गेम स्टॉप!

'गेमस्टॉप' ही इथली मॉलमधल्या व्हिडिओ गेम्सच्या दुकानांची एक चेन. नवीन गेम्स आणि तत्सबंधित यंत्रणा / सामग्री विकणे, तसेच जुन्या गेम्स / सामग्री टाकाऊ किमतीला विकत घेणे हा त्यांचा व्यवसाय. पंधरावीस वर्षांपूर्वी ही चेन प्रसिद्धीस आली, कारण निंटेंडो, सोनी प्लेस्टेशन आणि एक्सबॉक्स ह्यांच्या नवनवीन व्हिडीओ गेम्सची शर्यत तेव्हा जोरात सुरु झाली होती. त्याच काळात दोन वाढत्या वयातील मुलांचा पालक ह्या नात्याने त्यांना लेटेस्ट गॅजेट्स मिळवून देणं हे माझं कर्तव्य होतं. म्हणून मला ह्या दुकानाची एवढी तरी माहिती!

मुलं आणि इंटरनेट दोन्ही मोठी झाल्यावर असल्या दुकानांशी संपर्क तुटला. गेल्या आठवड्यात एकदम गेमस्टॉपचं नांव बातम्यांमध्ये झळकतांना बघून आश्चर्य वाटलं. खरे तर, इ-कॉमर्स आणि करोना ह्या दुहेरी हल्ल्यामुळे गेली काही वर्षे मॉल्सची एकंदर परिस्थिती हलाखीचीच आहे, आणि जास्तजास्त घसरते आहे. त्यात गेमस्टॉपसारख्या सामान्य दुकानाचा भाव एरवीही उतरतच चालला होता. त्यामुळे फारतर त्यांचं दिवाळं निघालं असावं अशा बातमीची अपेक्षा होती.

ह्याउलट, गेमस्टॉपच्या स्टॉकची किंमत नेहमीच्या १८-२०-३० डॉलरपासून एकदम तीनशे आणि चारशेच्या मध्ये, आणि नंतर आत्ता दोनशे तर तासाभरात साडेतीनशे तर पुढच्या पंधरा मिनिटात तीन डॉलर्स असे सापशिडीचे खेळ खेळायला लागल्यावर कुतूहल चांगलंच चाळवलं. ह्या मोठ्यांच्या खेळामागची मागची कहाणी सामाजिक-सांस्कृतिकदृष्ट्या फार मनोरंजक वाटली - ती अशी:

'शॉर्ट सेल' हा प्रकार बहुतेकांना माहिती असेलच. अगदी थोडक्यात सांगायचं तर, शॉर्ट करणे म्हणजे आपल्याकडे प्रत्यक्ष नसलेला स्टॉक विकणे. विकलेला स्टॉक ठराविक मुदतीमध्ये ग्राहकाला पुरवावा लागतो. आपल्याला जर स्टॉकची किंमत मधल्या काळात खाली येणे अपेक्षित असेल, तर ही विक्री जबरदस्त फायद्याची होऊ शकते. उदा. समजा आज बाजारात स्टॉकची किंमत दहा डॉलर आहे. आपण तो - हातात नसतांनाही - दहा (किंवा थोड्या कमी) डॉलरला विकायचा; कारण आपल्याला तो स्टॉक उद्याच सहापर्यंत खाली जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे, आपल्या गिर्हाइकाला तीन दिवसांनी तो स्टॉक देण्यापूर्वी आपण तो सहाला विकत घेऊन घरबसल्या उरलेले चार खिशात टाकू शकतो.

बेकायदेशीर? मुळीच नाही!

चेष्टा करतोय? नाही; हे सर्व खरं आहे, लोक हे सर्रास करत असतात; थोडं सोपं करून सांगितलंय एवढंच! 

काय म्हणालात, जुगार आहे हा? आहे ना! स्टॉक मार्केटला हिंदीमध्ये सट्टाबाजार असं म्हणतातच ना? हो, आपला होरा चुकला, आणि स्टॉक सहाऐवजी अकरावर गेला, तर चार डॉलर खिशात पडण्याऐवजी खिशातला एक कमी होईल! कारण आता आपण तो स्टॉक अकराला विकत घेऊन ग्राहकाला दहाला विकला आहे. आतबट्ट्याचा व्यवहार? अर्थात! 

पन साह्येब, पैसा कमवायचा तर जिगर जरुरी हाय ना?

