पुनवेची रात - १



पौर्णिमा अगदी एखाद दोन दिवसावर आलेली होती. जमखेड बुद्रुक येथील गढी आणि सभोवतालच्या जिल्ह्याची सेवा करणाऱ्या चंद्राने जवळजवळ पूर्ण गोलाकार धारण केला होता. जमखेडच्या जहागीरदारांच्या नवव्या पिढीचे वारसदार विश्वनाथराव सरदेशमुखांची राहती वास्तू असलेली मुल्हेर गढी एव्हाना काही तास चांदण्यात न्हाऊन निघाली होती. ती चंद्राची रुपेरी किरणे गढीच्या बुरुजांवर आणि तटबंदीवर विहरत होती, नील महालामध्ये चेहऱ्याला क्रीम लावत बसलेल्या विश्वनाथरावांच्या भगिनी चंद्रभागाबाई मुधोळकर ह्यांच्याकडे आदराने डोकावून पहात होती आणि शेजारच्या लाल महालातील उघड्या खिडकीतून बेधडक आत घुसल्यावर, चंद्रापेक्षाही सुंदर अशा प्रियंका मुधोळकर हिच्याकडे पाहून लज्जेने चूर होत होती. चंद्रभागाबाईंची सुपुत्री प्रियंका लाल महालातील आपल्या शय्येवर, लवकरच येणाऱ्या चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाला कुठचे बरं दागिने घालावेत ह्या चिंतेने व्याकूळ होऊन दुःखात मग्न होऊन आढ्याकडे टक लावून बघत पहुडली होती. तिच्यासारख्या जातीच्या सुंदरीला काहीही शोभते हे कितीही खरे असले, तरी ही गोष्ट प्रियंकाच्या डोक्यात शिरवून देण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागले असते.

आणखी थोडे दूर गेल्यावर, चंद्रप्रकाशात दिसत होते ते स्टेशनवरून येणाऱ्या बग्गीमधून उतरणारे जहागीरदार साहेबांचे मेहुणे, कर्नल व्यंकोजीराव मुधोळकर. तेथूनही आणखी थोडे पुढे गेल्यास अस्पष्ट दिसत होते, ते दस्तुरखुद्द नववे जहागीरदार विश्वनाथराव. जहागीरदार, त्यांच्या मुदपाकखान्यानाबाहेरील बागेच्या पलीकडे असलेल्या त्यांच्या आवडत्या म्हशीच्या आलिशान गोठ्याच्या बांधावर शरीर लपेटून पडले होते. त्यांच्या लाडक्या सम्राज्ञी ह्या म्हशीने लागोपाठ गेली दोन वर्षे मौजे निंबाड तालुक्याच्या 'लठ्ठ म्हैस' स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता!

एवढ्या उमद्या जनावराच्या सहवासात ह्या तिच्या थोड्या भ्रमिष्ट आणि भोळसर मालकाला मिळणारा ब्रह्मानंद अजून पूर्णावस्थेला पोचला नव्हता, कारण काळोख पडल्यामुळे, सम्राज्ञी गोठ्याच्या मागच्या वळचणीच्या भागात जाऊन सुस्तावली होती. त्यामुळे त्यांच्या नजरेला ती दिसत नव्हती; परंतु तिच्या खोल गंभीर श्वासाचा संथ रव मात्र त्यांचे कानी पडत होता. एखाद्या दरबारी राजगायकाला राग आळवतांना ऐकावे तसे विश्वनाथराव सम्राज्ञीच्या श्वासोच्छवासाची ती लय आकंठ प्राशन करत होते. अशा प्रसंगी, लाल धाग्याच्या विडीच्या उग्र करपट धुराच्या वासाने त्यांना एकाएकी जाणीव झाली की ते एकटे नसावे. चष्मा सावरता सावरता, ते शेजारी सैनिकी थाटातल्या कर्नलना उभे पाहून थक्क झाले.

कर्नलना शेजारी पाहून थक्क होण्याचे कारण असे, की जहागीरदारांना माहिती होते की कर्नल आदल्याच दिवशी जमखेड बुद्रुक भूमिपुत्रांच्या वार्षिक मेजवानी सोहळ्याप्रीत्यर्थ पुण्याला गेले होते. त्यांना सदेह येथे, मुल्हेर गढीच्या भूमीवर पाहून, जहागीरदारांच्या अतितल्लख मनामध्ये एक तर्क तरळला, की ते बहुधा परत आले असावेत. अर्थात, तीच अचूक नेमकी वस्तुस्थिती होती.

'आह, व्यंकोजी!' नम्रपणे स्वतःचा गोठ्याच्या भिंतीवर गुंडाळलेला देह सरळ करत ते म्हणाले.

लांबच्या प्रवासानंतर आखडलेले पाय मोकळे करण्यासाठी चक्कर मारायला निघालेल्या कर्नलची, निसर्गाच्या सान्निध्यात आपण एकटेच असू अशी माफक अपेक्षा होती. अचानक, ज्याला ते रस्त्याकडेचे जुन्या कपड्यांचे गाठोडे समजले होते त्या ढिगाऱ्यातून एक जिताजागता सासरचा मनुष्य उभा राहिला ह्या धक्क्यातून सावरत कर्नल जवळजवळ ओरडलेच!

'हे भगवान! विश्वनाथ तू! काय करतोयस हितं यवड्या रातीला?'

आप्तेष्टमित्रांमध्ये आतलंबाहेरचं करण्याचा जहागीरदारांचा स्वभावच नव्हता. त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं, की ते त्यांच्या म्हशीला ऐकत होते. ह्या वाक्याने त्यांचा श्रोता एखाद्या जुन्या जखमेमधून कळ यावी असे विव्हळला. गेली कित्येक वर्षे जहागीरदारांच्या प्रत्येक भेटीमध्ये, कर्नलची खात्री पटत चालली होती, की ज्या घराण्यातील स्त्री त्यांनी पत्नी म्हणून स्वीकारली, त्याचा हा कुटुंबप्रमुख डोक्याने अंमळ अधू आहे. पण ह्या वेळी त्या कुटुंबप्रमुखाने वेडसरपणाच्या दिशेने निश्चितच नेहमीपेक्षा जास्त प्रगती केली होती.

'तुमच्या म्हशीला आयकत हुता?' कर्नल भारलेल्या आवाजात म्हणाले, स्वतःच्याच मनात अजून त्या वाक्याचा अर्थ शोधत. 'या, आत चला आन झोपी जावा गुमान. न्हायतर कमरेत परत उसण भरेल सकाळलाच!'

Comments