सध्या करोनाच्या स्थानबद्धतेच्या काळात, पूर्वीच्या प्रवासातले फोटोंचे आल्बम चाळत बसतो; पुन्हा कधी कुठेतरी प्रवासाला जाता येईल, ह्याची स्वप्नं बघत. प्रत्यक्ष कुठे फिरायला जाता येत नाही, तर निदान त्या फोटोंमधून तरी दूरदूरच्या स्थळांच्या भेटींच्या आठवणी ताज्या करतो. खूप छान वेळ जातो त्यात, आणि प्रसन्न होऊन पुन्हा रोजच्या कामाला लागू शकतो. फोटोंमध्ये नसणारीही कित्येक दृश्यं आणि आठवणी मनात घोळायला लागतात. त्या त्या ठिकाणी पाहिलेल्या वेगवेगळ्या वल्ली पुन्हा जिवंतपणे डोळ्यासमोर साकार होतात. हे काही माझे नातेवाईक नाहीत, का मित्र नाहीत; परिचितसुद्धा नव्हेत. आणि तरीही, एवढ्या काळानंतरही मनाच्या एका कोपऱ्यामधून टुणकन उडी मारून डोळ्यासमोर येतात.
लहानपणी मला रस्त्यात चाललेले डोंबाऱ्याचे खेळ सुद्धा भुरळ घालत. मग ते दोरीवरून चालणं असेल, का माकडाचे खेळ असतील का कडकलक्ष्मीचं स्वतःला मारून घेणं असेल. मला खूप कुतूहल असे ह्या लोकांविषयी. इथे अमेरिकेत, आणि युरोपात सुद्धा, ठिकठिकाणी अशा रस्त्यातल्या कलाकारांच्या सुधारलेल्या पाश्चात्य आवृत्त्या बऱ्याच पहिल्या. विशेषतः टुरिस्टांची वर्दळ असलेल्या शहराच्या कुठल्याही भागात हे हमखास दिसतातच. अशा गजबजलेल्या ठिकाणी, रमतगमत, रस्त्यातल्या गंमती बघत फिरणं हा माझा मोठा विरंगुळा. कामानिमित्त फिरत असतांना बऱ्याच वेळी मी एकटा असे, साईटसीईंगसाठी असा वेळ कमीच असे; पण हॉटेलच्या किंवा दुसऱ्या कुठल्या बारमध्ये संध्याकाळ घालवण्यापेक्षा, अशा नवीन शहरात आपलं आपण, चुकत माकत, निरुद्देश पायी फिरणं हा माझा फार आवडता छंद.
अशा ठिकाणी हमखास दिसतात ते हौशी, पण अतिशय कसबी चित्रकार! बसल्या बसल्या झटाझट ते उत्साही टुरिस्टांची कॅरिकेचर टाईपची चित्रं रेखाटून देतात. अवघ्या दहा पंधरा मिनिटात, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यातलं एखादं ठाशीव वैशिष्टय हेरणं आणि अतिशयोक्तरित्या कागदावर उतरवणं ह्याला कौशल्याच्या बरोबरीने एक खास विनोदबुद्धी लागते. ह्या भांडवलावर हे चित्रकार वीकेंडला बऱ्यापैकी मिळकतही करू शकतात. माझ्यासारखे बघे थोडेच; हौशी मॉडेल्सच्या मात्र रांगा लागलेल्या असतात. अशा चित्रकारांमधला दुसरा प्रकार म्हणजे स्थानिक प्रेक्षणीय स्थळं, म्हणजे स्टॅचू ऑफ लिबर्टी, किंवा मॅनहॅटनची स्कायलाईन, नाहीतर आयफेल टॉवर वगैरे, झटाझट ऍक्रिलिक पेंटने चितारून देणारे. नुसतं त्याबद्दल लिहितांना माझ्या नाकात तो एरोसॉल कॅनमधून फवारत असलेला ऍक्रिलिक स्प्रेचा वास दरवळायला लागला. सहसा डार्क पार्श्वभूमीवर निऑन रंगांच्या साहाय्याने काढलेली ही चित्रं मला स्वतःला फार उथळ आणि बटबटीत वाटतात; पण त्यांनाही गिऱ्हाइकं असतात खरी. कॅलिग्राफी हा म्हटलं तर चित्रकलेचाच एक वेगळा आविष्कार. ह्यामध्येही एक नवीनच नवल पाहिले होते पॅरिसमध्ये. छोट्यामोठ्या पुठ्ठयाच्या फळ्यांवरची अक्षरं अनपेक्षितरित्या ओळखीची वाटली म्हणून थबकून पाहिलं तर एक अगदी फाटका (पण चतुर) बांग्लादेशी, चक्क युरोपिअन नावं बंगाली लिपीमध्ये लिहून देण्याचा धंदा करत होता! बंगाली लिपी मुळात वळसेदार, त्यात हा थोडी जास्त कलाकुसर दाखवत होता. त्यामुळे ते नजरेला फार आकर्षक वाटत होतं. त्या बेट्याने आजूबाजूला ताजमहाल, खजुराहोची शिल्पकला, वाघ, चित्ते, हत्ती वगैरे लक्षवेधक फोटो विखरून ठेवलेले असल्यामुळे, असल्या 'एक्झॉटिक' प्रदेशातल्या भाषेमध्ये आपलं नांव लिहून घायला बरेच पाश्चात्य प्रवासी अधीर होते. Juan (उच्चारी वान) ह्या स्पॅनिश तरुणाला त्याने खास बंगाली पद्धतीने त्याचे नांव 'ऊआन' (बंगालीमध्ये व हे अक्षर नाही) असं लिहून दिल्याचं पाहून मला खूप गंमत वाटली होती.
