गणिताच्या आवडीमुळे, मी सायन्स शाखेकडे जाणार हे नक्की होते. त्या काळी सायन्सच्या विद्यार्थ्यांनाही पहिली दोन वर्षे इंग्लिश आणि दुसरी एक भाषा हे विषय शिकायलाच लागत. सायन्सचे विद्यार्थी केवळ पाट्या टाकण्यासाठी हे भाषा विषय शिकतात अशी शिक्षकांची श्रद्धा असे; आणि भाषा वगैरे शिकल्याने आपली 'सायंटिफिक इमेज' डागाळेल असा विद्यार्थ्यांमध्ये गाढ विश्वास असे. त्यामुळे, ह्या विषयांच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या मनात, आणि विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांच्या मनात एक म्युच्युअल हेट्रेड असे.
एफ वाय ला आम्हाला व्यंकटेश माडगूळकरांचं 'बनगरवाडी' मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये होतं. शिकवणाऱ्या प्राध्यापिका मराठीतल्या नामवंत ('कुंजातील किंकाळी' ह्या गोग्गोड रहस्यकथेच्या!) लेखिका होत्या. मी बनगरवाडी आधीच वाचलेलं होतं; त्याच्या पार प्रेमात पडलेलो होतो. त्यातून, बाईंना मूळ विषय सोडून बऱ्याच टँजेन्शिअल गोष्टींबद्दल तासतास बोलायची हौस होती; त्यामुळे वर्गात माझी झोप पुरी करून घेण्याकडे माझा कल असे. एकदा असाच झोपेच्या काठावर असतांना त्यांचं 'उत्तम कथेसाठी संघर्ष अत्यंत महत्वाचा! संघर्षाखेरीज चांगले साहित्य होऊच शकत नाही' हे क्रांतिकारक विधान ऐकून खाडकन जागा झालो. हात वर केला; 'तुम्हाला बनगरवाडी उत्तम साहित्यात मोडते असे वाटते का'? लक्षात घ्या, आजकाल जी ए, ग्रेस किंवा नेमाडे ही नुसती नावं काढल्याक्षणी जसे झटाझट मत्थे टेकतात तसेच त्या काळी बनगरवाडीचे स्थान होते. त्यामुळे नाही म्हणायची बाईंची प्राज्ञाच नव्हती. 'अर्थातच! बनगरवाडी हा अक्षरवाङ्मयाचा एक उत्कृष्ट नमुना आहे... ' वगैरे वगैरे तीन मिनिटांचं एक मुखोद्गत भाषण त्यांनी पूर्ण केल्यानंतर मी विचारलं 'पण त्यात कुठे आहे लक्षणीय असा काही संघर्ष?'. बाईंनी माझ्याकडे झोपडपट्टीतल्या मुलाने ऋग्वेदातल्या ऋचांबद्दल प्रश्न विचारावा अशा महदाश्चर्याने आणि तुच्छतेने दीर्घकाळ पाहिलं (कदाचित उत्तर जुळवत असतील) आणि म्हणाल्या 'अर्थातच आहे. त्या मास्तराने अंजीला चोळी शिवून आणणे, नंतरचा गैरसमज हा संघर्षच आहे ना!'. मी निमूटपणे पुस्तक चाळू लागलो. सुमारे सव्वाशे पानांच्या पुस्तकामधल्या दोन-चार पानांवर असलेल्या त्या प्रसंगाला कथेतला महत्वाचा संघर्ष म्हणणाऱ्या त्या बाईंचे खूप कौतुक वाटले! त्यांना बनगरवाडीमधल्या धनगर समाजजीवन, त्या मास्तराच्या अनोख्या अनुभवांचे जिवंत चित्रण; त्या माणसांची अप्रतिम व्यक्तिचित्रणे; वाचकाला कथानकामध्ये गुंतवून घेण्याची विलक्षण शैली ह्यासगळ्यापेक्षा त्या एका प्रसंगातल्या छोट्याशा संघर्षामुळे हे पुस्तक 'अक्षर वाङ्मय' ठरते असे वाटले ह्याचा मोठा अचंबा वाटला. पण त्या लेखिका होत्या; मी निव्वळ विद्यार्थी, तो सुद्धा सायन्स शाखेचा.
पुढच्या वर्षी, मराठीतील एक नामवंत टीकाकार बाई आम्हाला मराठी शिकवत होत्या. त्यावर्षीचे पुस्तक होते कोल्हटकरांचे 'सुदाम्याचे पोहे'! हे पुस्तक मी पूर्वी वाचलेले नव्हते. बाईंनी हे पुस्तक विनोदी आहे, हे रहस्य वर्षभर प्राणापलीकडे जपून, लेक्चरांमधून आम्हाला त्याचा सुगावा लागू दिला नव्हता. एकतर त्यांच्या प्रवचनांमधले बरेच शब्द मराठी असावेत असा केवळ संशय, वाक्यातील काही क्रियापदांमुळे आम्हाला येत असे. पण त्या शब्दांचा प्रत्यक्ष अर्थ समजत नसल्यामुळे विश्वास कसा ठेवणार? त्यामुळे परीक्षेच्या चार दिवस आधी जेव्हा मी ते पुस्तक वाचायला घेतले तेव्हा वाचतांना नकळत हळूहळू हसू यायला लागल्यावर धक्काच बसला!
त्याच वर्षी इंग्रजीसाठी आम्हाला 'Cry, the beloved country' ही माझ्या मते एक अप्रतिम कादंबरी अभ्यासाला लावली होती. वंशद्वेषाच्या काळातील, दक्षिण आफ्रिकेमधील एका लहानशा गावातल्या काळ्या पाद्रीबाबांच्या आयुष्यातील घटनांवरील ही एक अतिशय तरल, हळुवार आणि तरीही वंशद्वेषाच्या कल्पनांवर भेदक आणि जोरदार प्रहार करणारी फार सुंदर कादंबरी आहे. शिकवायला होते, मराठीतील एक नामवंत कवी. ते स्वतः निरीश्वरवादी पुरोगामी असल्यामुळे कादंबरीतील पाद्रीबाबांच्या श्रद्धाळूपणावर आणि बायबलमधील वचनांच्या उल्लेखांवर ते तुटून पडत. ह्यातली आणखी मोठी गंमत म्हणजे, सरांच्या मराठी कवितांमध्ये येशू ख्रिस्ताच्या आयुष्यामधले आणि बायबलमधले अनेक उल्लेख किंवा संदर्भ असतात. त्यामुळे त्या कविता खरे तर सामान्य मराठी वाचकाला दुर्बोध वाटू शकतील.
कॉलेजच्या दोन वर्षात मराठी आणि इंग्रजी शिक्षकांच्या ज्ञानाचे एवढे महापूर येऊन सुद्धा माझ्या वाचनाच्या वेडाची लव्हाळी वाचली ही देवाजीचीच कृपा!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...