असाही तिळगूळ

काल फेसबुकवरचे तिळगुळ खाऊन गोड बोलण्याचे बरेच आदेश वाचून वरच्या मजल्यावरच्या ऑफिसातून खालच्या मजल्यावरच्या स्वैपाकघरात जेवायला गेलो. अर्धे पान व्यापून आक्रमकरीत्या उरलेल्या पानात पसरायची महत्वाकांक्षा बाळगणारी एक रस्सा भाजी आणि जरा जास्तच सावळ्या दिसणाऱ्या, रश्श्याच्या प्रेमामध्ये ओल्याचिंब भिजलेल्या पोळ्या वाढून तयार होत्या.

खायला सुरुवात केल्यावर, प्रत्यक्षात ज्याला रस्सा समजलो त्या रसायनामध्ये 'बैराग' मधल्या दिलीपकुमारसारखा बैंगनचा ट्रिपल रोल आहे हे जाणवलं. काही भागांमध्ये तो वांगी-बटाटे मुरंबा होता; काही भागात वांगी-बटाटे पंचामृत आणि उरलेल्या भागात भरल्या वांग्यांच्या दिशेने धावणारा रस्सा होता. ह्या रसायनामध्ये कोकोनट आणि पीनट ह्या दोन नटांव्यतिरिक्त मॉब सीनमधले एक्सट्रॉ म्हणून तिळाचे दाणे होते. ते फारच एक्सट्रॉ होते. सावळ्या रंगाची पोळी ही पोळी नसून, ते ज्वारी (का बाजरी)चे पापड होते. त्यात भाजलेले आणि तळलेले असे दोन्ही प्रकार होते. त्यातही तीळ फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ह्या मेनूमागील रहस्य उलगण्याचा प्रयत्न केल्यावर झालेले संभाषण:

'काय झालं, आज संक्रांत आहे ना, म्हणून तिळगुळाचे लाडू करायचे होते. पण सकाळी लक्षात आलं (आम्ही देशस्थ आहोत) की तीळ काही पुरेसे नाहीयेत घरात. तेवढ्यासाठी आता कुठे बाहेर जायचं? म्हणून म्हटलं, छानपैकी वांगी बटाटा रस्साच करू.'

'पण त्या रश्श्यात तर एवढे तीळ आहेत, आणि गूळ सुद्धा; तेवढे पुरले असते लाडूंना!'

'काहीतरी काय! ते तीळ नाहीयेत; बिया आहेत त्या वांग्यातल्या! खाव्या, चांगल्या असतात त्या.'

'पुढच्या वेळी लाडू केलेस तर गूळ ह्या रश्श्यापेक्षा थोडा कमी घाल हं. आणि नुसते पापड का भाजलेत त्याच्याबरोबर खायला?'

'अतीच करतोस हं! भाकऱ्या आहेत त्या. आणि केवढं तूप लावलंय मी त्यांना. ओह, काहींना राहिलं का लावायचं? मीठ थोsडं जास्त झालं, म्हणून एवढी नावं नकोत ठेवायला लगेच.'

'छे छे; मला वाटलं मी काही बेईमानी करेन ह्या भितीने आज रसदेत मीठ जास्त घातलंय. ह्या भाकऱ्यात तरी तीळच आहेत ना? का ज्वारी (बाजरी?) चं पीठच पुरं भरडलेलं नव्हतं?'

'संक्रांत आहे आज! आणि भाकरीत तीळ घालायची पद्धतच आहे.'

आज गोड बोलण्याची शपथ घेतली असल्याने एवढ्यावर संक्रांत निभावली.

माझ्या अभिव्यक्ती आणि लेखन स्वातंत्र्यावरची संक्रांत अजून यायची आहे. आता आज उद्याकडे येईलच.

(This is a work of fiction. Any resemblance to real events or characters is entirely coincidental.)


Comments