संपूर्ण शाकाहारी कुटुंबात जन्मलेल्या शाकाहारी मुलाने, लहानपणापासूनच भाज्यांच्या बाबतीत एवढे चोखंदळ असणे (हा शब्दप्रयोग माझा; 'नखरे बाळगणे' हे इतर संबंधितांचे वाक्ताडन!) म्हणजे चक्क पाण्यात राहून माशांशी वैर करण्यागतच! अगदी लहानपणचा 'पानात वाढलंय ते खायचं, नाहीतर खायला फक्त मार मिळेल' हा काळ सोडल्यावर मी ह्या भाज्यांबद्दलच्या नावडी उघडपणे व्यक्त करायला सुरुवात केली होती. कुठल्याही गोष्टीबद्दलचं खरं प्रेम व्यक्त करण्यासाठी आवडींएवढ्याच त्यातल्या नावडीही महत्वाच्या; असं माझं ठाम मत आहे. त्यात माणसाची खरी पारख दिसून येते. सगळ्यालाच छानछान म्हणणारे बऱ्याच वेळा भोंदू, संधीसाधू किंवा अत्यंत नीरस असतात. विशेषतः खाण्याच्या बाबतीत सगळंच आवडत असेल, तर त्याला खवैय्या नाही म्हणत, खादाड म्हणतात. म्हणून, विविक्षित आवडींबरोबर स्पष्ट नावडीही तेवढ्याच महत्वाच्या.
तर, भाज्यांमध्ये मी माझ्यापुरती वर्गवारी केलेली आहे. म्हणजे, कांदे आणि बटाटे ह्या भक्कम आधारस्तंभ भाज्यांच्या जोडीला टॉमेटो, कॉलीफ्लॉवर, सिमला मिरची, फरसबी आणि कोबी ह्या खऱ्या टॉप क्लास भाज्या. वाटाणा हा कांदा आणि बटाट्याच्या जोडीने माणसाला लागलेला एक दैवी शोध आहे. कुठल्याही भाजीबरोबर तो मिळूनमिसळून गुणाने नांदतो. उरलेल्या बहुतांश भाज्या मी कित्येकदा नाईलाज म्हणून, किंवा सशर्त खातो; काही मात्र माझ्यासारख्या क्षमाशील, उदारमनाच्या माणसाला देखील खाणं शक्य होत नाही.
गाजर, काकडी (आणि अगदी अत्यावश्यक असेल तरच) बीट वगैरे कोशिंबिरीसाठी छान आहेत. जेव्हा फरसबी नसेल तेव्हा गवार किंवा घेवडा कदाचित चालून जातात; पण ह्या दोन्हीमध्ये दोरे फार असतात, आणि ते काढण्यात (हो, अमेरिकेतील नवऱ्यांच्या कपाळी भांडी घासण्याबरोबर हेही काम लिहिलेलं आहे!) जन्म जातो. इथे घेवडा तेवढा चांगला मिळतही नाही. त्यामुळे ह्या भाज्या 'च्यालसे' सदरात असूनही मी ह्या भाज्यांच्या आग्रहाला त्यांच्याच दोऱ्यांमध्ये गुंडाळून ठेवतो.
