच; पूर्ण बंद? काय झालं काय? ... हो, हो; राईट अवे! शुअर!' जिमीकडे वळून म्हणाली, 'चला, ड्यूटी कॉल्स! एक सबंध स्ट्रीट पूर्ण बंद करायची आहे, फर्स्ट आणि सेकंड अव्हेन्यूच्या मध्ये. रस्त्यात सांगते तुला बाकीच्या डिटेल्स'.
* * *

गार्बेज बिनमध्ये वाकून बघत असलेला अँडी पोलीस सायरनच्या आवाजाने दचकला. एकदम चार पोलीस गाड्या, त्यांच्याबरोबरच अँब्युलन्स, ईएमटी, हॅझमॅटवाले आणि नॅशनल कार रेंटलचा टो-ट्रक सुद्धा! काय चाललंय काय? ह्या भागात अशी आणि एवढी मोठी वरात क्वचितच दिसते. कॅन शोधण्याचं महत्वाचं काम सोडून अँडीही इतर अनेक बघ्यांसारखा मान उंचावून पहायला लागला. फूड किचनच्या शेजारच्याच बिल्डिंगबाहेर सॅनिटेशन ट्रक भर रस्त्यात कधीपासून उभा होताच. ही स्ट्रीट वन-वे असल्याने, पोलीस फर्स्ट अव्हेन्यूवरच रोड ब्लॉक्स उभे करत होते, रस्त्यातल्या वाहनांना आणि लोकांना हटवत होते. सॅनिटेशन आणि पोलिसवाल्यांनी मिळून एका टोयोटापासून शंभर फुटाच्या परिघाभोवती पिवळी 'क्राईम सीन – डू नॉट क्रॉस' ची टेप लावायला सुरुवात केली होती. अँडीने नीरसपणे खांदे उडवले आणि आत्ताच भीक मागत बसावं, का आधी थोडे कॅन्स मिळतात का पहावं ह्याचा विचार करू लागला.
पुढच्या पाच दहा मिनिटात, रस्त्यावरची बघ्यांची गर्दी एकाएकी ओहोटी लागावी तशी पांगली. बहुतेकांनी आपापली नाकं मुठीत गच्चं दाबून धरली होती. अँडीला एवढ्या अंतरावर सुद्धा दुर्गंधी असह्य होऊन त्याने वासाच्या दिशेने नजर टाकली. पोलीसनी ड्रायव्हरशेजारचे दार उघडले होते.. वास नक्की त्याच गाडीतून येत होता. गाडीच्या भोवताली भिंत करून उभे राहिलेले, स्पेससूटसारखा पोशाख केलेले हॅझमॅटवाले, आणि नाकातोंडावर मास्क घातलेले इएमटीचे लोक मिळून गाडीमधून एका माणसाला ओढून बाहेर काढत होते. त्यांच्या हालचालींवरून, त्या माणसाला बाहेर काढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या त्यांच्या मेहनतीवरुनच दूरवरच्या बघ्यांनासुद्धा एकूण परिस्थितीचा अंदाज आलेला होता. नर्सने अत्यंत सफाईने बरोबर आणलेल्या प्लॅस्टिक बॅगेचा झिपर उघडला. दोघा इतर नर्सच्या मदतीने त्यांना कसंबसं तो देह त्या पिशवीत भरण्यात आणि झिप बंद करण्यात यश आलं. झिपर बंद करण्यापूर्वी त्यांनी त्या माणसाच्या हातातला फोन, आणि खिशातील वॉलेट, किल्ली वगैरे गोष्टी ताब्यात घेतल्या. ती बॅग घेऊन अँब्युलन्स भरधाव जवळच्या लेनॉक्स हिल हॉस्पिटलच्या मॉर्गकडे निघाली. एव्हाना, तोंडावरून मास्क आणि हातात ग्लोव्हस घातलेल्या चार पोलिसांनी मिळून गाडीतील कागदपत्रे आणि इतर सर्व वस्तू भराभरा जवळच्या एव्हिडन्स बॅग्समध्ये जमा केल्या. शेवटची बॅग बंद करता करता जिमीला, पॅसेंजर सीट आणि दरवाजा ह्यामधल्या खोबणीत अडकलेली ती छोटीशी बाटली दिसली. वरचं लेबल बघताक्षणी विस्फारल्या डोळ्यांनी मान हलवत त्याने ती पटकन बॅगेत टाकली. ह्या दुर्गंधीपासून त्याला लवकरात लवकर दूर जायचं होतं.
