करोना - ए बेडटाईम स्टोरी

बायोलॉजी, मेडिसीन वगैरे अभ्यासाच्या विषयांमध्ये मला काहीही रस नाही; कधीच नव्हता. एक प्रकारचा मेंटल ब्लॉकच म्हणाना! माझ्या मुलाला ह्या विषयांची फार आवड आहे म्हणून तो डॉक्टर झाला. (हे प्रेम त्याने नक्की आईकडून घेतलं असणार! त्याला द्यायला माझ्याकडे पुरेसं नव्हतं). मात्र, मला कुतूहल म्हणून पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळवायची, माहिती करून घ्यायची आवड आहे आणि मुलाला समजावून सांगण्याची आवड आणि हातोटी आहे. त्यामुळे आमची फोन संभाषणं बऱ्याचदा खूप मनोरंजक असतात - माझ्यासाठी तरी.
तो ह्यूस्टनमध्ये आहे, इतर राज्यांच्या तुलनेत सुदैवाने तिथे अजून करोनाचा प्रादुर्भाव फार जोरात नाही. हा करोना व्हायरस मोठा विचित्र आहे! थोड्या मोजक्या गोष्टी सोडल्या, तर ह्याच्या प्रसारासंबंधी निश्चित अशा काही पॅटर्न्स नाहीत. आणि म्हणूनच त्यावर नियंत्रण आणणं एवढं कठीण आहे. ह्यावरून काल रात्री बरंच मोठं संभाषण झालं. मुद्दा होता, की ह्या व्हायरसचा प्रसार काही ठिकाणी आश्चर्यकारकरित्या कमी प्रमाणात आहे; उदा. भारत आणि आफ्रिका खंड. ह्याचं श्रेय त्या देशांच्या वेळीच घेतलेल्या सावधानतेला; का ह्या व्हायरसच्याच वेगवेगळ्या जाती असतील, किंवा त्याच्या प्रसारामध्ये वांशिक फरकांचाही हात असेल? आफ्रिकेचं उदाहरण घेऊ - एकीकडे, अमेरिकेतील आफ्रिकन-अमेरिकन समुदायामध्ये ह्या रोगाचा प्रसार, आणि त्याच्या बळींचं प्रमाण खूप जास्त दिसतं; पण सुदैवाने आफ्रिका खंडासारख्या अतीलोकसंख्येच्या प्रदेशामध्ये, जेथे चिनी नागरिकांची बरीच ये-जा होती, जेथे सार्वजनिक वैद्यकीय सोयींची कमतरता गृहीत धरली जाते; तेथेही करोनाचा प्रसार कमी दिसतो. एकदा सध्याची धुमश्चक्री संपली, की हा अभ्यास करण्यासारखा विषय आहे.
मग अर्थातच पुढचा मुद्दा होता, व्हायरस शरीरावर हल्ला कसा करतो, आणि त्याला कशा प्रकारे रोखता येतं. ह्याक्षणी, मुलाने त्याच्या अमेरिकन संस्कृतीशी इमान राखून, 'तो व्हायरॉलॉजिस्ट किंवा इम्युनॉलॉजिस्ट नाही, केवळ माझ्यापेक्षा जास्तीच्या वैद्यकीय ज्ञानावर तो पुढील माहिती देत आहे' वगैरे बऱ्याच वैधानिक चेतावन्या देऊन पुढे बोलायला सुरुवात केली. व्हायरस हा तर एक 'निर्जीव' प्रोटीन मॉलेक्युल असतो. त्याला स्वतःचा डी एन ए असतो, पण त्याच्याकडे पुनरुत्पादनाची काहीच सोय नसते. होस्ट बॉडीशिवाय तो निष्क्रिय असतो. योग्य ती होस्ट बॉडी मिळाली, की तो पेशींमध्ये शिरकाव करून घेतो आणि त्या पेशींच्या जननप्रक्रियेचा स्वतःसाठी वापर करून घेऊन प्रचंड झपाट्याने वाढत जातो आणि इतर पेशींवर हल्ला करतो; आणि शेवटी होस्ट बॉडी - रुग्ण - मरू शकते.
ह्याक्षणी मी म्हटलं, मूर्खच आहे तो व्हायरस; ही तर सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीला मारण्याची गोष्ट! मुलगा म्हणाला, 'मूर्ख' शब्दाला जाणीवपूर्वक, विचारपूर्वक कृत्यांच्या संदर्भात काही अर्थ आहे. इथे हा एक निर्जीव केमिकल्सचा गोळा, एक प्रोटीन मॉलेक्यूल - त्याला कसला आलाय शहाणपणा आणि मूर्खपणा?
मी म्हटलं, मग शरीराची प्रतिकारशक्ती, त्या पांढऱ्या पेशी, त्यांचं काय? इतर पेशींनाही स्वतःचा बचाव करण्याचं काहीच साधन नसतं का? त्या का नाही ह्या व्हायरसला पेशीत शिरण्यापासून थांबवत? मुलगा म्हणाला, पेशी आणि जिवाणू एकमेकांशी केमिकल सिग्नल्सच्या सांकेतिक भाषेत बोलतात. 'शत्रू का मित्र' टाईप! 'मित्र' असल्याचा सिग्नल मिळाल्याशिवाय पेशींच्या तटबंदीमधून आत प्रवेश मिळत नाही. म्हणून सध्या एक अंदाज असा आहे, की व्हायरस बहुधा खोटा सिग्नल देऊन आत प्रवेश मिळवत असावा. मी म्हटलं, बघ, म्हणजे त्या व्हायरसला एवढी अक्कल आहे होस्ट बॉडीजना - शरीरातल्या पेशींना - कसं फसवायचं, आत प्रवेश कसा मिळवायचा ह्याची! आणि एवढा अट्टाहास कशासाठी, तर पुनरुत्पादनासाठी, स्वतःची संख्या वाढवण्यासाठी! मग ह्याला निर्जीव केमिकल्सचा निरुद्देश गोळा कसं म्हणता येईल?
मग संभाषण नेहमीप्रमाणे इंटेलिजन्स म्हणजे काय, कुठच्या क्षणी एक निर्जीव केमिकल्सचा गोळा 'जिवंत' होतो, 'प्राण' कधी फुंकले जातात एका रासायनिक पुंजक्यामध्ये? ह्या सगळ्या निव्वळ अपरिहार्य आणि निरर्थक रासायनिक प्रक्रिया आहेत, का ह्याला काही उद्देश, दिशा आहे? ह्यावर आलं.
मुलगा म्हणाला, बाबा कुठच्याही विषयावरून तू नेहमी इथेच कसा पोचतोस? मला माझं काम पूर्ण करायला हवंय आत्ता. तू आता झोप!
(मी त्याला लहानपणी रोज रात्री गोष्ट सांगत असतांना तो गोष्ट लांबवण्यासाठी काहीतरी शंका काढत राहायचा आणि मी कंटाळून ऑफिसचं काम अपुरं राहिलंय, तू आता झोप असं सांगत असे.)

Comments