पुढचा स्तर आहे, एखाद्या ठराविक पद्धतीने केल्यावरच घशाखाली उतरू शकणाऱ्या भाज्यांचा. ह्यामधील कलाकार आहेत - भेंडी, वांगी आणि बाजारात अगदी काहीच न मिळाल्यास तोंडली. भेंडीच्या टेक्सचरवरून, एव्हाना घासून बुळबुळीत झालेले बरेच विनोद असले, तरी आत्ता त्यावर न घसरता मी एवढंच म्हणेन की, ताकातली भेंडी ही मराठी आणि भिंडी मसाला ही पंजाबी आवृत्ती त्यातल्या त्यात चालून जाते. मी भारतात असतांना वांग्याची भाजी अजिबात खात नसे - मुख्य कारण म्हणजे त्याच्या प्रत्येक फोडीला लागलेले प्रत्येकी सदुसष्ट हजार बियांचे भरघोस घड! भेंडीचा बुळबुळीतपणा प्रयत्नांती तरी घालवता येतो; वांगेका क्या करोगे, मिलॉर्ड? इथली वांगी त्या मानाने बरी असतात. त्यातल्या त्यात, लहानशी भरली (म्हणजे काळा मसाला, भाजलेलं खोबरं, तीळ, दाण्याचं कूट अशा प्रचंड संपत्तीच्या लाचलुचपतीखाली झाकून टाकलेली) वांगी किंवा वांग्याचं भरीत (मुख्यतः त्याच्या भाजक्या धुरकट चवीसाठी) मला आता आवडायला लागली आहेत. तसंच चिन्यांकडे मिळणारं चायनीज एगप्लँट - सोया सॉस आणि करपवलेली लसूण (किंवा आलं) हे दीनदलित वांग्यांचाही उद्धार करू शकणारं एक भन्नाट कॉम्बिनेशन आहे, तोंडली मला आवडत नाहीत ती त्याच्या टेक्स्चरमुळे, आणि त्यातल्या बियांमुळे. ही भाजी शक्यतो खाऊच नये असं माझं स्वच्छ मत आहे; पण हे संकट येणारच असेल तर थोडं जास्त तेल आणि जास्त गोडा मसाला घालून बघा; कधीकधी घशाखाली उतरू शकतं.
कुठलीही भाजी सुसह्य करायच्या हमखास यशस्वी ट्रिका म्हणजे वरून लिंबू, कोथिंबीर किंवा (बहुतांश पदार्थामध्ये उपयुक्त) दाण्याचं कूट घालणे! ह्या तीन गोष्टींमध्ये बऱ्याच भाज्यांच्या त्रुटी झाकण्याचं सामर्थ्य आहे. अर्थातच ह्यामध्ये ओल्या खोबऱ्याच्या किमयेला मी मुळीच विसरलो नाही; पण इथे चांगलं ताजं ओलं खोबरं मिळण्यासाठी फार यातायात करावी लागते. त्यामुळे ती आठवण टाळली.
इतर काही भाज्या, सुरण, रताळी, गाजर (भाजी म्हणून), वालाच्या शेंगा, एरवी बिनकामाची धिप्पाड वांगी, एखादा उरलासुरला मुळा सुद्धा (उत्तर भारतीय लोक ह्याचे 'सलाद' वगैरे भंपक नांव देऊन गोडवे गातात; पण हा तिखट भिडू शक्यतो घरात येऊच देऊ नये) वगैरे भाज्या एखाद दिवस उंधियोच्या गोंडस नावाखाली खपू शकतात. एकजुटीने रटारटा शिजल्यामुळे ह्या सगळ्या बहिष्कृत भाज्यांचं आपापलं स्वतंत्र अस्तित्व लोप पावलेलं असतं. नजरेला तर नाहीच, पण जिभेलाही त्यांची वैयक्तिक ओळख पटत नाही हा बेस्ट भाग. असं कोरसमध्ये गाण्यापुरतीच त्यांची मजल.