टो-ट्रक त्या टोयोटाला घेऊन तिथून निघून गेल्यावर सॅनिटेशनवाल्यानी त्या सर्व परिसरात कसले तरी फवारे मारले; एकंदरीत दुर्गंधी कमी होत असल्याचं जाणवलं तरी.
स्ट्रीट अजूनही बंदच होती, पोलिसही जात नव्हते. पण मेन शो आता संपला एवढ्याच विचाराने तिथे उभा राहून हे सर्व पहात असलेला रिकामटेकडा अँडी सुद्धा निघाला. वळताना त्याने पाहिलं, एक पोलीस त्या परवाच्या बाईकडून कसल्या तरी कागदांवर सह्या घेत होता. बाई मोठमोठ्याने तणतणत होती 'एवढी भयानक घटना, आणि आज चौथ्यांदा फोन केल्यावर शेवटी तुम्हाला वेळ झाला हे निस्तरायला? केवढी दुर्गंधी येत होती, किती तक्रारी केल्या आम्ही सगळ्यांनी! ‘मेलेली घूस आहे’ असं सांगून, नुसते फवारे मारून गेले निघून. खरंच, रसातळाला चाललंय हे शहर!' पोलिसाने मख्खपणे हातातल्या कागदांवर नजर टाकली, आवश्यक त्या सह्या आहेत ना पाहिलं, आणि एक तोंडदेखलं थँक्यू म्हणून तो निघून गेला. तिच्या बाजूला उभ्या असलेल्या छोट्या जस्टीनची नजर आणि बोटं दोन्हीही हातातल्या सेलफोनच्या गेमपासून जराही ढळलेली नव्हती.
* * * 

शुक्रवार, ३० नोव्हेंबर - न्यूयॉर्क, न्यूयॉर्क
फ्यूनरल उरकलं. जेसनच्या ऑफिसातले थोडे लोक होते, एमिली आणि त्यांची दोन्ही मुलं होती, तिचे आई-वडील होते. फादर शेवटच्या यूलॉजीमध्ये नेहमीचं 'एवढ्या तरुण वयात...', 'देवाची करणी... अगम्य... ', 'कायमची शांती' वगैरे सगळं नेहमीच्याच निर्विकारपणे बोलले. उपस्थितांनीही वेळोवेळी आपापल्या कोरड्या डोळ्यांना रुमालाच्या कडा टोचून ते थोडे ओले केले. जेसनची मुलं मात्र थोडी बावरलेली दिसत होती - एवढ्या लहान वयात त्यांना सगळंच काही समजत नसावं. एमिलीच्या हट्टाखातर फ्यूनरल न्यू यॉर्कमध्येच करायचं ठरलं होतं; पण ती स्वतः सुद्धा बऱ्याचशा दगडी चेहऱ्यानेच सगळं पहात होती, आलेल्यांशी बोलत होती. घटस्फोट अजून कायद्याने पूर्ण झाला नसल्याने ती अजूनही मिसेस जेसन ब्रिग्सच होती.
साराला खूप उचंबळून आलं होतं. मनातली अनामिक भिती खरी ठरली, जेव्हा अनेक प्रयत्नांनंतर शेवटी एकदा त्या न्यू यॉर्क पोलीस ऑफिसरचा तिला फोन आला तेव्हा! मग घाईघाईने एमिलीचा फोन शोधणं, तिच्याशी फ्यूनरलबद्दल हुज्जत, मार्कचा एवढ्या एका गोष्टीसाठी न्यू यॉर्कला यायला नकार (विमानाचं तिकीट कोण काढणार, वरती राहायचा खर्च; जेसनने एक पैसाही ठेवला नाही आपल्यासाठी!), जेफ्रीची मनधरणी (होता खरा खर्च!) - एक ना दोन, अनेक लहानसहान मनःस्ताप! हे सगळं सहन करून सारा इथपर्यंत पोचली होती; एकदा जेसनला शेवटचं बघण्यासाठी. त्याच्या परिस्थतीत, ती जेमतेम त्याचा चेहरा बघू शकली - आणि मग मात्र तिचा बांध कोसळला होता; त्या चेहऱ्यावर अतीव दुःखाच्या रेषा आता कायमच्या कोरलेल्या होत्या.
सर्व्हिस संपल्यावर, एमिलीशी चार कोरडे औपचारिक शब्द बोलून, साराने जेसनच्या मुलांना पोटाशी धरलं, थोपटलं आणि एकदा डोळे भरून बघितलं. त्यांना बाय म्हणून, जेफ्री आणि ती चर्चमधूनच सरळ विमानतळावर जायला निघाले. फ्लाईटला होता अजून बराच वेळ; पण इथे थांबून तरी काय करणार.