वॉल स्ट्रीटवर (आणि बहुतेक दलाल स्ट्रीटवरही) असे जिगरबाज पोत्यानी असतात. फक्त, पाच आणि दहा डॉलरऐवजी ते लाखो-कोट्यावधी डॉलर्सचे फासे फेकत असतात. हेज फंड्स ('हेजींग युअर बेट्स' वरून नांव पडलेल्या) कंपन्या ह्या प्रकारच्या उलाढाली करूनच तर त्यांच्या धारकांसाठी अमाप पैसा (बहुतेक वेळा!) मिळवतात. ह्याही वेळी, गेमस्टॉपची नौका बुडणारच आहे, ह्या भरवशावर बऱ्याच हेज फंड कंपन्यांनी हा स्टॉक डिसेंबर-जानेवारीमध्ये प्रचंड शॉर्ट केलेला होता. मोठाल्या धेंडांनी स्टॉक शॉर्ट करण्याची गंमत ही असते, की त्यातून त्यांना तो लवकरच कोसळणे अपेक्षित आहे हे लिंबूटिंबू मार्केट प्लेयर्सच्याही लक्षात येतं; आणि आकाश कोसळणार ह्या भितीने ते आपल्याकडचे शेअर्स घाईघाईने विकून टाकतात. त्यामुळे स्टॉकची किंमत आणखी खाली घसरते. मोठ्या धेंडांनी लावलेल्या जाळ्यामध्ये छोट्या मासोळ्या अचूक फसतात. धेंडांच्या अपेक्षेप्रमाणे किंमत गडगडली, की ते तो स्टॉक विकत घेऊन त्यांचे शॉर्ट्स 'कव्हर' करतात - म्हणजे प्रत्यक्ष शेअर्स ग्राहकाला पुरवू शकतात - लक्षावधी डॉलर्स खिशात घालून! ह्यावेळी तर धेंडांना त्यांच्या असामान्य बुद्धीचा आणि धाडसी वृत्तीचा एवढा गर्व होता, की एका पॉइंटला स्टॉक १४० टक्के शॉर्ट झाला होता! म्हणजे, प्रत्यक्षात केवळ १०० शेअर्स अस्तित्वात असतांना १४० शेअर्स 'विकले' गेले होते. कोणीतरी जबरदस्त आर्थिक मार खाणार हे उघडच होतं!

आणि तसंच झाल. सलीम-जावेदच्या अमर शब्दात सांगायचं, तर 'इस बार, एक और मछलीने जाळेमें जानेसे इन्कार कर दिया'! एक नव्हे, अनेक लहानसे मासे इंटरनेटच्या किमयेने एकत्र येऊन त्यांनी मिळून ह्या मोठ्या धेंडांना धडा शिकवायचा घाट घातला. गेमस्टॉपचे अनेक शेअरहोल्डर्स नेटवरील चॅट ग्रूपवर एकत्र येऊन, त्यांनी आपल्याकडचे (खरे!) शेअर्स विकायचे नाही असं ठरवलं! ह्या निर्णयाने वॉल स्ट्रीटवर हादरे बसले. त्यातल्या त्यात शहाण्या (घाबरट?) हेज फंड्सनी झाली तेवढी लुस्कानी पुरे झाली असं म्हणून पडल्या किमतीला मिळाले तेवढे शेअर्स शॉर्ट कव्हर करण्यासाठी विकत घेतले. कोणीच, किंवा बहुतांश शेअरहोल्डर्स, शेअर्स विकत नाहीत म्हटल्यावर त्यांची किंमत वाढू लागली. गेल्या दोन-तीन दिवसातच कागदोपत्री पाच बिलियन (पाचशे कोटी) डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. एका हेज फंड कंपनीला प्रत्यक्ष - कागदोपत्री नव्हे - सुमारे दीड बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले म्हणतात.

वॉल स्ट्रीटवर ही धुळवड अद्याप चालूच आहे. अर्थात, लहान माशांनीही आता फार ताणण्यात अर्थ नाही, कारण ह्या किमतीच्या डोंगरदऱ्यांचा गेमस्टॉप कंपनीच्या प्रत्यक्ष कर्तृत्वाशी काहीच संबंध नसल्यामुळे, सध्याचे शॉर्ट्स एक्सपायर झाल्यावर स्टॉकची किंमत नेहमीच्या वीस-तीसच्या दरम्यान, किंवा आणखी खाली, येणे अपेक्षित आहे. मासोळ्यांना देवमासा बनायची स्वप्नं असली, तर त्यांनी ती वेळीच पूर्ण करून घ्यायला हवीत. सध्याच्या हुतूतूच्या खेळात फक्त आधी दम कोणाचा सुटतो, किंवा कोणाची हाव जास्त, एवढाच प्रश्न आहे.

हेज फंडांच्या सत्ताधारी समर्थ पाठीराख्यांनी, इंटरनेटवर ह्या प्रकारे संगनमत करणे हे अनैतिक आहे, मुक्त बाजारपेठेच्या तत्वांविरुद्ध आहे वगैरे कावकाव सुरु केली आहे.

खरं तर, इंटरनेटच्या सामर्थ्याच्या अवाक करणाऱ्या आवाक्याचे, सध्याच्या समाजव्यवस्थेला आणि कायदेकानूंना झपाट्याने मागे टाकण्याचे ते - आणखी एक - उत्तम उदाहरण आहे.

Comments