दुसऱ्या कलाकारांचा एक घोळका नेहमी आढळतो, तो म्हणजे मायमिंग - मूकाभिनय - करणाऱ्या लोकांचा. त्यामध्ये खरेखुरे विदुषकी चाळे करणारे असतात; किंवा मॅनेक्वीनच्या पुतळ्यासारखे निश्चल निर्विकार उभे रहाणारे, मधूनच एखादी सूक्ष्म हालचाल करून जिवंतपणाची चुणूक दाखवणारे असतात. किंवा नखशिखांत अंगभर, कपड्यांसकट, मेटॅलिक स्टील ग्रे रंग लावून रोबॉट्स सारख्या हालचाली करणारे असतात. ह्या रोबॉट्सचं भूमिकेशी तद्रूप होणं कौतुकास्पद असतं. लहान मुलांनी हात लावल्यावर, गुदगुल्या केल्यावर त्यांची यांत्रिक प्रतिक्रिया, किंवा प्रेक्षकांशी खरखरीत स्टॅटिक तुटपुंज्या शब्दात 'संवाद' साधणं हे खूप गमतीशीर असते. ह्या माईम्स मधले माझे सर्वात आवडते कलाकार म्हणजे, चारचौघांसारखे दिसणारे, गर्दीमध्ये एखाद्या माणसाच्या मागून चालत, त्याच्या मनातले भाव व्यक्त करत असल्यासारखे, अतिरेकी विनोदी हातवारे करत चालणारे नट (नटी अजून तरी पहिली नाहीय). बघ्यांची हसूनहसून पुरेवाट होत असताना, पाठपुरावा केला जात असणाऱ्या व्यक्तीने मागे वळून पाहिल्यास, हे नटश्रेष्ठ निमिषार्धात भूमिका झटकून, 'काय आचरट लोक आहेत! हसायला काय झालं?' ह्या आश्चर्यचकित अविर्भावात प्रेक्षकांनाच लूक देतात. ह्याची एक वेगळी आवृत्ती म्हणजे, हॅलोवीनच्या वेळी भुतं, हाडांचे सापळे, चेटकिणी, हडळी वगैरे मेकअप आणि पोशाख केलेल्या लोकांनी रात्रीच्या काळोखात अचानक मागून येऊन घाबरवण्याची.
सार्वजनिक स्थळांमध्ये गायनवादन करणारे कलाकार तर बहुतेक सगळ्याच देशात आणि शहरात आढळतात. अगदी मुंबईच्या लोकल ट्रेन्समध्ये सिगारेट टिनवर एक खडा वाजवत, अत्यंत भेसूर आवाजात गाणारे जसे ऐकले आहेत; तसेच लंडनच्या ट्यूब रेल्वेच्या भुयारी रस्त्यांमधून अप्रतिम सुंदर जॅझ प्रकारचं संगीत गाणारे आणि वाजवणारेही ऐकले आहेत. परदेशात गाणाऱ्यांपेक्षा वाजवणारेच जास्त आढळतात हे खरं! उन्हाळ्याच्या दिवसात, चौकाचौकांमधून अशा बजावण्याच्या मैफिली सजलेल्या दिसतात. व्हायोलिन हे त्यांचं (आणि माझंही) सगळ्यात आवडतं वाद्य. कित्येकदा एखादा जरा चांगला वाजवत असला, तर मी मुद्दाम थांबून ऐकून मगच पुढे गेलेलो आहे. खूप पूर्वी, विजय तेंडुलकर 'कोवळी उन्हे' नावाचं एक सदर लिहीत असत; त्यामध्ये त्यांनी चर्चगेट स्टेशनवर 'दिल तड्प तड्पके कह रहा है आ भी जा' वाजवणाऱ्या माणसाबद्दल एक लेख लिहिल्याची आठवण अजून मनात आहे.
