काही काळ शांतपणे, आपापल्या विचारात मग्न, दोघेही जण घराकडे चालले. मग अचानक, अशा प्रसंगी नेहमी होते त्याप्रमाणे, दोघेही नेमके एकाच वेळी बोलते झाले. कर्नल म्हणाले काल रात्री त्यांची आनंदबरोबर गाठ पडली आणि जहागीरदार विचारत होते काल पुण्यात असतांना तुम्ही शांताला भेटलात का.
कर्नल बुचकळ्यात पडले. 'शांता?'
'ओह, शांता म्हणजे, आपलं नर्मदा! नर्मदा म्हणायचं होतं मला. माझी बहीण नर्मदा हो! नांव विसरलो मी तिचं क्षणभर.'
'नर्मदा? छ्या छ्या, पुन्याला मजा कराया ग्येलो आसतांना मी नर्मदाला भेटण्यात येळ फुकट न्हाय घालवत.'
हा विचार जहागीरदारांना संपूर्णपणे मान्य होता. त्यांना जाणवले, त्यांचा मेहुणा माणसांच्या बाबतीत चांगला चोखंदळ जाणकार होता.
'अर्थातच! नक्कीच नाही. कोणीच असा वेळ कशाला फुकट घालवेल!' ते घाईघाईने म्हणाले. 'मी हे विचारणंच चुकीचं होतं. आता परवाच मी नर्मदाला लिहिलं होतं, माझ्या सम्राज्ञीचं पोर्ट्रेट रंगवायला एखादा चांगला चित्रकार सुचव. तर एवढं उध्दटासारखं उत्तर लिहिलंय तिने. म्हणे, आचरटपणा करू नकोस. अरे देवा माझ्या, काय एकेक भयानक बायका आहेत आमच्या घराण्यातल्या! नर्मदा एक ती तसली, पण कृष्णा बघा, नाहीतर गोदावरी. एकाहून एक नग आहेत, आणि हो, चंद्रभागा!'
'माज्यी बायकू!' कर्नल थोडे ताठ्याने म्हणाले.
'हो तर!' जहागीरदार त्यांचा हात सहानुभूतीने थोपटत म्हणाले. 'आता, मी का बरं विचारलं तुम्हाला नर्मदाला भेटलात का. काहीतरी कारण होतं. हां, आठवलं. आज सकाळीच चंद्रभागा सांगत होती, नर्मदाचं तिला पत्र आलंय, आणि ती फार काळजीत आहे.'
'का?'
'ओह, भयंकर काळजीत आहे.'
'कशाबद्दल?'
'काही कल्पना नाही.’
'चंद्री बोलली नाही काही, कशाबद्दल वगैरे?'
'नाही असं कसं; बोलली तर!' काय फालतू प्रश्न विचारताय अशा थाटात जहागीरदारसाहेब म्हणाले. 'तिने संपूर्ण हकीकत नीट समजावून सांगितली; पण त्याचा तपशील मात्र मी पूर्णपणे विसरलो आहे. सशांबद्दल काहीतरी होतं एवढंच आठवतंय.'
'सशांबद्दल?'
'असं चंद्रभागा म्हणाली.'
'नर्मदाला सशांबद्दल काय काळजी असणारे डोंबल!'
'हुं:?' आता पाणी थोडं खोल होतंय हे जाणवून जहागीरदार थोडे गोंधळले. पण क्षणभरात त्यांचा चेहरा उजळला. 'कदाचित ते तिच्या फुलबागेतली फुलं खात असतील?'
कर्नल तुच्छतेने खाकरले.
'तुमची भईन नर्मदा ऱ्हाते कोथरुडमदल्या सोसैटीत दुसऱ्या मजल्यावरच्या ब्लॉकमदी. त्या लोकांकडं सोताच्या फुलबागा नसत्यात.'
'हुं:, मग कठीण आहे बुवा समजणं हे ससे कुठून आले ह्या प्रकरणात! मला एक सांगा... ' हा सशांचा अप्रिय विषय बाजूला ढकलत ते म्हणाले 'तुम्ही मगाशी आनंदाचं पत्र आलं होतं असं म्हणालातसं वाटलं मला.'
'मी म्हनलं, त्यो माला भ्येटला हुता.'
'भेटला?'
'हां, ज्यिमखान्यावर. योक टाईट पंटरबी होता त्येच्या संगतीला.'
'टाईट पंटर?