टॅक्सी भरधाव सुरु झाली. साराचे हुंदके आता थांबले होते. तिने पर्समधून सेलफोन बाहेर काढला. त्या न्यू यॉर्क पोलीस ऑफिसर बाईने जेसनच्या फोनवरचा साराला उद्देशून अर्धवट लिहिलेला, पाठवू न शकलेला टेक्स्ट आजच तिला पाठवला होता. सारा वाचू लागली.
“हेय सिस! थँक्स फॉर द इन्व्हाईट. मला नाही वाटत ह्याही वर्षी मी येऊ शकेन. नाही; नेहमीसारखं 'खूप बिझी आहे, वेळ नाही' हे कारण नाही. म्हटलं तर आता चिक्कार वेळ आहे. पण माझ्या मनःस्थितीमध्ये तुला, आणि विशेषतः मार्कला, भेटायची इच्छाच नाही. मला लहानपणापासूनच न्यू यॉर्कचं, फास्ट लेनमधल्या आयुष्याचं फार वेड होतं तुला माहितीच आहे. धडपड करून मी ते मिळवलंच, निदान असं मला वाटलं. मार्कचा कधीच विश्वास नाही बसणार, पण मी खरंच श्रीमंतीच्या उच्च स्तरामध्ये, मल्टी मिलीयनेअर वर्गामध्ये, प्रवेश मिळवला, तेथे वावरलो, निदान कागदोपत्री तरी! आपण तिघांनी लहानपणी जे आयुष्य पाहिलं आणि अनुभवलं, त्यापासून कित्येक योजनं मी दूर येऊन पोचलो होतो. शिखरावर पोचण्यात अडचण तीच असते. फार दमछाक होते चढतांना; शिखरावरती आपण एकटे असतो, आणि घसरगुंडी फार स्टीप असते. गेल्या एकदोन वर्षात माझे काही निर्णय चुकले, काही फासे उलटे पडत गेले आणि त्यात जेव्हा एमिलीने तिच्या बाबांच्या नादी लागून मला सोडून देण्याचा निर्णय घेतला, मुलांना घेऊन जाण्याची धमकी दिली तेव्हा मी पारच खचलो. गाड्या, घर, बिझनेस सगळं तिच्या हवाली करूनही तिचं समाधान नव्हतं. शेवटी केंटकीमधल्या एका शेतकरी बापाच्या पोराने आकाशात एवढी भरारी घेण्याची स्वप्नं बाळगावी ह्याचीच मला लाज वाटू लागली. एवढ्या ठिकाणची एवढी कर्जं डोक्यावर, आणि ती फेडता येण्याची काही आशा नाही, ह्या परिस्थितीत मला जगण्यात काहीच अर्थ दिसत नाही. इथे मॅनहॅटनमध्ये ३००० स्केवर फुटांचं पेन्टहाऊस अपार्टमेंट आहे माझं, पण तिथे असलं काही केलं तर नंतर विकलं जायला त्रास होईल; म्हणून ही रेंटल कार!
तुला आठवतं लहानपणी शेतातल्या उंदरांना मारायला आणलेलं रॅट पॉयझन आपल्याला खेळतांना सापडलं होतं? ते खूप खूप कडू असतं सांगितलं होतंस तू मला. मी विचारलं 'तुला कसं माहिती' आणि तुझ्याकडे उत्तर नव्हतं म्हणून मी तुला खोटारडी म्हटलं? वेल, आता मी तुला खात्रीने सांगू शकतो – तू खरंच बोलत होतीस! पाच मिनिटं झाली...
खांद्यावर एकाएकी भार जाणवल्यामुळे जेफ्री दचकून जागा झाला. हमसाहमशी रडत असलेल्या साराचं डोकं त्याच्या खांद्यावर होतं. ड्रायव्हर समोरच्या रस्त्यावर डोळे खिळवून झटपट बदलणाऱ्या ट्रॅफिक लाईट्स मधून, बाजूने त्यांच्यासारख्याच भन्नाट वेगाने जाणाऱ्या असंख्य वाहनांमधून आणि उंदरांसारख्या मध्येमध्ये लिडबिडणाऱ्या माणसांमधून अचाट वेगाने टॅक्सी हाणत होता. भोवतालचं हे गजबजलेलं अजस्त्र जीवघेणं शहर त्यांच्यापासून मागे पळत होतं. 
जेफ्रीने निमूटपणे साराला जवळ ओढलं आणि हळुवारपणे तो तिला थोपटू लागला.

Comments