काही कविता

आतले आणि बाहेरचे
संघर्ष सनातन
काहींना वाटतं
हिरवळ आत जेवढी हिरवीगार
तेवढी बाहेर कुठेच नाही
काहींना वाटतं
बाहेर गेल्याशिवाय
हिरव्या रंगाचा अर्थच समजणार नाही
चडफडत दोघे
आयुष्य घालवतात
करड्या रंगावर
करडी नजर रोखून

थोडे मधले
कुंपणाजवळ उभे
त्यांना कुंपण दिसत नाही
सगळीकडची हिरवीगार ओलीशार
पाती खुणावतात
सगळीकडचे
मृतःप्राय कोरडेठाण
करडे गवत भेडसावते

आतले आणि बाहेरचे
एकजुटीने
मधल्याना हसतात
'न घरका, ना घाटका' म्हणतात

आतले आणि बाहेरचे;
रंगीत चष्म्याशिवाय बघणं
बिचाऱ्यांना समजूच शकत नाही

२५ जानेवारी, २०२१
* * * * * *

मातृदिन (हे आपलं निमित्त):
तुला वाटलं असेल, तू किती कष्ट घेतलेस ह्याची काहीच जाणीव नव्हती मला
तुला वाटलं असेल, तुझं सगळं बोलणं ह्या कानानी ऐकून त्या कानानी सोडून देतोय
एवढ्या दूर एकटा रहाणार ऐकल्याबरोबर तुझ्या डोळ्यात ठाकलेला,
माझ्या नेहमीच्या 'ह्याट!' नं चटकन करपून गेलेला,
अश्रु दिसला नसेल मला
तसं नव्हतं ग, तुला बहुतेक माहिती असणार... (असू दे!)
तुला सगळंच कळायचं
ह्या खडकाळ जमिनीत, काहीही रुजायला वेळ लागतो... फार
पानांवरच्या दंवानी आता नखशिखांत भिजलेले... फक्त मी
आणि अंधारात जागे रहाणारे माझे डोळे

७ मे, २०१६
* * * * * *

शब्दचित्र:
ते सगळे हसत हसत सफाईने ओरबाडतात
रेषही हलत नाही चेहऱ्यावरची म्हणतात
झोपण्यापूर्वी पोर्सेलिनचा मुखवटा काढून ठेवतो
तेव्हा चेहऱ्यावरचा रक्तबंबाळ रेषांचा गुंता फक्त त्यालाच दिसतो

११ ऑक्टोबर, २०१५

Comments