कर्नल साहेबांचा स्वभाव मुळात फार सहनशील नव्हता; आणि त्यात ह्या प्रत्येक वाक्याला, आवाज घुमावा तसे समोरच्याने पुन्हा तेच शब्द उगाळण्याचा खेळ त्यांच्या सहनशक्तीचा अंत बघत होता.
'हां, टाईट पंटर! भरमसाट दारू ढोसलेला योक पोट्टा! तुमाला समजतं ना टाईट पंटर मंजी काय त्ये?'
'ओ हो हो! टाईट पंटर! अर्थात, आता आलं लक्षात. पण तो आनंद नसणार व्यंकोजी! छे, छे आनंद नक्कीच नाही; मुळीच नाही! दुसरा कोणी तरी असेल.'
कर्नलनी धीराने ओठ गच्च आवळून घेतले; दुसऱ्या एखाद्याने दात रगडले असते.
'आनंदच व्हता तो. मी सांगतुय तुमाला. आता आनंदाला कसा वळखनार नाय मी! काय म्हनून आनंद नसेल तो?'
'कारण तो दिल्लीला गेलाय.'
'पन त्यो न्हाई आता दिल्लीत.'
'आहे तर!' जहागीरदार ठामपणे म्हणाले 'तुम्हाला आठवत नाही? त्या कुठल्या सिंधी पोरीशी आनंदने लग्न केलं. बिस्किटांचा व्यापार करणाऱ्या तिच्या बापाने त्याला तिकडे दिल्लीत नोकरी दिली आणि हा गेला तिकडे.'
'आनंद पुन्यामधी परतल्याला काही आठवडे उलटून गेले.'
'अरे देवा!'
'त्याच्या सासरेबुवांनी त्याला म्हाराष्ट्रात त्येंच्या धंद्याचा इस्तार करण्यासाठी पाठवला हाये.'
पुन्हा एकदा जहागीरदारांनी त्यांच्या देवाला साद घातली. त्यांचे शेंडेफळ, आनंदराव सरदेशमुख कोणत्याही धंद्याचा कोठेही विस्तार करू शकेल ह्यावर त्यांचा काडीमात्र विश्वास नव्हता. त्यांच्या ह्या अंतिम अपत्याच्या सहवासात कित्येक वर्षे व्यतीत केल्यानंतर, त्यांचे ठाम मत होते की त्याला खायची इच्छा झाल्यावर तोंड उघडण्याइतपत बुद्धिमत्ता होती, पण त्यापलीकडे मात्र फार जास्त नव्हती.
'त्येची बायकू बी संगट आल्येय, पन ती सध्या मुंबैत हाये. आनंदा उद्या हिकडं येनाराय.'
जहागीरदारांना विजेचा सौम्य झटका बसल्याप्रमाणे त्यांची गात्रे क्षणमात्र थरारली आणि मग त्यांचा उभा देह एकाएकी ताठर झाला. गावाकडल्या जमीनदार जहागीरदार वर्गातल्या इतर अनेकांप्रमाणे विश्वनाथरावांनाही, निष्ठुर दैवाने पदरात टाकलेल्या त्यांच्या अपत्यांविषयी फारसा जिव्हाळा नव्हता. आनंदाला तोंडात कायमची एक महागडी शिग्रेट धरून, एखाद्या विमनस्क मेंढरासारखं मुल्हेर गढीच्या आसमंतात वावरतांना पाहूनच विश्वनाथरावांच्या सुखाला ग्रहण लागत असे.
'इथे येतोय? आनंदा?' बधिर झालेल्या त्या भयग्रस्त बापाच्या मुखातून प्रश्न आला. 'पण तो फार काळ राहणार नसेल, नाही का?' एक केविलवाणी आशा अजूनही तरळत होती.
'फार काळ? काही महीन्ये तरी निश्चित! खरं तर कायमचाच येतो बोलला मला. आन त्यो टाईट पंटर, त्यो बी येतोय आनंदासंग. चला, झोपा आता. म्या चाललू.' एवढं बोलून, जहागीरदारांच्या मनःशांतीला चूड लावली ह्या सात्विक समाधानामध्ये कर्नल मुधोळकर नील महालाच्या दिशेने खुशीत चालू लागले. त्यांच्या पत्नी, एव्हाना तोंडाला क्रीम लावण्याचा कार्यक्रम आटोपून आता शय्येवर कुठल्या कादंबरीची पाने चाळत पहुडल्या होत्या.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...