उरलेल्या भाज्या, म्हणजे दुधी, घोसाळी, भोपळा, कारली,परवल आणि मश्रूम - ह्या सगळ्या उद्धारापलीकडच्या! काही आशा नाही त्यांना, माझ्या पोटात तरी सद्गती लाभण्याची. दुधी ह्या फळभाजीचा देवाने शोध लावला तो केवळ पणशीकर, चितळे वगैरे नांवाच्या सद्गृहस्थांकडून तिच्या वड्या नाहीतर हलवा बनवण्यासाठी. कोण्या अतिउत्साही गृहिणीने त्याला तिखट-मीठ-फोडणी घालून अजाण निष्पाप नवऱ्याच्या माथी, ती भाजी म्हणून मारली; तेव्हापासून मानवजात ह्या कर्माची फळे भोगते आहे. घोसाळी (ह्यांचे शिराळे नावाचे एक दूरचे नातलग आहेत, तेही तसलेच!) तर संपूर्ण होपलेस! सहसा बऱ्याच नापास भाज्यांना 'भजी' ही पाककृती तारून नेते; पण तिथेही ह्या घोसाळ्याचा जन्मजात बुळचटपणा नडतो. छान तळलेल्या चविष्ट कुरकुरीत बेसनाचं बाह्य आवरण संपलं, की आतमध्ये हे बुळे महाशय तस्सेच ठुमम बसलेले! बेसन, तेल, तिखटमीठ, ओवा ह्याचा मात्र ह्या लॉस्ट कॉज मध्ये नाहक बळी. कारल्याबद्दल काही बोलून मी माझं तोंड उगाच कडू करू इच्छित नाही. 'तुपात तळलं, साखरेत घोळलं... ' ही म्हण उगीच नाही पडली. पण कारलं चिरण्याआधीपासूनच त्याच्या शेवाळी हिरव्या, तंतूतंतू अशा दृश्य त्वचेमुळेच ते माझ्या नजरेत उतरलेलं असतं. परवल हा चमत्कार उत्तरेकडे, उन्हाळ्यातल्या भाज्यांच्या तुटवड्यामध्ये जास्त दिसतो. त्याच्या अत्यंत बावळट चवीमुळे, आणि मोक्याच्या प्रसंगी दाताखाली येणाऱ्या कडूजहर अजस्त्र बियांमुळे, ही फळभाजी माझ्या शत्रुपक्षात अढळ स्थान पटकावून आहे. हॅलोवीन सण नसता, तर भोपळ्याचा काय सदुपयोग करता आला असता ह्या विचाराने मला कित्येकदा झोप लागत नाही. अर्धा चिरलेला उघडा भोपळा मला लहानपणीही भेडसावत असे. इथे त्याला हॅलोवीनच्या भुताखेतांच्या सणामध्ये अगदी चपखल रोल मिळाला असंच वाटलं. तरीही, त्या काळात पम्पकिन पाय, कुकीज आणि पम्पकिन चवीची कॉफी वगैरे त्याच्या लाडांनी उच्छाद मांडलेला असतो. साखर, व्हॅनिला सीरप, जायफळ वगैरे यशस्वी कलाकार सुद्धा ह्या भोपळ्याला स्वतःच्या पायावर उभा करू शकत नाहीत; टुणुकटुणुक चालवणार कसला. मश्रुमचं माझ्या लहानपणी भारतात एवढं फॅड नव्हतं. पावसाळ्यात त्या छत्र्या उगवतांना पाहिल्यामुळे बहुतेक, मी हा पदार्थ खाऊ शकत नाही. त्यांचे बुळबुळीत टेक्स्चर हे दुसरं एक महत्वाचं कारण. फारच कोणी आग्रह करायला लागलं, तर मी चक्क मला मश्रूमची ऍलर्जी आहे असं सांगून टाकतो! पाहुण्याच्या ऍलर्जीजना अमेरिकन यजमान जेवढे घाबरतात, तेवढे झॉम्बी मुव्हिजना सुद्धा घाबरत नाहीत.
पालेभाज्यांमध्ये मला पालक, मेथी वगैरे राजमान्य भाज्या आवडतात. अळू, अंबाडी, चाकवत ह्याही आवडीच्या; पण त्या इथे बहुधा मिळतंच नाहीत. पण, लसूण, लाल मिरच्या आणि उडदाची डाळ घालून केलेली फर्मास फोडणी, आणि पालेभाजी (एक्सेप्ट अळू - तो फार सात्विक, त्याला लसूणबिसूण झेपणार नाही) - हे एक लाडकं कॉम्बिनेशन आहे. अर्थात कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच! काही लोक, हिरव्या पालेभाज्या ह्या सदरामध्ये जमिनीतून वर येणाऱ्या कुठल्याही पानांना फोडणी देऊन त्याची भाजी करतात, हा अनाचार थांबवायलाच हवा!
