२०२० अमेरिकन निवडणूक निकाल

 शेवटी, जो बायडन २०२०ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक जिंकले! त्यांचे, त्यांच्या सहकाऱ्यांचे आणि संपूर्ण अमेरिकन जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन! आपला घोडा विनमध्ये आल्याचा आनंद प्रत्येकाला असतोच ना!

ऍरिझोना आणि जॉर्जा सारख्या काही राज्यांमध्ये अध्यक्ष महाशय आणि बायडनच्या मतसंख्येमधील फरक फारच कमी आहे, तिथे पुन्हा मतमोजणी होईल. पण ह्या राज्यांची इलेक्टोरल कॉलेजमधील मतसंख्या निकाल बदलू शकण्याएवढी मोठी नाही. काही राज्यांमध्ये मतदानामध्ये गैरव्यवहार घडले असा अध्यक्षांचा दावा आहे. प्रतिस्पर्ध्यावर कोणतेही आरोप करतांना कसलेही पुरावे देण्याची अध्यक्षांना कधीच गरज भासत नाही (गैरव्यवहार झाले असं त्यांना वाटतं, एवढं पुरेसं नाही का!); त्यामुळे ह्या पोरकट 'रडीचा डाव' भांडणांमधून निवडणुकीच्या निकालामध्ये काही फरक पडण्याची शक्यताही कमीच.

अमेरिकेसारख्या महासत्तेच्या अध्यक्षपदी बसायला सर्वार्थाने - शब्दशः - ना लायक व्यक्ती चारच वर्षात त्या पदावरून हाकलली जात आहे ह्याचा आनंद आहेच. त्यांच्या पात्रतेबद्दल पाच वर्षांपूर्वीही शंका होती; पण पुढील चार वर्षात अध्यक्षांनी फारच मनावर घेऊन जातीने ती शंका किती रास्त होती ह्याची पुन्हापुन्हा १०० टक्के खात्री करून दिली. विद्यमान अध्यक्षाने निवडणूक हरणे ही इथे नामुष्की समजली जाते; अशी घटना २८ वर्षांनंतर आता पुन्हा घडत आहे. अध्यक्ष महाशयांना ह्याहूनही लाजिरवाणी गोष्ट म्हणजे ज्या 'लूझर' लेबलचा त्यांना केवळ तिरस्कार आहे, जे लेबल ते त्यांच्या कट्टर शत्रूंना घोर अपमान करण्यासाठी चार वर्षे लावत आले, तेच लेबल आता त्यांच्या माथी कायमचे बसणार!

असो! अध्यक्ष महाशयांची दखल घेण्याची ही कदाचित शेवटची संधी असेल हे लक्षात घेऊन त्याचीही सवय करून घ्यायला हवी लवकरच.

डोळे सताड उघडे ठेवून ह्याचीही दखल घ्यावीशी वाटते, की निकाल डेमोक्रॅट्सना अपेक्षित होते तेवढे चांगले नाहीत. अध्यक्षीय निवडणूकीमध्ये व्यक्तिमहात्म्याचा भाग फार मोठा असतो. ट्रम्पच्या अखंड कड्यावरून कोसळणाऱ्या किंवा आगी लावून राखरांगोळी करणाऱ्या वक्तव्यांमुळे जनमत त्याच्या विरुद्ध झाले होते. रोजच्या राजकीय तमासगिरीचा सगळ्यांनाच कंटाळा आला होता. त्यामुळे, शेवटी बायडन जिंकले ह्याच्यात एकीकडे फार आश्चर्य नाही.