परदेशातलं हे गाणंबजावणं रेल्वे स्टेशन किंवा रस्ते एवढ्यापुरतं सीमित नसतं; बऱ्याच वेळा हे रेस्टोरंट्स मध्येही पाठ पुरवतं. कधीकधी ते नुसतं पार्श्वभूमीवर मंद स्वरातल्या पियानो, व्हायोलिन किंवा सतारीवर चालू असतं; तर कधी पियानो, सॅक्सोफोन आणि ट्रम्पेटसकट जॅझच्या स्वरूपात अवतरतं. मेक्सिकन रेस्टोरंट्समध्ये तर त्यांच्या खास मारियाची बँड्सच्या रूपात रेस्टोरंटमध्ये चालतंफिरतंही दिसतं.
रेस्टोरंट्सवरून आठवलं, युरोपमध्ये रात्रीच्या जेवणाच्या वेळी फुलं विकायला येणाऱ्या लोकांचा एक उच्छाद असतो. विशेषतः एक पुरुष आणि बाई (किंवा बायका) एकत्र असतील, तर ते तुमचा पिच्छाच सोडत नाहीत. फुक्कट फुलं विकत घेऊन मी काही सहकारिणींचा दुवा मिळवला आहे!
ह्या सगळ्या 'रस्त्यात' भेटणाऱ्या कलाकारांच्या मांदियाळीत गाईड्सचा तर खास उल्लेख करायला हवा. भारतात मी पाहिलेले थोडेसेच गाईड, इतिहासाची गाईडबुकं पाठ करून ती घोकंपट्टी एकदाची प्रवाशांच्या कानात ओतणारेच होते. बोलण्याचा स्पीड आणि ढंग म्हणजे मुंबईतल्या पश्चिम रेल्वेच्या अनाऊन्सरच्या नोकरीसाठी ऑडिशन करत असल्यासारखा! ह्याविरुद्ध परदेशात पाहिलेले बहुतेक गाईड्स कलाकार म्हणण्यालायक होते. जी काही स्थळं पाहत आहोत त्याविषयी बरीच ऐतिहासिक आणि रंजक माहिती पुरवणारे, अतिशय खुबीने बरोबरच्या प्रवाशांचा अंदाज घेऊन त्यांच्या यथायोग्य टोप्या उडवत, वेळप्रसंगी स्थानिक ऐतिहासिक व्यक्तींची खिल्ली उडवत, हलकंफुलकं संभाषण साधत त्या जागांशी नाती जोडणारे होते. एकच अपवाद बघितला तो मनिला (फिलिपीन्स) मध्ये - हा जेमतेम विशीतला दिसणारा तरुण सांधेदुखी घेऊनच जन्माला आल्यासारखा बसच्या सीटवरून उठून बाहेर चालायला वगैरे अत्यंत नाखूष होता. प्रस्तावनेतच त्याने, 'तसं मनिलामध्ये बघण्यासारखं फार काही नाहीच आहे!' हे आश्वासन दिलं होतं. पर्यटन आणि प्रेक्षणीय स्थळं ह्याविषयी एवढी अध्यात्मिक उदासीनता, गाईडच्या अंगी, फारच क्वचित बघायला मिळते. सुदैवाने असे अनुभव विरळा.
आठवणी उलगडता उलगडता, पुन्हा एकदा प्रवासाला जाण्याच्या दिवास्वप्नांमध्ये रंगून गेलेलं असतांना एकाएकी जाणीव होते, आता बाहेर गेलं तर बरोबर पुरेसे मास्क्स आणि वाईप्स न्यायला हवेत.
स्वप्नांमधून खाडकन जाग येते, सगळा उत्साहच ओसरतो! मग अचानक डोक्यात विचार येतो समजा कुठे गेलं, तरी हे सगळे कलाकार कुठे असतील? आता काय करत असतील? ह्या करोनाच्या दिवसात घरी बसून कोणाची चित्रं काढत असतील? मास्क घातलेल्या सगळ्याच टूरिस्टांची कॅरीकेचर्स हळूहळू एकसारखीच दिसायला लागतील का? का घरी एकटेच व्हायोलिनचा रियाज करत असतील? चौकांमध्ये मास्क घालून गाणी कशी म्हणत असतील? सहा फुटांचं अंतर ठेवून पुढच्या माणसाचं मायमिंग कसं करतील?
का तेही घरात बसून पुन्हा एकदा माझ्यासारख्या टूरिस्टांच्या गर्दीची स्वप्नं बघत असतील?
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...