तीच गोष्ट कडधान्यांची - बहुतेक कडधान्यांच्या उसळी सुंदरच होतात. हरभरा, कुळीथ वगैरे जळात राहूनही निःसंग कोरडे राहणारे स्थितप्रज्ञ वगळून. पण खरी कडधान्य वापरावी तर पंजाब्यांनी. त्यांचे छोले आणि राजमा (विठू-रखमाई सारखी खरं तर राजमा-चावल ही अविभाज्य जोडी. त्यात पुन्हा तो चावल सुद्धा तब्बल सेंटिमीटरपेक्षा जास्त लांब, सडपातळ आणि मराठी लोक ज्याला फडफडीत म्हणतात तसा शिजलेला असायला हवा), तर फारच प्रिय! खरं म्हणजे राजमाच काय, भाताबरोबर खायच्या 'डाळी' बनवाव्या तर पंजाब्यांनीच! त्यांची काली दाल काय, किंवा दाल फ्राय काय; दाल-चावल अशा लीन, विनम्र, गरिबाचं खाणं म्हणवणाऱ्या जेवणाला चार चाँद लावून जातात. त्यांची चना दाल मात्र, मराठी माणसाच्या जिभेला मंजूर व्हायला थोडा वेळ लागतो. चणे हे शुक्रवारी देवीचा प्रसाद म्हणून - मोजून चार - खाण्यापुरते ठीक; त्यांची आमटी केलेली पाहून डोळ्यावर विश्वास बसत नाही. पण, त्या फिक्या, दालचिनी घातलेल्या आणि गाळ होऊ न देताही परफेक्ट शिजवलेल्या डाळीचीही आवड डेव्हलप होते.
एकंदरीत मला संशय आहे, की मी मराठी घरात चुकून जन्माला आलो! कदाचित हिंदी सिनेमातल्यासारखी माझी हॉस्पिटलमध्ये अदलाबदल वगैरे झाली असावी, अशा रोमहर्षक कल्पना माझ्या डोक्यात तरळून गेल्या आहेत! मला बहुतांश 'खास मराठी' म्हटले जाणारे पदार्थ आवडत नाहीत; किंवा किमानपक्षी मी त्यांच्याबद्दल उदासीन आहे. थालीपीठ, आंबोळी (अरारारा! दुसरं काही बरं नांव नसतं का देता आलं? कदाचित मी खाऊन पाहिला तरी असता!), उकड, तिखटमिठाचा सांजा (हे राम! ते मद्राशी बघा, उपमा नावाचं ह्याचंच भावंड काय सुंदर करतात!), धिरडी, ठेपले ह्यातला प्रत्येक पदार्थ घरात होण्यापूर्वी एक तुंबळ युद्ध माजतं, ज्यात बऱ्याचदा माझी हार होते (हो, पीनट बटर सॅन्डविच तरी किती खाणार?) अशा प्रकारे आता मला सवयीने ह्या पदार्थांची नावं तरी माहिती झाली आहेत - कशावरून भांडतो आहोत ते तरी माहिती असावं म्हणून!
नावडत्या भाज्यांवर चार शब्द लिहावेत म्हणून सुरु केलेले हे स्फुटलेखन, एकदा मन मोकळं करायला लागल्यावर अपेक्षेपेक्षा थोडं मोठं झालं. पण खरं तर, 'मी (मांसाहारी) कसा झालो' ह्या आगामी ग्रंथामधला हा केवळ अंशमात्र भाग आहे. पिच्चर अभी बाकी है, दोस्त (ही धमकी नव्हे)!

Fantastic write up sir.
ReplyDeleteThank you!
Delete