करोनापूर्व काळातली, म्हणजे माणसं जेव्हा पंचक्रोशीबाहेर प्रवास करण्याचं साहस करत, तेव्हाची गोष्ट आहे. मी आणि एक सहकारी मित्र प्रवासात होतो; मॅरीयॉटमध्ये राहत होतो. वास्तव्याच्या शेवटच्या रात्री, मी झोपायच्या तयारीत असतांना, मित्राचा फोन. 'ताबडतोब माझ्या खोलीत ये'.
गेलो. दार उघडंच होतं. मित्र चोरून भूताकडे बघत असल्यासारखा वारंवार भिंतीकडे बघत, बेडवर बसलेला. भिंतीवर पोट फुगलेल्या ढेकणाएवढं मोठं झुरळ होतं. मला मारेकऱ्याच्या भूमिकेसाठी बोलावलंय असं समजून मी भिंतीकडे चालू लागलो, शस्त्र म्हणून वाटेतलं एक हॉटेलचं पुस्तक उचलून. 'न SS ही!' अशी हिन्दी सिनेमातल्या नायिकेसारखी किंकाळी फोडत मित्र ओरडला. 'मैंने मॅनेजरको फोन किया है; वो किसीको भेज रहा है'. आता मी गोंधळलो; व्यावसायिक मारेकरी बोलावले आहेत, तर मी काय नंतरचे मंत्र म्हणायचे आहेत का?
हॉटेलचा सहाफुटी नोकर आला. तो तोंडाला मास्क, हातात ग्लोव्हज आणि छोटं डस्टपॅन वगैरे घेऊन युद्धासाठी सुसज्ज होता. आमच्या नजरांचा मागोवा घेत त्या 'All action, no talk' प्राण्याने तीन पावलांत भिंत गाठली आणि मित्राची अस्फुट किंकाळी बाहेर यायच्या आत त्या झुरळाचा खेळ संपवला. इकडेतिकडे बघत त्याने 'एनी मोअर?' एवढंच विचारलं; स्वतः शोधलं आणि काही न दिसल्यावर 'गुड नाईट!' म्हणून तो निघून गेला.
आता मित्राला वाचा फुटली; आणि मला इथे बोलावण्याचं प्रयोजन समजलं. त्याचं म्हणणं होतं की मॅरीयॉट सारख्या हॉटेल रूममध्ये झुरळ असणं ही अत्यंत धक्कादायक बाब आहे (इथे झुरळं फारच क्वचित आढळतात हे खरं आहे) आणि 'इसकी कीमत उन्हे चुकानी पडेगी'. म्हणजे काय, तर मॅरीयॉटने त्याला तिन्ही रात्री फुकट द्याव्यात. माझ्याही अंगात नको तेव्हा नको ती भुतं संचारतात! ह्यावेळी रामशास्त्री आले. मी म्हटलं 'पण झुरळ इथे तीन दिवस होतं ह्याला काय पुरावा आहे ना'? त्याने रागारागाने मला मित्रकर्तव्याची जाणीव करून दिली आणि 'ओय, बात मैं करुंगा! तू बस स्पोर्ट करते रहियो.' असं म्हटलं. स्पिकिंग पार्ट नाही, 'हम कपडे संभालता है' एवढाच रोल आहे ऐकल्यावर मी खूष होऊन झोपायला गेलो.
दुसऱ्या दिवशी चेकआऊट करतांना त्याने मॅनेजरला बोलावून, कालची थरारक भयकारी हकीकत खूप रंगवून त्याला ऐकवली. मॅनेजरचं ट्रेनिंग फार चांगलं असल्यामुळे तो तीन मिनिटाच्या ह्या धबधब्यात वेळोवेळी योग्य तशा माना हलवत, हुंकार भरत, चेहऱ्यावर अपार सहानुभूती, लज्जा आणि दुःखाचे रंग फासत उभा होता; मीही स्पोर्टींग रोलमध्ये चेहऱ्यावर आळीपाळीने दुःख आणि संताप आणत होतो. भाषणानंतर त्याने एक खेदाचा प्रस्ताव मांडला आणि मोजून तीन वेळा माफी मागितली. मित्राने झालेल्या मनस्तापासाठी संपूर्ण स्टे फुकट मिळावा ही मागणी केली. थोड्या चर्चेनंतर मॅनेजरने 'झुरळ तर फक्त शेवटच्याच दिवशी होतं' हा मुद्दा काढून ती एक रात्र फुकट देण्याचं औदार्य दाखवलं. (रामशास्त्री मनोमन खूष!)
आता निघणार, तेवढ्यात खालील संवाद घडला:
मित्र: यू डोन्ट नो व्हॉट इट डिड टू मी.
मॅनेजर: (गोंधळून) हू, द कॉक्रोच?
हा सीन मूळ संहितेत नसल्याने मीही गोंधळलो - ह्याला कसं स्पोर्ट करणार?
मित्र: नो, युअर गाय किल्ड इट!
मॅनेजर: (अडीच वर्षाच्या मुलाच्या बाबाच्या टोनमध्ये) ही हॅड टू (बेटा)! अदरवाईज दॅट कॉक्रोच वूड बॉदर यू अगेन.
मित्र: बट दॅट किलिंग केप्ट मी अवेक द होल नाईट! ही शूडंट किल.
मॅनेजर: (डोक्यावर बर्फाची लादी ठेवून) आय ऍग्री! वूई विल ट्रेन देम बेटर इन द फ्यूचर.
शेवटी, मित्राचा हा रात्रभराचा मनस्ताप फुकट रात्र अधिक मॅरीयॉटचे १० हजार बोनस पॉईंट्स मिळाल्यावर कुठे पुरेसा कमी झाला.
ह्यापुढील एअरपोर्टच्या प्रवासात, आणखी काय करून किमान २५ हजार तरी पॉईंट्स मिळवता आले असते ह्याच्या कहाण्या ऐकून माझा मनस्ताप मात्र प्रचंड वाढला.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...