आश्चर्य आहे, ते ट्रम्पला मिळालेल्या ७१ मिलियन मतांबद्दल - बायडनपेक्षा चार-पाच मिलिअन कमी असली, तरी ७१ मिलियन मते कुठल्याच न्यायाने 'कमी' नाहीत! चार वर्षाच्या तत्वशून्य, धोरणविरहित अंदाधुंदीनंतर; थिल्लर, हास्यास्पद आणि स्वार्थी वर्तणुकीनंतर; कमरेचे सोडून सत्य-अर्धसत्य सर्व त्यात गुंडाळून ठेवल्यानंतर; बेजबाबदार 'सत्तेसाठी काहीही' ह्या निलाजऱ्या प्रदर्शनानंतर सुद्धा सात कोटी लोकांना त्याला मत द्यावेसे वाटते हे आश्चर्य आहे - निदान असायला हवे. डेमोक्रॅट्स आणि लिबरल लोकांनी स्वतःला ज्या अनेक गोडगोड सोयीस्कर गैरसमजांच्या गुंडाळ्यांमध्ये गुरफटून घेतले आहे त्यापैकी हा एक - की हे सर्वच्या सर्व सात कोटी मतदार मूर्ख आणि रेसिस्ट आहेत. ट्रम्पच्या पाठिराख्यांपैकी कित्येक जण निःसंशय रेसिस्ट, गौरवर्णीय वर्चस्व मानणारे आहेत; पण सगळ्यांना त्या एका मापाने मोजता येणार नाही. माझ्या ऐकण्या-वाचण्याप्रमाणे त्यातले बहुसंख्य अशिक्षित आणि खेडवळ आहेत. हे माझे, किंवा इतरांचे मत नाही - ही एक्सिट पोल्समधील आकडेवारी आहे. ह्या वर्गाला झपाट्याने चाललेले जागतिकीकरण, बदलती औद्योगिक व्यवस्था आणि खालावती वैयक्तिक आर्थिक परिस्थिती ह्या सगळ्याची भिती आहे. झोडपण्यासाठी एखादा बागुलबुवा (मग तो मेक्सिकन असो, वा चिनी असो) उभा करून, जनमानसाच्या भितीचा आपल्या राजकारणासाठी फायदा करून घेणारा ट्रम्प पहिला राजकारणी नाही (अतिशय यशस्वी मात्र होता!) आणि दुर्दैवाने शेवटचाही नसेल.

आश्चर्य आहे, ते डेमोक्रॅट्सना सिनेटमध्ये बहुमत मिळवण्यात (अद्याप तरी) यश न मिळण्याचे; त्याहीपलीकडे जाऊन हाऊसमधील काही सीट्स प्रत्यक्ष गमावण्याचे! सिनेटमध्ये ट्रम्पचे तीन महत्वाचे हांजी हांजी करणारे चमचे पुन्हा सुखरूप निवडून आले आहेत. डेमोक्रॅट्सना ह्यामधून धडा घ्यायला हवा. अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी केलेल्या त्यांच्या अतिरेकी लाडाकोडांमध्ये, डेमोक्रॅट्स बहुसंख्यांकांना नकळत दूर ढकलत आहेत. जॉर्ज फ्लॉइड सारख्या काही घटना पोलिसी बेमुर्वत ठोकशाहीचे, कदाचित वर्णविद्वेषाचेही चिन्ह असतील - आणि त्याचा योग्य तो परामर्श घ्यायलाच हवा! पोलीस प्रशिक्षण पद्धतीत सुधारणा करायलाच हवी. बंदुकीवरील बोट काढून, प्रथम तंग वातावरण थोडं शांत करण्याचा पुरेसा प्रयत्न करण्यावर भर द्यायलाच हवा. पण, प्रत्येक काळ्या माणसाच्या अटकेमागे किंवा दुर्दैवी मृत्यूमागे फक्त पोलिसी हिंसाचार आणि वर्णविद्वेष आहे हे म्हणणे हाही अतिरेकच आहे. हे बोलण्याचे धाडस डेमोक्रॅट्स मध्ये अत्यंत अभावानेच आढळते. गरिबी, बेकारी, ड्रग ऍडिक्शन हे विकार गोऱ्या समाजातही आहेत; त्यांनाही मदतीची गरज आहे. LGBTQ आणि इतर अल्पसंख्यांकांच्या हक्क रक्षणामध्ये, ६५ टक्के बहुसंख्य जनतेला गृहीत धरून चालणे - पाठिंब्यात किंवा विरोधात - दोन्ही, हे राजकीय असामंजस्याचे लक्षण आहे.

चार वर्षांच्या लोकशाही तत्वांच्या विध्वंसानंतर, ट्रम्पने जाताजाता बायडनच्या मार्गात असंख्य काटे रचून ठेवले आहेत. सुदैव एवढेच म्हणता येईल, की २००८ च्या निवडणुकीनंतर निवडून आल्याक्षणी (त्यावेळी, अर्थव्यवस्थेच्या वाताहतीमधील) काटे साफ करून, मार्ग शोधून काढण्याची बायडनना आता सवय झालेली असेल. त्यांचे कालचे भाषण तरी अतिशय आशादायक, विचारपूर्ण आणि दोन्ही पक्षातील अतिरेक्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणारे भासले. गेल्या तीस वर्षात मी ऐकलेल्या त्यांच्या असंख्य भाषणांपैकी सर्वात मुद्देसूद आणि प्रभावी भाषण म्हणता येईल!

बायडनना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक आणि अनंत शुभेच्छा!

त्यांना, आणि आपणा सर्वांना, त्याची गरज आहे नक्कीच.



Comments